श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय १९ वा

पुंसवन-व्रताचा विधी -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने विचारले - भगवन ! आपण ज्या पुंसवनव्रताचे वर्णन केले आणि म्हणालात की, त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तर आता मी त्याचा विधी जाणू इच्छितो. (१)

श्रीशुक म्हणाले - हे पुंसवनव्रत सर्व कामना पूर्ण करणारे आहे. पतीची आज्ञा घेऊन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून याचा आरंभ करावा. प्रथम मरुद्‍गणांच्या जन्माची कथा ऐकून ब्राह्मणांची आज्ञा घ्यावी. नंतर सकाळी दात घासून स्नान करावे. दोन शुभ्र वस्त्रे धारण करावीत आणि अलंकारही घालावेत. प्रातःकाळी काही खाण्याच्या अगोदर भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करावी. प्रभो, आपण पूर्णकाम आहात. म्हणून निरपेक्ष आहात. आपण सर्व विभूतींचे स्वामी आणि सकल सिद्धीस्वरूप आहात. मी आपणांस वारंवार नमस्कार करते. हे आराध्यदेवते, आपण कृपा, विभूती, तेज, महिमा आणि वीर्य इत्यादी समस्त गुणांनी नित्ययुक्त आहात. म्हणून आपणास भगवान म्हणतात. आपण सर्वशक्तिमान आहात. माते लक्ष्मीदेवी, आपण भगवंतांची अर्धांगिनी आणि महामायास्वरूपिणी आहात. भगवंतांचे सर्व गुण आपल्या ठिकाणी निवास करतात. हे महाभाग्यवती जगन्माते, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. मी आपणास नमस्कार करते. (२-६)

परीक्षिता, अशा प्रकारे स्तुती करून एकाग्र चित्ताने," महानुभाव, समस्त महाविभूतींचे स्वामी भगवान पुरुषोत्तमांना आणि त्यांच्या महाविभूतींना मी नमस्कार करते आणि त्यांना पूजासामग्री समर्पण करते." या मंत्राने दररोज स्थिर चित्ताने श्रीविष्णूंना आवाहन, अर्घ्य, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, अलंकार, गंध, फुल, धूप, दीप आणि नैवेद्य इत्यादी अर्पण करून पूजन करावे. जो नैवेद्य शिल्लक राहील, त्याने (महान ऐश्वर्याचे अधिपती भगवान पुरुषोत्तमांना उद्देशून मी आहुती देते.) हा मंत्र म्हणून अग्नीमध्ये बारा आहुती द्याव्यात. जो सर्व प्रकारची संपत्ती मिळवू इच्छितो, त्याने दररोज भक्तिभावाने भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करावी, कारण तेच दोघेजण सर्व इच्छा पूर्ण करणारे तसेच श्रेष्ठ वर देणारे आहेत. नंतर भक्तिपूर्ण मनाने भगवंतांना जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा. वरील मंत्राचा दहावेळा जप करून नंतर या स्तोत्राचा पाठ करावा. (७-१०)

"हे लक्ष्मीनारायणा, आपण दोघेजण सर्वव्यापक आणि संपूर्ण जगाचे अंतिम कारण आहात. ही अव्यक्त प्रकृती आपली मायाशक्ति असून तिचे स्वरूप समजणे अत्यंत कठीण आहे. आपण या महामायेचे अधीश्वर आहात. आणि आपणच स्वतः परमपुरुष आहात. आपणच सर्व यज्ञस्वरूप असून यज्ञक्रिया आणि फळभोक्तेही आपणच आहात. ही देवी तिन्ही गुणांची अभिव्यक्ती असून आपण त्यांना व्यक्त करणारे व त्यांचे भोक्ते आहात. आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आहात आणि लक्ष्मीदेवी शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण आहेत. लक्ष्मीदेवी नाम व रूप आहेत आणि आपण नाम-रूप या दोघांचेही प्रकाशक आणि आधार आहात. प्रभो, आपली कीर्ती पवित्र आहे. आपण दोघेही त्रैलोक्याला वरदान देणारे परमेश्वर आहात. म्हणून माझ्या मोठमोठया आशा-आकांक्षा आपल्या कृपेने पूर्ण होवोत." (११-१४)

परीक्षिता, वर देणार्‍या लक्ष्मीनारायणांची अशी स्तुती करून तेथून नैवेद्य बाजूला ठेवावा. आणि त्यांना आचमन देऊन पूजा करावी. त्यानंतर भक्तिभावाने परिपूर्ण अशा हृदयाने भगवंताची स्तुती करावी आणि यज्ञावशेषाचा वास घेऊन पुन्हा भगवंताची पूजा करावी. आपल्या पतीला साक्षात भगवंत समजून अतिशय प्रेमाने त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना द्याव्या. पतीनेसुद्धा प्रेमपूर्वक आपल्या पत्नीची लहान-मोठी सर्व कामे करीत राहावे. पती-पत्नीपैकी एकाने एखादे कर्म केले, तरी त्याचे फळ दोघांनाही मिळते. म्हणून जर पत्नी हे व्रत करण्यास अयोग्य असेल, तर अत्यंत एकाग्रतेने पतीनेच हे अनुष्ठान करावे. हे भगवान विष्णूंचे व्रत आहे. हे व्रत घेतल्यानंतर मधेच सोडता कामा नये. जो हे व्रत घेईल, त्याने दररोज पुष्पमाळा, चंदन, नैवेद्य, अलंकार इत्यादींनी भक्तिपूर्वक ब्राह्मण आणि सुवासिनी स्त्रियांचे पूजन करावे. तसेच भगवान विष्णूंचीसुद्धा पूजा करावी. यानंतर भगवंतांना त्यांच्या धामाकडे विसर्जन करून आत्मशुद्धी आणि सर्व इच्छांच्या पूर्तीसाठी पहिल्यापासून त्यांना दाखविलेल्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा. साध्वी स्त्रीने या विधीने बारा महिने-संपूर्ण वर्षभर या व्रताचे आचरण करून कार्तिक अमावस्येला उद्यापन म्हणून उपवास, पूजन इत्यादी करावे. दुसर्‍या दिवशी प्रातःकाळी स्नान करून नेहमीप्रमाणे श्रीविष्णूंचे पूजन करावे. आणि तिच्या पतीने पाकयज्ञाच्या विधीने तूपमिश्रित दूधात शिजविलेल्या भाताच्या बाराच आहुती अग्नीमध्ये द्याव्यात. त्यानंतर ब्राह्मण जेव्हा प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देतील तेव्हा मोठया नम्रतेने मस्तक नमवून त्याचा स्वीकार करावा. आणि त्यांची अनुमती घेऊन भोजन करावे. प्रथम आचार्यांना भोजन द्यावे. नंतर मौन धारण करून कुटुंबियांसह स्वतः भोजन करावे. नंतर हवन करून शिल्लक राहिलेला चरू पत्नीला द्यावा. तोच प्रसाद स्त्रीला सत्पुत्र आणि सौभाग्य प्रदान करणारा ठरतो.(१५-२४)

जो मनुष्य भगवंतांच्या या पुंसवन व्रताचे विधिपूर्वक अनुष्ठान करतो, त्याला या जन्मातच त्याने इच्छिलेली वस्तू मिळते. या व्रताचे पालन करून स्त्री सौभाग्य, संपत्ती, संतती, चिरसौभाग्य, यश आणि घर प्राप्त करून घेते. या व्रताचे अनुष्ठान करणारी कन्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त असा पती प्राप्त करते. विधवा निष्पाप होऊन वैकुंठलोकी जाते. जिची मुले मरतात, ती स्त्री त्याच्या प्रभावाने चिरायू पुत्रांची प्राप्ती करून घेते. धनवान पण अभागी स्त्रीला उत्तम भाग्य प्राप्त होते आणि कुरूप स्त्रीला सुंदर रूप प्राप्त होते. रोगी रोगमुक्त होऊन बलवान शरीर आणि श्रेष्ठ इंद्रियशक्ति प्राप्त करून घेतो. जो मनुष्य मंगलकर्मे किंवा श्राद्धकर्माचे वेळी याचा पाठ करतो, त्यावेळी देव आणि पितर यांची अनंतकाळ तृप्ती होते. हवनाची समाप्ती झाल्यानंतर अग्नी, लक्ष्मी आणि श्रीविष्णू संतुष्ट होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. परीक्षिता, मी तुला मरुद्‍गणांची आदरणीय आणि पुण्यप्रद जन्मकथा ऐकविली, त्याचबरोबर दितीच्या श्रेष्ठ पुंसवन व्रताचे सुद्धा वर्णन ऐकविले. (२५-२८)

स्कंध सहावा - अध्याय एकोणिसावा समाप्त
स्कंध सहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP