|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ७ वा - अध्याय २ रा
हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकशिपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] नारद म्हणाले – युधिष्ठिरा ! जेव्हा भगवंतांनी वराह अवतार धारण करून स्वतःच्या भावाला मारले, तेव्हा हिरण्यकशिपूचा रागाने जळफळाट झाला आणि तो शोकाने संतप्त झाला. तो क्रोधाने थरथर कापत दातओठ चावून क्रोधाने जळजळीत झालेल्या डोळ्यांतील क्रोधाग्नीच्या धुराने धुरकट झालेल्या आकाशाकडे पाहात म्हणू लागला. त्यावेळी त्याच्या विक्राळ दाढा, आग ओकणारी उग्र दृष्टी आणि विस्फारलेल्या भुवया यांमुळे त्याच्या तोंडाकडे बघवत नव्हते. भर सभेत त्रिशूळ हातात घेऊन तो द्विमूर्धा, त्र्यक्ष, शंबर, शतबाहू, हयग्रीव, नमुची, पाक, इल्वल, विप्रचित्ती, पुलोमा, शकुन इत्यादींना संबोधित म्हणाला, “हे दैत्य-दानवांनो, तुम्ही सर्वजण माझे म्हणणे ऐका आणि त्यानंतर मी म्हणेन, तसे तत्काळ करा, वेळ घालवू नका. माझ्या क्षुद्र शत्रुंनी माझ्या परम प्रिय आणि हितैषी भावाला विष्णूकरवी मारविले आहे. तो समदृष्टी असला तरी मनधरणी करून देवांनी त्याला आपल्या बाजूला वळविले आहे. हा विष्णू मुळात शुद्ध तेजोरूप असूनही आता मायेने वराह इत्यादी रूपे धारण करू लागला आहे. त्याने आपला स्वभाव सोडला आहे. लहान मुलाप्रमाणे, जो त्याची सेवा करील, त्याच्या बाजूला तो झुकतो. त्याचे चित्त स्थिर नाही. आता मी माझ्या या त्रिशूळाने त्याचा गळा छाटून त्याच्या रक्ताच्या धारेने रक्त-प्रिय असलेल्या माझ्या भावाचे तर्पण करीन, तेव्हाच माझ्या हृदयातील क्रोध शांत होईल. झाडाचे मूळ तोडल्यानंतर फांद्या आपोआप सुकतात, तसे तो मायावी शत्रू नष्ट झाल्यानंतर सर्व देव आपोआप निष्प्रभ होतील. कारण त्यांचे जीवन विष्णू हेच आहे. म्हणून तुम्ही आता पृथ्वीवर जा. तेथे ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वर्चस्व आहे. तेथे जे लोक तपश्चर्या, यज्ञ, स्वाध्याय, व्रत आणि दानादी शुभ कर्मे करीत असतील, त्या सर्वांना मारून टाका. द्विजांची धर्म-कर्मे हाच विष्णूचा आधार आहे. कारण यज्ञ आणि धर्मच त्याचे स्वरूप आहे. देव, ऋषी, पितर, सर्व प्राणी आणि धर्म यांचा तोच खरा आश्रय आहे. म्हणून जेथे ब्राह्मण, गायी, वेद आणि वर्णाश्रमांची धर्म-कर्मे असतील, त्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांना जाळून टाका, उजाड करून टाका.” (१-१२) तेव्हा दैत्यराज हिरण्यकशिपूची आज्ञा शिरसावंद्य मानून ते युद्धप्रिय दैत्य जनतेचा नाश करू लागले. त्यांनी नगरे, गावे, गायींचे गोठे, बागबगीचे, शेते, विहार करण्याची ठिकाणे, ऋषींचे आश्रम, रत्नांच्या खाणी, शेतकर्यांच्या वस्त्या, डोंगराळ गावे, गवळ्यांच्या वस्त्या आणि नगरे जाळून टाकली. काहींनी खोदण्याच्या साहित्याने मोठमोठे पूल, किल्ले आणि नगरांचे दरवाजे तोडून-फोडून टाकले. तर दुसर्यांनी कुर्हाडींनी फळे, फुले आलेले वृक्ष तोडून टाकले. काही दैत्यांनी जळत्या कोलितांनी लोकांची घरे जाळली. अशा प्रकारे दैत्यराजाच्या सेवकांनी निरागस प्रजेला छळण्यास सुरूवात केली. त्यावेळी देव स्वर्ग सोडून लपून-छपून पृथ्वीवर राहू लागले. (१३-१६) युधिष्ठिरा, दुःखी हिरण्यकशिपूने मृत भावाची अंत्येष्टी केल्यावर आपले पुतणे शकुनी, शंबर, धृष्ट, भूतसंतापन, वृक, कालनाभ, महानाभ, हरिश्मश्रू आणि उत्कच यांचे सांत्वन केले. हे राजा, त्यांची आई रुषाभानू आणि आपली माता दिती यांना मधुर वाणीने देशकालानुरूप समजावीत त्याने म्हटले. (१७-१९) हिरण्यकशिपू म्हणाला – हे माते, वहिनी आणि पुत्रांनो, वीर हिरण्याक्षासाठी तुम्ही शोक करू नका. शत्रूच्या समोर पराक्रम गाजवताना मृत्यू येणे, हेच वीरांना गौरवास्पद वाटते. हे देवी, पाणपोईवर जमणार्या लोकांप्रमाणे या जगातील प्राण्यांचे एकमेकांना भेटणे असते. आपल्या कर्मांनुसार जीव काही काळ एकमेकांना भेटतात आणि दूर जातात. खरे पाहू जाता आत्मा नित्य, अविनाशी, शुद्ध, सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि देहापासून वेगळा आहे. तो आपल्या अविद्येनेच देह इत्यादी निर्माण करून सूक्ष्म शरीराचा स्वीकार करतो. जसे हलणार्या पाण्याबरोबर त्यात प्रतिबिंबित झालेली झाडेसुद्धा हलतात असे वाटते आणि डोळे फिरवू लागलो की, सगळी पृथ्वी फिरत आहे असे वाटते, त्याचप्रमाणे हे कल्याणी, विषयांमुळे मन भटकू लागले की निर्विकार आत्मा भटकतो असे वाटते. शरीराशी त्याचा संबंध नसला तरीसुद्धा संबंध असल्यासारखे वाटते. सर्व प्रकारे शरीरविरहित असणार्या आत्म्याला शरीर समजणे, हेच ते अज्ञान होय. यामुळेच प्रिय किंवा अप्रिय वस्तूंची भेट किंवा वियोग होतो. हे सारे कर्मांशी संबंध आल्यामुळे घडते. जन्म, मृत्यू, अनेक प्रकारचे शोक, अविवेक, चिंता आणि विवेकाची विस्मृती होणे या सर्वांचे कारण अज्ञान हेच आहे. याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात. तो इतिहास म्हणजे मेलेल्या मनुष्यांच्या संबंधितांशी यमराजाने केलेला संवाद होय. तुम्ही तो आता एकाग्रचित्ताने ऐका. (२०-२७) उशीनर देशामध्ये सुयज्ञ नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. लढाईत शत्रूंनी त्याला मारले. त्यावेळी त्याचे भाऊ-बंद त्याच्या भोवताली बसले. त्याचे रत्नजडित कवच छिन्न-विच्छिन्न झाले होते. अंगावरील अलंकार आणि माळा इतस्ततः विखुरल्या गेल्या होत्या. बाणांच्या मारांनी छाती फाटून गेली होती. तो मेला होता. त्याचे शरीर रक्ताने लडबडले होते. केस विस्कळित झाले होते. डोळे बाहेर आले होते आणि क्रोधामुळे दातांनी ओठ दाबले गेले होते. कमळासारखे त्याचे मुख धुळीने माखले होते. युद्धामुळे त्याचे शस्त्र आणि हात तुटले होते. (२८-३०) आपले पती उशीनर नरेशांची दैववशात झालेली ही दशा पाहून राण्यांना अतिशय दुःख झाले. “हे नाथ ! आमचा घात झाला.” असे म्हणत त्या जोरजोराने छाती पिटून घेत आपल्या स्वामीच्या चरणांजवळ पडल्या. त्या जोरजोराने इतक्या रडू लागल्या की, डोळ्यांतील अश्रू कुंकुममंडित स्तनावर पडून त्या लाल लाल रंगाच्या धारांनी त्यांच्या प्रियतमाचे पाय धुतले गेले. त्यांचे केस आणि अलंकार अस्ताव्यस्त विखुरले गेले. करुण स्वरात त्या विलाप करीत होत्या आणि ते ऐकून पाहणार्या माणसांच्या मनात कालवाकालव होत होती. “हाय ! हाय ! विधाता किती क्रूर आहे ! स्वामी, त्यानेच आज आपल्याला आमच्या डोळ्यांआड केले. यापूर्वी आपण उशीनर देशातील प्रजेचे अन्नदाते होता. त्याच आपल्याला आज त्याने प्रजेला शोक देणारे केले. अहो महाराज, आपण आमच्यावर अतिशय प्रेम करून आम्ही केलेल्या लहानशा सेवेचे उपकार मानत होता. अरेरे ! आता आम्ही आपल्याशिवाय कशा राहू ? आम्ही आपल्या चरणांच्या दासी आहोत. वीरवर, आपण जेथे चालला आहात, तेथेच जाण्याची आम्हांला आज्ञा करा.” आपल्या पतीच्या प्रेताला धरून त्या अशा प्रकारे विलाप करीत होत्या. ते प्रेत अग्निसंस्कारासाठी नेऊ देण्याची त्यांची इच्छा नव्हती. इतक्यात सूर्यास्त झाला. उशीनर राजाच्या सग्यासोयर्यांनी त्यावेळी जो विलाप केला, तो ऐकून स्वतः यमराज तेथे बालकाच्या वेषात आले आणि त्यांना म्हणाले. (३१-३६) यमराज म्हणाले – अहो, हे लोक माझ्यापेक्षा वडील असून आपल्या बरोबरीच्या लोकांचे मरण पाहातात. तरीसुद्धा हे असे मूर्ख कसे ? अरे ! हा मनुष्य जेथून आला, तेथेच निघून गेला. या लोकांनाही एक दिवस तेथे जावयाचेच आहे. असे असता हे लोक विनाकारण इतका शोक का बरे करीत आहेत ? आम्ही तर तुमच्यापेक्षा लाखपट चांगले. कारण आमचे आई-वडील आम्हांला सोडून गेले. आमच्या शरीरात पुरेसे बळही नाही. लांडगे वगैरे हिंस्र पशू आम्हांला खातील, याचीही आम्हांला काळजी वाटत नाही. कारण गर्भामध्ये ज्याने आमचे रक्षण केले, तोच आमचे या जीवनातसुद्धा रक्षण करीत आहे. हे राण्यांनो, जो अविनाशी ईश्वर आपल्या लीलेने या जगाची उत्पत्ती, रक्षण आणि नाश करतो, त्या प्रभूचा हा एक केवळ खेळ आहे. या चराचर जगताला दंड किंवा बक्षीस देण्यास तोच समर्थ आहे. भाग्य अनुकूल असेल तर रस्त्यात पडलेली वस्तूसुद्धा जशीच्या तशी पडून राहते. परंतु भाग्य प्रतिकूल असेल तर घरात ठेवलेली वस्तूसुद्धा हरवते. जीव, कोणत्याही सहार्याशिवाय, दैवाच्या दया दृष्टीने जंगलातसुद्धा पुष्कळ दिवस जिवंत राहतो, परंतु दैव विपरीत झाल्यावर घरात सुरक्षित असूनही तो मरतो. (३७-४०) सर्व प्राण्यांचा मृत्यू पूर्वजन्मातील कर्मानुसार त्या त्या वेळीच होतो. आणि जन्मसुद्धा तसाच होतो. परंतु आत्मा त्याच्या धर्मांना स्पर्श करीत नाही. जसे मनुष्य आपले मातीचे घर आपल्याहून वेगळे समजतो, त्याचप्रमाणे हे पंचभूतात्मक शरीरसुद्धा आपल्याहून वेगळे असूनही मोहाने त्याला आपले समजतो. जसे बुडबुडे इत्यादी पाण्याचे विकार, घडा इत्यादी मातीचे विकार आणि अलंकार इत्यादी सोन्याचे विकार परमाणूंपासून तयार होतात, रूपांतरित होतात आणि नष्ट होऊन जातात, त्याचप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या परमाणूंपासून बनलेले हे शरीरसुद्धा काळानुसार उत्पन्न होते, त्यात बदल होतो आणि ते नष्ट होते. जसे लाकडात व्यापून असलेला अग्नी त्यापेक्षा वेगळा असतो, जसे देहात राहूनही वायूचा त्याच्याशी संबंध नसतो, जसे आकाश सगळीकडे व्याप्त असूनही कोणाच्या गुणदोषांनी लिप्त होत नाही, तसेच सर्व देहेंद्रियात राहणारा आणि त्यांचा आश्रय असलेला आत्मासुद्धा त्यांहून वेगळा आणि निर्लिप्त आहे. (४१-४३) मूर्खांनो, ज्याच्यासाठी तुम्ही शोक करीत आहात, तो हा सुयज्ञ तर तुमच्यासमोर पडला आहे. पण यामध्ये जो ऐकणारा आणि बोलणारा होता, तो मात्र कधी कोणाला दिसत नव्हता. आणि आजही दिसत नाही. (तर शोक कुणासाठी ?) जो मुख्य महाप्राण आहे, तो सुद्धा बोलणारा किंवा ऐकणारा नाही. सर्व पदार्थांना देह आणि इंद्रियांद्वारा पाहणारा जो आत्मा आहे, तो शरीर आणि प्राण या दोहोंपासून वेगळा आहे. व्यापक असा तो आत्मा पंचमहाभूते, इंद्रिये आणि मनाने युक्त अशी श्रेष्ठ-कनिष्ठ शरीरे ग्रहण करतो आणि आपल्या विवेकाच्या सामर्थ्याने सोडून देतो. वास्तविक पाहाता तो या सर्वांपासून वेगळा आहे. जोपर्यंत तो लिंगशरीराने युक्त असतो, तोपर्यंत कर्मांनी बांधलेला असतो आणि या बंधनांमुळेच मायेने होणारे मोह आणि क्लेश त्याचा पिच्छा सोडीत नाहीत. प्रकृतीचे गुण आणि त्यांपासून बनलेल्या वस्तूंना खरे समजणे किंवा म्हणणे हा खोटाच दुराग्रह आहे. मनाने कल्पना केलेल्या किंवा स्वप्नात दिसणार्या वस्तूंप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे जे काही ग्रहण केले जाते, ते सर्व खोटे आहे. म्हणून शरीर आणि आत्म्याचे तत्त्व जाणणारे पुरुष अनित्य शरीरासाठी शोक करीत नाहीत की नित्य आत्म्यासाठी. परंतु ज्ञान नसल्याकारणाने जो लोक शोक करतात, त्यांचा स्वभाव बदलणे कठीण आहे. (४४-४९) एका जंगलात एक पारधी राहत होता. तो पक्ष्यांचा काळ म्हणूनच जम्नाला आला होता. तो ठिकठिकाणी जाळे लावून पक्ष्यांना पकडत असे. तेथे त्याने चिमण्यांचे एक जोडपे फिरताना पाहिले. त्या पारध्याने त्यांपैकी मादीला अचानक भुलविले. ती दैववशात त्या जाळ्यात अडकली. मादीची अवस्था पाहून नराला अत्यंत दुःख झाले. तो बिचारा तिला सोडवू शकत नव्हता. तरीपण प्रेमामुळे तो त्या बिचारीसाठी विलाप करू लागला. तो म्हणाला, खरे तर विधाता सर्व काही करू शकतो, परंतु तो अतिशय निर्दय आहे. ही अभागी अशा माझ्यासाठी शोक करीत, दीन होऊन तडफडत आहे. हिला नेऊन तो काय करणार ? देवाने मला खुशाल न्यावे. हिच्याखेरीज मी माझे अपूर्ण, दीनवाणे आणि दुःखाने भरलेले विधुराचे जीवन घेऊन काय करू ? माझ्या अभागी पिल्लांना अजून पंखही फुटलेले नाहीत. त्या मातृहीन पक्ष्यांचे पालन मी कसे करणार ? अरेरे ! घरट्यात ती आपल्या आईची वाट पाहत असतील. अशा तर्हेने तो पक्षी अत्यंत विलाप करू लागला. आपल्या सहचारिणीच्या वियोगाने तो अत्यंत व्याकूळ झाला होता. अश्रूमुळे त्याचा गळा दाटून आला. तेवढ्यात, काळाच्या प्रेरणेने जवळच लपून बसलेल्या त्या पारध्याने त्या पक्ष्यावर बाण सोडला आणि तोही मेला. मूर्ख राण्यांनो, तुम्हांला आपला मृत्यू दिसत नाही. आणि याच्यासाठी मात्र रडता ! शंभर वर्षे जरी तुम्ही याप्रकारे शोकाने छाती बडवीत राहिलात, तरी तुम्हांला तो पुन्हा मिळणार नाही. (५०-५७) हिरण्यकशिपू म्हणाला – त्या मुलाचे हे बोलणे ऐकून सर्वचजण स्तंभित झाले. त्याचे नातलग समजून चुकले की, सर्व काही अनित्य आणि खोटे आहे. हे उपाख्यान ऐकवून यमराज तेथेच अंतर्धान पावले. नातलगांनीसुद्धा सुयज्ञाचे अंत्यसंस्कार केले. म्हणून तुम्हीसुद्धा स्वतःसाठी किंवा दुसर्यासाठी शोक करू नका. या संसारात कोण आपला आणि कोण आपल्यापासून वेगळा आहे ? अज्ञानामुळेच प्राण्यांचा हा आपला-परका असा दुराग्रह असतो. (५८-६०) नारद म्हणाले – दितीने आपल्या सुनेसह हिरण्यकशिपूचे हे म्हणणे ऐकून त्याच क्षणी पुत्रशोकाचा त्याग केला आणि परमात्म्यामध्ये आपले चित्त लावले. (६१) स्कंध सातवा - अध्याय दुसरा समाप्त |