श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ६ वा

प्रल्हादाचा असूर-बालकांना उपदेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

प्रल्हाद म्हणाला – या जगात मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. तो परमात्म्याची प्राप्ती करून देणारा, परंतु केव्हाही नाहीसा होणारा आहे. म्हणून शहाण्याने लहानपणीच भगवंतांची प्राप्ती करून देणार्‍या साधनांचे अनुष्ठान केले पाहिजे. या मनुष्य-जन्मात भगवंतांच्या चरणांना शरण जाणे एवढीच जीवनाची सफलता आहे; कारण भगवंत सर्व प्राण्यांचे स्वामी, सुहृद, प्रियतम आणि आत्मा आहेत. बंधूंनो, जसे कोणताही प्रयत्‍न न करता दैवामुळे दुःख भोगावे लागते लागते, त्याचप्रमाणे इंद्रियांचे सुख, जीव कोणत्याही योनीत असला, तरी त्याला मिळतेच. म्हणून सांसारिक सुखासाठी प्रयत्‍न करण्याची आवश्यकता नाही. कारण असे करणे म्हणजे आयुष्य आणि शक्ती व्यर्थ खर्च करणे होय. शिवाय त्यामुळे त्याला भगवंतांच्या कल्याणस्वरूप चरणकमलांची प्राप्ती होत नाही. म्हणून ज्याच्या डोक्यावर अनेक प्रकारचे भय स्वार झाले आहे, असे हे शरीर जोपर्यंत मृत्यूच्या मुखात जात नाही, तोपर्यंतच बुद्धिमान पुरुषाने आपल्या कल्याणासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षांचे आहे. ज्याने आपल्या इंद्रियांना वश केले नाही, त्याचे अर्धे आयुष्य व्यर्थ निघून जाते; कारण तो रात्रीच्या वेळी गाढ अज्ञानाने ग्रस्त होऊन झोपलेला असतो. बालपणी त्याला ज्ञान नसते. कुमार-अवस्था खेळण्यात जाते, अशा स्थितीत वीस वर्षे निघून जातात. जेव्हा म्हातारपण शरीराला ग्रासते, तेव्हा शेवटच्या वीस वर्षांत काही करण्याची अंगात शक्ती उरत नाही. कधीही पूर्ण न होणार्‍या मोठ-मोठ्या इच्छा आणि जबरदस्त मोह यांमध्ये घरा-दाराची आसक्ती असलेल्या बेसावध जीवाचे उरलेसुरले आयुष्यही निघून जाते. (१-८)

ज्याला इंद्रिये वश नाहीत, असा कोणता पुरुष घरा-दारात आसक्त राहून माया-ममतेच्या मजबूत पाशात अडकलेल्या स्वतःला सोडवू शकेल ? ज्याचा चोर, सेवक तसेच व्यापारी आपल्या अत्यंत प्रिय अशा प्राणांची बाजी लावून संग्रह करतात आणि म्हणून जे त्यांना प्राणांपेक्षाही अधिक हवेसे वाटते, त्या धनाचा लोभ कोणाला सोडवेल ? जो आपल्या प्रेमळ पत्‍नीशी एकांतात सहवास, तिच्या प्रेमळ गोष्टी आणि गोड सल्ल्याला भुलला, भाऊबंद आणि मित्रांच्या स्नेहपाशात बांधला गेला आणि लहान बोबड्या मुलांच्या बोबड्या बोलण्यात रमला तो हे सर्व कसे सोडू शकेल ? जो आपापल्या सासरी गेलेल्या प्रिय कन्या, मुले, भाऊ-बहिणी, आणि असहाय्य माता-पिता, अत्यंत सुंदर सुंदर बहुमूल्य सामग्रींनी सजविलेली घरे, उपजीविकेची वंशपरंपरागत साधने, तसेच गुरेढोरे आणि सेवकांचे नेहमी स्मरण करण्यात रमलेला जीव त्यांना कसा सोडू शकेल ? जो जननेंद्रिय आणि रसनेंद्रिय यांपासून मिळणार्‍या सुखांनाच सर्वस्व मानून बसला आहे, त्याच्या भोगवासना कधी तृप्त होत नाहीत, जो लोभाने कर्मेच कर्मे करता करता रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःला बंधनात अडकवून घेत आहे आणि ज्याच्या मोहाला कोणतीही सीमा नाही, तो त्यांच्यापासून कसा विरक्त होऊ शकेल आणि त्यांचा त्याग करील ? हे माझे कुटुंब आहे, या भावनेत तो इतका रममाण होतो की, त्यांचे पालन-पोषण करण्यासाठी आपले अमूल्य आयुष्य वाया घालवितो आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश सोडून दिल्याचे त्या वेड्याला भान राहत नाही. शिवाय या कामांमुळे त्याला सर्वत्र त्रिविध ताप जाळीत असतात. असे असूनही त्याला वैराग्य उत्पन्न होत नाही. कुटुंबाची काळजी वाहणार्‍या त्याचे मन धनाच्या चिंतनात नेहमी गढलेले असते. आणि दुसर्‍यांचे धन चोरण्यात असणार्‍या लौकिक-पारलौकिक दोषांची जाणीव असूनही आपल्या इच्छा काबूत न ठेवल्याकारणाने इंद्रियभोगांच्या लालसेने तो चोर्‍याही करू लागतो. बंधूंनो, अशा प्रकारे जो आपल्या कुटुंबियांच्या पालन-पोषणातच व्यग्र असतो, तो विद्वान असला तरी त्याला भगवत्प्राप्ती होऊ शकत नाही. कारण आपला-परका हा भेद त्याचे ठिकाणी राहिल्याने त्यालासुद्धा अज्ञानी लोकांप्रमाणेच तामसी गती प्राप्त होते. जो स्त्रियांच्या मनोरंजनाचे साधन होऊन तिचे खेळणे होऊन राहिला आहे आणि ज्याने आपल्या पायात संतानरूपी बेडी अडकवून घेतली आहे, तो बिचारा कोणी का असेना व कोठे का असेना, कोणत्याही प्रकारे आपला उद्धार करून घेऊ शकत नाही. म्हणून बंधूंनो ! विषयासक्त दैत्यांच्या संगतीपासून तुम्ही लांब रहा आणि आदिदेव भगवान नारायणांना शरण जा. कारण ज्यांनी संसाराची आसक्ती सोडली आहे, त्या महात्म्यांचा तोच परम मोक्ष आहे. (९-१८)

दैत्यपुत्रांनो, भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी फार प्रयत्‍न करावे लागत नाहीत. कारण ते समस्त प्राण्यांचे आत्मा आहेत आणि सगळीकडे सत्तेच्या रूपात स्वयंसिद्ध वस्तू आहेत. ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत लहान-मोठे सर्व प्राणी, पंचमहाभूतांनी बनलेल्या वस्तू, पंचमहाभूते, सूक्ष्म तन्मात्रा, महत्तत्त्व, तिन्ही गुण आणि गुणांची साम्यावस्था असलेली प्रकृती या सर्वांमध्ये एकच अविनाशी परमात्मा विराजमान आहे. तेच अंतर्यामी द्रष्ट्याच्या रूपात आहेत आणि तेच दृश्य जगाच्या रूपामध्येसुद्धा आहेत. सर्वथा अनिर्वचनीय आणि विकल्परहित असूनही त्यांना द्रष्टा आणि दृश्य, व्याप्य आणि व्यापक मानले जाते. ते केवलस्वरूप, अनुभवस्वरूप, आनंदस्वरूप, एकमात्र परमेश्वरच आहेत. गुणमय सृष्टी निर्माण करणार्‍या मायेमुळे त्यांचे स्वरूप लपून राहिले आहे. ती दूर होताच त्यांचे दर्शन होते. म्हणून तुम्ही आपला आसुरी स्वभाव सोडून सर्व प्राण्यांवर दया करा. प्रेमाने त्यांचे भले करा. यानेच भगवंत प्रसन्न होतील. आदिनारायण अनंत भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही, अशी कोणती वस्तू आहे ? लोक आणि परलोकासाठी ज्या धर्म, अर्थ इत्यादींची आवश्यकता सांगितली जाते, ते तर गुणांच्या परिणामानुसार प्रयत्‍न न करताही आपोआप मिळणारे आहेत. आपण जर श्रीभगवंतांच्या चरणामृताचे सेवन करू लागलो आणि त्यांच्या नाम-गुणांचे कीर्तन करू लागलो, तर आपल्याला मोक्षाची तरी काय आवश्यकता आहे ? तसे पाहिले तर धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ आत्मविद्या, कर्मकांड, न्याय, दंडनीती आणि उपजीविकेची विविध साधने हे सर्व वेदांचे प्रतिपाद्य विषय आहेत. परंतु ते जर आपले परम हित करणार्‍या श्रीहरींना समर्पण होण्यात साहाय्यक असतील, तरच मी ते सार्थक मानतो. हे निर्मल ज्ञान अतिशय दुर्लभ आहे. नर-नारायणांनी नारदांना याचा उपदेश केला होता आणि हे ज्ञान भगवंतांच्या अनन्य प्रेमी आणि निष्काम भक्तांच्या चरणकमलांच्या धुळीने न्हालेल्या माणसांनाच प्राप्त होते. हे विज्ञानासहित ज्ञान विशुद्ध भागवतधर्म होय. भगवंतांचे दर्शन करून देणार्‍या देवर्षी नारदांच्या तोंडून हे मी पूर्वी ऐकले होते. (१९-२८)

दैत्यपुत्र म्हणाले – प्रल्हादा, या दोन गुरुपुत्रांशिवाय आणखी कोणत्याही गुरूंना तू किंवा आम्ही जाणत नाही. हेच आपणा सर्व मुलांना शिकविणारे आहेत. तू अजून लहान असून राजमहालात आईजवळ राहतोस. म्हणून तू नारदांना भेटलास हे अशक्य वाटते. यावर आमचा विश्वास बसेल अशी एखादी गोष्ट असेल, तर ती सांगून आमच्या शंकेचे निरसन कर. (२९-३०)

स्कंध सातवा - अध्याय सहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP