श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १४ वा

गृहस्थाचे सदाचार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

युधिष्ठिराने विचारले – हे देवर्षी, माझ्यासारखा गृहासक्त माणूस सहजपणे कोणत्या साधनाने हे पद प्राप्त करू शकेल ? (१)

नारद म्हणाले – राजा ! मनुष्याने गृहस्थाश्रमात गृहस्थधर्मानुसार सगळी कामे करून ती भगवंतांना समर्पण करावीत आणि महात्म्यांची सेवा करावी. सवडीप्रमाणे विरक्त पुरुषांबरोबर वारंवार श्रद्धापूर्वक भगवंतांच्या अवतारांच्या कथामृताचे पान करीत राहावे. जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींशी आसक्त राहत नाही, तसेच सत्संगाने जसजशी बुद्धी शुद्ध होत जाईल, तसतशी आपोआप सुटणार्‍या शरीर, स्त्री, पुत्र इत्यादींची आसक्ती आपणहून सोडावी. बुद्धिमान पुरुषाने आवश्यक तेवढीच घर आणि शरीर यांची काळजी घ्यावी. अधिक नको. आतून विरक्त राहून बाहेरून विषयासक्त असल्याप्रमाणे लोकांमध्ये व्यवहार करावा. माता-पिता, बंधू-बांधव, पुत्र-मित्र आणि दुसरे जे काही म्हणतील किंवा जे काही इच्छितील, त्याला आतून ममता न ठेवता होकार द्यावा. (२-६)

बुद्धिमान पुरुषाने पाऊस वगैरेमुळे उत्पन्न होणारे अन्न वगैरे, पृथ्वीपासून उत्पन्न होणारे सोने इत्यादी, तसेच अकस्मात प्राप्त होणारे द्रव्य इत्यादी सर्व भगवंतांनीच दिले आहे असे समजून प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यावा व उरलेल्याचा सत्कृत्यात उपयोग करावा. जेवढ्यावर भूक भागेल, तेवढ्यावरच मनुष्याचा अधिकार आहे. यापेक्षा अधिक संपत्ती जो आपली आहे, असे मानतो, तो चोर होय. तो शिक्षेला पात्र ठरतो. हरीण, उंट, गाढव, वानर, उंदीर, सरपटणारे प्राणी, पक्षी, माशी इत्यादींना आपल्या पुत्राप्रमाणेच समजावे. तसे पाहाता त्यांच्यात आणि पुत्रात काय फरक आहे ? गृहस्थाश्रमी मनुष्यानेसुद्धा धर्म, अर्थ आणि काम यांच्यासाठी फार कष्ट करू नयेत. परंतु देश, काल आणि प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असावे. आपल्याकडील सर्व सामग्री कुत्री, पतित, चांडाळ इत्यादी सर्व प्राण्यांना यथायोग्य वाटून नंतरच स्वतः उपयोगात आणावी. एवढेच काय, जिला मनुष्य आपली समजतो, त्या आपल्या पत्‍नीलासुद्धा अतिथी इत्यादींच्या निर्दोष सेवेत लावावे. जिच्यासाठी लोक प्राणसुद्धा देतात, प्रसंगी आपले आई-बाप आणि गुरूलासुद्धा मारतात, त्या पत्‍नीवरचे प्रेम ज्याने काढून घेतले, त्याने नित्यविजयी भगवंतांवरसुद्धा विजय मिळविला असे समजावे. शेवटी किडे, विष्ठा किंव राखेचा ढीग होऊन जाणारे हे तुच्छ शरीर कोठे आणि यासाठी जिच्याविषयी आसक्ती असते ती स्त्री कोठे आणि आपल्या महिम्याने आकाशालाही झाकून टाकणारा हा आत्मा कोठे ? (७-१३)

प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादीतून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा. जो बुद्धिमान पुरुष याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये माझेपण ठेवीत नाही, त्याला संतपद प्राप्त होते. आपल्या वर्णाश्रमानुसार असलेल्या व्यवसायाने मिळालेल्या सामग्रीने दररोज देव, ऋषी, मनुष्य, भूत, पितृगण आणि आपल्या आत्म्याचे पूजन करावे. एकाच परमेश्वराची वेगवेगळ्या रूपांतील ही आराधना होय. जर आपला अधिकार इत्यादी आणि यज्ञासाठी आवश्यक सर्व वस्तू प्राप्त झाल्या, तर मोठ मोठे यज्ञ किंवा अग्निहोत्र इत्यादी करून भगवंतांची आराधना करावी. राजा, सर्व यज्ञांचे भोक्ते भगवंतच आहेत. परंतु ब्राह्मणाच्या मुखात अर्पण केलेल्या अन्नाने त्यांची जशी तृप्ती होते, तशी अग्निमुखात हवन केल्यानेही होत नाही. म्हणून ब्राह्मण, देवता, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांना उपयुक्त असणार्‍या वस्तू देऊन सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असलेल्या भगवंतांची पूजा करावी. यांत ब्राह्मणांना प्राधान्य द्यावे. (१४-१८)

धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे. याशिवाय कर्क व मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यतीपात, दिनक्षय, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाची वेळ, द्वादशी, श्रवण, धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्रांच्या वेळी, अक्षय्य तृतीया, कार्तिक शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांची कृष्णाष्टमी, माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यातील मघा नक्षत्राने युक्त पौर्णिमा, आणि प्रत्येक महिन्यातील मासनक्षत्र, जसे चित्रा, विशाखा, ज्येष्ठा इत्यादींनी युक्त असेल ती पौर्णिमा; मग त्या दिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो, द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तराभाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीचा तिन्ही उत्तरा नक्षत्रांचा योग किंवा जन्म नक्षत्र वा श्रवण नक्षत्राचा योग, या सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत. हे योग फक्त श्राद्धासाठीच नव्हेत, तर सर्व पुण्य कर्मांसाठी उपयोगी आहेत. हे कल्याणकारक आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत. या वेळी सर्वप्रकारे शुभ कर्मे केली पाहिजेत. त्यातच आयुष्याची सार्थकता आहे. या शुभ संयोगांच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव, ब्राह्मणांची पूजा केली जाते, किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते, त्याचे मिळणारे फळ चिरकाल टिकणारे असते. युधिष्ठिरा, याचप्रमाणे पत्‍नीचे पुंसवनादी संस्कार, मुलांचे जातकर्मादी संस्कार, तसेच स्वतःचे यज्ञदीक्षादी संस्कार, प्रेतसंस्कार, वार्षिक श्राद्धे तसेच अन्य मंगल कर्मांच्या वेळी दान इत्यादी पुण्यकर्मे केली असता ती अक्षय्य फळ देतात. (१९-२६)

जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते, त्या स्थानांचे मी आता वर्णन करतो. जेथे सत्पात्र व्यक्ती आढळतात, तो सर्वांत पवित्र देश होय. ज्यांच्यामध्ये हे चराचर जग राहिले आहे, त्या भगवंतांच्या मूर्ती ज्या ठिकाणी असतील, जेथे तप, विद्या, दया आदी गुणांनी संपन्न ब्राह्मण निवास करीत असतील, जेथे जेथे भगवंतांची पूजा होते आणि जेथे पुराणप्रसिद्ध गंगा इत्यादी नद्या आहेत, ती सर्व स्थाने कल्याणकारी होत. पुष्कर वगैरे सरोवरे, सिद्धपुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्रे, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, पुलहाश्रम, नैमिषारण्य, फाल्गुन क्षेत्र (कन्याकुमारी), सेतुबंध, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपासरोवर, बिंदुसरोवर, बदरिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामांचे आश्रम, महेंद्र, मलय इत्यादी कुलपर्वत, तसेच जेथे जेथे भगवंतांच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते, ते सर्व देश अत्यंत पवित्र होत. आपले कल्याण इच्छिणार्‍याने वारंवार या स्थानी गेले पाहिजे. या ठिकाणी जी पुण्यकर्मे केली जातात, त्यांचे माणसांना हजार पटीने फळ मिळते. (२७-३३)

युधिष्ठिरा, योग्य कोण याचा निर्णय करतेवेळी पात्रतेचे निकष जाणणार्‍या विवेकी पुरुषांनी हे चराचर जग ज्यांचे स्वरूप आहे, त्या एकमात्र भगवंतांनाच सत्पात्र ठरविले आहे. राजा, तुझ्या या यज्ञात देव, ऋषी, सिद्ध आणि सनकादिक असूनही अग्रपूजेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच पात्र ठरविले. असंख्य जीवांनी भरलेल्या या ब्रह्मांडरूप महावृक्षाचे एकमात्र मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून त्यांची पूजा केल्याने सर्व जीवांचा आत्मा तृप्त होतो. त्यांनी मनुष्य, पशु-पक्षी, ऋषी, देव इत्यादींची शरीररूप नगरे निर्माण केली आणि तेच या नगरांमध्ये जीवरूपाने राहातात, म्हणून त्यांना पुरुष म्हणतात. युधिष्ठिरा, भगवंत या मनुष्यादी शरीरांमध्ये त्यांच्या वेगवेगळेपणामुळे कमी-अधिक रूपाने प्रकाशमान झालेले आहेत. म्हणून मनुष्यच अधिक श्रेष्ठ पात्र आहे आणि मनुष्यांमध्येसुद्धा ज्यांच्यामध्ये तप, योग वगैरे भगवंतांचा अंश अधिक आढळतो, ते तितकेच अधिक श्रेष्ठ होत. (३४-३८)

युधिष्ठिरा, त्रेतादी युगांमध्ये जेव्हा विद्वानांना आढळले की, मनुष्ये परस्परांचा तिरस्कार, द्वेष, अपमान करतात, तेव्हा त्या लोकांनी उपासनेसाठी भगवंतांच्या प्रतिमांची योजना केली. तेव्हापासून पुष्कळसे लोक अत्यंत श्रेद्धेने प्रतिमांमध्ये भगवंतांची पूजा करतात. परंतु जे माणसांचा द्वेष करतात, त्यांना प्रतिमेची उपासना करूनसुद्धा फळ मिळू शकत नाही. युधिष्ठिरा, मनुष्यांमध्येसुद्धा ब्राह्मण उत्तम पात्र मानला गेला आहे. कारण तो आपली तपश्चर्या, विद्या, संतोष वगैरे गुणांनी भगवंतांचे वेदरूप शरीर धारण करतो. महाराज, हे जे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे श्रेष्ठ देवही ब्राह्मणच आहेत, जे आपल्या चरणधुळीने तिन्ही लोक पवित्र करतात. (३९-४२)

स्कंध सातवा - अध्याय चवदावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP