|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ७ वा - अध्याय १२ वा
ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] नारद म्हणतात – गुरुकुलात निवास करणार्या ब्रह्मचार्याने आपली इंद्रिये स्वाधीन ठेऊन दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे, गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवावे आणि त्यांच्या हिताचे असेल तेच कार्य करावे. सायंकाळी आणि प्रातःकाळी गुरू, अग्नी, सूर्य आणि श्रेष्ठ देवतांची उपासना करावी आणि मौन राहून एकाग्रतेने गायत्रीचा जप करीत दोन्ही वेळेची संध्या करावी. (१-२) गुरुजी जेव्हा बोलावतील, तेव्हा संपूर्ण शिस्त पाळून त्यांच्याकडून वेदांचे अध्ययन करावे. पाठाच्या प्रारंभी आणि शेवटी त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करावा. शास्त्राच्या आज्ञेनुसार मेखला, मृगचर्म, वस्त्र, जटा, दंड, कमंडलू, यज्ञोपवित आणि हातामध्ये दर्भपवित्र धारण करावे. सायंकाळी आणि प्रातःकाळी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरुजींना समर्पित करावी. त्यांनी अनुज्ञा दिली तर भोजन करावे, नाहीतर उपास करावा. आपल्या शीलाचे रक्षण करावे. थोडे खावे, आपले काम निपुणतेने करावे, श्रद्धा ठेवावी आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे. स्त्री आणि स्त्रियांच्या अधीन राहणारे यांच्याशी आवश्यक असेल, तेवढाच व्यवहार करावा. जो गृहस्थाश्रमी नाही आणि ब्रह्मचारी आहे, त्याने स्त्रियांविषयी चाललेल्या गोष्टींपासून अलिप्त राहावे. इंद्रिये अतिशय बलवान आहेत. प्रयत्न करणार्यांचे मनसुद्धा ती क्षुब्ध करून त्यांना आपल्याकडे ओढतात. तरुण ब्रह्मचार्याने तरुण गुरूपत्नीकडून भांग पाडणे, शरीराला मालिश करणे, स्नान घालणे, उटणे लावणे यांसारखी कामे करून घेऊ नयेत. स्त्रिया अग्नीप्रमाणे तर पुरुष तुपाच्या घड्याप्रमाणे होत. आपल्या कन्येबरोबरसुद्धा एकांतात राहू नये. इतर वेळी सुद्धा जरुरीपुरतेच तिच्याजवळ असावे. जोपर्यंत हा जीव आत्मसाक्षात्काराने हा देह आणि इंद्रिये केवळ आभास आहेत असा निश्चय करून स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत “हा पुरुष आणि ही स्त्री” हे द्वैत संपत नाही. तोपर्यंत त्याची भोगबुद्धी कायम असते. हे निश्चित. (३-१०) शील-रक्षणाचे हे सर्व नियम गृहस्थ व संन्यासी या दोघांनाही लागू आहेत. गृहस्थाश्रम्याने गुरुकुलात राहून गुरूची सेवा करणे हे (समयानुसार) ऐच्छिक आहे. कारण पत्नीच्या ऋतुकाळी त्याला तेथून घरी जावे लागते. ब्रह्मचार्याने काजळ घालणे, तेल लावणे, मालिश करणे, स्त्रियांची चित्रे काढणे, मांस खाणे, मद्य पिणे, फुलांचे हार घालणे, अत्तर, सुवासिक तेल, चंदन लावणे आणि अलंकार घालणे यांचा त्याग करावा. अशा प्रकारे गुरुकुलात वास्तव्य करून द्विजांनी आपली शक्ती आणि आवश्यकता पाहून वेद, त्यांची सहा अंगे आणि उपनिषदे यांचे, अध्ययन करावे. तसेच त्यांचा अर्थ समजून घ्यावा. तसेच जर सामर्थ्य असेल, तर गुरू मागतील तेवढी दक्षिणा द्यावी. नंतर त्यांच्या आज्ञेने गृहस्थ, वानप्रस्थ किंआ संन्यास आश्रमात प्रवेश करावा किंवा जन्मभर ब्रह्मचर्याचे पालन करीत त्याच आश्रमात राहावे. जरी भगवंत स्वाभाविकपणे सर्व ठिकाणी व्यापून असल्यामुळे त्यांचे येणेजाणे असू शकत नाही, तरीसुद्धा अग्नी, गुरू, आत्मा आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वतःच्या अंशभूत जीवरूपाने ते प्रविष्ट आहेत, असे पाहावे. अशा प्रकारे आचरण करणारा ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी किंवा गृहस्थ विज्ञानसंपन्न होऊन परब्रह्मतत्वाचा अनुभव घेतो. (११-१६) आता मी ऋषींच्या मतानुसार वानप्रस्थ आश्रमाचे नियम सांगतो. यांचे आचरण केल्याने वानप्रस्थाश्रम्याला अनायासेच ऋषींचे लोक जे महर्लोक त्यांची प्राप्ती होते. वानप्रस्थ आश्रमात असणार्याने नांगरलेल्या जमिनीतून उत्पन्न होणारे धान्य खाऊ नये. न नांगरलेल्या जमिनीतील धान्यसुद्धा अयोग्य वेळी पक्व झाले असेल तर खाऊ नये. अग्नीवर शिजविलेले अथवा कच्चे अन्नही खाऊ नये. फक्त सूर्याच्या उष्णतेने पिकलेली कंदमुळे, फळे इत्यादी सेवन करावी. जंगलात आपोआप उगवलेल्या धान्याचे नित्य-नैमित्तिक कर्मांचे वेळी चरू पुरोडाश करून हवन करावे. जेव्हा नवीन धान्य वगैरे मिळू लगेल, तेव्हा अगोदर साठविलेले धान्य टाकून द्यावे. अग्निहोत्राच्या अग्नीचे रक्षण करण्यासाठीच घर, पर्णकुटी किंवा गुहेचा आश्रय घ्यावा. स्वतः थंडी, वारा, अग्नी, पाऊस आणि सूर्याचे ऊन सहन करावे. डोक्यावर जटा धारण कराव्यात आणि केस, नखे, दाढी-मिशा काढू नयेत. तसेच शरीरावरील मळही काढू नये. कमंडलू, मृगचर्म, दंड, वल्कले आणि अग्निहोत्राची सामग्री आपल्याजवळ ठेवावी. विवेकी मुनीने बारा, आठ, चार, दोन किंवा एक वर्षपर्यंत वानप्रस्थ आश्रमाच्या नियमांचे पालन करावे. अधिक काळ तपश्चर्या केल्यामुळे बुद्धी विकल होणार नाही, याचे भान राखावे. (१७-२२) वानप्रस्थ पुरुष आजार किंवा म्हातारपण यांमुळे आपली कर्मे पूर्ण करू शकत नसेल आणि वेदांत-विचार करण्याचे सामर्थ्यही त्याच्यामध्ये नसेल तर त्याने अनशनादी व्रत करावे. अनशन सुरू करण्यापूर्वीच त्याने आपल्या आहवनीय इत्यादी अग्नींना आपल्या आत्म्यामध्ये विलीन करून घ्यावे. ’मी माझेपणा’ चा त्याग करून शरीराला त्याच्या कारणभूत तत्त्वांमध्ये योग्य तर्हेने विलीन करावे. जितेंद्रिय पुरुषाने आपल्या शरीरातील आकाशाला आकाशात, प्राणांना वायूमध्ये, उष्णतेला अग्नीमध्ये, रक्त, कफ, पू या पाण्याच्या तत्त्वांना पाण्यामध्ये आणि हाडे इत्यादी कठीण वस्तूंना पृथ्वीमध्ये लीन करावे. हे राजा, याचप्रमाणे वाणी आणि भाषण यांना त्यांची अधिष्ठात्री देवता अग्नीमध्ये, हात आणि कलाकौशल्याला इंद्रामध्ये, पाय आणि त्यांच्या गतीला कालस्वरूप विष्णूमध्ये, रती आणि उपस्थ इंद्रियाला प्रजापतीमध्ये, पायू आणि मलोत्सर्गाला त्यांच्या आश्रयानुसार मृत्यूमध्ये लीन करावे. कान आणि शब्दाला दिशांमध्ये, स्पर्श आणि त्वचेला वायूमध्ये, डोळ्यांसहित रूपाला ज्योतीमध्ये, रसांसहित रसनेंद्रियाला पाण्यामध्ये आणि गंधासह नाकाला पृथ्वीमध्ये विलीन करावे. मनोरथासह मनाला चंद्रामध्ये, जाणण्याजोग्या पदार्थांसह बुद्धीला ब्रह्मदेवामध्ये, तसेच अहंता आणि ममतारूप क्रिया करणार्या अहंकाराला त्याच्या कर्मांसह रुद्रामध्ये विलीन करावे. याचप्रमाणे चेतनेसहित चित्ताला क्षेत्रज्ञामध्ये आणि गुणांमुळे विकारी वाटणार्या जीवाला परब्रह्मामध्ये लीन करावे. त्याचबरोबर पृथ्वीला पाण्यात, पाण्याला अग्नीमध्ये, अग्नीला वायूमध्ये, वायूला आकाशात, आकाशाला अहंकारामध्ये, अहंकाराला महत्तत्त्वामध्ये, महत्तत्त्वाला अव्यक्तामध्ये आणि अव्यक्ताला अविनाशी परमात्म्यामध्ये विलीन करावे. याप्रमाणे अविनाशी परमात्म्याच्या रूपामध्ये शिल्लक राहिलेली जी चिद्वस्तू आहे, तो आत्मा आहे, तो मी आहे, हे जाणून अद्वितीय भावामध्ये स्थिर व्हावे. जसे आपले आश्रय असणारे लाकूड भस्म झाल्यावर अग्नी शांत होऊन आपल्या मूळ रूपात राहतो, तसेच त्यानेसुद्धा राहावे. (२३-३१) स्कंध सातवा - अध्याय बारावा समाप्त |