|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ७ वा - अध्याय १३ वा
यतिधर्माचे निरूपण आणि अवधूत-प्रल्हाद-संवाद - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] नारद म्हणतात – वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषामध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल, तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा. तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता, एका गावात एक रात्र राहण्याचा नियम करून पृथ्वीवर संचार करावा. जर वस्त्र नेसावयाचे असेल, तर गुप्त अंग झाकण्यासाठी फक्त लंगोटी नेसावी. आणि काही आपत्ती नसेल तर दंड आणि आश्रमाचे चिन्ह असणार्या वस्तूंखेरीज, त्याग केलेली कोणतीही वस्तू पुन्हा ग्रहण करू नये. संन्याशाने सर्व प्राण्यांचे हित चिंतावे, शांत राहावे, भगवत्परायण राहावे आणि कोणाचाही आश्रय न घेता स्वतःतच रमावे आणि एकट्यानेच संचार करावा. हे संपूर्ण विश्व, कार्य आणि कारणापासून वेगळ्या असलेल्या परमात्म्यामध्ये अंतर्भूत आहे असे जाणावे आणि कार्यकारणस्वरूप या जगामध्ये ब्रह्मस्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याला परिपूर्ण रूपात पाहावे. आत्म्याकडेच लक्ष असणार्या संन्याशाने सुषुप्ती आणि जागृती या दोन्हींच्या संधिकालात आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि बंधन व मोक्ष ही दोन्ही केवळ माया आहेत, सत्य स्वरूपात काही नाही, असे समजावे. शरीराच्या अवश्य होणार्या मृत्यूचे किंवा अनिश्चित जीवनाचेही अभिनंदन करू नये. सर्व प्राण्यांची उत्पत्ती आणि नाशाला कारणीभूत असणार्या काळाची फक्त वाट पाहात राहावे. अनात्म वस्तूंचे प्रतिपादन करणार्या शास्त्रांची आवड नसावी. आपल्या जीवननिर्वाहासाठी काही काम करू नये. केवळ वाद-विवाद करण्यासाठी काही तर्क करू नये किंवा कोणाचीही बाजू घेऊ नये. शिष्यसमुदाय जोडू नये, पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास करू नये, व्याख्यान देऊ नये आणि कोणतीही कामे सुरू करू नयेत. शांत, समदर्शी, महात्म्या संन्याशाला धर्म म्हणून कोणत्याही आश्रमाचे बंधन नाही. आपल्या आश्रमाची चिन्हे त्याने धारण करावीत किंवा करू नयेत. त्याच्याजवळ आश्रमाचे काही चिन्ह नसो; परंतु त्याने आत्मानुसंधानात मग्न असावे. त्याने अत्यंत विचारशील असावे, परंतु लोकांत वेडा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वतःला दाखवावे. स्वतः प्रतिभाशाली असूनही माणसांना असे वाटले पाहिजे की, हा मुका आहे. (१-१०) याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. अजगराप्रमाणे राहणारा मुनी आणि प्रल्हाद यांच्यामधील तो संवाद आहे. भगवंतांचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांसह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होता. त्याने पाहिले की, सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी जमिनीवरच एक मुनी पडून राहिले आहेत. त्यांचे अंग धुळीने माखले असल्याने त्यांचे निर्मळ तेज झाकले गेले होते. त्यांचे कर्म, रूप, वाणी आणि वर्ण-आश्रम-चिन्हे यांवरून ते कोणी सिद्ध पुरूष आहेत किंवा नाहीत, हे लोकांना समजू शकत नव्हते. भगवंतांचा भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्यांच्या चरणांवर ठेऊन नमस्कार केला आणि विधिपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांना हा प्रश्न केला. ब्रह्मन, उद्योगी आणि भोगी पुरुषांच्याप्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे. जगाचा हा नियम आहे की, उद्योग करणार्यालाच धन मिळते, धनवानालाच भोग प्राप्त होतात आणि भोगी लोकांचेच शरीर धष्टपुष्ट असते. याखेरीज पुष्टीचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. आपण तर काही उद्योग करीत नाही, असेच पडून राहाता. म्हणून आपल्याजवळ धन नाही. मग आपल्याला भोग कोठून मिळणार ? भोगाखेरीजच आपले हे शरीर धष्टपुष्ट कसे ? हे विप्रवर, हे आम्ही ऐकण्यासारखे असेल, तर सांगावे. आपण विद्वान, समर्थ आणि चतुर आहात. आपले बोलणे अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे. असे असताही आपण सर्व जग कर्म करीत असलेले पाहूनसुद्धा समभावाने पडून आहात, याचे कारण काय ? (११-१८) नारद म्हणतात – जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रश्न केला, तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले. (१९) महामुनी म्हणाले – दैत्यराज, सर्वश्रेष्ठ पुरुष तुझा सन्मान करतात. मनुष्यांना कर्मांची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळते, ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच. तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात. तरीसुद्धा राजा, मी जसे जाणले आहे, त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. कारण आत्मशुद्धीची इच्छा असणार्यांनी तुझा सन्मान अवश्य केला पाहिजे. (२०-२२) इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही. तिच्यामुळेच जन्ममृत्यूच्या फेर्यात फिरावे लागते. तिने माझ्याकडून अनेक कर्मे करवून असंख्य योनींमध्ये मला जन्माला घातले. कर्मांमुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे. ही स्वर्ग, मोक्ष, तिर्यग्योनी तसेच या मानवदेहाच्या प्राप्तीचे द्वार आहे. संसारातील स्त्री-पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते, हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो आहे. (२३-२५) सुखच आत्म्याचे स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे. तसेच सर्व भोग ही मनोराज्ये आहेत, असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहातो. मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप, त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहातो. अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो. प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीरादिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहातो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो. तो आपल्या प्रयत्नांत सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात. नेहमी शारीरिक वैगेरे दुःखांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी, त्याला मरण हे येणारच असल्याने, त्यांचा काय उपयोग ? लोभी आणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहातच आहे. भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो. जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत, ते राजा, चोर, शत्रू, स्वजन, पशु-पक्षी, याचक, काळ, इतकेच काय स्वतःलासुद्धा भीत असतात. म्हणून ज्याच्यामुळे शोक, मोह, क्रोध, राग, भय, परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात, त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा. (२६-३३) अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वांत मोठे गुरू आहेत. त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हांला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे. मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते, तसेच लोक मोठ्या कष्टाने धन-संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो. यावरून सर्व विषयभोगांपासून अलिप्त राहिले पाहिजे, हे मी शिकलो. मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहातो आणि दैवाने जे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहातो. कधी थोडे अन्न खातो, तर कधी पुष्कळ. कधी स्वादिष्ट, तर कधी बेचव आणि कधी अनेक गुणांनी युक्त तर कधी अजिबात गुण नसलेले. कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो, तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावरसुद्धा पुन्हा भोजन करतो. मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणार्या भोगांवरच संतुष्ट असतो. म्हणून मला रेशमी, सुती, हरिणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र, झाडाची साल किंवा आणखी काहीही, जे वस्त्र मिळेल ते मी अंगावर घालतो. मी कधी जमिनीवर, गवतावर, पानांवर, दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहातो, तर कधी दुसर्यांच्या इच्छेनुसार महालांतील पलंगावरील गादीवरही झोपतो. दैत्यराज, कधी स्नान करून, शरीराला चंदन लावून, सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ, हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो, तर कधी पिशाच्चासारखा अगदी नग्नपणे हिंडतो. माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच; म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही. मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो. (३४-४२) सत्याचे अनुसंधान ठेवणार्या मनुष्याने, त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात, त्यांचे चित्तवृत्तीमध्ये हवन करावे. या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणार्या चित्तवृत्तीला मनामध्ये, मनाला सात्विक अहंकारात आणि सात्विक अहंकाराला महत्तत्त्वाद्वारे मायेत हवन करावे. अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे, असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थित होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे. माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे. तू भगवंतांचा परम भक्त आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले. (४३-४५) नारद म्हणतात – मुनींकडून परमहंसांच्या या धर्मांचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले. (४६) स्कंध सातवा - अध्याय तेरावा समाप्त |