|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १९ वा
भगवान वामनांचे बलीकडून तीन पावले जमीन मागणे, बलीचे वचन देणे आणि शुकाचार्यांनी त्याला अडविणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - बलीचे हे वचन धर्मयुक्त आणि अतिशय मधुर असे होते. ते ऐकून भगवान वामनांनी अत्यंत प्रसन्नतेने त्याचे अभिनंदन करून म्हटले - (१) भगवान म्हणाले - राजन, आपण जे काही म्हणालात, ते आपल्या कुलपरंपरेला अनुरूप, धर्मपूर्ण, यश वाढविणारे आणि अत्यंत मधुर आहे. परलोकी हितकर असणार्या धर्माच्या बाबतील आपण भृगूंना प्रमाण मानता. त्याचबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा परम शांत प्रह्लाद यांची आज्ञासुद्धा आपण प्रमाण मानता. आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन आणि कंजूष पुरुष कधी झाला नाही. तसेच ज्याने ब्राह्मणांना कधी दान दिले नाही किंवा कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली, असाही कोणी झाला नाही. याचकाची विनंती ऐकून किंवा युद्धाचे वेळी शत्रूने आह्वान दिल्यावर तिकडे पाठ फिरविणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कोणी झाला नाही. आपल्या कुलातच जसा आकाशात चंद्र त्याप्रमाणे प्रह्लाद आपल्या निर्मल यशाने शोभत आहे. आपल्या कुळातच हिरण्याक्षासारखा वीराचा जन्म झाला. तो वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालूनही त्याला आपल्या जोडीचा कोणी वार मिळाला नाही. जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढीत होते, तेव्हा तो त्यांच्या समोर आला. तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळविला. परंतु त्यानंतर सुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्याक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकूनसुद्धा आपला विजय झाला, असे ते समजत नव्हते. हिरण्यकशिपूला जेव्हा त्याच्या वधाचा वृत्तांत समजला, तेव्हा तो आपल्या भावाचा वध करणार्याला मारण्यासाठी म्हणून संतापून भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचला. हिरण्यकशिपू हातात शूळ घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे, असे पाहून वेळकाळ जाणणार्या श्रेष्ठ मायावी विष्णूंनी विचार केला. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे मृत्यू, त्याचप्रमाणे मी जेथे जेथे जाईन, तेथे तेथे हा माझा पिच्छा पुरवील. म्हणून आपण त्याच्या हृदयात प्रवेश करावा. त्यामुळे तो मला पाहू शकणार नाही. कारण तो बहिर्मुख आहे. हे असुरशिरोमणे, ज्यावेळी हिरण्यकशिपू त्यांच्यावर झडप घालीत होता, त्याचवेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनविले आणि ते त्याच्या श्वासांत लपून नाकातून हृदयात जाऊन बसले. हिरण्यकशिपूने त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. यामुळे चिडून तो आरडाओरड करू लागला. त्या वीराने पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, पाताळ आणि समुद्र असे सगळीकडे भगवंतांना शोधले, परंतु त्याला ते कुठेच दिसले नाहीत. ते कुठेच नाहीत, असे पाहून तो म्हणू लागला, "मी सर्व जग पिंजून काढले, परंतु तो सापडला नाही. माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच, जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येता येत नाही, अशा लोकी निघून गेला असावा. बस ! आता त्याच्याशी वैरभाव ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण वैर देहाबरोबरच संपते. क्रोधाचे कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढतच जातो. राजा, तुझा पिता प्रह्लादनंदन विरोचन फार मोठा ब्राह्मणभक्त होता. इतका की, त्याचे शत्रू असणार्या देवांनी ब्राह्मणांचा वेष घेऊन त्याचे आयुष्य मागितले आणि त्यांचे कपट माहीत असूनही त्याने त्यांना आपले आयुष्य दिले. ज्या धर्माचे, गृहस्थ, ब्राह्मण, आपले पूर्वज आणि अन्य यशस्वी वीरांनी पालन केले, त्याच धर्माचे तुझी आचरण करीत आहात. हे दैत्येंद्रा, मागितलेली वस्तू देणार्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने तीन पावले एवढी थोडीशी जमीन मागत आहे. हे राजन, आपण सर्व जगाचे स्वामी आणि मोठे उदार आहात. तरीसुद्धा मला आपल्याकडून अधिक काही नको. कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकते इतकेच दान घेतले असता त्याला पाप लागत नाही. (२-१७) बली म्हणाला - ब्राह्मणकुमारा, तुझे बोलणे तर वृद्धासारखे आहे; परंतु तुझी बुद्धी अजून लहान मुलासारखीच आहे. अजून तू लहान आहेस ना ? म्हणून आपला फायदा-तोटा तुला समजत नाही. मी तिन्ही लोकांचा एकमात्र अधिपती आहे आणि द्वीपचे द्वीप देऊ शकतो. जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त तीन पावले भूमी मागतो, त्याला बुद्धिमान म्हणावे काय ? हे ब्रह्मचारी, जो एक वेळ माझ्याकडे आला, त्याला पुन्हा कधी कोणाकडून काही मागण्याची आवश्यकता वाटता कामा नये. म्हणून आपली उपजीविका चालविण्यासाठी तुला जेव्हढ्या भूमिची आवश्यकता असेल, तेवढी माझ्याकडून मागून घे. (१८-२०) श्रीभगवान म्हणाले - राजन, मनुष्य जर इंद्रियांना काबूत ठेवू शकत नसेल, तर संसारातील सर्वच्या सर्व प्रिय विषयही त्याच्या कामना पूर्ण करू शकत नाहीत. जो तीन पावले भूमीने संतुष्ट होत नाही, त्याला नऊ वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरीसुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही; कारण सातही द्वीपे मिळविण्याची त्याच्या मनात इच्छा शिल्लक राहातेच. मी असे ऐकले आहे की, पृथू, गय इत्यादी राजे सातही द्वीपांचे अधिपती होते. परंतु इतके धन आणि भोग मिळूनसुद्धा त्यांचा लोभ संपला नाही. मिळेल त्यातच संतुष्ट राहणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो. परंतु इंद्रियांना काबून न ठेवणारा, तिन्ही लोकांचे राज्य मिळूनसुद्धा संतोष नसेल तर दुःखीच असतो. धन आणि भोगांनी संतुष्ट न होणेच जीवाला जन्न्ममृत्यूच्या फेर्यात अडकविण्यास कारणीभूत आहे. पण जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते. जो ब्राह्मण, दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूतच संतुष्ट असतो, त्याच्या तेजाची वृद्धी होते. तो असंतुष्ट राहिला तर जसे पाण्यामुळे अग्नी शांत होतो, तसे त्याचे तेज नाहीसे होते. म्हणून वर देणार्यात श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त तीन पावले भूमीच मागतो. तेवढ्यानेच माझे काम भागेल कारण आवश्यकते इतकेच धन जवळ बाळगावे. (२१-२७) श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवंतांनी असे म्हटल्यानंतर बलिराजाला हसू आले. तो म्हणाला, "ठीक आहे. तुझी इच्छा असेल, तेवढेच घे." असे म्हणून वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्याने झारी हातात घेतली. ज्ञानी शुक्राचार्यांना सर्व काही कळले होते. भगवंतांची ही लीला जाणून त्यांना जमीन देणासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले - (२८-२९) शुकाचार्य म्हणाले - विरोचनकुमारा, हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत. देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्नी अदितीपासून अवतीर्ण झाले आहेत. आपले सर्वस्व जाईल, हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा केलीस. हे तर दैत्यांवर मोठे संकट आले आहे. हे मला योग्य वाटत नाही. स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचार्याचे रूप घेतले आहे. हे तुझे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज आणि कीर्ती, तुझ्याकडून हिरावून घेऊन इंद्राला देतील. हे विश्वरूप आहेत. तीन पावलामध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील. मूर्खा, सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल ? हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी आणि दुसर्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील. यांच्या विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल. तेव्हा यांचे तिसरे पाऊल कुठे राहील ? प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात पडावे लागेल; कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ ठरशील. जे दान दिल्यानंतर जीवन निर्वाहासाठी काही उरत नाही, ते दान विद्वान पुरुष योग्य मानीत नाहीत. ज्याचा जीवन निर्वाह योग्य तर्हेने चालतो , तोच या संसारात दान, यज्ञ, तप आणि परोपकार ही कर्मे करू शकतो. जो मनुष्य आपले धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी, अशा पाच कारणांसाठी विभागतो, तोच इह-परलोकी सुख मिळवितो. हे असुरश्रेष्ठा, मी तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आशय सांगतो. ऐक. श्रुती म्हणते, होय म्हणणे, हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे. हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फूल, फळ आहे. परंतु जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फूल, फळ कसे राहणार ? असत्य हेच शरीररूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर वृक्ष सुकून जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तात्काळ नष्ट होईल, यात शंका नाही. "हां, मी देईन" हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते, म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजेच धनापासून वंचित करणारा होय. याच कारणास्तव, जो पुरुष "हां, मी देईन" असे म्हणतो, त्याचे धन संपून जाते. जो मागणार्याला सर्व काही देण्याचे मान्य करतो, तो आपल्या भोगासाठी काहीच शिल्लक ठेवू शकत नाही. याच्या उलट, "मी देणार नाही" हे जे अस्वीकारात्मक असत्य आहे, ते आपले धन सुरक्षित राखणारे तसेच पूर्ण करणारे आहे. परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही. जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो त्याची अपकीर्ती होते. तो जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो. स्त्रियांना वश करण्यासाठी, हास्यविनोदामध्ये, विवाहाच्या वेळी, आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, प्राणसंकट उपस्थित झाल्यावर, गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी, तसेच एखाद्याला मृत्यूपासून वाचविण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही. (३०-४३) स्कंध आठवा - अध्याय एकोणिसावा समाप्त |