|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ७ वा - अध्याय ७ वा
मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदांच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] नारद म्हणतात – दैत्यपुत्रांनी जेव्हा असा प्रश्न केला, तेव्हा भगवंतांच्या परम प्रेमी भक्त प्रल्हादाला मी सांगितलेल्या गोष्टींचे स्मरण झाले. मंद हास्य करीत तो त्यांना म्हणाला. (१) प्रल्हाद म्हणाला – आमचे वडील जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी मंदराचलावर गेले होते, तेव्हा इंद्रादी देवांनी दानवांशी युद्ध करण्याची फार मोठी तयारी केली. ते म्हणू लागले की, जशा मुंग्या सापाला खातात, त्याचप्रमाणे लोकांना त्रास देणार्या पापी हिरण्यकशिपूला त्याच्या पापानेच खाऊन टाकले. देवांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे, असे जेव्हा दैत्यांच्या सेनापतींना समजले, तेव्हा त्यांचे साहस कमी होऊ लागले. देवांकडून मार खाल्यानंतर, स्त्री, पुत्र, मित्र, आप्तेष्ट, वाडे, गुरेढोरे आणि इतर साहित्य यांपैकी कशाचीही चिंता न करता भयभीत होऊन आपले प्राण वाचविण्यासाठी ते सर्वजण अतिशय लगबगीने जिकडे तिकडे पळून गेले. आपला विजय व्हावा या हेतूने देवांनी राजमहालात लुटालूट केली. ऐवढेच काय, इंद्राने माझी माता पट्टराणी कयाधूलासुद्धा बंदी बनविले. भीतीने व्याकूळ होऊन माझी माता टिटवीप्रमाणे रडत होती आणि इंद्र बळजबरीने तिला घेऊन जात होता. दैवयोगाने देवर्षी नारद तेथून जात होते. त्यांनी वाटेत माझ्या मातेला पाहिले. ते म्हणाले, “देवराज, ही निरपराध आहे. हिला घेऊन जाणे योग्य नाही. महाभागा, या साध्वी परस्त्रीला ताबडतोब सोड.” (२-८) इंद्र म्हणाला – देवद्रोही हिरण्यकशिपूचे अत्यंत प्रभावशाली वीर्य हिच्या पोटात आहे. प्रसुत होईपर्यंत ही माझ्याजवळ राहील. बालक झाल्यावर त्याला मारून मी हिला सोडून देईन. (९) नारद म्हणाले – भगवंतांचा साक्षात परमप्रेमी भक्त आणि सेवक हिच्या गर्भात आहे. तो अत्यंत बलवान आणि निष्पाप महात्मा आहे. तू त्याला मारू शकणार नाहीस. देवर्षी नारदांचे हे म्हणणे मान्य करून इंद्राने माझ्या मातेला सोडून दिले. शिवाय हिच्या गर्भामध्ये भगवद्भक्त आहे, हे जाणून त्याने माझ्या मातेला प्रदक्षिणा केली आणि तो आपल्या लोकी निघून गेला. (१०-११) यानंतर देवर्षी नारद माझ्या मातेला आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि तिची समजूत घालून म्हणाले, “मुली, तुझे पती तपश्चर्या करून परत येईपर्यंत तू येथेच रहा.” “जशी आपली आज्ञा” असे म्हणून निर्भयपणे देवर्षी नारदांच्या आश्रमात दैत्यराज घोर तपश्चर्या पूर्ण करून परत येईपर्यंत ती राहू लागली. माझी गरोदर माता गर्भातील बाळाचे कल्याण व्हावे आणि योग्य वेळी प्रसूती व्हावी, या इच्छेने मोठ्या भक्तिभावाने नारदांची सेवा करीत राहिली. (१२-१४) देवर्षी नारद अतिशय दयाळू आणि सर्वसमर्थ आहेत. त्यांनी माझ्या मातेला भागवत धर्माचे रहस्य आणि विशुद्ध ज्ञान असा दोन्हींचा उपदेश दिला. उपदेश करतेवेळी त्यांचे लक्ष्य मी ही होतो. पुष्कळ कालावधी निघून गेल्यामुळे आणि स्त्री स्ववाभानुसार माझ्या मातेला त्या ज्ञानाचे स्मरण राहिले नाही. परंतु देवर्षींची विशेष कृपा असल्याने अजूनही मला त्याची विस्मृती झाली नाही. माझ्या या म्हणण्यावर तुम्ही श्रद्धा ठेवाल, तर तुम्हालाही ते ज्ञान प्राप्त होऊ शकेल; कारण श्रद्धेमुळे स्त्रिया व मुले यांची बुद्धीसुद्धा माझ्याप्रमाणेच देहादिकांविषयीचा अहंकार नष्ट करणारी होऊ शकते. ज्याप्रमाणे ईश्वरमूर्ती कालाच्या प्रेरणेने वृक्षांच्या फळांना सहा विकार होतात, त्याचप्रमाणे जन्म, अस्तित्वाची जाणीव, वाढ, परिणाम, क्षय आणि विनाश हे सहा विकार शरीरालाच दिसतात; त्यांचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. आत्मा नित्य, अविनाशी, शुद्ध, एक, क्षेत्रज्ञ, आश्रय, निर्विकार, स्वयंप्रकाश, सर्वांचे कारण, व्यापक, असंग तसेच कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेला असा आहे. ही आत्म्याची बारा उत्कृष्ट लक्षणे होत. यांच्या योगाने आत्मतत्त्व जाणणार्या पुरुषाने, अज्ञानामुळे, शरीर इत्यादींच्यामध्ये जो मी-माझे पणाचा खोटा भाव उत्पन्न उत्पन्न होतो त्याचा त्याग केला पाहिजे. जसे दगडात असलेले सोने काढण्याची युक्ती माहीत असणारा सुवर्णकार त्या युक्तीने सोन्याची प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे अध्यात्मतत्व जाणणारा पुरुष आत्मप्राप्तीच्या उपायांच्या द्वारे आपल्या शरीररूप क्षेत्रातच ब्रह्मपदाचा साक्षात्कार करून घेतो. (१५-२१) मूळ प्रकृती, महतत्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या आठ तत्वांना आचार्यांनी मूळ प्रकृती म्हटले आहे. सत्व, रज, तम हे तिचे तीन गुण आहेत आणि दहा इंद्रिये, एक मन आणि पंचमहाभूते हे तिचे सोळा विकार आहेत. या सर्वांमध्ये एक पुरुषतत्व व्यापून राहिले आहे. या सर्वांचा समुदाय म्हणजेच हा देह होय. हा स्थावर व जंगम असा दोन प्रकारचा आहे. या देहात अंतःकरण इंद्रिये इत्यादी अनात्म वस्तूंचाच “हा आत्मा नाही,” असा निषेध करीत आत्म्याला शोधले पाहिजे. आत्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे. परंतु तो त्या सर्वांपासून वेगळा आहे. अशा प्रकारे शुद्ध बुद्धीने हळू हळू सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांवर विचार केला पाहिजे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्या तीन वृत्ती आहेत. या वृत्तींचा ज्याच्यामुळे अनुभव येतो, तोच सर्वांपलीकडचा सर्वांचा साक्षी परमात्मा होय. जसे गंधामुळे त्याचा आश्रय असलेल्या वायूचे ज्ञान होते, त्याचप्रमाणे बुद्धीच्या या कर्मजन्य आणि बदलणार्या तिन्ही अवस्थांच्या द्वारा त्यांत साक्षीभावाने व्याप्त असणार्या आत्म्याला जाणावे. गुण आणि कर्मांमुळे उत्पन्न होणारे हे जन्म-मृत्यूचे चक्र आत्म्याला शरीर आणि प्रकृतीपासून वेगळे करीत नसल्यानेच चालू आहे. हे अज्ञानमूलक आणि मिथ्या आहे, असे असूनसुद्धा जीवाला याची स्वप्नाप्रमाणे प्रचीती येत असते. (२२-२७) म्हणून तुम्ही प्रथम या गुणांना अनुसरून होणार्या कर्मांचे बीजच नाहीसे केले पाहिजे. असे केल्याने बुद्धीच्या निरनिराळ्या वृत्तींचा प्रवाह नाहीसा होतो. यालाच दुसर्या शब्दांत योग किंवा परमात्म्याशी मिलन होणे असे म्हणतात. हे करण्यासाठी हजारो साधने आहेत. परंतु ज्या उपायाने सर्वशक्तिमान भगवंतांविषयी स्वाभाविक निष्काम प्रेम निर्माण होईल, तोच उपाय सर्वश्रेष्ठ होय. ही गोष्ट स्वतः भगवंतांनीच सांगितली आहे. गुरूंची प्रेमपूर्वक सेवा, आपल्याला जे मिळेल ते सर्व प्रेमाने भगवंतांना समर्पित करणे, भगवत्प्रेमी महात्म्यांचा सत्संग, भगवंतांची आराधना, त्यांच्या कथांविषयी श्रद्धा, त्यांच्या गुण आणि लीलांचे कीर्तन, त्यांच्या चरणकमलांचे ध्यान, त्यांची मंदिरे-मूर्ती इत्यादींचे दर्शन, पूजन इत्यादी साधनांनी भगवंतांविषयी स्वाभविक प्रेम उत्पन्न होते. सर्वशक्तिमान भगवान श्रीहरी सर्व प्राण्यांमध्ये विराजमान आहेत. या भावनेने सर्व प्राण्यांची इच्छा यथाशक्ती पूर्ण करून अंतःकरणपूर्वक त्यांचा सन्मान करावा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा शत्रूंवर विजय प्राप्त करून जे लोक भगवंतांची भक्ती करतात, त्यांना त्या भक्तीमुळे भगवान वासुदेवांविषयी प्रेम निर्माण होते. (२८-३३) जेव्हा भगवंतांनी लीलाशरीरांनी केलेल्या अद्भुत पराक्रमांनी, त्यांचे अनुपम गुण आणि चरित्रांचे श्रवण करून अत्यंत आनंदाच्या उद्रेकाने मनुष्याचे शरीर रोमांचित होते, अश्रुंमुळे कंठ दाटून येतो आणि तो लाजलज्जा सोडून मोठमोठ्याने गाऊ-नाचू लागतो आणि ओरडतोही. ज्यावेळी तो ग्रहपीडेने वेडा झालेल्या माणसाप्रमाणे कधी हसतो, कधी रडतो, कधी ध्यान करतो, तर कधी भगवद्भावाने लोकांना नमस्कार करू लागतो, जेव्हा तो भगवंतांमध्येच तन्मय होऊन दीर्घ निःश्वास टाकू लागतो आणि संकोच सोडून “हरे, जगत्पते, नारायणा, असे म्हणू लागतो, तेव्हा भक्तियोगाच्या महान प्रभावाने त्याची सर्व बंधने तुटून पडतात आणि भगवद्भावाचीच भावना करीत करीत त्याचे हृदयसुद्धा तदाकार-भगवन्मय होऊन जाते. त्यावेळी त्याच्या जन्म-मृत्यूच्या बीजांचा साठासुद्धा जळून जातो आणि तो श्रीभगवंतांना प्राप्त होतो. या जगात पापात्म्या जीवासाठी भगवंतांची प्राप्ती ही संसारचक्राला मिटवून टाकणारी आहे. काही विद्वान ह्या वस्तूला ब्रह्म आणि काहीजण निर्वाण सुखाच्या रूपात ओळखतात. म्हणून शहाण्या मित्रांनो, आपापल्या हृदयात तुम्ही हृदयेश्वर भगवंतांचे भजन करा. असुरकुमारांनो, आपल्या हृदयातच आकाशाप्रमाणे नित्य विराजमान असणार्या भगवंतांचे भजन करण्यासाठी कोणते असे विशेष कष्ट पडतात ? ते समानरूपाने सर्व प्राण्यांचे प्रेमळ मित्र आहेत. एवढेच काय, आपले आत्माच आहेत. त्यांना सोडून भोगसामग्री का गोळा करायची ? धन, पत्नी, गुरे-ढोरे, पुत्र, घर, जमीन, हत्ती, खजिना इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे ऐश्वर्य, एवढेच काय, संसारातील विनाशी संपूर्ण धन आणि भोगसामग्री क्षणभंगूर जीवन असणार्या या मनुष्याला कितीसे सुख देऊ शकेल ? त्याचप्रमाणे यज्ञयागामुळे प्राप्त होणारे स्वर्गादी लोकसुद्धा नाशवान आणि उच्चनीच असे आहेत. म्हणून ते सुद्धा निर्दोष नाहीत. केवळ परमात्म्यामध्ये दोष असलेला कोणी पाहिला नाही की ऐकला नाही. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनन्य भक्तीने त्याचेच भजन केले पाहिजे. (३४-४०) याशिवाय स्वतःला मोठा विद्वान समजणारा मनुष्य या लोकात ज्या उद्देशाने वारंवार अनेक कर्मे करतो, त्या उद्देशांची प्राप्ती तर लांबच, उलट त्याच्या विपरीतच फळ त्याला खात्रीने मिळते. या जगात कर्म करणार्याचे दोन उद्देश असतात – सुख मिळविणे आणि दुःखापासून सुटका करून घेणे. परंतु जो अगोदर इच्छा नसल्यामुळे सुखात राहात असे, त्याला आता इच्छेमुळे नेहमी दुःख भोगावे लागते. मनुष्य सकाम कर्मांनी या लोकी ज्या शरीरासाठी भोग प्राप्त करू इच्छितो, ते शरीरच मुळी आपले नाही, नाशवान आहे आणि येणारे-जाणारे आहे. जेथे शरीराचीच ही अवस्था आहे, तेथे त्याच्यापासून वेगळे असणार्या पुत्र, स्त्री, घर, धन, राज्य, खजिनाम हत्ती-घोडे, मंत्री, नोकर-चाकर, आप्तेष्ट आणि आपले वाटणारे इतर यांची काय कथा ? हे विषय शरीराबरोबरच नष्ट होणारे, अर्थपूर्ण वाटले तरी अनर्थ करणारेच आहेत. आत्मा स्वतःच परम आनंदाचा महान समुद्र आहे. त्याला या वस्तूंचा काय उपयोग ? बंधूंनो, विचार करा. जो जीव गर्भात असल्यापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये आपल्या कर्मांच्या अधीन होऊन अनंत क्लेश भोगतो, त्याचा या संसारात काय स्वार्थ आहे ? सूक्ष्म शरीरालाच तो जीव आपला आत्मा मानून त्याच्या द्वारा अनेक प्रकारची कर्मे करतो आणि कर्मांमुळेच पुन्हा शरीर ग्रहण करतो. अशा प्रकारे कर्मामुळे शरीर आणि शरीरामुळे कर्म ही परंपरा चालू राहाते आणि हे सर्व अविवेकामुळे होते. म्हणून निष्काम भावाने निष्र्किय आत्मस्वरूप भगवान श्रीहरींचे भजन करा. धर्म, अर्थ आणि काम हे त्यांच्या इच्छेखेरीज मिळत नाहीत. भगवान श्रीहरी सर्व प्राण्यांचे ईश्वर, आत्मा आणि परम प्रियतम आहेत. आपणच निर्माण केलेल्या पंचमहाभूते आणि सूक्ष्मभूते इत्यादींच्या द्वारे निर्माण केलेल्या शरीरामध्ये ते जीव म्हणून राहातात. देवता, दैत्य, मनुष्य, यक्ष किंवा गंधर्व, कोणी का असेना जो भगवंतांच्या चरण कमलांचे सेवन करतो, त्याचे आमच्याप्रमाणेच कल्याण होते. (४१-५०) दैत्यबालकांनो, भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी ब्राह्मण, देवता किंवा ऋषी होणे, सदाचार आणि विविध ज्ञानाने परिपूर्ण होणे, दान, तप, यज्ञ, शारीरिक आणि मानसिक पवित्रता तसेच व्रतांचे अनुष्ठान हे पुरेसे नाही. भगवंत केवळ निष्काम भक्तीनेच प्रसन्न होतात. इतर सर्व निरर्थक आहे. म्हणून दानव बंधूंनो, सर्व प्राण्यांना आपल्यासारखेच समजून सर्वत्र विराजमान, सर्वात्मा, सर्वशक्तिमान भगवंतांची भक्ती करा. भगवंतांच्या भक्तीच्या प्रभावाने दैत्य, यक्ष, राक्षस, स्त्रिया, शूद्र, गवळी, पशु-पक्षी आणि पिष्कळसे पापी जीवसुद्धा भगवद्भावाला प्राप्त झाले आहेत. या शरीरात जीवाचा सगळ्यांत मोठा स्वार्थ एवढाच आहे की, त्याने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त करून घ्यावी. नेहमी सर्व ठिकाणी आणि सर्व वस्तूंमध्ये भगवंतांचे दर्शन करणे हेच त्या भक्तीचे स्वरूप आहे. (५१-५५) स्कंध सातवा - अध्याय सातवा समाप्त |