श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १० वा

प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुरदहनाची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणतात – वयाने लहान असूनही प्रल्हादाने जाणले की सर्व वर हे भक्तीमध्ये विघ्न आणणारे आहेत. म्हणून स्मित करीत तो भगवंतांना म्हणाला. (१)

प्रल्हाद म्हणाला – प्रभो, मी जन्मतःच विषयभोगात आसक्त झालेलो आहे. आता पुन्हा मला या वरांच्या लोभात पाडू नका. त्या भोगांच्या संगाला भिऊन व त्यांचा वीट येऊन मुक्तीच्या अभिलाषेनेच मी आपल्याला शरण आलो आहे. भगवन, माझ्यामध्ये भक्ताची लक्षणे आहेत की नाहीत, हे जाणून घेण्यासाठीच आपण आपल्या भक्ताला वरदान मागण्याची प्रेरणा दिली आहे. हे विषयभोग हृदयाची अज्ञानाची गाठ अधिकच मजबूत करणारे आणि जन्ममृत्यूचे कारण आहेत. हे जगद्रुरो, या बाबतीत परीक्षा पाहण्याशिवाय दुसरे काही कारण दिसत नाही. कारण आपण दयाळू आहात. जो सेवक आपल्याकडून वर इच्छितो, तो सेवक नसून व्यापारी होय. जो स्वामीकडून आपल्या कामनांची पूर्तता करून घेऊ इच्छितो, तो सेवक नव्हे आणि जो त्याच्यावर सत्ता गाजविण्यासाठी त्याच्या कामना पूर्ण करतो तो स्वामी नव्हे. मी आपला निष्काम सेवक आहे आणि आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. राजा आणि सेवक यांचा कारणपरत्वे जसा स्वामी-सेवक असा संबंध असतो, तसा तर तुमचा व माझा संबंध नाही. हे वर देणार्‍यांचे शिरोमणी स्वामी, मी मागेन तो वर आपण मला देऊ इच्छित असाल, तर माझ्या हृदयात कधीही कोणत्याही कामनेचे बीज अंकुरितच होऊ नये, हा वर द्या. हृदयामध्ये कोणत्याही कामनेचा उदय होताच इंद्रिये, मन, प्राण, देह, धर्म, धैर्य, बुद्धी, लज्जा, लक्ष्मी, तेज, स्मृती आणि सत्य ही सर्व नष्ट होतात. हे कमलनयना, ज्यावेळी मनुष्य आपल्या मनात घर करून राहिलेल्या कामनांचा त्याग करतो, त्याचवेळी तो भगवत्स्वरूपाला प्राप्त होतो. भगवन, आपल्याला नमस्कार असो. आपण सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले उदार व स्वतः परब्रह्म परमात्मा आहात. अद्‌भुत नृसिंहरूपधारी श्रीहरींच्या चरणांना मी नमस्कार करतो. (२-१०)

श्रीनृसिंह म्हणाले – तुझ्यासारखे माझे अनन्य भक्त या किंवा परलोकातील कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नाहीत. तरीसुद्धा एक मन्वन्तरापर्यंत तू दैत्याधिपतींचे सर्व विषय भोग. सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये यज्ञभोक्ता ईश्वर एकटा मीच आहे. त्या माझी तू आपल्या हृदयात स्थापना कर आणि तुला प्रिय असणार्‍या माझ्या कथा ऐकत माझीच आराधना कर. आणि अशा प्रकारे आपल्या प्रारब्ध कर्मांचा क्षय कर. भोगांच्या द्वारे पुण्यकर्मांचे फळ आणि निष्काम पुण्यकर्मांनी पापाचा नाश करून देवलोकांनी सुद्धा गावी, अशी पवित्र कीर्ती जगात पसरवून, योग्य वेळी शरीराचा त्याग करून मुक्त होऊन तू माझ्याकडे येशील. तू केलेल्या माझ्या या स्तुतीचे जो मनुष्य संकीर्तन करील आणि त्याचवेळी माझे आणि तुझे स्मरणसुद्धा करील, तो कर्मबंधनातून मुक्त होईल. (११-१४)

प्रल्हाद म्हणाला – महेश्वरा, आपण वर देणार्‍यांचे स्वामी आहात. आपल्याकडे मी आणखी एक वर मागतो. आपले ईश्वरी तेज आणि शक्तिमान चराचर गुरू असलेल्या आपणास माझ्या पित्याने जाणून न घेता आपली निंदा केली. “ह्या विष्णूने आपल्या भावाला मारले” अशा खोट्या कल्पनेने माझे वडील क्रोधावेग आवरू शकले नाहीत. म्हणूनच त्यांनी आपला भक्त असल्याकारणाने माझ्याशीही द्रोह केला. हे दीनबंधो, आपली दृष्टी पडताच जरी ते पवित्र झाले असले, तरीसुद्धा मी आपणास प्रार्थना करतो की, सहज नाश न पावणार्‍या दुस्तर दोषापासून माझे वडील शुद्ध व्हावेत. (१५-१७)

श्रीभगनान म्हणाले – हे निष्पाप प्रल्हादा, तुझे वडील त्यांच्या एकवीस पिढ्यांतील पितरांसह पवित्र झाले. कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र त्यांना झाला. माझे शांत, समदर्शी आणि सदाचारी भक्त जेथे जेथे निवास करतात, ते देश पापांची खाण असले तरी पवित्र होऊन जातात. दैत्यराज, माझ्या भक्तिभावामुळे ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत, ते लहान-मोठ्या कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास देत नाहीत. कारण त्यांचा सर्वांच्याबद्दल आत्मभाव निर्माण झालेला असतो. जगात जे लोक तुझ्यावर प्रेम करतील, ते सुद्धा माझे भक्त होतील. माझ्या सर्व भक्तांचा तू आदर्श आहेस. माझ्या शरीराचा स्पर्श झाल्याने तुझे वडील पूर्णपणे पवित्र झाले असले, तरी तू त्यांची अंत्येष्टी कर. तुझ्यासारख्या मुलामुळेच त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होईल. वत्सा, तू आपल्या पित्याच्या गादीवर बस आणि वेदज्ञ मुनींच्या आज्ञेनुसार माझे ठिकाणी मन ठेऊन आणि मला शरण येऊन माझ्या सेवेसाठीच आपली सर्व कर्मे कर. (१८-२३)

नारद म्हणतात – युधिष्ठिरा, भगवंतांच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने आपल्या पित्याचे क्रियाकर्म केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मणांनी त्याला राज्याभिषेक केला. याचवेळी देव, ऋषी इत्यादींसह ब्रह्मदेवांनी, भगवान नृसिंह प्रसन्नवदन आहेत, असे पाहून पवित्र वचनांनी त्यांची स्तुती करून त्यांना म्हटले. (२४-२५)

ब्रह्मदेव म्हणाले – हे देवांच्या आराध्यदेवा, आपण सर्वांतर्यामी, जीवांचे पालनकर्ते आणि सर्वांचे पूर्वज आहात. हा पापी दैत्य लोकांना फार त्रास देत असे. आपण याला मारलेत. ही फार चांगली गोष्ट झाली. मी याला वर दिला होता की, माझ्या सृष्टीतील कोणताच प्राणी तुझा वध करू शकणार नाही, त्यामुळे तो मस्तवाल झाला होता. तपश्चर्या, योग आणि बळ यांच्यायोगे उच्छृंखल होऊन याने सर्व वेदविधींचा उच्छेद करून टाकला होता. याचा पुत्र परमभागवत शुद्धहृदय बाळ प्रल्हाद याला आपण मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, हे याचे सौभाग्य आहे. तो आता आपल्याला शरण आला आहे, ही सुद्धा मोठी आनंदाची गोष्ट आहे. हे भगवन, जो कोणी एकाग्र मनाने आपल्या या नृसिंहरूपाचे ध्यान करील, त्याला हे रूप सर्व प्रकारच्या भयांपासून वाचवील; एवढेच काय, मारण्याच्या इच्छेने आलेल्या मृत्यूपासूनसुद्धा वाचवील. (२६-२९)

श्रीनृसिंह म्हणाले – ब्रह्मदेवा, आपण दैत्यांना असा वर देऊ नका. जे स्वभावाने क्रूर आहेत, त्यांना असा वर देणे म्हणजे सापाला अमृत पाजण्यासारखे आहे. (३०)

नारद म्हणतात – युधिष्ठिरा, असे म्हणून भगवान, ब्रह्मदेवांनी केलेल्या पूजेचा स्वीकार करून समस्त प्राण्यांच्या दृष्टीने तेथेच अंतर्धान पावले. यानंतर प्रल्हादाने भगवत्स्वरूप ब्रह्मदेव, शंकर, प्रजापती आणि देवांची पूजा करून त्यांना शिरसाष्टांग प्रणाम केला. तेव्हा ब्रह्मदेवांनी शुक्राचार्य इत्यादी मुनींसह, प्रल्हादाला सर्व दानव आणि दैत्यांचा अधिपती म्हणून नेमले. यानंतर इत्यादी देवांनी प्रल्हादाचे अभिनंदन करून त्याला शुभाशीर्वाद दिले. प्रल्हादानेसुद्धा सर्वांचा यथायोग्य सत्कार केला. नंतर ब्रह्मादिक देव आपापल्या लोकी निघून गेले. (३१-३४)

भगवंतांचे ते दोन्ही पार्षद जय आणि विजय अशा प्रकारे दितीचे पुत्र झाले होते. वैरभावाने त्यांच्या हृदयात राहणार्‍या भगवंतांनी त्यांना मारले. ऋषींनी दिलेल्या शापामुळे ते पुन्हा कुंभकर्ण आणि रावणाच्या रूपाने राक्षस झाले. भगवान श्रीरामांच्या पराक्रमामुळे त्यावेळी त्यांचा अंत झाला. युद्धामध्ये भगवान रामांच्या बाणांनी त्यांचे हृदय विदीर्ण झाले. तेथेही पडल्या-पडल्या पूर्वजन्मीप्रमाणे भगवंतांचे स्मरण करीत करीत त्यांनी आपले शरीर सोडले. तेच आता या युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्त्राच्या रूपाने जन्माला आले होते. भगवंतांशी वैरभाव ठेवल्यामुळे तुझ्यासमोरच ते त्यांच्यामध्ये सामावून गेले. ज्याप्रमाणे गांधीलमाशीने पकडलेली अळी भीतीमुळे तिच्यासारखीच होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णांशी शत्रुत्व करणारे सर्व राजे अंतसमयी त्यांचे स्मरण केल्याने पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्त होऊन तद्रुप झाले. ज्याप्रकारे भगवंतांचे प्रिय भक्त आपल्या भेदभावविरहित अनन्य भक्तीने भगवत्स्वरूपाची प्राप्ती करून घेतात, त्याचप्रमाणे शिशुपाल इत्यादी राजेसुद्धा भगवंतांच्या वैरभावयुक्त अनन्य चिंतनाने भगवंतांच्या सारूप्याला प्राप्त झाले. (३५-४०)

भगवंतांचा द्वेष करणार्‍या शिशुपाल इत्यादींना त्यांच्या सारूप्याची प्राप्ती कशी झाली, हे तू मला विचारले होतेस, त्याचे उत्तर मी तुला दिले. ब्राह्मणदेव परमात्मा श्रीकृष्णांचे हे परमपवित्र अवतारचरित्र आहे. दोन्ही आदिदैत्यांच्या वधाचे यामध्ये वर्णन आहे. या प्रसंगामध्ये भगवंतांचा परम भक्त प्रल्हाद याचे चरित्र, ज्ञान, वैराग्य तसेच विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे स्वामी असलेल्या श्रीहरींचे यथार्थ स्वरूप, तसेच त्यांचे दिव्य गुण व लीलांचे वर्णन आहे. देव आणि दैत्य यांच्या उच्चनीच पदांमध्ये कालक्रमानुसार जे महान परिवर्तन होते, त्याचेही निरूपण या आख्यानामध्ये केले गेले आहे. ज्याच्याद्वारे भगवंतांची प्राप्ती होते, त्या भागवतधर्माचेसुद्धा वर्णन या आख्यानात आहे. अध्यात्मासंबंधीही सर्व वर्णन यात आहे. भगवंतांच्या पराक्रमांनी परिपूर्ण अशा या पवित्र आख्यानाचे जो कोणी श्रद्धेने कीर्तन आणि श्रवण करतो, तो कर्मबंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य परमपुरुष परमात्म्याची ही श्रीनृसिंह-लीला, सेनापतींच्या सह हिरण्यकशिपूचा वध आणि संत शिरोमणी प्रल्हादाचा पवित्र प्रभाव एकाग्र मनाने वाचतो आणि ऐकतो त्याला भगवंतांचे अभयपद जे वैकुंठ, त्याची प्राप्ती होते. (४१-४७)

या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्यरूपात गुप्तरूपाने निवास करते. म्हणूनच सार्‍या जगाला पवित्र करणारे ऋषी-मुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहित परम शांत परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच श्रीकृष्ण तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरू आणि स्वतः आत्मा आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. युधिष्ठिरा, पूर्वी एकदा मोठ्या मायावी मयासुराने रुद्रदेवांच्या कीर्तीला कलंक लावला, तेव्हा याच भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा त्यांच्या यशाचे रक्षण आणि विस्तार केला होता. (४८-५१)

राजाने विचारले – नारदमुने, मयदानवाने कोणत्या कार्यामध्ये जगदीश्वर रुद्रदेवांचे यश नष्ट केले होते आणि भगवान श्रीकृष्णांनी कोणत्या प्रकारे त्यांच्या यशाचे रक्षण केले ? (५२)

नारद म्हणाले – याच भगवान श्रीकृष्णांकडून शक्ती प्राप्त करून घेऊन एकदा देवांनी युद्धामध्ये असुरांना जिंकले होते. त्यावेळी असुर, मायावी असुरांचे परम गुरु मय दानवाला शरण गेले. शक्तिशाली मयासुराने सोने, चांदी आणि लोखंड यांची तीन नगरे निर्माण केली. ती इतकी विलक्षण होती की त्यांचे येणे-जाणे समजून येत नसे. त्यात अपरिमित युद्धसामग्री भरलेली होती. (५३-५४)

युधिष्ठिरा, दैत्यसेनापतींच्या मनात तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपती यांचेविषयी पूर्वीचा वैरभाव होताच. आता त्याची आठवण येऊन त्या तीन विमानांच्या द्वारा त्यात लपून बसून ते सर्वांचा नाश करू लागले. तेव्हा लोकपालांसह सर्व प्रजा भगवान शंकरांना शरण गेली आणि त्यांना प्रार्थना केली की, प्रभो, त्रिपुरात राहणार्‍या असुरांनी आमचा नाश करण्याचे ठरविले आहे. आम्ही आपले आहोत. म्हणून देवाधिदेवा, आमचे रक्षण करा. (५५-५६)

त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर करुणेने देवांना म्हणाले – “भिऊ नका !” नंतर त्यांनी धनुष्याला बाण लावून तिन्ही नगरांवर सोडला. त्यांच्या त्या बाणापासून सूर्यमंडलातून निघणार्‍या किरणांप्रमाणे इतर अनेक बाण बाहेर पडले. त्यातून आगीचे जणू काही लोळ येत होते. त्यामुळे ती नगरे दिसेनाशी झाली. त्या बाणांच्या केवळ स्पर्शाने नगरातील सर्वजण निष्प्राण होऊन पडले. महायोगी मयाने दैत्यांना उचलून आणले आणि अमृताच्या विहीरीत टाकले. त्या सिद्ध अमृत-रसाचा स्पर्श होताच असुरांचे शरीर अत्यंत तेजस्वी आणि वज्राप्रमाणे सुदृढ झाले. ढगांना इतस्ततः करणार्‍या विजेच्या लोळाप्रमाणे ते उठून उभे राहिले. (५७-६०)

श्रीविष्णूंनी जेव्हा पाहिले की, आपला संकल्प सिद्धीस न गेल्यामुळे महादेव विषण्ण झाले आहेत, तेव्हा त्या असुरांवर विजय मिळविण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. हेच भगवान विष्णू त्यावेळी गाय झाले आणि ब्रह्मदेव वासरू झाले. मध्यान्हसमयी दोघेही त्या तिन्ही नगरात गेले आणि त्या सिद्धरसाच्या विहीरीतील सर्व अमृत त्यांनी पिऊन टाकले. त्या विहिरींचे रक्षक जरी या दोघांना पाहात होते, तरी भगवंतांच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांना ते रोखू शकले नाहीत. महामायावी मयासुराला ही गोष्ट समजली, तेव्हा ती दैवगती आहे, याचे स्मरण होऊन त्याला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही. शोक करणार्‍या अमृत-रक्षकांना तो म्हणाला, “देव, असुर, मनुष्य किंवा कोणताही प्राणी, स्वतःसाठी, दुसर्‍यासाठी किंवा दोघांसाठीही जे प्रारब्धाचे विधान असेल, ते बदलू शकत नाही.” यानंतर भगवान श्रीविष्णूंनी आपल्या शक्तींच्या द्वारा शंकरांच्या युद्धाची सामग्री तयार केली. त्यांनी धर्मापासून रथ, ज्ञानापासून सारथी, वैराग्यापासून ध्वज, ऐश्वर्यापासून घोडे, तपश्चर्येपासून धनुष्य, विद्येपासून कवच, क्रियेपासून बाण आणि आपल्या इतर अनेक शक्तींपासून पुष्कळ अन्य वस्तू निर्माण केल्या. या सामग्रीने सज्ज होऊन भगवान शंकर रथावर आरूढ झाले आणि त्यांनी धनुष्य-बाण धारण केले. अभिजित मुहूर्तावर भगवान शंकरांनी धनुष्यावर बाण चढविला आणि ती तिन्ही दुर्भेद्य पुरे भस्मसात करून टाकली. युधिष्ठिरा, त्याचवेळी स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या. शेकडो विमानांची गर्दी झाली. देव, पितर आणि सिद्धेश्वर आनंदाने जयजयकार करीत पुष्पवर्षाव करू लागले. अप्सरा नाचू आणि गाऊ लागल्या. युधिष्ठिरा, अशा प्रकारे त्या तिन्ही पुरांना जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झाले आणि ब्रह्मादिकांनी केलेली स्तुती ऐकत आपल्या धामाकडे निघून गेले. आत्मस्वरूप जगद्रुरू भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने अशा प्रकारे ज्या मनुष्यासारख्या लीला करतात, त्याच अनेक लोकपावन लीलांचे ऋषी गायन करतात. आता मी तुला आणखी काय सांगू ते सांग. (६१-७१)

स्कंध सातवा - अध्याय दहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP