श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १ ला

नारद-युधिष्ठिर-संवाद आणि जय-विजयाची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

परीक्षिताने विचारले – ब्रह्मन, भगवान स्वतः सर्वांच्या विषयी समदृष्टी आहेत. सर्व प्राण्यांचे प्रिय आणि सुहृद आहेत. असे असताना भेदभाव करणार्‍या सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी इंद्रासाठी दैत्यांचा वध कसा केला ? ते साक्षात मोक्षस्वरूप आहेत. म्हणून त्यांना देवांकडून काहीही मिळवायचे नाही. तसेच ते निर्गुण असल्यामुळे दैत्यांशी त्यांचे वैर किंवा त्यांच्यापासून त्यांना उद्वेगसुद्धा नाही. हे महात्मन, भगवंतांच्या समत्वादी गुणांच्या संबंधाने आमच्या मनात मोठा संदेह निर्माण झाला आहे. आपण तो नाहीसा करावा. (१-३)

श्रीशुक्राचार्य म्हणाले – महाराज, श्रीहरींच्या अद्‌भुत चरित्रासंबंधी तू सुंदर प्रश्न विचारलास. कारण भगवद्‍भक्तांच्या महिम्याने भगवंतांविषयी भक्ती वाढते. या परम पुण्यमय प्रसंगांचे नारदादी ऋषी मोठ्या प्रेमाने गायन करतात. आता मी श्रीकृष्ण-द्वैपायन मुनींना नमस्कार करून भगवंतांच्या कथांचे वर्णन करतो. वास्तविक पाहाता भगवंत निर्गुण, अजन्मा, अव्यक्त आणि प्रकृतीच्याही पलीकडील असे आहेत. असे असून सुद्धा आपल्या मायेच्या गुणांचा स्वीकार करून ते मरणारा व मारणारा अशी दोन्ही रूपे धारण करतात. सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे गुण आहेत. परमात्म्याचे नव्हेत. परीक्षिता, या तीनही गुणांचे कमी-जास्त होणे एकाच वेळी नसते. वेळेनुसार भगवंत गुणांचा स्वीकार करतात. सत्वगुण वाढतो, त्यावेळी देव आणि ऋषींचा, रजोगुणाच्या वाढीच्या वेळी दैत्यांचा आणि तमोगुणाची वाढ होते तेव्हा ते यक्ष आणि राक्षसांचा लौकिक वाढवितात. जसा अग्नी लाकूड इत्यादी वस्तूंत असताना त्यापेक्षा वेगळा भासत नाही, पण घर्षण केल्यावर मात्र तो वेगळा दिसतो. त्याप्रमाणे परमात्मा सर्व शरीरांत असताना वेगळा असल्याचे भासत नाही. परंतु विवेकी पुरुष विचार करून त्याच्याव्यतिरिक्त अन्य वस्तूंचा निषेध करून शेवटी आपल्या हृदयातच अंतर्यामीरूपाने असणार्‍या त्याला प्राप्त करून घेतात. जेव्हा परमेश्वर जीवासाठी शरीरे निर्माण करू इच्छितो, तेव्हा आपल्या मायेने रजोगुण वेगळा करून त्याचे आधिक्य निर्माण करतो. जेव्हा जीवरूपातील तो विचित्र योनींमध्ये रममाण होऊ इच्छितो, तेव्हा सत्वगुणाची वाढ करतो आणि जेव्हा तो या शरीरांचा संहार करू इच्छितो तेव्हा तमोगुणाला वाढण्याची प्रेरणा देतो. परीक्षिता, भगवान सत्यसंकल्प आहेत. तेच जगाच्या उत्पत्तीला कारण असलेली प्रकृती आणि पुरुष यांचे सहकारी व आश्रय अशा कालाची निर्मिती करतात. राजा, हे कालस्वरूप ईश्चर जेव्हा सत्वगुणाची वाढ करतात, तेव्हा सत्वगुणी देवतांचे सामर्थ्य वाढते आणि तेव्हाच ते परमयशस्वी देवप्रिय परमात्मा देवांचे शत्रू असणार्‍या रज-तमोगुणी दैत्यांचा संहार करतात. (४-११)

राजन, जेव्हा राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठिरांनी एक प्रश्न विचारला होता, त्यावेळी देवर्षी नारदांनी याविषयी मोठ्या प्रेमाने एक इतिहास सांगितला होता. त्या महान राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिरांनी आपल्या डोळ्यांदेखत एक आश्चर्यकारक घटना पाहिली की, चेदिदेशाचा राजा शिशुपाल भगवान श्रीकृष्णांमध्ये एकरूप झाला. देवर्षी नारद तेथेच बसले होते. या घटनेने आश्चर्यचकित होऊन धर्मराजाने मुनींच्या समोर त्या यज्ञमंडपात नारदांना हा प्रश्न विचारला होता. (१२-१४)

युधिष्ठिराने विचारले – अहाहा ! ही तर मोठी विचित्र घटना आहे. परमतत्व भगवान श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट होणे हे अनन्य भक्तांनासुध्दा कठीण आहे. मग भगवंताचा द्वेष करणार्‍या शिशुपालाला ही प्राप्ती कशी झाली ? नारदमुने ! आम्ही सर्वच याचे रहस्य जाणू इच्छितो. पूर्वी एकदा भगवंतांची निंदा केल्यामुळे ऋषींनी राजा वेनाला नरकात धाडले होते. दमघोषाचा हा पुत्र पापात्मा शिशुपाल आणि दुष्ट दंतवक्त्र हे दोघेही जेव्हापासून बोबडे बोलू लागले होते, तेव्हापासून आतापर्यंत भगवंतांचा द्वेषच करीत आले आहेत. अविनाशी परब्रह्म श्रीकृष्णांना अखंड शिव्याशाप देणार्‍या यांच्या जिभेला कोड कसे फुटले नाही की यांना घोर नरकाची प्राप्ती कशी झाली नाही ? उलट, ज्या भगवंतांची प्राप्ती अत्यंत कठीण आहे, त्या भगवंतांमध्ये हे दोघेजण सर्वांच्या देखत सहजपणे विलीन झाले. वार्‍याच्या झोताने हलणार्‍या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे माझी बुद्धी याविषयी द्विधा झाली आहे. आपण सर्वज्ञ असल्याने या अद्‌भुत घटनेचे रहस्य समजावून द्यावे. (१५-२०)

श्रीशुक म्हणतात – देवर्षी नारद राजाचा हा प्रश्न ऐकून अत्यंत प्रसन्न झाले. युधिष्ठिराला संबोधित सर्वजण ऐकत असता, भर सभेत त्यांनी ही कथा सांगितली. (२१)

नारद म्हणाले – युधिष्ठिरा ! निंदा, स्तुती, सत्कार आणि तिरस्कार हे शरीराचेच असतात. प्रकृती आणि पुरुषाविषयी विवेक न केल्यामुळे या शरीराची कल्पना केली जाते. हे राजा, जेव्हा या शरीरालाच आपला आत्मा मानले जाते, तेव्हा ’मी माझे’ असा भाव तयार होतो. भेद उत्पन्न होण्याचे हेच मूळ आहे. या कारणामुळेच मारणे आणि निंदा यांमुळे क्लेश होतात. “हे मी आहे” असा ज्या शरीराविषयी अभिमान निर्माण होतो, त्या शरीराच्या वधाने प्राण्यांना आपला वध झाला असे वाटते. परंतु भगवंतांमध्ये असा अभिमान नाही. कारण ते सर्वात्मा आणि अद्वितीय आहेत. ते दुसर्‍यांना दंड देतात, तो रागाने किंवा द्वेषाने नव्हे, तर त्यांच्या कल्याणासाठीच देतात. मग भगवंतांविषयी हिंसेची कल्पना कशी करता येईल ? म्हणून वैरभावाने किंवा वैर सोडून, भयाने, स्नेहाने किंवा इच्छा मनात धरून, कसेही असो; आपले मन भगवंतांच्या ठिकाणी लावले पाहिजे. म्हणजे भगवंत त्याला वेगळा मानीत नाहीत. माझे तर असे ठाम मत आहे की, वैरभावाने मनुष्य भगवंतांमध्ये जितका तन्मय होऊन जातो तितका भक्तीयोगाने होत नाही. गांधीलमाशी किड्याला आणून मातीच्या घरट्यात बंदिस्त करते आणि वारंवार येऊन त्याला नांगी मारते. तेव्हा तो किडा भीती आणि उद्वेगाने त्या माशीचे चिंतन करीत करीत तिच्यासारखाच होऊन जातो. मायेने मनुष्य झालेल्या भगवान श्रीकृष्णांशी वैर करणारेसुद्धा सतत त्यांचे चिंतन करता करता पापरहित होऊन त्यांनाच प्राप्त झाले. जसे भक्तीने भक्त, तशीच अनेक माणसे कामनेने, द्वेषाने, भीतीने किंवा स्नेहाने आपले मन भगवंतांमध्ये लावून आपली सर्व पापे धुऊन टाकून भगवंतांना प्राप्त झाली. महाराज, गोपींनी प्रेमाने, कंसाने भयाने, शिशुपाल-दंतवक्त्र इत्यादी राजांनी द्वेषाने, यदुवंशीयांनी नात्याच्या संबंधाने, तुम्ही स्नेहाने आणि आम्ही भक्तीने आपले मन भगवंतांमध्ये लावले आहे. भक्तांच्या व्यतिरिक्त भगवंतांचे चिंतन करणारे जे पाच प्रकारचे पुरुष आहेत, त्यांपैकी कोणाशीही राजा वेनाची तुलना होऊ शकत नाही. म्हणून कसेही का असेना, आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्ये लावले पाहिजे. महाराज, शिवाय तुझे मावस भाऊ शिशुपाल आणि दंतवक्त्र हे दोघेही भगवान विष्णूंचे मुख्य पार्षद होते. ब्राह्मणांच्या शापामुळे या दोघांना आपल्या पदावरून खाली यावे लागले. (२२-३२)

युधिष्ठिराने विचारले – भगवंतांच्या पार्षदांनासुद्धा पदभ्रष्ट करणारा शाप कोणी दिला होता ? तो कोणता होता ? भगवंतांच्या अनन्य भक्तांचा जन्म व्हावा ही गोष्ट विश्वास ठेवण्याजोगी वाटत नाही. वैकुठांत राहणारे लोक प्राकृत शरीर, इंद्रिये आणि प्राणांविरहित असतात. त्यांच प्राकृत शरीराशी संबंध कसा आला, ते आपण सांगावे. (३३-३४)

नारद म्हणाले – ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादी ऋषी एके दिवशी तिन्ही लोकांमध्ये स्वच्छंदपणे विहार करीत असता वैकुंठात जाऊन पोहोचले. वास्तविक हे सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत, परंतु पाचसहा वर्षांच्या बालकांसारखे आहेत. ते वस्त्रसुद्धा नेसत नाहीत. त्यांना सामान्य मुले समजून द्वारपालांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. यामुळे रागावून त्यांनी द्वारपालांना शाप दिला की, “मूर्खांनो, भगवान विष्णूंच्या रज-तमोगुणरहित चरणांजवळ निवास करण्यास तुम्ही पात्र नाही. सबब तुम्ही ताबडतोब येथून अत्यंत पापमय असुरयोनीत जा.” त्यांनी शाप देताच जेव्हा ते वैकुंठातून खाली येऊ लागले, तेव्हा ते कृपाळू महात्मे त्यांना म्हणाले – “ठीक आहे. हा शाप तीन जन्म भोगून तुम्ही परत या वैकुंठात याल.” (३५-३८)

तेव्हा तेच दोघेजण दितीचे पुत्र झाले. त्यांपैकी थोरल्याचे नाव हिरण्यकशिपू होते आणि धाकट्याचे हिरण्याक्ष. दैत्य-दानवांच्या समाजात हेच सर्वश्रेष्ठ होते. भगवान विष्णूंनी नृसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकशिपूला आणि पृथ्वीला समुद्रातून वर काढताना वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाला मारले. आपला पुत्र प्रल्हाद भगवत्प्रेमी आहे, म्हणून त्याला मारू इच्छिणार्‍या हिरण्यकशिपूने त्याला अतिशय यातना दिल्या. परंतु प्रल्हाद सर्वात्मा भगवंतांचा परमप्रिय, समदर्शी व अत्यंत शांत भक्त होता. भगवंतांच्या तेजाने युक्त असल्यामुळे पुष्कळ प्रयत्‍न करूनही हिरण्यकशिपू त्याला मारू शकला नाही. (३९-४२)

नंतर हेच दोघे विश्रवा मुनी व केशिनी यांचे रावण व कुंभकर्ण नावाचे पुत्र झाले. ते त्रैलोक्याला पीडा देणारे होते. त्यावेळीसुद्धा भगवंतांनी त्यांना शापातून सोडविण्यासाठी रामरूपाने त्यांचा वध केला. युधिष्ठिरा, मार्कंडेय मुनींच्या तोंडून तू भगवान श्रीरामांचे चरित्र ऐकशील. तेच दोघे या जन्मात तुझ्या मावशीचे क्षत्रियपुत्र झाले. भगवान श्रीकृष्णांच्या चक्राच्या स्पर्शाने सर्व पापे नष्ट होऊन आता ते शापातून मुक्त झाले. तीव्र वैरभाव ठेवल्यामुळे ते सतत श्रीकृष्णांचेच चिंतन करीत असत. म्हणूनच ते भगवंतांना प्राप्त झाले आणि पुन्हा त्यांचे पार्षद होऊन त्यांच्याजवळ गेले. (४३-४६)

युधिष्ठिराने विचारले – भगवन, हिरण्यकशिपूने आपल्या महात्मा असलेल्या पुत्र प्रल्हादाचा इतका द्वेष का केला ? शिवाय प्रल्हाद भगवन्मय कसा झाला, हेही मला सांगा. (४७)

स्कंध सातवा - अध्याय पहिला समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP