श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १ ला

मन्वंतरांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

परीक्षिताने विचारले - गुरुदेव, स्वायंभुव मनूचा वंश मी विस्ताराने ऐकला. याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी, आपली वंशपरंपरा चालविली होती. आता आपण आम्हांला दुसर्‍या मनूंविषयी सांगावे. हे ब्रह्मन, ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरामध्ये भगवंतांच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन करतात, ते आपण सांगावे. आम्ही त्याचे श्रवण करू इच्छितो. हे ब्रह्मन्, विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मन्वंतरांमध्ये ज्या ज्या लीला केल्या, सध्या ज्या करीत आहेत आणि यापुढील मन्वंतरांमध्ये ज्या काही करतील, ते सर्व आम्हांस ऐकवावे. (१-३)

श्रीशुक म्हणाले - या कल्पात स्वायंभुव वगैरे सहा मन्वंतरे होऊन गेली आहेत. त्यांपैकी पहिल्या मन्वंतराचे मी वर्णन केले. त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती. स्वायंभुव मनूची कन्या आकूतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहूतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी, भगवंतांनी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला. परीक्षिता, भगवान कपिलांचे वर्णन मी या आधीच तिसर्‍या स्कंधामध्ये केले आहे. आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केले, त्याचे वर्णन करतो. (४-६)

भगवान स्वायंभुव मनू सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राज्यत्याग करून पत्‍नी शतरूपेबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. परीक्षिता, सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून शंभर वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. त्यावेळी ते दररोज भगवंतांची अशी स्तुती करीत. (७-८)

मनू म्हणत - ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते, परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही, जे हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात, ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही, परंतु विश्वाला जे जाणतात, तेच हे परमात्मा. हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्व चराचर त्या परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहे. म्हणून मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्याने दिलेल्या वस्तूंचाच जीवन-निर्वाहासाठी उपभोग घ्यावा आणि कोणाच्याही धनाचा लोभ धरू नये. भगवंत सर्वांना पाहतात, पण त्यांना कोणी पाहात नाही. ज्यांची ज्ञानशक्ति अखंड आहे, त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणार्‍या असंग परमात्म्याला शरण जा. ज्यांचा आदी, अंत किंवा मध्य नाही, ज्यांना कोणी आपला नाही की परका नाही, कोणी बाहेर नाही की कोणी आत नाही, तेच विश्वाचे आदी, अंत, मध्य, आपले, परके, बाहेर, आत असे सर्व काही आहेत, ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे, तेच सत्य परब्रह्म आहेत. तेच परमात्मा विश्वरूप आहेत. त्यांना अनंत नावे आहेत. ते सर्वशक्तिमान, सत्य, स्वयंप्रकाश, अजन्मा आणि पुराणपुरुष आहेत. आपल्या शक्तिरूप मायेने जन्म वगैरेंचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूपमात्र राहतात. ऋषी नैष्कर्म्यसिद्धीसाठी आधी कर्मयोगाचे अनुष्ठान करतात. कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मांपासून मुक्त होतो. सर्वशक्तिमान भगवंतसुद्धा कर्मे करतात. परंतु ते आत्मलाभाने परिपूर्ण असल्याने त्या कर्मांमध्ये आसक्त होत नाहीत. म्हणून त्यांचे अनुकरण करणारेसुद्धा कर्मबंधनांपासून मुक्त होतात. भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही. ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही. कोणाच्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंदरूपानेच कर्म करीत असतात. आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात. तेच सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि त्यांचे रक्षक आहेत. त्या प्रभूंना मी शरण आलो आहे. (९-१६)

श्रीसुख म्हणतात - एकदा स्वायंभुव मनू एकाग्रचित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करीत होते. ते झोपेत बरळत आहेत असे वाटून भुकेलेले असुर व राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. हे पाहून अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम नावांच्या देवांसह तेथे आले. खाण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या त्या असुरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले. (१७-१८)

स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. तो अग्निपुत्र होता. धुमान, सुषेण, रोचिष्मान इत्यादी त्यांचे पुत्र होते. त्या मन्वन्तरात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्‍नी तुषिता होती. भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभू नावाने प्रसिद्ध झाले. ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन अठ्ठ्याऐंशी हजार व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य पालन केले. (१९-२२)

उत्तम हा तिसरा मनू होता. तो प्रियव्रताचा मुलगा होता. त्याच्या पुत्रांची नावे पवन, सृंजय, यज्ञहोत्र इत्यादी होती. त्या मन्वंतरात वसिष्ठांचे प्रमद इत्यादी सात पुत्र सप्तर्षी होते. सत्य, वेदश्रुत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजित होते. त्यावेळी धर्माची पत्‍नी सूनृता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाचा अवतार घेतला. त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण होते. त्यावेळचा इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतांनी असत्यपरायण, दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष, राक्षस तसेच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला. (२३-२६)

चौथ्या मनूचे नाव तामस असे होते. तिसचा मनू उत्तमाचा तो भाऊ होता. पृथू, ख्याती, नर, केतू इत्यादी त्याचे दहा पुत्र होते. सत्यक, हरी आणि वीर नावाचे देव होते. इंद्राचे नाव त्रिशिख असे होते. त्या मन्वंतरात ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षी होते. परीक्षिता, त्यावेळी विधृतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते. कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचविले. या मन्वंतरातही हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्‍नीपासून भगवंतांनी हरी नावाने अवतार घेतला. याच अवतारांत त्यांनी गजेंद्राचे मगरापासून रक्षण केले होते. (२७-३०)

परीक्षिताने विचारले, हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसे सोडविले, ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो. सर्व कथांमध्ये तीच कथा परम पुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे की ज्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन केलेले असते. (३१-३२)

सूत म्हणतात - शौनकादी ऋषींनो, राजा परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता. त्याने जेव्हा श्रीशुकदेवांना अशाप्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले, तेव्हा ते आनंदित झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेल्या सभेत ती कथा सांगू लागले. (३३)

स्कंध आठवा - अध्याय पहिला समाप्त

GO TOP