श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ३ रा

हिरण्यकशिपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले – युधिष्ठिरा, हिरण्यकशिपूने असा विचार केला की, आपण अजिंक्य, अजर, अमर आणि जगाचा एकमेव सम्राट व्हावे. तसेच आपल्याला कोणी शत्रू असू नये. यासाठी तो मंदराचलाच्या एका दरीत जाऊन अत्यंत तीव्र तपश्चर्या करू लागला. हात उंचावून आकाशाकडे पाहात तो पायाच्या अंगठ्यावर जमिनीवर उभा राहिला. प्रलयकाळातील सूर्यकिरणांप्रमाणे त्याच्या जटा चमकत होत्या. अशा रीतीने जेव्हा तो तपश्चर्येमध्ये व्यग्र झाला, तेव्हा देव आपापल्या पदांवर पुन्हा आरूढ झाले. पुष्कळ दिवस तपश्चर्या केल्यानंतर त्याच्या तपश्चर्येची आग धुरासह त्याच्या डोक्यातून बाहेर पडू लागली. ती चारी बाजूंना पसरली आणि खाली-वर तसेच आजूबाजूच्या लोकांना जाळू लागली. आगीच्या ज्वाळांनी नद्या आणि समुद्र उकळू लागले. द्वीप आणि तारे तुटून पडू लागले आणि दाही दिशांना जणू आग लागली. (१-५)

आगीच्या लोळांनी स्वर्गातील देव पोळू लागले. ते स्वर्गातून ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना करू लागले, “हे जगत्पती देवाधिदेवा, हिरण्यकशिपूच्या तपाच्या ज्वाळांनी आम्ही पोळू लागलो आहोत. आता आम्ही स्वर्गात राहू शकत नाही. हे अनंता, हे सर्वाध्यक्षा, आपणास योग्य वाटत असेल, तर आपली सेवा करणार्‍या जनतेचा नाश होण्याअगोदरच त्याला शांत करा. आपण सर्व काही जाणत आहात, तरीसुद्धा आम्ही आपल्याला निवेदन करीत आहोत. जो हेतु मनात ठेवून तो ही घोर तपश्चर्या करीत आहे, ते ऐका. त्याचा विचार असा आहे की, जसे ब्रह्मदेव तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने हे चराचर जग निर्माण करून सर्व लोकांच्या वर असलेल्या सत्यलोकात विराजमान झाले, त्याचप्रमाणे आपणसुद्धा उग्र तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने तेच पद प्राप्त करून घ्यावे. कारण वेळ अमर्याद आहे आणि आत्मा नित्य आहे. (म्हणून एका जन्मात नाही तर अनेक जन्मांत व एका युगात नाही तर अनेक युगांत) आपल्या तपश्चर्येच्या शक्तीने मी या जगाची वेगळीच रचना करीन. वैष्णव इत्यादी पदांमध्ये तरी अशी काय विशेषता आहे ? कारण कल्पाच्या शेवटी त्यांनासुद्धा काळाच्या गर्तेत जावे लागते. अशा प्रकारचे त्याचे मनोगत आम्ही ऐकले आहे. असा हट्ट धरूनच तो घोर तपश्चर्या करीत आहे. आपण तिन्ही लोकांचे स्वामी आहात. आता आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. हे जगत्पते, आपले हे परमेष्ठिपद ब्राह्मण आणि गाईंची वृद्धी, कल्याण, ऐश्वर्य, खुशाली आणि विजय यांसाठी आहे. (६-१३)

युधिष्ठिरा, देवांनी जेव्हा भगवान ब्रह्मदेवांना असे निवेदन केले, तेव्हा ते भृगू, दक्ष इत्यादी प्रजापतींसह हिरण्यकशिपूच्या आश्रमात गेले. तेथे ते प्रथम त्याला पाहू शकले नाहीत. कारण वारूळ, गवत आणि बांबूंच्या जाळ्या यांनी त्याचे शरीर झाकले गेले होते. मुंग्यांनी त्याची चरबी, त्वचा, मांस आणि रक्त चाटून खाल्ले होते. तो आपल्या तपश्चर्येच्या तेजाने लोकांना, ढगांनी झाकोळलेल्या सूर्याप्रमाणे तापवीत होता. त्याला पाहून ब्रह्मदेवसुद्धा आश्चर्यचकित झाले. हसत हसत ते त्याला म्हणाले. (१४-१६)

ब्रह्मदेव म्हणाले, वत्सा, ऊठ, ऊठ. तुझे कल्याण असो. कश्यपनंदना, आता तुझी तपश्चर्या सिद्ध झाली आहे. मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. तुला जे पाहिजे असेल ते निःसंकोचपणे मागून घे. मी तुझ्या हृदयाचे अद्‌भुत सामर्थ्य पाहिले. अरे, कीटकांनी तुझा देह खाऊन टाकला आहे. तरीसुद्धा तुझे प्राण हाडांच्या साहाय्याने टिकून आहेत. अशी कठीण तपश्चर्या पूर्वीच्या कोणत्याही ऋषींनी केली नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही. असा कोण आहे बरे की, जो शंभर वर्षे पाणी न पिता जिवंत राहू शकेल ? हे दितिनंदना, तू केलेले हे काम धीर पुरुषांनासुद्धा करणे अशक्य आहे. तू या तपश्चर्येने मलाही वश करून घेतले आहेस. हे दैत्यशिरोमणी, यामुळे प्रसन्न होऊन तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तू मरणारा आहेस तर मी अमर आहे. म्हणून तुला माझे झालेले दर्शन निष्फळ होणार नाही. (१७-२१)

नारद म्हणतात – असे म्हणून ब्रह्मदेवांनी मुंग्यांनी खाल्लेल्या त्याच्या शरीरावर आपल्या कमंडलूतील दिव्य आणि अमोघ प्रभावशाली पाणी शिंपडले. लाकडातून जशी आग वर यावी, त्याप्रमाणे पाणी शिंपडताच तो बांबूजवळच्या वारुळातून उठून उभा राहिला. त्यावेळी त्याचे शरीर सर्व अवयवांनी परिपूर्ण आणि बलवान झाले होते. इंद्रियांमध्ये शक्ती आली होती. आणि मन सचेत झाले होते. सर्व अंग वज्राप्रमाणे कठोर आणि तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकदार झाले होते. तो नवयुवक होऊन उभा राहिला. आकाशात हंसावर बसलेले ब्रह्मदेव आहेत, असे त्याने पाहिले. त्यांना पाहून त्याला अतिशय आनंद झाला. त्याने त्यांना शिरसांष्टांग नमस्कार केला. नंतर हात जोडून नम्रतेने तो उभा राहिला आणि मोठ्या प्रेमाने, आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहात गद्‍गद्‍ वाणीने तो स्तुती करू लागला. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते आणि सर्व शरीर आनंदाने पुलकित झाले होते. (२२-२५)

हिरण्यकशिपू म्हणाला – कल्पाच्या शेवटी ही सारी सृष्टी कालनिर्मित घनदाट अंधाराने झाकून गेली होती. त्यावेळी स्वयंप्रकाशस्वरूप (असलेल्या) आपण आपल्या तेजाने पुन्हा हिला प्रगट केले. आपणच आपल्या त्रिगुणमय रूपाने हिची निर्मिती, रक्षण आणि संहार करता. आपण रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणाचे आश्रय आहात. आपणच सगळ्यांच्या पलीकडचे आणि श्रेष्ठ आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. आपणच जगाचे मूळ कारण आहात. ज्ञान आणि विज्ञान आपली मूर्ती आहे. प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी या कार्यरूपांत आपण स्वतःला प्रगट केले आहे. आपणच मुख्य प्राण सूत्रात्म्याच्या रूपाने चराचर जगाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवता. आपणच प्रजेचे रक्षणकर्तेही आहात. चित्त, चेतना, मन आणि इंद्रियांचे स्वामी आपणच आहात. पंचमहाभूते, शब्दादी विषय आणि त्यांच्या संस्कारांचे निर्मातेसुद्धा महत्तत्त्चाच्या रूपाने आपणच आहात. जो वेद होता, अध्वर्यू, ब्रह्मा आणि उद्गाता या ऋत्विजांनी होणार्‍या यज्ञाचे प्रतिपादन करतो, ते आपलेच शरीर आहे. त्यांच्याच द्वारा अग्निष्टोम इत्यादी सात यज्ञांचा आपण विस्तार करता. आपणच सर्व प्राण्यांचे आत्मा आहात. कारण आपण अनादी, अनंत, अपार, सर्वज्ञ आणि अंतर्यामी आहात. आपणच काल आहात. प्रत्येक क्षणी आपण सावध राहून आपल्या क्षण, लव, इत्यादी विभागांच्या द्वारा लोकांचे आयुष्य क्षीण करीत असता. असे असूनही आपण निर्विकार आहात. कारण आपण ज्ञानस्वरूप, परमेश्वर, अजन्मा, महान आणि सर्व जीवांना जीवन देणारे अंतरात्मा आहात. प्रभो, कार्य, कारण, चालती-फिरती किंवा स्थिर अशी कोणतीच वस्तू नाही जी आपल्याहून वेगळी आहे. सर्व विद्या आणि कला आपले शरीर आहेत. आपण त्रिगुण मायेच्या पलीकडील स्वतःच ब्रह्म आहात. हे सुवर्णमय ब्रह्मांड आपल्या उदरात आहे. आपण याला आपल्यातूनच प्रगट करता. प्रभो, हे दिसत असलेले ब्रह्मांड आपले स्थूल शरीर आहे. यामार्फत आपण इंद्रिये, प्राण आणि मन यांच्या विषयांचा उपभोग घेता. परंतु त्यावेळीसुद्धा आपण आपले परम ऐश्वर्यमय असलेल्या स्वरूपातच स्थित राहाता. खरे पाहू जाता, आपण पुराणपुरुष, स्थूल-सूक्ष्माच्या पलीकडील ब्रह्मस्वरूपच आहात. आपण आपल्या अनंत आणि अव्यक्त स्वरूपाने सर्व जग व्यापले आहे. चेतन आणि अचेतन या दोन्हीही आपल्या शक्ती आहेत. भगवन, मी आपल्याला नमस्कार करीत आहे. (२६-३४)

प्रभो, वर देणार्‍यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपण जर मला इष्ट वर देणार असाल, तर तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहूनही इतर प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये. मग ते मनुष्य असोत की पशू. देव, दानव किंवा मोठे नाग असोत, प्राणयुक्त असोत की प्राणरहित असोत. तसेच आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात कोणत्याही शस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझ्याशी सामना करणारा कोणी नसावा. मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा. इंद्रादी सर्व लोकपालांमध्ये जसा आपला महिमा आहे, तसाच माझाही असावा. तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचे ऐश्वर्य प्राप्त होते, तेच मलाही द्यावे. (३५-३८)

स्कंध सातवा - अध्याय तिसरा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP