श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय २ रा

मगराने गजेंद्राला पकडणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा एक प्रसिद्ध, सुंदर, श्रेष्ठ पर्वत होता. तो दहा हजार योजने उंच होता. त्याची लांबी-रुंदी सुद्धा चारी बाजूंनी तेवढीच होती. त्याच्या चांदी, लोखंड आणि सोन्याच्या तिन्ही शिखरांच्या तेजाने समुद्र, दिशा आणि आकाश झगमगत असत. आणखीही त्याची कीतीतरी अशी शिखरे होती की जी रत्‍ने आणि धातूंच्या रंगीबेरंगी छटांनी सर्व दिशा प्रकाशित करीत असत. त्यांच्यावर वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, वेली आणि झुडपे होती. झर्‍यांच्या झुळझुळ वाहणार्‍या पाण्याने ती निनादित होत. सर्व बाजूंनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पाय धूत. त्या पर्वतावरील हिरवे पाचू रत्‍ने तेथील जमीन हिरवीगार करीत. सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठी येत. जेव्हा त्यांच्या संगीताच्या ध्वनीचा गुहांमध्ये प्रतिध्वनी उमटत असे, तेव्हा मोठमोठे सिंह त्याला दुसर्‍या सिंहाचा आवाज समजून आपणही जोराने गर्जना करीत. (१-६)

त्या पर्वताचे कडे निरनिराळ्या जंगली जनावरांच्या झुंडींनी सुशोभित झालेले असत. अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या देवतांच्या उद्यानांमध्ये सुंदर पक्षी मधुर कंठाने गात असत. त्याच्यावर पुष्कळशा नद्या आणि सरोवरे होती. त्यातील पाणी अत्यंत निर्मळ होते. त्यांच्या काठावर रत्‍नांची वाळू चमकत असे. त्यांमध्ये देवांगना स्नान करीत असत. त्यामुळे त्यांतील पाणी अत्यंत सुगंधित होऊन जाई. तो सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहात असे. (७-८)

त्रिकूटाच्या दरीमध्ये महात्मा भगवान वरुणाचे एक उद्यान होते. ऋतुमान असे त्याचे नाव होते. देवांगना त्यात क्रीडा करीत असत. तेथे सगळीकडे नेहमी फळाफुलांनी बहरलेले दिव्य वृक्ष शोभत होते. त्या उद्यानात मंदार, पारिजात, गुलाब, अशोक, चाफे, आम्रवृक्ष, चार, फणस, आंबाडा, सुपारी, नारळ, खजूर, महाळुंग, मोह, सागवान, ताड, तमाल, असणा, अर्जुन, रिठा, औदुंबर, पिंपरी, वड, पळस, चंदन, लिंब, कांचन, साल, देवदार, द्राक्ष ऊस, केळी, जांभूळ, बोर, रुद्राक्ष, हरडा, आवळा, बेल, कवठ, इडलिंबू, बिब्बा इत्यादी वृक्ष डोलत होते. त्या उद्यानात एक मोठे सरोवर होते. त्यात सोनेरी कमळे उमललेली होती. याशिवाय निरनिराळ्या जातीच्या कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल, कमळांच्या सौंदर्याने ते शोभून दिसत होते. त्यांवर धुंद भुंगे गुंजारव करीत होते. पक्ष्यांचा मनोहर किलबिलाट चालू होता. तेथे हंस, कारंडव, चक्रवाक, आणि सारस पक्ष्यांचे थवे होते. पाणकोंबडा आणि चातक यांचे कूजन चालू होते. मासे आणि कासव यांच्या हालचालींमुळे कमळपुष्पे डोलत होती आणि त्यांचे झडलेले पराग पाणी सुगंधित करीत होते. कदंब, वेत, बोरू, कंदबवेल इत्यादि वृक्षांनी ते वेढलेले होते. (९-१७)

कुंद, कोरांटी, अशोक, शिरीष, कुडा, हिंगणबेट, कटिशेवंती, सोनजुई, नागचाफा, पुन्नाग, जाई, मोगरा, शेवंती, कस्तुरमोगरा, कदंब इत्यादि पुष्पवृक्ष, तसेच तटावरील प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्यागार राहणार्‍या इतर वृक्षांनी ते सरोवर अत्यंत शोभायमान दिसत असे. (१८-१९)

तेथे एकदा त्या पर्वताच्या जंगलामध्ये अनेक हत्तिणींसह राहणारा एक गजेंद्र काटाकुट्यांनी भरलेल्या वेळू, बांबू, वेत, मोठमोठी झुडपे, झाडे यांना तुडवीत फिरत होता. त्या मदरसाच्या नुसत्या वासाने मोठेमोठे सिंह, हत्ती, वाघ, गेंडे, चित्ते, मोठमोठे नाग, काळी-गोरी वानरे, वन-गाई वगैरे भिऊन पळून जात. आणि त्याच्या मर्जीने लांडगे, डुकरे, रेडे, अस्वले, साळी, वानर, कुत्री, माकडे, हरिण, ससे इत्यादि लहानसहान प्राणी निर्भयतेने वावरत असत. हत्तीची वयात येणारी पिल्ले उन्हाने व्याकूळ झालेल्या त्याच्या पाठोपाठ येत होती. मोठमोठे हत्ती आणि हत्तिणी सुद्धा त्याच्याभोवती कडे करून चालल्या होत्या. त्याच्या प्रचंड शरीरामुळे पहाड सर्व बाजूंनी कापत होता. त्याच्या गंडस्थळातून स्रवणार्‍या मदाचे पान करण्यासाठी भ्रमर त्याच्या भोवती घिरट्या घालीत होते. लांबूनच कमळाच्या परागांनी सुगंधित झालेला वारा हुंगून त्याचे डोळे मदधुंद झाले होते. त्याला आणि त्याच्या कळपाला अतिशय तहान लागलेली होती. म्हणून तो लगबगीने सरोवराजवळ गेला. त्या सरोवराचे पाणी अत्यंत निर्मळ आणि अमृताप्रमाणे मधुर होते. सोनेरी आणि शुभ्र कमळांच्या परागांनी ते सुगंधित झाले होते. हत्ती अगोदर तेथे घुसून आपल्या सोंडेन भरपूर पाणी प्याला. नंतर त्या पाण्यात डुंबून त्याने आपला थकवा घालविला. गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे मायेने तो हत्ती आपल्या सोंडेने पाण्याचे फवारे उडवीत आपल्या बरोबरच्या हत्तिणी आणि पिल्लांना न्हाऊ घालू लागला. तसेच त्यांच्या तोंडात आपली सोंड घालून त्यांना पाणी पाजू लागला. भगवंतांच्या मायेने अजाण बनलेल्या उन्मत्त गजेंद्राला आपल्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे याची कल्पनाही नव्हती. (२०-२६)

परीक्षिता, त्याचवेळी त्याच्या प्रारब्धामुळे एका बलाढ्य मगराने त्याचा पाय पकडला. अशा तर्‍हेने योगायोगाने संकटात सापडलेल्या त्या अत्यंत बलवान गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्‍न केला. दुसरे हत्ती, हत्तिणी आणि त्यांच्या पिल्लांनी पाहिले की, त्यांच्या स्वामीला एक बलवान मगर मोठ्या वेगाने ओढून नेत आहे आणि तो अत्यंत घाबरलेला आहे. त्यांना अतिशय दुःख झाले. ते चित्कार करू लागले. पुष्कळांनी त्याला ओढून पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला; परंतु ते असमर्थ ठरले. गजेंद्र आणि मगर आपापली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते. कधी गजेंद्र मगराला बाहेर ओढीत होता तर कधी मगर गजेंद्राला आत ओढीत होता. परीक्षिता, अशा प्रकारे झुंज चालू असता एक हजार वर्षे निघुन गेली. तरीही दोघेजण जिवंत होते, हे पाहून देवसुद्धा आश्चर्यचकित झाले. (२७-२९)

पुष्कळ् काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढला गेल्यामुळे शेवटी गजेंद्राचे शरीर थकले. त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही की, मनामध्ये उत्साह राहिला नाही. इकडे मगर जलचरच होता. असे असल्याने त्याची शक्ति क्षीण होण्याऐवजी वाढली. अशा प्रकारे शरीरबलाचा अभिमान असणारा तो गजेंद्र एकाएकी प्राणसंकटात सापडला आणि स्वतःला सोडवून घेण्यात जेव्हा असमर्थ ठरला, तेव्हा आपल्या सुटकेच्या उपायावर त्याने पुष्कळ विचार केला. शेवटी त्याने ठरविले. "हा मगर म्हणजे विधात्याने मला लावलेला फासच आहे. याने मी कासावीस झालो आहे. हे माझे बांधव हत्तीसुद्धा जर मला या संकटातून सोडवू शकत नाहीत, तर या बिचार्‍या हत्तिणी कोठून सोडवू शकतील ? म्हणून आता मी परमेश्वरालाच शरण जातो. अत्यंत प्रचंड वेगाने धावणार्‍या काळरूप सर्पाला भिऊन जो कोणी शरण येतो, त्याला जो वाचवतो, तसेच ज्याच्या भितीने मृत्यूसुद्धा आपले काम करतो, तो जो कोणी जगदीश्वर असेल, त्यालाच मी शरण आहे. (३०-३३)

स्कंध आठवा - अध्याय दुसरा समाप्त

GO TOP