श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १५ वा

गृहस्थांसाठी मोक्षधर्मांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणतात – युधिष्ठिरा, काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये, काहींची तपश्चर्येमध्ये, काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरूपणामध्ये, काहींची आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये तर काहींची योग-साधनेत असते. गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ ब्राह्मणालाच हव्य-कव्याचे दान करावे. तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे. श्राद्धाच्या वेळी देवांसाठी दोन आणि पितरांसाठी तीन किंवा दोन्हींकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे. धनवान असणार्‍यानेसुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये. कारण आप्तेष्टांचा विस्तार केल्याने देश-कालानुसार श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही. देश आणि काळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधिपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय्य फळ देते. अन्न समर्पण करतेवेळी देव, ऋषी, पितर, अन्य प्राणी, स्वजन आणि स्वतःलासुद्धा परमात्मस्वरूपात पाहावे. (१-६)

धर्माचे मर्म जाणणार्‍या पुरुषाने श्राद्धाचेवेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये. कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहिंसेने नाही. ज्या लोकांना सद्धर्मपालनाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी, कोणत्याही प्राण्याला कायावाचामनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. यज्ञाचे मर्म जाणणारे काही ज्ञानी लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांचे हवन करतात आणि बाह्य क्रियाकर्मांपासून विरक्त होतात. जेव्हा एखादा पशुपुरोडाशादी द्रव्यमय यज्ञांनी यजन करू इच्छितो, तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा निर्दय मूर्ख आपल्याला निश्चितपणे मारील, या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात. म्हणून धर्म जाणणार्‍या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणार्‍या, मुनीजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्य-नैमित्तिक कर्मे करावीत आणि त्यात संतुष्ट असावे. (७-११)

विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत. अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणार्‍या पुरुषाने त्याग करावा. धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो ’विधर्म’ होय. आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म ’परधर्म’ होय. पाखंड किंवा दंभ म्हणजे ’उपधर्म’ किंवा ’उपमा’ होय. शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा ’छ्ल’ होय. आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो ’आभास’ होय. आपापल्या स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रमधर्म असतो, तो कोणाला शांती देणार नाही बरे ? (१२-१४)

निर्धन अशा धर्मात्म्या पुरुषाने शरीर निर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळविण्याचा प्रयत्‍न करू नये. कारण, कोणत्याही प्रकारचे प्रयत्‍न न करता अजगराची जशी उपजीविका चालते, त्याचप्रमाणे निवृत्तिपरायण पुरुषाची निवृत्तीच त्याची उपजीविका चालविते. आत्मसुखात रममाण होणार्‍या निष्क्रीय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते, जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वणवण हिंडतो, त्याला कसे बरे मिळू शकेल ? जसे पायात जोडे घालून चालणार्‍याला काट्याकुट्याची भीती वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या मनात संतोष आहे, त्याला नेहमी सर्व काही सुखच सुख असते. राजा ! माणूस फक्त पाण्यावरसुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का ? परंतु जननेंद्रिय आणि जीभ यांच्यामुळे दीनवाणा होऊन बिचारा कुत्र्यासारखा जगतो. असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रियलोलुपतेमुळे तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते. तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्या-पिण्याची इच्छा संपते. आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो; परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही. अनेक विषयांचे जाणकार, शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वानसुद्धा असंतोषामुळे अधःपतित होतात. (१५-२१)

संकल्पांचा त्याग करून कामाला, कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे. अध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांवर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्याद्वारा योग साधनेतील विघ्नांवर आणि शरीर, प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळविला पाहिजे. अधिभौतिक दुःखाला दयेने, अधिदैविक वेदनांना समाधीने आणि आध्यात्मिक दुःखाला योगबलाने तसेच झोपेला सात्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. सत्वगुणाच्या योगाने रजोगुण-तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्त्वगुणावर विजय मिळविला पाहिजे. श्रीगुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळविता येतो. हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत. जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो, त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय. मोठ-मोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहातात, प्रकृती आणि पुरुषाचे अधीश्वर असलेले ते गुरू साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात. (२२-२७)

शास्त्रामध्ये जितके नियम सांगितले आहेत, त्यांचे तात्पर्य हेच आहे की, कामादी सहा शत्रूंवर, सहा इंद्रियांवर विजय मिळवावा. एवढे करूनही जर त्या नियमांनी भगवंतांचे ध्यान करता आले नाही, तर सारा खटाटोप व्यर्थ आहे. जसे शेती, व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत्प्राप्ती, ते देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत, उलट अनर्थकारक फळ देतात. (२८-२९)

जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो, त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. एकांतात एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळलेले मर्यादित भोजन करावे. राजा ! पवित्र आणि सपाट जमिनीवर आपले आसन अंथरावे आणि त्यावर सुखावह रीतीने ताठ व स्थिर बसून ॐकाराचा जप करावा. जोपर्यंत मन विषयांपासून परावृत्त होत नाही, तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून, पूरक, कुंभक आणि रेचक करून प्राणायाम करावा. बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित्त जेथे जेथे जाईल, तेथून तेथून त्याला परत खेचून आणून हळू हळू हृदयात स्थिर करावे. जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो, तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो, त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचे चित्त शांत होते. अशा प्रकारे जेव्हा कामादी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात, तेव्हा चित्ताला ब्रह्मानंदाचा स्पर्श होतो. पुन्हा ते कधीही विकारयुक्त होत नाही. (३०-३५)

जो संन्यासी अगोदर धर्म, अर्थ आणि कामाचे मूळ कारण असलेल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो, तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो. जे आपल्या शरीराला अनात्मा, नाशिवंत आणि विष्ठा, कृमी तसेच राख समजले होते, तेच मूर्ख पुन्हा त्याला आत्मा समजून त्याची प्रशंसा करू लागतात. कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी, व्रतांचा त्याग केलेले ब्रह्मचारी, गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रियलोलुप संन्यासी हे चारही आश्रमांना कलंकभूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात. भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या त्या मूर्खांची कीवच केली पाहिजे. आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत आणि ज्याने आपल्या आत्म्याला परब्रह्मस्वरूप जाणले आहे, तो कोणत्या इच्छेने आणि कशासाठी इंद्रियांच्या अधीन होऊन आपल्या शरीराचे पोषण करील ? (३६-४०)

उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे – शरीर रथ आहे, इंद्रिये घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन लगाम आहे, शब्दादी विषय रस्ता आहे, बुद्धी सारथी आहे, चित्त हेच भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे. दहा प्राण धुरा आहेत, धर्म व अधर्म चाके आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे. ॐकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष्य आहे. (ह्या ॐकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे.) राग, द्वेष, लोभ, शोक, मोह, भय, मद, मान, अपमान, दुसर्‍यांच्या गुणांमध्ये दोष पाहाणे, कपट, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद, भूक आणि निद्रा हे आणि असेच अनेक जीवांचे शत्रू आहेत. त्यांमध्ये रजोगुण आणि तमोगुणप्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत. काही सत्त्वगुणप्रधान वृत्तीसुद्धा शत्रू असतात. हा मनुष्य शरीररूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिये कार्यरत आहेत, तोपर्यंत श्रीगुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेने धारदार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंतांच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्यसिंहासनावर विराजमान व्हावे आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचासुद्धा त्याग करावा. अन्यथा बेसावध जीवाला हे इंद्रियरूप दुष्ट घोडे आणि दुर्बुद्धिरूप सारथी भलत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरूप लुटारूंच्या हातात देतील. ते चोर, सारथी आणि घोड्यांसहित या जीवाला, मृत्यूचे अत्यंत भय असणार्‍या घोर अंधकारमय संसाराच्या विहीरीत ढकलून देतील. (४१-४६)

वैदिक कर्मे दोन प्रकारची असतात. प्रवृत्तिपर व निवृत्तिपर. प्रवृत्तिपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहाते आणि निवृत्तिपर ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते. श्येनयागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्वदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना ’इष्ट’ म्हटले जाते आणि देवालय, बगीचे, विहीरी बांधणे, पाणपोई घालणे यांसारखी लोकोपयोगी कामे ही ’पूर्तकर्मे’ होत. ही सर्व प्रवृत्तिपर काम्यकर्मे आहेत. आणि ती अशांतीला कारण ठरतात. हे राजा, मेल्यावर प्रवृत्तिमार्गी पुरुष चरू, पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सूक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धूमाभिमानी देवतांच्या जवळ जातो. नंतर तेथून अनुक्रमे रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोहोचतो. तेथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सूक्ष्म देह अनुक्रमे वनस्पती, अन्न आणि वीर्य यांच्या रूपांत परिणत होऊन पितृयानमार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो. अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकांत जाऊन पुण्यभोग संपल्यावर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. गर्भधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्च संस्कारांनी युक्त असलेला निवृत्तिमार्गी द्विज सर्व द्रव्ययज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या इंद्रियांमध्ये हवन करतो. इंद्रियांना दर्शनादिसंकल्परूप मनामध्ये, मनाला परा वाणीमध्ये आणि परा वाणीला वर्णसमुदायांमध्ये, वर्णसमुदायाला ’अ उ म’ या तीन स्वरांच्या रूपात राहणार्‍या ॐकारामध्ये, ॐकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला सूत्रात्मारूप प्राणामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. अशा रीतीने तो निवृत्तिनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी, सूर्य, दिवस, मध्याह्न, शुक्लपक्ष, पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्याजवळ जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले ’विश्व’ शरीर सूक्ष्मामध्ये विलीन करून सूक्ष्म उपाधियुक्त ’तैजस’ होतो. नंतर सूक्ष्म उपाधीचा कारणशरीरामध्ये लय करून कारणोपाधिक ’प्राज्ञ’ होतो. नंतर त्या शरीराचा लय करून ’तुरीय’ रूपात राहातो. अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहतो. हेच मोक्षपद होय. याला देवयान मार्ग म्हणतात. या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसर्‍या देवतेकडे जात ब्रह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थित होतो. तो पुन्हा जन्माला येत नाही. (४७-५५)

पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो, तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. जो उत्पन्न होणार्‍या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषयरूपाने बाहेर आणि भोक्तारूपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाणणे आणि जाणण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तूंच्या रूपामध्ये सर्व काही हा तत्त्ववेत्ताच असतो. (म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही.) आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते, त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणार्‍या वस्तू सत्य नाहीत, हे विचार, युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊनसुद्धा खर्‍या वाटतात. या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचमहाभूतांचा समूह नाही, की परिणामही नाही; ते आपल्या अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तशीच पंचमहाभूतेसुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून – सूक्ष्मभूतांपासून वेगळी नाहीत; पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवीचे अस्तित्व सापडत नाही. म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते. तेव्हा हे अवयवसुद्धा असत्य आहेत, हे आपोआप सिद्ध होते. अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्त्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की, ज्या वस्तू अगोदर होत्या, त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधि-निषेधाचे शास्त्र असते. (५६-६१)

जे विवेकी पुरुष स्वानुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अशा त्रिविध अद्वैताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि द्रष्टा, दर्शन दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. वस्त्र जसे सूतरूपच असते, तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे, त्यांत भेद नाही, असे जाणणे म्हणजे ’भावाद्वैत’. (परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत.) युधिष्ठिरा ! मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वतः परमात्म्यामध्येच होत आहेत, हा भाव ठेऊन सर्व कर्मे त्याला समर्पण करणे हे ’क्रियाद्वैत’ होय. स्वतः, स्त्री-पुत्रादी नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोक्ता जीव हाच परमात्मा आहे, या प्रकारचा विचार म्हणजे ’द्रव्याद्वैत’ होय. (६२-६५)

युधिष्ठिरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य, ज्यावेळी, ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल, ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तिकाल वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या, तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवद्‌भक्त मनुष्य घरात राहूनसुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. युधिष्ठिरा, हेच पहा ना ! तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले. (६६-६८)

पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी, मी एक गंधर्व होतो. उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यांमुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अतिशय प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलांचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. ते कळल्यावर मी स्त्रियांसह (वेड्यासारखा) गात तेथे गेलो. हा आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून त्यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की, “तू आमची अवहेलना केली आहेस; म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्यांच्या शापाने मी दासी-पुत्र झालो; परंतु त्या शूद्र-जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवाशुश्रुषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने गृहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो. (६९-७४)

या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्यरूपात गुप्तरूपाने निवास करते. म्हणूनच सार्‍या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहित, परम शांत, परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरू आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत ! (७५-७७)

श्रीशुक म्हणतात – देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत, हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. अशा प्रकारे मी तुला दक्षकन्यांच्या वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशांमध्ये देव, असुर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली. (७८-८०)

स्कंध सातवा - अध्याय पंधरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP