|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १६ वा
चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, त्यानंतर देवर्षी नारदांनी मृत राजकुमाराचा जीवात्मा, शोकाकुल स्वजनांना प्रत्यक्ष दाखवून त्याला ते म्हणाले. (१) नारद म्हणाले - हे जीवात्म्या, तुझे कल्याण असो. बघ. तुझे माता-पिता, सगे-सोयरे, तुझ्या वियोगाने अत्यंत शोकाकुल झाले आहेत. तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या आप्तेष्टांबरोबर घालव आणि राजसिंहासनावर बसून आपल्या पित्याने दिलेले भोग घे. (२-३) जीवात्मा म्हणाला - मी, आपल्या कर्मानुसार देवता, मनुष्य, पशु-पक्षी इत्यादी योनींमध्ये भटकत असताना कोणत्या जन्मांमध्ये हे माझे माता-पिता झाले ? निरनिराळ्या जन्मांमध्ये सर्वचजण सर्वांचे भाऊबंद नातलग, शत्रू-मित्र, मध्यस्थ, तटस्थ आणि द्वेष करणारे होत असतात. जसे सोने इत्यादी खरेदी-विक्री होणार्या वस्तू एका व्यापार्याकडून दुसर्याकडे जातात-येतात, त्याप्रमाणे जीवसुद्धा निरनिराळ्या योनींमध्ये जातात-येतात. नित्य असणार्या पदार्थांचा संबंधसुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो. आणि जोपर्यंत ज्याचा ज्या वस्तूशी संबंध असतो, तोपर्यंतच त्याची त्या वस्तूबाबत ममताही असते. जीव हा कायमचा आणि अहंकाररहित आहे. तो गर्भामध्ये येऊन जोपर्यंत ज्या शरीरात राहतो, तोपर्यंतच ते शरीर आपले समजतो. हा जीव नित्य, अविनाशी, सूक्ष्म, सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाश आहे. हा ईश्वररूप असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनीच स्वतःला विश्वाच्या रूपामध्ये प्रगट करतो. याला कोणी अत्यंत प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही. आपला नाही की परका नाही. कारण गुण-दोष करणार्यांच्या वृत्तींचा हा एकटाच साक्षी आहे. हा आत्मा कार्यकारणाचा साक्षी आणि स्वतंत्र आहे. म्हणून हा शरीरादिकांचे गुण-दोष किंवा कर्मफळे घेत नाही. नेहमी हा त्रयस्थाप्रमाणे तटस्थ राहातो. (४-११) श्रीशुक म्हणतात - असे सांगून तो जीवात्मा निघून गेला. तेव्हा ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या त्या बांधवांनी स्नेहबंधन तोडून शोकही सोडून दिला. यानंतर त्याच्या नातलगांनी मुलाच्या मृत देहाच्या योग्य त्या और्ध्वदैहिक क्रिया पूर्ण केल्या आणि ज्यामुळे शोक, मोह, भय आणि दुःखाची प्राप्ती होते, तो सोडण्यास कठीण असा स्नेह सोडून दिला. ज्या राण्यांनी बाळाला मारले होते, त्या बालहत्या केल्यामुळे लज्जित व निस्तेज झाल्या होत्या. त्यांनी अंगिरा ऋषींचा उपदेश आठवून मत्सर सोडून यमुनेच्या तटावर ब्राह्मणांच्या आदेशानुसार बालहत्येचे प्रायश्चित्त घेतले. अशा प्रकारे ऋषींच्या उपदेशाने विवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे तळ्यातील चिखलातून बाहेर आलेल्या हत्तीप्रमाणे चित्रकेतू घर-दाररूप अंधार्या विहिरीतून बाहेर आला. यमुना नदीत विधिपूर्वक स्नान करून त्याने तर्पण इत्यादी धार्मिक क्रिया केल्या. त्यानंतर इंद्रियांना जिंकून आणि मौनव्रत धारण करून त्याने ब्रह्मपुत्रांना वंदन केले. चित्रकेतू जितेंद्रिय, भगवद्भक्त आणि शरणागत आहे, असे पाहून भगवान नारदांनी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला या विद्येचा उपदेश केला. (१२-१७) हे भगवन ! वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण स्वरूप आपल्याला नमस्कार करून आम्ही आपले ध्यान करतो. आपण विज्ञानस्वरूप आहात. आपली मूर्ती परमानंदमय आहे. आपण आपल्या स्वरूपभूत आनंदातच मग्न आणि शांत आहात. द्वैतदृष्टी आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. मी आपल्याला नमस्कार करतो. आपल्या स्वरूपभूत आनंदाच्या अनुभूतीमुळे आपण मायाजनित राग-द्वेषादिक सोडून दिले आहेत. आपण सर्वांच्या इंद्रियांचे प्रेरक, महान आणि विराट-स्वरूप आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. मन आणि वाणी आपल्यापर्यंत न पोहोचता मधूनच परत येते. त्यानंतर अद्वितीय, नाम-रूपरहित, चेतनमात्र आणि कार्य-कारणाच्याही पलीकडील जी वस्तू शिल्लक राहते, ती आमचे रक्षण करो. हे कार्यकारणरूप जग ज्यापासून उत्पन्न होते, ज्याच्यात राहाते आणि ज्यामध्ये विलीन होते, मातीच्या वस्तूत माती ओतप्रोत व्यापलेली असावी, त्याप्रमाणे सर्व विश्वात व्यापून असणार्या त्या परब्रह्मस्वरूप आपल्याला मी नमस्कार करीत आहे. आपण जरी आकाशाप्रमाणे आत-बाहेर व्यापून आहात, तरी आपल्याला मन, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिये जाणू शकत नाहीत. तसेच प्राण व कर्मेंद्रिये आपल्या क्रियारूप शक्तींनी स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. मी आपणास नमस्कार करतो. जसे लोखंड अग्नीने तापल्यानंतर जाळू शकते, एरव्ही नाही. त्याप्रमाणे शरीर, इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी आपल्या चैतन्यांशाने युक्त होऊनच जागृतीत व स्वप्नात आपापली कामे करतात; तीच सुषुप्ती आणि मूर्च्छित अवस्थेत चैतन्यांशाने युक्त नसल्यामुळे आपापली कामे करण्यास असमर्थ ठरतात. ज्याला ‘द्रष्टा’ म्हणतात, तेही आपलेच एक नाव आहे. जागृती इत्यादी अवस्थांमध्ये आपण त्याचा स्वीकार करता. महाप्रभावशाली महाविभूतिपती भगवान महापुरुषांना नमस्कार असो. श्रेष्ठ भक्तांचे समुदाय आपल्या करकमलांच्या कळ्यांनी आपल्या दोन्ही चरणकमलांच्या सेवेमध्ये तत्पर असतात. प्रभो, आपणच सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणांस वारंवार नमस्कार करीत आहे. (१८-२५) श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, नारद आपल्या शरणागत भक्त चित्रकेतूला या विद्येचा उपदेश करून महर्षी अंगिरांच्याबरोबर ब्रह्मलोकी निघून गेले. नारदांनी दिलेल्या त्या विद्येचे चित्रकेतूने त्यांच्या आज्ञेनुसार फक्त पाणी पिऊन सात दिवस मोठया एकाग्रतेने अनुष्ठान केले. हे राजा, त्यानंतर त्या विद्येच्या अनुष्ठानाने सात रात्रींनंतर राजा चित्रकेतूला विद्याधरांचे अखंड आधिपत्य प्राप्त झाले. यानंतर काही दिवसांनी या विद्येच्या प्रभावाने त्याचे मन आणखी शुद्ध झाले. आता तो देवाधिदेव भगवान शेषांच्या चरणांजवळ पोहोचला. भगवान शेष सिद्धेश्वरांच्या समुदायात विराजमान आहेत. त्यांचे शरीर कमळांतील तंतूप्रमाणे गौर वर्णाचे आहे. त्यांनी निळ्या रंगांचे वस्त्र परिधान केले आहे. डोक्यावर मुगुट, दंडांमध्ये बाजूबंद, कमरेला कमरपटटा आणि मनगटांमध्ये कडी इत्यादी अलंकार चमकत आहेत. डोळे अरुणासारखे तांबूस वर्णाचे आहेत आणि मुखावर प्रसन्नता शोभून दिसत आहे. असे त्यांचे चित्रकेतूला दर्शन झाले. भगवान शेषांचे दर्शन होताच राजर्षी चित्रकेतूची सर्व पापे नष्ट झाली. त्याचे अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ झाले. हृदयामध्ये भक्तीचा पूर आला. त्यामुळे नेत्रांमधून प्रेमाने अश्रू गळू लागले. शरीरावर रोमांच उभे राहिले. अशा स्थितीत त्याने आदिपुरुष भगवान शेषांना नमस्कार केला. त्याच्या नेत्रातून जे प्रेमाश्रू वाहू लागले, त्यामुळे भगवान शेषांचा चरण ठेवण्याचा चौरंग भिजून गेला. प्रेमाचा उद्रेक झाल्यामुळे त्याच्या तोंडून एकही अक्षर बाहेर पडू शकले नाही. पुष्कळ वेळपर्यंत तो भगवान शेषांची मुळीच स्तुती करू शकला नाही. थोडया वेळानंतर त्याला बोलण्याची थोडीशी शक्ती आली. विवेकबुद्धीने त्याने मन एकाग्र केले आणि सर्व इंद्रियांच्या बाह्यवृत्ती रोखून धरल्या. नंतर ज्यांच्या स्वरूपाचे पांचरात्र इत्यादी भक्तिशास्त्रांत वर्णन केले आहे, त्या जगद्गुरूंची त्याने स्तुती सुरू केली. (२६-३३) चित्रकेतू म्हणाला - हे भगवन ! आपण अजिंक्य आहात. तरी जितेंद्रिय आणि समदर्शी साधूंनी आपल्याला जिंकले आहे. आपणसुद्धा आपल्या गुणांनी त्यांना जिंकले आहे. जे निष्कामभावाने आपले भजन करतात, त्यांना आपण अत्यंत दयाळूपणाने स्वतःलाही देऊन टाकता. भगवन ! जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आपले लीलाविलास आहेत. विश्वनिर्माता ब्रह्मदेव इत्यादी आपल्या अंशाचेही अंश आहेत. तरीसुद्धा ते स्वतःला तुमच्याहून वेगळे समजून उगीचच एकमेकांशी स्पर्धा करतात. अतिशय लहान परमाणूपासून ते सर्वांत मोठया महत्तत्त्वापर्यंत सर्व वस्तूंच्या सुरूवातीला, शेवटी आणि मध्ये आपणच असता. तरीही आपण आदी, मध्य, आणि अंतरहित आहात. कारण कोणत्याही पदार्थाच्या सुरूवातीस आणि शेवटी जी वस्तू असते तीच मध्येसुद्धा असते. पृथ्वी इत्यादी एकापेक्षा एक दहापट सात आवरणांनी घेरलेला हा जो ब्रह्मांडकोष आहे, तो आपल्याप्रमाणेच दुसर्या कोटयवधी ब्रह्मांडांसह आपल्यामध्ये एका परमाणूप्रमाणे फिरत राहतो आणि असे असूनसुद्धा त्याला आपला अंत लागत नाही. म्हणून आपण अनंत आहात. जे नरपशू केवळ विषयभोगच इच्छितात, ते आपले भजन न करता आपल्या विभूतिस्वरूप इंद्रादी देवतांची उपासना करतात. हे प्रभो ! जसा राजकुलाचा नाश झाल्यानंतर त्याच्या अनुयायांची उपजीविकाही नाहीशी होते, त्याचप्रमाणे क्षुद्र उपास्य देवतांचा नाश झाल्यावर त्यांनी दिलेले भोगही नष्ट होतात. हे परमात्मन ! ज्ञानस्वरूप आणि निर्गुण अशा आपल्या ठिकाणी केलेली सकाम भावनासुद्धा इतर कर्मांप्रमाणे जन्ममृत्यूरूप फळ देणारी असत नाही. जसे भाजलेल्या बीजांना अंकुर येत नाहीत. कारण जीवांना जी सुख-दुःखादी द्वंद्वे उत्पन्न होतात, ती निर्गुणापासून नव्हे; तर सत्त्वादी गुणांपासूनच होतात. हे अजित, ज्यावेळी आपण विशुद्ध भागवतधर्माचा उपदेश केला होता, त्याचवेळी आपण सर्वांना जिंकून घेतले. कारण स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचा संग्रह न ठेवणारे आत्माराम सनकादी ऋषीसुद्धा मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्याच भागवतधर्माचा आश्रय घेतात. भागवतधर्मामध्ये ‘मी-तू’ किंवा ‘माझे-तुझे’ अशी विषम बुद्धी नसते. याउलट ज्या धर्मात भेदबुद्धी असते, तो धर्म, अशुद्ध, नाशवान, आणि अधर्मप्राय असतो. आपले आणि दुसर्याचे सुद्धा अहित करणार्या सकाम धर्माने आपले किंवा दुसर्याचे काय हित साधणार आहे ? जेव्हा या धर्माचे अनुष्ठान करणार्याला स्वतःला पीडा होते, तेव्हा आपल्याला राग येतो आणि जेव्हा दुसर्याला त्रास होतो तेव्हा तो अधर्म होतो. आपण ज्या दृष्टीने भागवतधर्माचे निरूपण केले आहे, ती कधी परमार्थापासून विचलित होत नाही. म्हणून जे संत पुरुष चराचर सर्व प्राण्यांमध्ये समदृष्टी ठेवतात, तेच त्या धर्माचे सेवन करतात. भगवन आपल्या केवळ दर्शनानेच माणसांची पापे क्षीण होऊन जातात, ही काही अशक्य गोष्ट नाही. कारण आपले नाव एकवेळा ऐकल्यानेही नीच चांडाळसुद्धा संसारातून मुक्त होतो. भगवन ! यावेळी आपल्या केवळ दर्शनानेच माझ्या अंतःकरणातील सर्व मळ धुतला गेला आहे, ते योग्यच आहे. कारण आपले भक्त असणार्या देवर्षी नारदांनी जे काही सांगितले, ते खोटे कसे होऊ शकेल ? हे अनंता, आपण संपूर्ण जगाचे आत्मा आहात. म्हणून जगात प्राणी जे काही करतात, ते आपण सर्व जाणत असताच. म्हणून ज्याप्रमाणे काजवा सूर्याला प्रकाशित करू शकत नाही, त्याचप्रमाणे परमगुरू अशा आपल्याला मी काय निवेदन करावे ? भगवन ! आपल्याच आधिपत्याखाली सार्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो. कुयोगी भेददृष्टीमुळे आपले खरे स्वरूप जाणत नाहीत. अत्यंत शुद्ध स्वरूप अशा आपणास मी नमस्कार करतो. ज्यांची शक्ती प्राप्त करूनच कर्मेंद्रिये कर्म करण्यास समर्थ होतात, तसेच ज्यांच्या दृष्टीने युक्त होऊनच ज्ञानेंद्रिये आपापले विषय ग्रहण करण्यास समर्थ होतात, ज्यांच्या मस्तकावर हे भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे वाटते, त्या सहस्रशीर्ष भगवंतांना मी नमस्कार करतो. (३४-४८) श्रीशुक म्हणतात - हे कुरुश्रेष्ठा, विद्याधरांचा अधिपती चित्रकेतूने जेव्हा भगवान अनंतांची अशी स्तुती केली, तेव्हा ते प्रसन्न होऊन त्याला म्हणाले. (४९) श्रीभगवान म्हणाले - हे राजा, नारद आणि अंगिरा यांनी तुला माझ्यासंबंधी ज्या विद्येचा उपदेश केला, त्यामुळे आणि माझ्या दर्शनाने तू चांगल्या रीतीने सिद्ध झाला आहेस. मीच सर्व प्राण्यांच्या रूपात आहे, मीच त्यांचा आत्मा आहे, आणि मीच पालनकर्तासुद्धा आहे. शब्दब्रह्म वेद आणि परब्रह्म ही दोन्ही माझीच सनातन रूपे आहेत. कार्यकारणात्मक जगामध्ये आत्मा व्यापून आहे. आणि कार्यकारणात्मक जग आत्म्यामध्ये स्थित आहे. तसेच या दोन्हींमध्ये मी अधिष्ठानरूपाने व्याप्त आहे आणि माझ्यामध्येच या दोहोंची कल्पना केलेली आहे. ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात सारे विश्व स्वतःमध्येच पाहतो, तसेच स्वप्नातच जागा होऊन आपण अंथरुणावर असल्याचेही जाणतो. त्याचप्रमाणे जीवाच्या जागृती इत्यादी अवस्था परमेश्वराचीच माया होत, हे जाणून, सर्वांचा साक्षी असणार्या मायातीत परमात्म्याचेच स्मरण केले पाहिजे. झोपलेला पुरुष ज्याच्या सहाय्याने आपली झोप आणि त्यातील अतींद्रिय सुखाचा अनुभव घेतो, ते ब्रह्म मीच आहे. त्याला तू आपला आत्मा समज. मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा अनुभव घेणारा आहे. तो त्या अवस्थांत राहूनही वास्तविक त्यांच्यापासून वेगळा आहे. सर्व अवस्थांमध्ये अखंड असणारे ज्ञानच ब्रह्म आहे व तेच परब्रह्म आहे. जेव्हा जीव माझ्या स्वरूपाला विसरतो, तेव्हा तो स्वतःला वेगळा समजतो. त्यामुळेच या संसारचक्रात सापडतो आणि जन्मानंतर जन्म व मृत्यूनंतर मृत्यू त्याला प्राप्त होतात. ही मनुष्ययोनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा मूळ प्रवाह आहे. ही मिळाल्यानंतरही जो आपले आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला जाणून घेत नाही, त्याला कोणत्याही योनीत शांती मिळू शकत नाही.(५०-५८) राजा, कर्म करण्यामध्ये दुःख आहे आणि त्यापासून मिळणारे फळही दुःखदायी आहे. परंतु कर्मांपासून निवृत्त होण्यात निर्भयपणा आहे. असा विचार करून बुद्धिमान पुरुषाने कोणत्याही कर्मांचा किंवा त्यांच्या फळांचा संकल्प करू नये. सर्व स्त्री-पुरुष सुख मिळावे आणि दुःखापासून सुटका व्हावी यासाठी कर्म करतात. परंतु त्या कर्मांमुळे त्यांचे दुःख दूर होत नाही की त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही. ज्ञानाचा अभिमान बाळगणार्या माणसांनी कर्माचे व त्यांच्या फळाचे हे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. त्याचबरोबर आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्था आणि त्यांचा अभिमानी, यापेक्षा तो विलक्षण आहे, हेही जाणले पाहिजे. हे जाणून माणसाने ऐहिक व पारलौकिक विषयभोगांपासून विवेकबुद्धीने अलिप्त राहावे आणि ज्ञान व विज्ञानातच संतुष्ट राहून माझा भक्त व्हावे. योगमार्गाचे तत्त्व समजणार्या माणसांनी आपला सर्वात मोठा स्वार्थ हा मानला पाहिजे की ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचा अनुभव घेणे. हे राजा, माझा हा उपदेश जर तू लक्षपूर्वक आणि श्रद्धेने धारण करशील, तर ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन लवकरच सिद्ध होशील. (५९-६४) श्रीशुकदेव म्हणतात- त्यानंतर जगद्गुरु विश्वात्मा भगवान श्रीहरी चित्रकेतूला असे आश्वासन देऊन त्याच्यासमोरच अंतर्धान पावले.(६५) स्कंध सहावा - अध्याय सोळावा समाप्त |