श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ५ वा

हिरण्यकशिपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्‍न -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणतात – भगवान शुक्राचार्यांना दैत्यांनी आपले पुरोहित म्हणून नेमले होते. शंड आणि अमर्क असे त्यांचे दोन पुत्र होते. ते दोघे राजवाड्याजवळ राहून हिरण्यकशिपूने पाठविलेल्या नीतिनिपुण बालक प्रल्हाद आणि दुसर्‍या शिकण्याजोग्या दैत्यांच्या मुलांना राजनीती इत्यादी शिकवीत असत. गुरुजींनी शिकविलेला पाठ ऐकून प्रल्हाद जसाच्या तसा म्हणून दाखवी. परंतु मनापासून त्याला ते आवडत नसे. कारण त्या शिक्षणात आपले आणि दुसर्‍याचे असा खोटा दुराग्रह असे. युधिष्ठिरा, हिरण्यकशिपूने एके दिवशी आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की, “बाळा, तुला कोणती गोष्ट चांगली वाटते, ती सांग पाहू.” (१-४)

प्रल्हाद म्हणाला – तात, ’मी’ आणि ’माझे’ या खोट्या आग्रहाने संसारातील प्राणी नेहमी उद्विग्न असतात. त्यांच्यासाठी मी हेच योग्य समजतो की, त्यांनी आपल्या अधःपतनाचे मूळ कारण, गवताने झाकलेल्या अंधार्‍या विहिरीप्रमाणे असणार्‍या या घराचा त्याग करून वनात निघून जावे आणि भगवान श्रीहरींना शरण जावे. (५)

नारद म्हणतात – प्रल्हादाच्या तोंडून शत्रुपक्षाच्या प्रशंसेची गोष्ट ऐकून हिरण्यकशिपू उपहासाने हसला आणि म्हणाला, दुसर्‍याच्या सांगण्यावरून लहान मुलांची बुद्धी अशीच बिघडते. गुरुजींच्या घरी विष्णूंचे भक्त काही ब्राह्मण गुप्तपणे राहत असावेत. मुलाचा बुद्धिभेद होणार नाही, यासाठी त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. (६-७)

जेव्हा प्रल्हादाला गुरुजींच्या घरी पोहोचविले, तेव्हा पुरोहितांनी त्याची प्रशंसा करून सामोपचाराने गोड शब्दांत विचारले. कुमार प्रल्हादा, तुझे कल्याण असो ! अगदी खरे खरे सांग हं ! खोटे बोलू नकोस. तुझी बुद्धी अशी उलटी कशी झाली ? दुसर्‍या कोणा मुलाची तर बुद्धी अशी नाही ! हे कुलनंदन प्रल्हादा, सांग बरे मुला ! आम्ही तुझे गुरुजन हे जाणू इच्छितो की, तुझी बुद्धी आपणहून अशी आहे की, दुसर्‍या कुणी भडकावले ? (८-१०)

प्रल्हाद म्हणाला – ज्यांच्या मायेमुळे ज्या माणसांची बुद्धी मोहाने ग्रस्त झाली आहे, त्यांचाच मी-तूपणाचा खोटा दुराग्रह झालेला दिसतो, त्या मायापती भगवंतांना मी नमस्कार करतो. ते भगवान जेव्हा कृपा करतात, तेव्हा माणसांची पशुबुद्धी नष्ट होते. या पशुबुद्धीमुळेच ’हा मी व हा परका’ अशा प्रकारचा खोटा भेदभाव निर्माण होतो. तोच परमात्मा हा आत्मा आहे. आपले आणि दुसर्‍याचे असा भेद निर्माण करून अज्ञानी लोक त्याचेच वर्णन करतात. त्यांचे हे न जाणून घेणेही योग्यच आहे; कारण त्या आत्म्याचे तत्त्व जाणणे अत्यंत कठीण आहे. ब्रह्मदेव इत्यादी मोठ मोठे वेद जाणणारेसुद्धा ज्याच्याविषयी मोहित होतात, तोच परमात्मा आपल्या दृष्टीने माझी बुद्धी ’बिघडवीत’ आहे. गुरुजी, लोखंड जसे लोहचुंबकाकडे आपणहून खेचले जाते, त्याचप्रमाणे चक्रपाणी भगवंतांच्या स्वच्छंद इच्छाशक्तीने माझे चित्तसुद्धा संसारापासून वेगळे होऊन त्यांचेकडे ओढले जाते. (११-१४)

नारद म्हणतात – परम ज्ञानी प्रल्हाद आपल्या गुरुजींना असे म्हणून गप्प बसला. बिचारे राजाचे सेवक पुरोहित क्रोधाने त्याला झिडकारून म्हणाले, “माझी छडी आणा रे ! हा आमच्या कीर्तीला कलंक लावीत आहे. या दुर्बुद्धी कुलांगाराला वठणीवर आणण्यासाठी चौथा मार्ग म्हणजे मारणे हेच उपयुक्त ठरेल. दैत्यवंशरुप चंदनवृक्षांच्या वनामध्ये ही काटे असलेली बाभूळ कुठून उत्पन्न झाली ? या वनाचे मूळ तोडण्यासाठी जो विष्णू कुर्‍हाड झाला, त्याच कुर्‍हाडीची मूठ हा झाला आहे.” अशा प्रकारे गुरुजींनीं वेगवेगळ्या पद्धतीने धाक-दपटशा दाखवून प्रल्हादाला धर्म, अर्थ आणि काम यांचे शिक्षण दिले. काही दिवसांनंतर गुरुजींनी प्रल्हादाचे साम, दाम, दंड आणि भेद यांविषयीचे शिक्षण पूर्ण झालेले पाहून ते त्याला त्याच्या मातेकडे घेऊन गेले. मातेने मोठ्या लडिवाळपणे त्याला चांगल्या तर्‍हेने आंघोळ घालून, कपडे-अलंकारांनी सजवून हिरण्यकशिपूकडे नेले. प्रल्हाद आपल्या वडिलांच्या चरणांवर नतमस्तक झाला. हिरण्यकशिपूने त्याला आशीर्वाद देऊन दोन्ही हातांनी बराच वेळ आपल्या छातीशी कवटाळले. त्यावेळी दैत्यराजाचे मन आनंदाने भरून गेले. युधिष्ठिरा, प्रसन्नवदन प्रल्हादाला हिरण्यकशिपूने आपल्या मांडीवर बसवून त्याच्या डोक्याचे अवघ्राण केले. त्याच्या डोळ्यांतून ओघळलेल्या आसवांनी प्रल्हादाचे शरीर भिजू लागले. त्याने आपल्या पुत्राला विचारले. (१५-२१)

हिरण्यकशिपू म्हणाला – बाळ प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यांपैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. (२२)

प्रल्हाद म्हणाला – तात, भगवान विष्णूंच्या भक्तीचे नऊ प्रकार आहेत. भगवंतांच्या गुणांचे श्रवण, त्यांचेच कीर्तन, त्यांचे स्मरण, त्यांच्या चरणांची सेवा, त्यांची पूजा, त्यांना वंदन, त्यांचे दास्य, सख्य आणि त्यांना भक्ती आत्मनिवेदन. जर भगवंतांची या नऊ प्रकारची भक्ती समर्पण भावनेने केली, तर मी त्यालाच उत्तम अध्ययन समजतो. प्रल्हादाचे हे बोलणे ऐकून हिरण्यकशिपूचे ओठ क्रोधाने थरथर कापू लागले. तो गुरुपुत्राला म्हणाला, अरे नीच ब्राह्मणा, हे दुर्बुद्धी, तू हे काय केलेस ? तू माझी पर्वा न करता या मुलाला असे कसे निरुपयोगी शिक्षण दिलेस ? तू माझ्या शत्रूचा आश्रित आहेस. मित्राचे रूप घेऊन शत्रूचे काम करणारे दुष्ट या जगात काही कमी नाहीत. परंतु त्यांचे पाप योग्य वेळी उघडकीस येते. जसे पापी माणसांचे लपून केलेले पाप रोगाच्या रूपाने कालांतराने उघडकीस येते. (२३-२७)

गुरुपुत्र म्हणाला – हे इंद्रशत्रो, तुमचा पुत्र हे जे काही बोलतो, ते मी किंवा दुसर्‍या कोणी शिकविल्याने बोलत नाही. राजन, ही त्याची जन्मजात बुद्धी आहे. आपण आपला क्रोध आवरा. विनाकारण आम्हांला दोष देऊ नका. (२८)

नारद म्हणाले – जेव्हा गुरुजांनी असे उत्तर दिले, तेव्हा हिरण्यकशिपूने प्रल्हादाला पुन्हा विचारले, काय रे ! जर तुझी ही अहित करणारी खोटी बुद्धी तुला गुरूंकडून मिळालेली नाही, तर कुठून मिळाली, ते सांग. (२९)

प्रल्हाद म्हणाला – तात, संसारातील लोक चघळलेलेच विषय पुन्हा चघळतात. त्यांचा इंद्रियांवर ताबा नसल्याकारणाने ते भोगलेले विषयच पुन्हा भोगण्यासाठी संसाररूपी घोर नरकात पुन्हा पुन्हा जातात. अशा गृहासक्त माणसांची बुद्धी स्वतःहून कोणाच्या शिकवण्यावरून किंवा एकमेकांच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांच्या ठिकाणी स्थिर होत नाही. इंद्रियांनी दिसणार्‍या बाह्य विषयांनाच जे मूर्ख सर्वाधिक योग्य समजतात, आंधळ्यांच्या पाठोपाठ जाऊन खड्ड्यात पडणार्‍या आंधळ्यासारखे जे वेदांनी सांगितलेल्या काम्यकर्मरूप दोरीच्या दीर्घबंधनामध्ये बांधले गेले आहेत, त्यांना आपला स्वार्थ आणि परमार्थ भगवान विष्णूच आहेत, हे कळत नाही. ज्यांची बुद्धी भगवंतांच्या चरणकमलात रमते, त्यांच्या जन्म-मृत्युरूप अनर्थाचा सर्वथैव नाश होतो. परंतु जोवर विरक्त भगवत्प्रेमी महात्म्यांच्या चरणधुळीत ते स्नान करीत नाहीत, तोपर्यंत त्यांना अशी बुद्धी होत नाही. (३०-३२)

एवढे बोलून प्रल्हाद गप्प बसला. क्रोधाने अंध झालेल्या हिरण्यकशिपूने त्याला आपल्या मांडीवरून उचलून जमिनीवर आपटले. प्रल्हादाचे बोल तो सहन करू शकला नाही. रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले. तो म्हणाला, दैत्यांनो, याला येथून बाहेर घेऊन जा आणि ताबडतोब मारून टाका. हा मारून टाकण्याच्याच योग्यतेचा आहे. पहा ना ! आपल्या नातलगांना सोडून हा नीच, दास असल्याप्रमाणे स्वतःच्या चुलत्याला मारणार्‍या विष्णूंच्या चरणांची पूजा करतो. मला वाटते, याच्या रूपाने माझ्या भावाला मारणारा हा विष्णूच आलेला आहे. हा मूर्ख पाच वर्षाचा असतानाच आपल्या मात्या-पित्यांच्या सोडण्यास कठीण अशा स्नेहाला विसरला, तो त्या विष्णूचे तरी काय भले करणार आहे ? एखादा परकासुद्धा आपल्याला औषधाप्रमाणे बरे करील, तर तो एका अर्थी आपला पुत्रच होय. परंतु जर आपला पुत्रच आपले अहित करू लागला तर तो रोगाप्रमाणेच आपला शत्रू होय. शरीराची हानी करणारा अवयव छाटून टाकला पाहिजे. कारण त्यामुळेच उरलेले शरीर सुखाने जगू शकते. स्वजनाचे रूप घेऊन आलेला हा माझा शत्रूच आहे. योगी माणसाची भोगलोलुप इंद्रिये ज्याप्रमाणे त्याचे अनिष्ट करतात, त्याचप्रमाणे हा माझे अहित करणारा आहे. म्हणून खाताना, झोपताना किंवा बसलेला असताना अशा कोणत्याही वेळी, कोणत्याही उपायाने याला मारून टाका. (३३-३८)

हिरण्यकशिपूने जेव्हा दैत्यांना अशी आज्ञा दिली, तेव्हा तीक्ष्ण दाढा, अक्राळ-विक्राळ तोंडे, लाल-लाल दाढी मिशा तसेच लांब केस असलेले दैत्य हातात त्रिशूल घेऊन “मारा ! तोडा ! !” असे म्हणत जोराने ओरडू लागले. प्रल्हाद गप्प बसला होता, तरी दैत्य मात्र त्याच्या मर्मांवर शूलांचे प्रहार करीत होते. मन-वाणीच्या आवाक्यात न येणारे, सर्वात्मा, सर्व शक्तींचे आधार अशा परमात्म्यामध्ये प्रल्हादाचे चित्त एकरूप झाले होते. त्यामुळे भाग्यहीनाचे उद्योग जसे व्यर्थ होतात, तसे त्यांचे ते सर्व प्रहार निष्फळ झाले. युधिष्ठिरा, जेव्हा प्रल्हादावर सर्व प्रयत्‍नांचा काहीच परिणाम झाला नाही, तेव्हा भयभीत हिरण्यकशिपू प्रल्हादाला मारण्यासाठी हट्टाला पेटून निरनिराळे उपाय करू लागला. त्याने त्याला मदोन्मत्त हत्तींकडून तुडविले, विषारी साप डसविले, अभिचार कर्म करविले, पर्वताच्या कड्यावरून खाली ढकलून दिले, अनेक प्रकारच्या मायांचा प्रयोग करविला, अंधार्‍या कोठडीत बंद केले, विष पाजविले आणि खाणे-पिणेही बंद करविले. बर्फाळ जागेत, तुफानात, धगधगत्या आगीत ठेवले, समुद्रात बुडविले, पर्वतांच्या खाली दाबून ठेवले. परंतु यांपैकी कोणत्याही उपायाने तो आपल्या निष्पाप पुत्राला मारू शकला नाही. तेव्हा हिरण्यकशिपूला अतिशय काळजी वाटू लागली. प्रल्हादाला मारण्यासाठी त्याला कोणताही उपाय सुचेना. मी याला पुष्कळ अपशब्द बोललो, मारून टाकण्याचे पुष्कळ उपाय केले, परंतु हा मी केलेला द्रोह आणि दुर्व्यवहार यांपासून आपल्या प्रभावानेच वाचला. हा लहान असूनही समजूतदार आहे आणि निःशंक होऊन माझ्याजवळच राहतो. याच्याजवळ काही-ना-काही सामर्थ्य अवश्य आहे. आपल्या पित्याच्या दुर्वर्तनामुळे शुनःशेप जसा पित्याच्या विरोधात गेला होता, त्याचप्रमाणे हा, मी केलेले अपकार विसरणार नाही. हा कोणाला घाबरत नाही की याला मरण येत नाही. याच्या शक्तीचा थांगपत्ताच लागत नाही. याच्या विरोधामुळेच निश्चितपणे माझा मृत्यू तर ओढवणार नाही ना ! (३९-४७)

अशा प्रकारे विचार करता करता त्याचा चेहरा थोडासा सुकला. शुक्राचार्याचे पुत्र शंड आणि अमर्क, हिरण्यकशिपू सुन्न होऊन बसला आहे, असे पाहून त्याला एकांतात नेऊन म्हणाले, “स्वामी, आपण एकट्यानेच तिन्ही लोकांवर विजय मिळविला आहे. आपण आपल्या भुवया उंचावल्या तरी सर्व लोकपालांचा थरकाप होतो. आपण चिंता करावी अशी एकही गोष्ट आमच्या पाहाण्यात नाही. लहान मुलाचे वागणे आपण मनावर का घेता ? आमचे वडील शुक्राचार्य येईपर्यंत याने भिऊन पळून जाऊ नये, म्हणून याला वरुणाच्या पाशांनी बांधून टाका. कदाचित वय वाढल्याने किंवा गुरुजनांची सेवा केल्याने माणसाची बुद्धी सुधारते. (४८-५०) हिरण्यकशिपूने “ठीक आहे” असे म्हणून गुरुपुत्रांचा सल्ला मान्य करून म्हटले, ज्याचे पालन गृहस्थाश्रमी राजे लोक करतात, त्या धर्माचा याला उपदेश केला पाहिजे. युधिष्ठिरा, यानंतर पुरोहित विनयशील व नम्र अशा त्याला धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थांचे अनुक्रमे शिक्षण देऊ लागले. परंतु गुरुजींचे धर्म, अर्थ आणि काम यांविषयीचे ते शिकविणे प्रल्हादाला आवडत नसे; कारण राग-द्वेषादी द्वंद्वे आणि विषयभोगांत रस असणार्‍यासाठीच ते शिक्षण उपयोगी होते. जेव्हा गुरुजी काही घरच्या कामासाठी बाहेर गेले होते, तेव्हा सुट्टी मिळाल्याकारणाने बरोबरीच्या मुलांनी प्रल्हादाला खेळण्यासाठी बोलाविले. प्रल्हाद परम ज्ञानी होता. त्याने त्यांना अत्यंत मधुर शब्दांनी आपल्याकडे बोलावले. त्यांचा जन्ममृत्युरूप भूतकाळ व आपल्यावरील निष्ठा त्याला ज्ञात होती. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी हसत हसत तो त्यांना म्हणाला. युधिष्ठिरा, ते सर्वजण अजून लहान होते. म्हणून राग-द्वेषांनी युक्त विषय भोगणार्‍या पुरुषांच्या सांगण्याने आणि कृतींनी त्यांची बुद्धी अजून दूषित झाली नव्हती. यामुळे आणि प्रल्हादाबद्दल अत्यंत आदर असल्याकारणाने त्या सर्वांनी आपले खेळण्याचे साहित्य बाजूला ठेवले आणि प्रल्हादाजवळ जाऊन त्याच्याकडे एकटक पाहात त्याच्याभोवती ते बसून राहिले. तसेच भगवंतांचा परम प्रेमी भक्त प्रल्हादाचे हृदय त्यांच्याविषयीच्या करुणा आणि मैत्रीयुक्त भावांनी भरून गेले आणि तो त्यांना म्हणू लागला. (५१-५७)

स्कंध सातवा - अध्याय पाचवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP