श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ८ वा

भगवान नृसिंहांचा अवतार, हिरण्यकशिपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणतात – प्रल्हादाचे प्रवचन ऐकून दैत्यबालकांनी ते निर्दोष असल्यामुळे स्वीकारले आणि गुरुजींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. सर्व विद्यार्थ्यांची बुद्धी एकमात्र भगवंतांमध्येच स्थिर होत आहे असे पाहून गुरुजी भयभीत झाले आणि ताबडतोब हिरण्यकशिपूकडे जाऊन त्यांनी त्यांना हे निवेदन केले. पुत्र प्रल्हादाची ही असह्य आणि अप्रिय अनीति ऐकून क्रोधाने त्याचे शरीर थरथर कापू लागले. त्याने प्रल्हादाला आता मारायचे ठरवले. (१-३)

मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणारा प्रल्हाद मोठ्या नम्रतेने हात जोडून हिरण्यकशिपूच्या समोर उभा होता आणि खरे तर त्याचा तिरस्कार करणेही अयोग्य होते. परंतु हिरण्यकशिपू स्वभावतःच क्रूर असल्यामुळे लाथ मारल्यावर साप फुसकारतो, तसा तो फूत्कारू लागला. त्याने त्याच्याकडे द्वेषयुक्त तिरप्या नजरेने पाहिले आणि संतापून कठोर शब्दांत म्हटले, “मूर्खा, तू तर अतिशय उद्दाम झाला आहेस. स्वतः तर नीच आहेसच, परंतु आता आपल्या कुळात फूट पाडू पाहतोस. तू उद्धटपणे माझी आज्ञा मोडली आहेस. आजच तुला यमसदनाला पाठवतो. मी रागावलो की, तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपाल यांचा थरकाप होतो. तर मग मूर्खा, तू कोणाच्या भरवशावर भीती नसल्याप्रमाणे माझी आज्ञा मोडतोस ?” (४-७)

प्रल्हाद म्हणाला – महाराज, ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व लहान-मोठे चराचर जीव ज्यांच्या ताब्यात आहेत, तेच मी आणि आपणच नव्हे, तर विश्वातील सर्व बलवंतांचेसुद्धा बळ आहेत. तेच महापराक्रमी सर्वशक्तिमान प्रभू काळ आहेत. तसेच सर्व प्राण्यांचे इंद्रियबल, मनोबल, देहबल, धैर्य आणि इंद्रियेसुद्धा तेच आहेत. तेच परमेश्वर आपल्या शक्तींच्या द्वारा या विश्वाची निर्मिती, रक्षण आणि संहार करतात. तेच तिन्ही गुणांचे स्वामी आहेत. आपण आपला हा असुर स्वभाव सोडून द्या. आपल्या अंकित न राहणार्‍या व कुमार्गाकडे नेणार्‍या या मनाव्यतिरिक्त दुसरा कोणीही या संसारात आपला शत्रू नाही. सर्वांच्याबद्दल मनात समान भाव ठेवा. हीच भगवंताची सर्वश्रेष्ठ पूजा होय. आपले सर्वस्व लुटणार्‍या या सहा इंद्रियरूपी डाकूंवर आधी विजय प्राप्त करून घेत नाहीत आणि आम्ही दहाही दिशा जिंकल्या आहेत, असे काहीजण मानतात. मात्र ज्या ज्ञानी आणि जितेंद्रिय महात्म्याने सर्व प्राण्यांविषयी समभाव बाळगला, त्याला त्याच्या अज्ञानातून प्रगट होणारे कामक्रोधादी शत्रूसुद्धा असत नाहीत; तर मग बाहेरचे शत्रू कोठून असतील ? (८-११)

हिरण्यकशिपू म्हणाला – अरे मंदबुद्धी, तुझ्या बरळण्याची तर हद्द झाली. तू खात्रीने मरू इच्छितोस. कारण जो मरणाच्या दारी असतो, तोच अशा तर्‍हेची बडबड करतो. अरे अभाग्या, माझ्याखेरीज जो कोणी अन्य जगाचा स्वामी आहे असे तू सांगितलेस, तो जगदीश्वर आहे कोठे ? तो सर्वत्र असेल तर मग या खांबात का नाही दिसत ? वायफळ बडबडणार्‍या तुझे डोके हा मी उडवतो. ज्याच्यावर तुझा एवढा भरवसा आहे, तो तुझा हरी तुझे रक्षण करू दे. तो अत्यंत बलवान महादैत्य अशा प्रकारे भगवंतांच्या परम भक्त असणार्‍या मुलाला – प्रल्हादाला रागाने वारंवार वेडेवाकडे बोलून त्रास देऊ लागला. नंतर हातात खड्‍ग घेऊन त्याने सिंहासनावरून खाली उडी मारली आणि अतिशय जोराने तेथील एका खांबावर एक ठोसा मारला. हे राजा, त्याच वेळी त्या खांबातून एक महाभयंकर आवाज ऐकू आला. त्या आवाजाने ब्रह्मांडच फाटले की काय, असे वाटू लागले. सत्यलोकापर्यंत जेव्हा तो आवाज पोहोचला, तेव्हा तो ऐकून ब्रह्मदेवादिकांना वाटले की जणू आपल्या लोकात प्रलय होऊ लागला आहे. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने जेव्हा जोरात उडी मारली, तेव्हा दैत्यसेनापतींचा सुद्धा भयाने थरकाप उडवून देणारा तो अद्‌भुत आणि अपूर्व आवाज त्याने ऐकला. पण हा आवाज करणारा कोणी त्या सभेत त्याला दिसला नाही. (१२-१७)

आपले सेवक प्रल्हाद आणि ब्रह्मदेव यांची वाणी सत्य करण्यासाठी आणि सर्व पदार्थांमध्ये आपली व्यापकता दाखविण्यासाठी त्याच वेळी सभेमध्ये त्या खांबातून अतिशय आश्चर्यकारक रूप धारण करून भगवंत प्रगट झाले. ते रूप ना सिंहाचे होते ना मनुष्याचे. हिरण्यकशिपू ज्यावेळी आवाज काढणार्‍याचा शोध घेत होता, त्याचवेळी खांबातून निघणार्‍या त्या अद्‌भुत प्राण्याला त्याने पाहिले. तो विचार करू लागला, “हा तर मनुष्य नाही की पशूही नाही; तर मग हा नृसिंह रूपातील अलौकिक प्राणी कोण आहे ? तो असा विचार करीत होता, तोच त्याच्या अगदी समोर नृसिंहभगवान उभे राहिले. त्यांचे ते रूप अतिशय भयानक होते. तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धमक भयानक डोळे होते. जांभई दिल्यामुळे आयाळ इकडे तिकडे फडफडत होती. दाढा अतिशय विक्राळ होत्या. तलवारीप्रमाणे चमकणारी, सुरीप्रमाणे धारदार तीक्ष्ण जीभ होती. भुवया उंचावल्याने त्यांचे मुख अधिकच दारुण दिसत होते. कान वरच्या बाजूला ताठ दिसत होते. फुगविलेले नाक आणि उघडलेले तोंड पहाडातील गुहेप्रमाणे अद्‌भुत वाटत होते. फाकलेल्या जबड्यामुळे त्याची भयानकता फारच वाढली होती. विशाल शरीर स्वर्गाला स्पर्श करीत होते. मान थोडीशी बुटकी आणि मोठी होती. छाती रुंद आणि कंबर बारीक होती. चंद्रकिरणाप्रमाणे असणारे शुभ्र रोम सर्व शरीरावर चमकत होते. चारी बाजूंना शेकडो हात पसरलेले होते. त्यांची नखे हीच आयुधे होती. त्यांच्या जवळपास फिरकणेसुद्धा अशक्य होते. आपल्या चक्रादी आणि इतरांच्या वज्रादी श्रेष्ठ शस्त्रांनी त्यांनी सर्व दैत्य-दानवांना पळवून लावले. हिरण्यकशिपूला वाटले, बहुदा महामायावी विष्णूनेच मला मारण्यासाठी हे सोंग घेतले आहे. परंतु त्याच्या या चालीने माझे काय वाकडे होणार आहे ? (१८-२३)

असे म्हणत आणि गर्जना करीत तो दैत्यरूप हत्ती हिरण्यकशिपू हातात गदा घेऊन नृसिंहावर तुटून पडला. परंतु जसा पतंग आगीत पडल्यावर अदृश्य होतो, तसाच तो दैत्य भगवंतांच्या तेजामध्ये दिसेनासा झाला. सर्व शक्ती आणि तेजाचा आश्रय असणार्‍या भगवंतांच्या बाबतीत हे काही आश्चर्यकारक नाही. कारण सृष्टीच्या प्रारंभी त्यांनी आपल्या तेजाने तमोगुणरूपी घोर अंधकारसुद्धा नाहीसा केला होता. त्यानंतर त्या दैत्याने अतिशय क्रोधाने हल्ला करून आपली गदा जोराने फिरवून तिने नृसिंहावर प्रहार केला. जसा गरुड सापाला पकडतो, तसे प्रहार करतेवेळीच भगवंतांनी गदेसहित त्या दैत्याला पकडले. ते जेव्हा त्याच्याशी खेळू लागले, तेव्हा जसा खेळ करताना गरुडाच्या पकडीतून साप सुटतो तसा तो दैत्य त्यांच्या हातून निसटला. युधिष्ठिरा, स्थाने हिरावून घेतलेले लोकपाल त्यावेळी ढगांत लपून हे युद्ध पाहात होते. तो भगवंतांच्या हातातून निसटल्याचे पाहाताच ते घाबरले. हिरण्यकशिपूलाही असेच वाटले की, आपल्या शौर्याला घाबरून नृसिंहाने आपल्याला हातातून सोडून दिले. या विचाराने उत्साहित होऊन ढाल-तलवार घेऊन तो युद्धासाठी पुन्हा त्यांना जाऊन भिडला. त्यावेळी तो ससाण्याप्रमाणे मोठ्या वेगाने खाली-वर उड्या मारीत ढाल-तलवारीचे असे काही पवित्रे बदलू लागला की, ज्यामुळे त्याच्यावर आक्रमण करण्याची संधीच मिळू नये. तेव्हा भगवान अत्यंत उच्च स्वराने प्रचंड आवाजात असे हसले की त्यामुळे हिरण्यकशिपूने डोळे मिटले. नंतर साप जसा उंदराला पकडतो, त्याप्रमाणे भगवंतांनी अत्यंत वेगाने झडप घालून त्याला पकडले. ज्याच्या अंगावर वज्राच्या आघातानेही खरचटले नव्हते, तोच आता त्यांच्या हातून सुटण्यासाठी अतिशय धडपड करू लागला. भगवंत त्याला दरवाजात घेऊन गेले आणि त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन सहजपणे आपल्या नखांनी त्याला असे फाडले की गरुडाने अत्यंत विषारी सापाला फाडावे. त्यावेळी त्यांच्या क्रोधयुक्त भीषण डोळ्यांकडे पाहावत नव्हते. ते आपल्या जिभेने पसरलेल्या तोंडाच्या दोन्ही कडा चाटीत होते. रक्ताच्या चिळकांड्यांनी त्यांचे तोंड आणि आयाळ लाल झाली होती. हत्तीला मारून त्याच्या आतड्यांची माळ गळ्यात घातलेल्या सिंहाप्रमाणे ते दिसत होते. त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याला जमिनीवर आपटले. हजारो दैत्य-दानव त्यावेळी हातात शस्त्रे घेऊन भगवंतांवर प्रहार करण्यासाठी आले; परंतु भगवंतांनी चारी बाजूंनी आलेल्या त्यांना आपल्या भुजारूपी सेनेने, लाथांनी आणि नखरूपी शस्त्रांनी मारले. (२४-३१)

भगवान नृसिंहांच्या आयाळीच्या फटकार्‍याने ढग इतस्ततः विखुरले. त्यांच्या नेत्रांतील तेजाने सूर्यादी ग्रहांचे तेज फिके पडले. त्यांच्या श्वासांच्या जोराने समुद्र खवळले आणि सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती चीत्कार करू लागले. त्यांच्या आयाळीला थडकून देवतांची विमाने अस्ताव्यस्त झाली. स्वर्ग डळमळू लागला. आपटलेल्या पायांच्या धक्क्याने भूकंप होऊ लागले आणि वेगाने पर्वत उडू लागले. तसेच तेजामुळे आकाश आणि दिशा दिसेनाशा झाल्या. यावेळी भगवंतांशी सामना करील, असा कोणी दिसत नव्हता. शिवाय त्यांचा क्रोधही वाढतच होता. राजसभेत ते उंच सिंहासनावर जाऊन विराजमान झाले. त्यावेळी त्यांच्या अत्यंत तेजस्वी आणि क्रुद्ध झालेल्या भयंकर चेहर्‍याकडे पाहून, त्यांच्याजवळ जाऊन त्यांची सेवा करण्याचे कोणालाही धाडस झाले नाही. (३२-३४)

जेव्हा स्वर्गातील देवींना ही आनंदाची बातमी समजली की, तिन्ही लोकांची डोकेदुखी असलेला हिरण्यकशिपू युद्धामध्ये भगवंतांच्या हातून मारला गेला, तेव्हा आनंदाने त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले. त्या भगवंतांवर वारंवार पुष्पवर्षाव करू लागल्या. त्यावेळी विमानातून आलेल्या देवतांची भगवंतांच्या दर्शनासाठी आकाशात गर्दी झाली. देवांचे ढोल आणि नगारे वाजू लागले. गंधर्वराज गाऊ लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. राजा, त्याचवेळी ब्रह्मदेव, इंद्र, शंकर इत्यादी देव, ऋषी, पितर, सिद्ध, विद्याधर, महानाग, मनू, प्रजापती, गंधर्व, अप्सरा, चारण, यक्ष, किंपुरुष, वेताळ, सिद्ध, किन्नर आणि सुनंद, कुमुद वगैरे भगवंतांचे सर्व पार्षद त्यांच्याजवळ आले. सिंहासनावर विराजमान झालेल्या अत्यंत तेजस्वी भगवान नृसिंहांची ते मस्तकावर हात जोडून थोड्या अंतरावरून स्वतंत्रपणे स्तुती करू लागले. (३५-३९)

ब्रह्मदेव म्हणाले – प्रभो, आपण अनंत आहात. आपल्या शक्तीचा कोणाला अंत लागत नाही. आपला पराक्रम अद्‍भुत आणि कर्म पवित्र आहे. जरी आपण गुणांच्याद्वारा आपल्या लीलेनेच, संपूर्ण विश्वाची उत्पत्ती, पालन आणि प्रलय करीत असला, तरी स्वतः निर्विकार असता. मी आपणांस नमस्कार करतो. (४०)

श्रीरुद्र म्हणाले – कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता, पण ज्या तुच्छ दैत्याला मारण्यसाठी आपण आज क्रुद्ध झालात, तो मारला गेला आहे. हे भक्तवत्सल प्रभो, आपण आपल्या या भक्ताचे रक्षण करावे. (४१)

इंद्र म्हणाले – हे परमात्मन नरसिंहा ! आपण आमचे रक्षण करून आमचे जे यज्ञभाग आम्हांला परत मिळवून दिले ते वास्तविक आपलेच आहेत. दैत्याच्या त्रासाने मिटलेले आमचे हृदयकमल आपण प्रफुल्लित केले, ते सुद्धा आपलेच निवासस्थान आहे. अहो नाथ, हे जे स्वर्गाचे राज्य त्याची आपल्या सेवकांना काय तमा ! कारण ते काळाचाच घास आहे. आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय मुक्तीचासुद्धा आदर करीत नाहीत. तर मग इतर भोगांची काय कथा ! (४२)

ऋषी म्हणाले – हे पुरुषोत्तमा, आपण तपश्चर्येच्या मार्गानेच आपल्यात लीन झालेल्या जगाची पुन्हा उत्पत्ती केली होती आणि त्याच आत्मतेजःस्वरूप श्रेष्ठ तपश्चर्येचा आम्हांला उपदेश केला होता. या दैत्याने त्या तपश्चर्येचा विध्वंस केला होता. हे शरणागतवत्सला, त्या तपश्चर्येचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून त्याच उपदेशाला आपण अनुमोदन दिले आहे. (४३)

पितर म्हणाले – प्रभो, आमचे पुत्र आमच्यासाठी जे पिंडदान करीत ते हा बळजबरीने हिसकावून घेऊन खात असे. जेव्हा ते तीर्थामध्ये किंवा पर्वकाळी तिलतर्पण करीत ते सुद्धा हा पीत असे. आज आपण आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून ते सर्व आम्हांला परत दिले आहे. सर्व धर्मांचे आपणच रक्षणकर्ते आहात. हे नृसिंहदेवा, आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. (४४)

सिद्ध म्हणाले – हे नृसिंहदेवा, या दुष्टाने आपल्या योग आणि तपश्चर्येच्या बळावर आमची योगसाधनेने सिद्ध केलेली गती हिसकावून घेतली होती. आपण आपल्या नखांनी त्या घमेंडखोराला फाडले आहे. विनम्र भावाने आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. (४५)

विद्याधर म्हणाले – हा मूर्ख आपले बळ आणि शौर्य यांनी घमेंडखोर झाला होता. आम्ही विविध धारणा करून जी विद्या प्राप्त केली होती, तीसुद्धा याने नाहीशी करून टाकली. युद्धामध्ये आपण याला यज्ञपशुप्रमाणे मारले. मायेने नृसिंह बनलेल्या आपणांस आम्ही नित्य नमस्कार करीत आहोत. (४६)

नाग म्हणाले – ज्या पाप्याने आमचे मणी आणि आमच्या श्रेष्ठ व सुंदर स्त्रियांना सुद्धा हिसकावून घेतले, त्याची छाती फाडून आपण आमच्या पत्‍न्यांना अतिशय आनंदित केले आहे. प्रभो, आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. (४७)

मनू म्हणाले – देवाधिदेवा, आम्ही आपले आज्ञाधारक मनू आहोत. ज्या दैत्याने आमची धर्ममर्यादा उल्लंघिली होती, त्या दुष्टाला आपण मारले. आम्ही आपले सेवक आहोत. आम्ही आपली काय सेवा करावी, याविषयी आज्ञा करा. (४८)

प्रजापती म्हणाले – परमेश्वरा, आपण आम्हांला प्रजापती बनविले होते. परंतु याने मनाई केल्याने आम्ही प्रजा उत्पन्न करू शकत नव्हतो. आपण याची छाती फाडली आणि हा जमिनीवर कायमचा झोपी गेला. सत्वमय मूर्ती धारण करणार्‍या हे प्रभो, आपला हा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे. (४९)

गंधर्व म्हणाले – प्रभो, आम्ही आपल्यासाठी नृत्य करणारे, अभिनय करणारे आणि संगीत ऐकविणारे सेवक आहोत. ज्या दैत्याने आपले बळ, शौर्य आणि पराक्रमाने आम्हांला त्याचे गुलाम करून ठेवले होते, त्याची आपण ही दशा केलीत. कुमार्गाने जाणार्‍याचे कधीच कल्याण होत नाही हेच खरे ! (५०)

चारण म्हणाले – प्रभो, सज्जनांच्या हृदयाला पीडा देणार्‍या या दुष्टाला आपण संपविले आहे. जे प्राप्त होताच जन्म-मृत्युरूप संसारचक्रातून सुटका होते, त्या आपल्या चरणकमलांना आम्ही शरण आलो आहोत. (५१)

यक्ष म्हणाले – हे नरहरे, आपल्या श्रेष्ठ कर्मांमुळे आम्ही आपल्या सेवकांमध्ये प्रधान म्हणून गणले जात होतो. परंतु हिरण्यकशिपूने आम्हांला आपली पालखी वाहाणारे भोई बनविले. हे प्रकृतीच्या नियामक परमात्म्या, याच्यामुळे लोकांना होणार्‍या कष्टाच्या जाणीवेनेच आपण त्याला मारले आहे. (५२)

किंपुरुष म्हणाले – आम्ही अत्यंत तुच्छ असे किंपुरुष आहोत आणि आपण सर्वशक्तिमान महापुरुष आहात. सत्पुरुषांनी याला धिक्करले, म्हणूनच हा कुपुरुष झाला. (५३)

वैतालिक म्हणाले – भगवन, मोठमोठ्या सभा आणि ज्ञानयज्ञांमध्ये आम्ही आपल्या निर्मल यशाचे गायन करून मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेत होतो. या दुष्टाने आमचे ते उपजीविकेचे साधनच नष्ट केले होते. महारोगाप्रमाणे या दुष्टाला आपण मुळापासून उखडून टाकले, ही मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. (५४)

किन्नर म्हणाले – आम्ही किन्नरगण आपले सेवक आहोत. ह्या दैत्याने आम्हांला वेठबिगार केले होते. हे हरे, आज आपण या पाप्याला नष्ट केले. हे नरसिंह प्रभो, अशीच आपण आमची भरभराट करीत राहावे. (५५)

भगवंतांचे पार्षद म्हणाले – शरणागतवत्सला, सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपले हे अलौकिक नृसिंहरूप आम्ही आजच पाहिले आहे. भगवन, ज्याला सनकादिकांनी शाप दिला होता तोच हा आपला आज्ञाधारक सेवक. आम्ही असे समजतो की, आपण कृपाळूपणे याचा उद्धार करण्यासाठीच याचा वध केला आहे. (५६)

स्कंध सातवा - अध्याय आठवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP