|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ७ वा - अध्याय ११ वा
मानवधर्म, वर्णधर्म आणि स्त्रीधर्माचे निरुपण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात – भगवन्मय झालेल्या प्रल्हादाचे साधुसमाजात सन्मानित झालेले पवित्र चरित्र ऐकून महापुरुषात अग्रगण्य युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला. त्याने नारदांना पुन्हा विचारले. (१) युधिष्ठिर म्हणाला – भगवन, आता मी वर्ण आणि आश्रम तसेच मनुष्यांचा सनातन धर्म यांचे श्रवण करू इच्छितो. कारण धर्मामुळेच मनुष्याला परम पदाची प्राप्ती होते. हे नारद महोदय, आपण प्रजापती ब्रह्मदेवांचे पुत्र आहात. शिवाय तपश्चर्या, योग आणि समाधी यांमुळे इतर पुत्रांपेक्षा आपण त्यांना अधिक प्रिय आहात. आपल्यासारखे नारायण परायण, दयाळू, सदाचारी, शांत, विद्वान ब्राह्मण धर्माचे अत्यंत गुप्त रहस्य जसे जाणतात, तसे दुसरे लोक जाणत नाहीत. (२-४) नारद म्हणतात – अजन्मा भगवंतच लोकांच्या सर्व धर्मांचे मूळ कारण आहेत. तेच प्रभू जगाच्या कल्याणासाठी धर्म आणि मूर्ती यांच्यापासून आपल्या अंशाने अवतीर्ण होऊन बदरिकाश्रमामध्ये तपश्चर्या करीत आहेत. त्या नारायण भगवानांना नमस्कार करून त्यांच्याच मुखातून ऐकलेला सनातन धर्म मी सांगतो. युधिष्ठिरा, सर्ववेदस्वरूप भगवान श्रीहरी, त्यांचे तत्त्व जाणणार्या महर्षींनी रचलेल्या स्मृती आणि ज्यामुळे अंतःकरण प्रसन्न होते, ते कर्म हे धर्माचे मूळ आहे. (५-७) युधिष्ठिरा, धर्माची तीस लक्षणे शास्त्रात सांगितली आहेत, ती अशी – सत्य, दया, तपश्चर्या, पावित्र्य, सहनशीलता, योग्यायोग्य विचार, मनाचा संयम, इंद्रियांचा निग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरळपणा, संतोष, समदर्शित्व, महात्म्यांची सेवा, सांसारिक क्रियांपासून हळूहळू निवृत्ती, मनुष्याच्या अभिमानपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे उलटेच फळ मिळते असा विचार, मौन, आत्मचिंतन, प्राण्यांना अन्न इत्यादींचे यथायोग्य वाटप, प्राण्यांमध्ये आणि विशेषेकरून मनुष्यांमध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवतेचा भाव ठेवणे, संतांचे परम आश्रय भगवान श्रीकृष्ण यांची श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, पूजा, नमस्कार, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण ही नवविधा भक्ती या तीस प्रकारांनी युक्त असे आचरण हाच सर्व माणसांचा परम धर्म आहे. याच्या पालनाने सर्वात्मा भगवंत प्रसन्न होतात. (८-१२) धर्मराज, ज्यांच्या वंशामध्ये अखंडपणे संस्कार होत आले आहेत आणि ज्यांना ब्रह्मदेवांनी संस्कारयोग्य मानले आहे, त्यांना द्विज म्हणतात. जन्म आणि कर्माने शुद्ध असणार्या द्विजांसाठी यज्ञ, अध्ययन, दान आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमांसाठींच्या कर्मांचे शास्त्राने विधान केले आहे. अध्ययन, अध्यापन, दान घेणे व देणे आणि यज्ञ करणे व करविणे ही ब्राह्मणाची सहा कर्मे होत. क्षत्रियाने दान घेता कामा नये. प्रजेचे रक्षण करणार्या क्षत्रियाने जीवननिर्वाह ब्राह्मणांखेरीज इतर सर्वांकडून यथायोग्य कर इत्यादी घेऊन करावा. वैश्याने नेहमी ब्राह्मणांना अनुकूल राहून गाई पाळणे, शेती आणि व्यापार यांद्वारा आपली उपजीविका चालवावी. द्विजांची सेवा हा शूद्राचा धर्म होय. त्याची उपजीविका त्याच्या मालकाने चालवावी. ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहाची साधने चार प्रकारची आहेत – वार्ता (यज्ञ, अध्यापन करून धन घेणे), शालीन (न मागता जे मिळेल त्यावर उपजीविका करणे), यायावर (दररोज धान्य इत्यादी मागून घेणे) आणि शिलोञ्छन (शेतात धान्य काढून नेल्यानंतर पडलेले कण आणि बाजारात पडलेले धान्य-कण वेचून त्यावर निर्वाह चालविणे). यांमध्ये पहिलीहून दुसरी, दुसरीहून तिसरी आणि तिसरीहून चौथी वृत्ती श्रेष्ठ होय. कनिष्ठ वर्णाच्या पुरुषाने आपत्तिकाल असल्याखेरीज वरिष्ठ वृत्तीचा अवलंब करू नये. क्षत्रिय दान घेण्याव्यतिरिक्त ब्राह्मणाच्या उरलेल्या पाच वृत्तींचा अवलंब करू शकतो. आपत्तिकालात सर्वजण सर्व वृत्तींचा स्वीकार करू शकतात. ऋत, अमृत, मृत, प्रमृत आणि सत्यानृत यांपैकी कोणत्याही वृत्तीचा आश्रय घ्यावा. परंतु श्वानवृत्तीचा अवलंब कधीही करू नये. बाजारात पडलेले तसेच शेतामध्ये पडलेले धान्यकण वेचून ’शिलोञ्छ’ वृत्तीने उपजीविका करणे ’ऋत’ होय. मागितल्याखेरीज जे काही मिळेल त्या अयाचित वृत्तीने जीवननिर्वाह करणे ’अमृत’ होय. नेहमी याचना करून आणणे म्हणजेच ’मृत’ होय. शेती करून जीवननिर्वाह करणे ’प्रमृत’ होय. व्यापार करणे ’सत्यानृत’ होय आणि कनिष्ठ वर्णाची सेवा करणे ’श्वानवृत्ती’ होय. या शेवटच्या निंद्य वृत्तीचा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी कधीही आश्रय घेऊ नये. कारण ब्राह्मण सर्ववेदमय आणि राजा सर्वदेवमय आहे. (१३-२०) शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत. युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत. देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत. वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत. (२१-२४) पतीची सेवा करणे, पतीला अनुकूल असणे, पतीच्या संबंधितांना प्रसन्न ठेवणे आणि नेहमी पतीच्या नियमांचे रक्षण करणे हे पतिव्रता स्त्रियांचे धर्म होत. साध्वी स्त्रीने झाडलोट करणे, सारवणे, रांगोळ्या काढणे इत्यादींनी घर आणि मनोहर वस्त्रालंकारांनी आपले शरीर अलंकृत करावे. सर्व भांडीकुंडी स्वच्छ ठेवावे. आपल्या पतीच्या लहानमोठ्या इच्छा पूर्ण कराव्यात. विनय, इंद्रियसंयम, सत्य आणि प्रिय वचनांनी प्रेमपूर्वक वेळोवेळी पतीची सेवा करावी. जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे. कोणत्याही वस्तूचा लोभ असू नये. सर्व कार्यांमध्ये चतुरपणे आणि धर्मानुसार वागावे. सत्य आणि प्रिय बोलावे. आपल्या कर्तव्यात तत्पर असावे. पती पतित झाला नसेल तर पवित्र अशा स्त्रीने प्रेमाने पतीचा सहवास करावा. जी पतिव्रता लक्ष्मीप्रमाणे पतिपरायण होऊन त्याला साक्षात भगवंताचे स्वरूप समजून त्याची सेवा करते, तिच्या पतीला वैकुंठलोकात भगवत्स्वरूप प्राप्त होते आणि ती लक्ष्मीसमान त्याच्याबरोबर आनंदात राहाते. (२५-२९) जे चोरी किंवा इतर पापकर्मे करीत नाहीत, त्या अंत्यज, चांडाळ इत्यादी अतिकनिष्ठ वर्णसंकर झालेल्या जातींच्या वृत्तीसुद्धा त्यांच्या त्यांच्या कुलपरंपरेनुसार चालत आलेल्याच होत. वेददर्शी ऋषींनी त्या त्या युगात साधारणतः मनुष्यांच्या स्वभावानुसार धर्माची व्यवस्था केली आहे. तोच धर्म त्यांच्यासाठी इहलोकात आणि परलोकात कल्याणकारी आहे. जो आपल्या स्वाभाविक वृत्तीप्रमाणे स्वधर्माचे पालन करतो, तो हळूहळू त्या स्वाभाविक कर्मांच्या वरच्या पातळीवर जाऊन गुणातीत होतो. (३०-३२) महाराज, ज्याप्रमाणे वारंवार पेरणी केल्याने शेत स्वतःच शक्तिहीन होते आणि त्यात अंकुर उगवणेही बंद होते, इतकेच काय त्यात पेरलेले बीसुद्धा नष्ट होते. त्याचप्रमाणे हे चित्त, जे वासनांचा खजिना आहे, विषयांचे अतिशय सेवन केल्याने त्याला स्वतःलाच उबग येतो. परंतु अल्प प्रमाणात भोग घेतल्यास तसे होत नाही. जसे एक एक थेंब तूप टाकल्याने आग विझत नाही, परंतु एकदम जास्त तूप पडले, तर ती विझून जाते. ज्या पुरुषाचा वर्ण सांगण्यासाठी जे लक्षण सांगितले आहे, ते जर दुसरा वर्ण असणार्याच्या ठिकाणीही असेल, तर तोसुद्धा त्याच वर्णाचा समजावा. (३३-३५) स्कंध सातवा - अध्याय अकरावा समाप्त |