श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ९ वा

प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहांची स्तुती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणतात – अशा प्रकारे क्रोधावेशाने ज्यांच्या जवळही जाणे कठीण अशा श्रीनृसिंहांच्या जवळपासही ब्रह्मदेव, शंकरप्रमुख सर्व देवगण जाऊ शकले नाहीत. तेव्हा देवांनी साक्षात लक्ष्मींना पाठविले. त्यांनी जेव्हा त्यांचे ते प्रचंड अद्‌भुत रूप पाहिले, तेव्हा भयभीत होऊन त्याही त्यांच्याजवळ जाऊ शकल्या नाहीत. कारण असे अपूर्व रूप त्यांनी कधी पाहिले नव्हते की ऐकले नव्हते. तेव्हा ब्रह्मदेव आपल्याजवळच उभ्या असलेल्या प्रल्हादाला म्हणाले, “बाळ, तुझ्या पित्यावर भगवान कोपले होते. तर आता तूच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शांत कर,” असे म्हणून त्यांनी त्याला पाठविले. राजा, परम भगवद्‍भक्त बाळ प्रल्हाद ’ठीक’ असे म्हणून सावकाश भगवंतांच्या जवळ जाऊन हात जोडून त्यांना त्याने भूमीवर साष्टांग नमस्कार घातला. आपल्या चरणांवर पडलेल्या त्या बाळाला पाहून देवांचे हृदय दयेने कळवळले. त्यांनी प्रल्हादाला उठवून त्याच्या डोक्यावर कालसर्पाने भयभीत झालेल्यांना अभयदान देणारे आपले करकमल ठेवले. त्यांच्या करकमलाचा स्पर्श होताच त्याचे सारे पाप धुऊन गेले. त्याला त्याचक्षणी परमात्म तत्वाचा साक्षात्कार झाला. त्याने मोठ्या प्रेमाने आणि आनंदविभोर होऊन भगवंतांचे चरणकमल आपल्या हृदयात धारण केले. त्यावेळी त्याचे सर्व शरीर पुलकित झाले, हृदयामध्ये प्रेमधारा आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. प्रल्हाद भावपूर्ण हृदयाने आणि अनिमिष नेत्रांनी भगवंतांना पाहात होता. भावसमाधीत स्वतः एकाग्र होत, प्रेमगद्‍गद वाणीने त्याने त्यांची स्तुती सुरू केली. (१-७)

प्रल्हाद म्हणाला – ब्रह्मदेव इत्यादी देव, ऋषी, सिद्ध इत्यादींची बुद्धी नेहमी सत्वगुणी असते. तरीसुद्धा ते आपल्या प्रवाही वाणीने आपल्या विविध गुणांचे गायन करून अजूनही आपल्याला संतुष्ट करू शकले नाहीत. मी तर घोर असुर जातीत जन्मलेला. माझ्याकडून आपण संतुष्ट व्हाल काय ? मला तर वाटते की, धन, कुलीनता, रूप, तप, विद्या, ओज, तेज, प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी आणि योग हे सर्व गुण परमपुरुष भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी पुरेसे नाहीत. परंतु भक्तीने मात्र भगवंत गजेंद्रावरसुद्धा संतुष्ट झाले होते. माझ्या समजुतीप्रमाणे बारा गुणांनी युक्त असलेला ब्राह्मणसुद्धा जर भगवान कमलनाभांच्या चरणकमलांना विन्मुख असेल, तर त्याच्यापेक्षा ज्या चांडाळाने आपले मन, वाणी, कर्म, धन आणि प्राण भगवंतांच्या चरणी समर्पित केले आहेत, तो श्रेष्ठ होय. तो आपल्या कुळालासुद्धा पवित्र करतो पण आपल्या मोठेपणाचा अभिमान बाळगणारा ब्राह्मण नाही. सर्वशक्तिमान प्रभू आपल्या स्वरूपाच्या साक्षात्कारानेच परिपूर्ण आहेत. आपली अज्ञानी पुरुषांकडून पूजा करून घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. भक्तांच्या हितासाठीच ते त्यांनी केलेल्या पूजेचा करुणेने स्वीकार करतात. जसे आपल्या मुखाचे सौंदर्य आरशात दिसणार्‍या प्रतिबिंबालाही सुंदर बनविते, तसेच भक्त भगवंतांचा जो जो सन्मान करतो तो परत त्यालाच प्राप्त होतो. म्हणूनच मी होणतीही शंका मनात न आणता, माझ्या बुद्धीनुसार सर्व प्रकारे भगवंतांचा महिमा वर्णन करीतआहे. या महिमा गायनामुळे अविद्येमुळे संसार चक्रात सापडलेला नीच जीव तत्काळ पवित्र होतो. (८-१२)

भगवन, आपण सत्वगुणाचे आश्रय आहात. हे ब्रह्मदेवादी सर्व देव आपले आज्ञाधारक भक्त आहेत. आम्हा दैत्यांप्रमाणे ते आपला द्वेष करीत नाहीत. प्रभो, आपण उत्तमोत्तम अवतार ग्रहण करून या जगाचे कल्याण आणि अभ्युदय व्हावा, तसेच त्यांना आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून अनेक प्रकारच्या लीला करीत असता. आपण असुराला मारले. आता आपला क्रोध शांत करावा. जसे विंचू, साप इत्यादींना मारल्यामुळे सज्जनसुद्धा सुखी होतात, त्याचप्रमाणे या दैत्याच्या नाशाने सर्व लोकांना सुख प्राप्त झाले आहे. आता सर्वजण आपल्या शांत स्वरूपाची वाट पाहात आहेत. नृसिंहदेवा, भयापासून मुक्त होण्यासाठी भक्तजन आपल्या या स्वरूपाचे स्मरण करतील. हे परमात्मन, आपले मुख अत्यंत भयानक आहे. आपली जीभ लवलवत आहे. डोळे सूर्यासारखे आहेत. भुवया उंचावलेल्या आहेत. दाढा तीक्ष्ण आहेत. आतड्यांची माळ, रक्ताने माखलेली आयाळ, भाल्याच्या टोकाप्रमाणे उभे असलेले कान, दिग्गजांनासुद्धा भयभीत करणारा सिंहनाद, आणि शत्रूला फाडणारी आपली ही नखे पाहून मी थोडासुद्धा भ्यालो नाही. हे दीनबंधो, मी भयभीत झालो आहे, तो या असह्य आणि उग्र संसारात भरडला गेल्यामुळे. आपल्या कर्मांनी बांधला जाऊन मी या भयंकर दैत्ययोनीमध्ये फेकला गेलो आहे. हे नाथ, आपण प्रसन्न होऊन सर्व जीवांसाठी शरण जाण्यास योग्य आणि मोक्षस्वरूप अशा आपल्या चरणकमलांजवळ मला केव्हा बोलवाल ? हे अनंता, मी ज्या ज्या योनींमध्ये गेलो, त्या सर्व योनींमध्ये प्रियजनांचा वियोग आणि अप्रिय जनांचा संयोग करून देणार्‍या दुःखरूप आगीमध्ये होरपळत राहिलो. ते दुःख नाहीसे करण्याचे जे औषध आहे, तेही दुःखरूपच आहे. आपल्यापासून वेगळ्याच वस्तूंना आत्मा समजून मी भटकत आहे. ज्यायोगे मी आपली सेवा करू शकेन, ते साधन मला सांगा. हे प्रभो, आपणच आम्हांला प्रिय आहात. आमचे सुहृद आहात. आपणच सर्वांचे परम दैवत आहात. आपल्या चरणांपाशी राहणार्‍या भक्तांच्या संगतीत ब्रह्मदेवांनी गाइलेल्या आपल्या लीला-कथा गात मी सहजपणे त्रिगुणांपासून मुक्त होऊन या संसारसागरातून पलीकडे जाऊ शकेन. हे नृसिंहदेवा, या जगातील दुःखी लोकांची दुःखे नाहीशी करण्याचे जे उपाय मानले जातात, ते आपण उपेक्षा केल्यास तात्पुरतेच असतात. जसे आई-वडील मुलांचे रक्षण करू शकत नाहीत, औषध रोग नाहीसा करीत नाही आणि समुद्रात बुडणार्‍याला नाव वाचवू शकत नाही. सत्त्वादी गुणांमुळे वेगवेगळ्या स्वभावाचे अर्वाचीन पिता वगैरे आणि प्राचीन ब्रह्मदेव इत्यादी कर्ते आहेत, त्यांना प्रेरणा देणारे आपणच आहात. ते आपल्या प्रेरणेने ज्या आधारामध्ये, ज्या निमित्ताने, ज्या साधनांनी, ज्यावेळी, ज्याच्या प्रेरणेने, ज्याच्यासंबंधी, ज्यापासून, ज्याच्यासाठी, ज्या रीतीने, जे काही उत्पन्न करतात किंवा रूपांपरित करतात, ते सर्वजण आणि ते सर्व काही आपलेच स्वरूप आहे. (१३-२०)

पुरुषांच्या संकल्पानुसार कालामुळे गुणांमध्ये क्षोभ झाल्याकारणाने माया मनःप्रधान लिंगशरीरनिर्मिती करते. हे लिंगशरीर बलवान, कर्ममय तसेच वेदोक्त कर्मप्रधान आहे. हेच अविद्येने जीवाच्या भोगासाठी कल्पिलेले मन, दहा इंद्रिये आणि पाच तन्मात्रा या सोळा विकाररूप आर्‍यांनी युक्त असे संसारचक्र आहे. हे जन्मरहित प्रभो, असा कोण पुरुष आहे की जो आपल्याला न भजता हे मनरूप संसार-चक्र पार करू शकेल ? हे सर्वशक्तिमान प्रभो ! माया मला या सोळा आरे असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे पिळून काढीत आहे. आपण आपल्या चैतन्यशक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि कालरूपाने सर्व साध्य आणि साधने आपल्या अधीन ठेवता. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण मला या चक्रातून ओढून काढून आपल्याजवळ घ्या. भगवन, ज्याच्यासाठी संसारी लोक अतिशय हापापलेले असतात, ते स्वर्गात मिळणारे सर्व लोकपालांचे आयुष्य, लक्ष्मी आणि ऐश्वर्य मी पुष्कळ पाहिले आहे. ज्यावेळी माझे वडील थोडेसे रागावून हसत आणि त्यांच्या भुवया थोड्या वर चढत, तेव्हाच ती संपत्ती त्यांच्याजवळ राहात नसे, पण माझ्या अशा त्या पित्यालाही आपण मारले. म्हणूनच संसारातील प्राणी ज्या ब्रह्मलोकापर्यंतचे आयुष्य, लक्ष्मी, ऐश्वर्य आणि इंद्रियभोग यांची इच्छा करतात ते मला नकोत; कारण अत्यंत शक्तिशाली काळाचे रूप धारण करून आपण त्यांना ग्रासले आहे, हे मी जाणतो. आपण मला आपल्या दासांच्या सान्निध्यात घेऊन चला. विषयभोगाच्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात, परंतु त्या मृगजळाप्रमाणे फसव्या आहेत. तसेच हे शरीरसुद्धा अगणित रोगांचे उगमस्थान आहे. कोठे ते मिथ्या विषयभोग आणि कोठे हे रोगयुक्त शरीर ! दोन्हींची असारता जाणूनसुद्धा मनुष्य यापासून विरक्त होत नाही. मोठ्या कष्टाने प्राप्त होणार्‍या भोगांच्या लहान लहान मधुबिंदूंच्या द्वारा तो आपली इच्छारूपी आग विझविण्याचा प्रयत्‍न करतो ! हे प्रभो, कुठे या तमोगुणी असुर वंशात रजोगुणापासून उत्पन्न झालेला मी आणि कुठे आपली त्याच्यावरील कृपा ! धन्य आहे ! आपण आपला प्रसादस्वरूप जो कमलाकर माझ्या मस्तकावर ठेवला आहे, तो आपण ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीच्या मस्तकावरसुद्धा कधी ठेवला नव्हता ! इतर संसारी जीवांप्रमाणे लहान-मोठा असा भेदभाव आपण करीत नाही; कारण आपण सर्वांचे आत्मा आणि अकारण प्रेमी आहात. कल्पवृक्षासारखा असलेला आपला प्रसादसुद्धा आपली सेवा केल्यामुळेच प्राप्त होतो. सेवेनुसारच जीवांवर आपल्या कृपेचा उदय होतो. त्यासाठी जातीची उच्चता किंवा नीचता कारणीभूत नाही. भगवन, हा संसार ही एक अंधकारमय विहीर असून तीमध्ये कालरूपी सर्प डसण्यासाठी नेहमी तयार असतो. विषयभोगांची इच्छा असणारे पुरुष तीत पडलेले आहेत. त्यांच्या संगतीने मीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ तीत पडू लागलो होतो. परंतु भगवन, देवर्षी नारदांनी मला आपला समजून तीतून वाचविले. असे असता मी आपल्या भक्तजनांची सेवा कशी सोडू ? हे अनंता, ज्या वेळी माझ्या पित्याने मला मारण्यासाठी हातामध्ये खड्‍ग घेतले आणि म्हटले, “जर माझ्याखेरीज दुसरा कोणी ईश्वर असेल तर तो तुला वाचवील. मी आता तुझे डोके उडवितो,” त्यावेळी आपण माझ्या प्राणांचे रक्षण केले आणि माझ्या पित्याचा वध केला. मला वाटते की आपण आपले सेवक असणार्‍या सनकादी ऋषींचे वचन सत्य करण्यासाठीच तसे केले होते. (२१-२९)

भगवन, हे संपूर्ण जग म्हणजे एकमात्र आपणच आहात. कारण यामध्ये आधी, अन्ती आणि मध्ये आपणच असून त्याहून वेगळे आहात. आपण आपल्या मायेने गुणांच्या परिणामस्वरूप या जगाची उत्पत्ती करून यात पहिल्यापासूनच असूनही प्रवेश करण्याची लीला करता आणि त्या गुणांनी युक्त होऊन अनेक आहात, असे भासविता. भगवन, हे जे काही कार्यकारणरूपाने प्रचीतीला येत आहे, ते सर्व आपणच आहात आणि त्याहून वेगळेही आहात. आपला-परका हा भेदभाव, ही अर्थहीन शब्दांची माया आहे. कारण ज्याच्यापासून ज्याचा जन्म, स्थिती, लय आणि दिसणे असते ते त्याचे स्वरूपच असते. जसे बीज आणि झाड ही कारण आणि कार्याच्या दृष्टीने वेगवेगळी आहेत, तरीसुद्धा गुणधर्म आणि मूळ रूप यांच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत. (३०-३१)

भगवन, आपण हे संपूर्ण विश्व आपल्यामध्ये सामावून घेऊन आत्मसुखाचा अनुभव घेत निष्क्रीय होऊन प्रलयकालीन पाण्यात शयन करता. त्यावेळी आपल्या स्वयंसिद्ध योगाने बाह्य दृष्टी बंद करून आपण आपल्या स्वरूपाच्या प्रकाशात निद्रेलाही विलीन करून घेता आणि तुर्यावस्थेत राहता. त्यावेळी आपण झोपेतही नसता की विषयांचाही उपभोग घेत नसता. आपण आपल्या कालशक्तीने प्रकृतीच्या गुणांना प्रेरित करता, म्हणजेच हे ब्रह्मांड आपलेच शरीर आहे. प्रथम हे आपल्यातच लीन झालेले होते. जेव्हा प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषशय्येवर शयन करणार्‍या आपण योगनिद्रेचा त्याग केला, तेव्हा वटवृक्षाच्या बीजापासून विशाल वृक्ष होतो, त्याप्रमाणे आपल्या नाभीतून ब्रह्मांडकमल उत्पन्न झाले. (३२-३३)

त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाले. जेव्हा त्यांना कमळाखेरीज आणखी काहीच दिसले नाही, तेव्हा स्वतःमध्येच बीजरूपाने व्याप्त असलेल्या तुम्हांला ते जाणू शकले नाहीत आणि तुम्हांला आपल्याबाहेर तुम्ही आहात असे समजून पाण्यात घुसून शंभर वर्षेंपर्यंत शोधत राहिले. परंतु तेथे त्यांना काहीच मिळाले नाही. ते बरोबरच आहे. कारण अंकूर उगवल्यावर बी कसे दिसणार ? तेव्हा ब्रह्मदेवांना मोठेच आश्चर्य वाटले. ते पुन्हा कमळात बसून राहिले. पुष्कळ काळानंतर तीव्र तपश्चर्या केल्याने जेव्हा त्यांचे हृदय शुद्ध झाले, तेव्हा त्यांना पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरणरूप अशा आपल्या शरीरातच ओतप्रोत भरून असलेल्या तुमचा साक्षात्कार झाला. जसा पृथ्वीमध्ये व्यापून असलेल्या अतिसूक्ष्म गंधाचा साक्षात्कार होतो. (३४-३५)

विराट पुरुष हजारो मुखे, चरण, डोकी, हात, मांड्या, नासिका, तोंड, कान, नेत्र, अलंकार आणि आयुधांनी संपन्न होता. त्याच्या विभिन्न अंगांच्या रूपात चौदा लोक दिसत होते. त्या महापुरुषाला पाहून ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला. मधू आणि कैटभ नावाचे रजोगुणी आणि तमोगुणी दोन मोठे बलाढ्य दैत्य होते. जेव्हा ते वेद चोरून घेऊन गेले, तेव्हा आपण हयग्रीव अवतार धारण केला आणि त्या दोघांना मारून सत्वगुणरूप श्रुती ब्रह्मदेवांना परत आणून दिल्या. तो सत्वगुणच आपले अत्यंत प्रिय शरीर आहे, असे महात्मे म्हणतात. पुरुषोत्तमा, अशा प्रकारे आपण मनुष्य, पशु-पक्षी, ऋषी, देव आणि मत्स्य इत्यादी रूपांत अवतार घेऊन लोकांचे पालन तसेच विश्वाचा द्रोह करणार्‍यांचा संहार करीत असता. या अवतारांच्या द्वारे आपण प्रत्येक युगात युगधर्माचे रक्षण करता. कलियुगात आपण गुप्तरूपाने राहाता. म्हणून आपले एक नाव ’त्रियुग’ असेही आहे. (३६-३८)

हे वैकुंठनाथा, माझे मन पापवासनांनी कलुषित झाले आहे. ते मुळातच अत्यंत दोषयुक्त आहे. कामनांमुळे ते व्याकूळ असते आणि हर्ष, शोक, भय तसेच नाना चिंतांनी व्याकूळ असते. आपल्या कथांमध्ये त्याला गोडीच वाटत नाही. यामुळे मी दीन होऊन राहिलो आहे. अशा अशांत मनाने मी आपल्या स्वरूपाचे चिंतन तरी कसे करू ? हे अच्युता, ही कधीही तृप्त न होणारी जीभ मला अन्नाकडे, जननेंद्रिय स्त्रीकडे, त्वचा स्पर्शाकडे, पोट भोजनाकडे, कान शब्दकडे, नासिका गंधाकडे आणि हे चंचल डोळे रूपाकडे याप्रमाणे मला आपापल्याकडे खेचत राहातात. याशिवाय कर्मेंद्रियेसुद्धा आपापल्या विषयांकडे घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती खर्च करतात. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्‍न्या त्याला आपापल्याकडे ओढतात, तशी माझी दशा होऊन राहिली आहे. अश प्रकारे हा जीव आपल्या कर्मबंधनात अडकून या संसाररूपी वैतरणी नदीमध्ये पडला आहे. जन्मापासून मृत्यू, मृत्यूपासून जन्म आणि या दोहोंद्वारा कर्मभोग भोगीत भोगीत हा भयभीत झाला आहे. हा आपला आहे, हा परका आहे, असा भेदभाव बाळगून तो कोणाशी मैत्री करतो, तर कोणाशी शत्रुत्व ! या मूढ जीवाची ही दुर्दशा पाहून आपल्याला त्याची दया येऊ दे. भवनदीच्या पैलतीराला असलेल्या भगवंता, या प्राण्यांनाही आता पार करा. हे जगद्‍गुरो, आपण या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असताना या जीवांना या भव-नदीतून पार करणे आपल्याला काय कठीण आहे ? हे दीननाथा, अज्ञानी जीवांनाच महापुरुषांच्या अनुग्रहाची आवश्यकता आहे. आपल्या भक्तांच्या आम्हां निरंतर सेवकांना त्याची काय जरूरी आहे ? हे परमात्मन, आपल्या परमामृतस्वरूप लीला-गायनात चित्त मग्न असलेल्या मला पार करण्यास कठीण अशा भववैतरणीचे थोडेसुद्धा भय वाटत नाही. परंतु आपल्यापासून विन्मुख असणार्‍या आणि इंद्रियांच्या विषयांचे मायामय खोटे सुख मिळविण्यासाठी संसाराचे ओझे वाहाणार्‍या अज्ञानी जीवांचे मला वाईट वाटत आहे. हे देवा, मुनी तर साधारणपणे आपल्या मुक्तीसाठी निर्जन वनात जाऊन मौनव्रत धारण करतात. ते दुसर्‍यांच्या भल्यासाठी काही प्रयत्‍न करीत नाहीत. परंतु मी या असहाय जीवांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नाही आणि या दिशाहीन भटकणार्‍या प्राण्यांना आपल्याखेरीज दुसर्‍या कोणाचा आश्रय दिसत नाही. (३९-४४) गृहस्थाश्रमी लोकांना मैथुन इत्यादींचे जे सुख मिळते ते अत्यंत तुच्छ आहे. जसे हाताला सुटलेली खाज नाहीशी करण्यासाठी खाजविताना सुरुवातीला थोडेसे सुख झाल्यासारखे वाटते, परंतु नंतर दुःखच दुःख होते. परंतु हे बिचारे अज्ञानी पुष्कळसे दुःख भोगूनही या विषयभोगांनी तृप्त होत नाहीत. याउलट धैर्यवान माणूस जशी सुटलेली खाज सहन करतो, तसाच तो कामाचा वेगही सहन करतो. पुरुषोत्तमा ! मौन, ब्रह्मचर्य, शास्त्रश्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्मपालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांतसेवन, जप आणि समाधी ही मोक्षाची दहा साधने प्रसिद्ध आहेत. परंतु ज्याला आपली इंद्रिये वश नाहीत, त्याच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधने ठरतात. आणि दांभिक लोकांच्याबाबतीत तर त्यांचे ढोंग लोकांच्या लक्षात आल्यावर या गोष्टी उपजीविकेचे साधन म्हणूनही राहात नाहीत. बीज आणि अंकुर यांप्रमाणे वेदांनी कार्य आणि कारण ही आपली दोन रूपे सांगितली आहेत. वास्तविक आपण प्राकृत रूपरहित आहात. परंतु या कार्य आणि कारणरूपांना सोडून आपले ज्ञान होण्याचे अन्य कोणतेही साधन नाही. लाकडावर लाकूड घासून जसा अग्नि प्रगट केला जातो, त्याप्रमाणे योगीजन भक्तियोगाने आपल्याला कार्य आणि कारण ह्या दोन्हींमध्ये शोधतात, कारण ही दोन्ही आपल्या स्वरूपाहून वेगळी नाहीत. हे अनंता ! वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, पाणी, पाच तन्मात्रा, प्राण, इंद्रिये, मन, चित्त, अहंकार, संपूर्ण विश्व तसेच सगुण व निर्गुण हे सर्व केवळ आपणच आहात. एवढेच काय, पण मन आणि वाणीने ज्यांचे वर्णन करता येते, ते सर्व आपल्याहून वेगळे नाही. हे भगवन ! हे सत्त्वादी गुण, त्यांपासून उत्पन्न झालेली महत्‍ आदी तत्त्वे, देव, मनुष्य, मन इत्यादी कोणीही आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत. कारण या सर्वांना सुरुवात व शेवट आहे. असा विचार करून ज्ञानी जन शब्दांनी आपले स्वरूप सांगत नाहीत. म्हणून हे परम पूज्य ! नमस्कार, स्तुती, सर्वकर्मसमर्पण, सेवा, चरणकमलांचे चिंतन आणि लीलाकथांचे श्रवण ही आपल्या सेवेची सहा अंगे आहेत. या सेवेशिवाय परमहंसांचे सर्वस्व असणार्‍या आपली भक्ती कशी प्राप्त होईल ? (४५-५०)

नारद म्हणाले – निर्गुण भगवंतांच्या गुणांचे, भक्त प्रल्हादाने भक्तिभावाने अशा प्रकारे वर्णन करून प्रणाम केला. तेव्हा संतुष्ट झालेले भगवान क्रोध आवरून त्याला म्हणाले. (५१)

श्री भगवान म्हणाले – हे बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी जी इच्छा असेल, ती माग. मी मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. हे चिरंजीवा, जो मला प्रसन्न करून घेत नाही, त्याला माझे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. परंतु माझे दर्शन झाल्यावर माणसाला दुःख करण्याचे कारण नाही. मी सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. म्हणून कल्याणाची इच्छा करणारे परम भाग्यवान साधुजन सर्वतोपरी मला प्रसन्न करण्याचाच प्रयत्‍न करतात. (५२-५४)

नारद म्हणाले – असुरकुळाचे भूषण असणारा प्रल्हाद भगवंतांचा अनन्य भक्त होता. म्हणून लोकांना मोह पाडणार्‍या वरांचे प्रलोभन दाखवूनही त्याने त्यांची इच्छा केली नाही. (५५)

स्कंध सातवा - अध्याय नववा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP