|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १५ वा
चित्रकेतूला अंगिरा आणि नारदांचा उपदेश - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणाले - राजा शोकग्रस्त होऊन आपल्या मेलेल्या पुत्राजवळ मेल्यासारखा पडून होता.त्याला महर्षी अंगिरा आणि नारद शास्त्रोक्त वचनांनी समजावू लागले. ते म्हणाले, राजेंद्रा, ज्याच्यासाठी तू इतका शोक करीत आहेस, तो बालक या आणि या अगोदरच्या जन्मात तुझा कोण होता ? तसेच तू त्याचा कोण होतास ? आणि पुढच्या जन्मीसुद्धा तुझा त्याच्याशी काय संबंध असेल ? जसे पाण्याच्या वेगाने वाळूचे कण एकमेकांशी जोडले जातात आणि वेगवेगळे होतात. त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात प्राणीसुद्धा एकमेकांशी जोडले जातात आणि वेगळे होतात. जसे काही बीजांपासून दुसरी बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, त्याचप्रमाणे भगवंतांच्या मायेने प्रेरित होऊन प्राण्यांपासून अन्य प्राणी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. राजा, आम्ही, तू आणि आमच्याबरोबर या जगात जितके चराचर प्राणी आज आहेत, ते सर्वजण आपल्या जन्मापूर्वी नव्हते आणि मृत्यूनंतर राहणार नाहीत. यावरून असे सिद्ध होते की, सध्यासुद्धा त्यांचा व आपला काही संबंध नाही. सर्व प्राण्यांचे अधिपती, जन्म-मृत्यूरहित भगवान निरपेक्ष असूनही जशी मुले खेळणी तयार करतात आणि मोडून टाकतात, तशी आपण उत्पन्न केलेल्या व आपल्या अधीन असलेल्या प्राण्यांची निर्मिती करतात आणि त्यांच्याकडून अन्य प्राण्यांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. राजा, जसे एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न होते, त्याचप्रमाणे माता-पित्यांच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो. घटादी कार्यांमध्ये माती जशी नित्य, तसा देहांत राहणारा आत्मा नित्य असतो. जसे एकाच मातीरूप वस्तूमध्ये घटत्व इत्यादी जाती आणि घट इत्यादी व्यक्ती, हा भेद काल्पनिक आहे, त्याचप्रमाणे आत्मवस्तूमध्ये देही आणि देह याप्रकारचा भेदसुद्धा अनादी अविद्येने कल्पिलेला आहे. (१-८) श्रीशुकदेव म्हणतात - राजा, जेव्हा महर्षींनी अशा प्रकारे राजा चित्रकेतूची समजूत घातली, तेव्हा शोकाने म्लान झालेले मुख हाताने पुसून तो त्यांना म्हणाला. (९) राजा म्हणाला - आपण दोघेही ज्ञानी आणि श्रेष्ठांपेक्षाही श्रेष्ठ असे स्वतःला अवधूत वेषांत लपवून येथे आलेले कोण आहात ? भगवंतांचे ब्रह्मवेत्ते भक्त माझ्यासारख्या विषयासक्त प्राण्यांना उपदेश करण्यासाठी अवधूतासारखा वेष करून पृथ्वीवर स्वचछंदपणे फिरत असतात. सनत्कुमार, नारद, ऋभू, अंगिरा, देवल, असित, अपांतरतम, व्यास, मार्कंडेय, गौतम, वसिष्ठ, भगवान परशुराम, कपिल, शुक, दुर्वास, याज्ञवल्क्य, जातूकर्ण्य, आरुणि, रोमश, च्यवन, दत्तात्रेय, आसुरी, पतंजली, वेदशिरा, बोध्यमुनि, पंचशिरा, हिरण्यनाभ, कौसल्य, श्रुतदेव, ऋतध्वज हे तसेच दुसरे सिद्धेश्वर ज्ञानदान करण्यासाठी पृथ्वीवर विहार करीत असतात. हे स्वामींनो ! मी विषयभोगात आसक्त असा मूर्ख असून अज्ञानाच्या घोर अंधकारात बुडून जाऊ लागलो आहे. आपण मला ज्ञानाच्या प्रकाशात आणावे. (१०-१६) अंगिरा म्हणाले - राजा, मी अंगिरा. ज्यावेळी तू पुत्रासाठी आसुसलेला होतास, तेव्हा मीच तुला पुत्र दिला होता. आणि हे ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद होत. तू पुत्रशोकामुळे अत्यंत घोर अशा अज्ञानांधकारामध्ये बुडून जात आहेस असे पाहिले, तेव्हा विचार केला की, तू भगवंतांचा भक्त आहेस. म्हणून तुला शोक होणे योग्य नाही. हे राजा, तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच आम्ही दोघे येथे आलो आहोत. कारण जो भगवंत आणि ब्राह्मणांचा भक्त असतो, त्याला शोक होणे योग्य नाही. (१७-१९) ज्यावेळी मी प्रथम तुझ्या घरी आलो होतो, त्यावेळी मी तुला परम ज्ञानाचा उपदेश दिला असता, परंतु तुझ्या मनामध्ये पुत्राची उत्कट इच्छा होती, म्हणून मी पुत्रच दिला. आता तुला स्वतःलाच पुत्र असणार्यांना किती दुःख होत असते, याचा अनुभव आला आहे. हीच गोष्ट स्त्री, धन, घर, विविध प्रकारचे ऐश्वर्य, संपत्ती, शब्दादी विषय, राज्यवैभव, पृथ्वी, राज्य, सेना, खजिना, सेवक, अमात्य, सगे-सोयरे, इष्ट-मित्र सर्वांना लागू आहे; कारण हे सर्वच्या सर्व अनित्य आहे. शूरसेना, म्हणून हे सर्व पदार्थ शोक, मोह, भय आणि दुःखाला कारण आहेत, मनाचे खेळ आहेत. कारण हे प्रत्यक्ष नसतानाही दिसतात. हे गंधर्वनगर, स्वप्न, जादू आणि मनोरथांप्रमाणे सर्वथैव असत्य आहेत. जे लोक कर्मवासनांनी प्रेरित होऊन विषयांचे चिंतन करीत राहातात, त्यांचे मन हे पदार्थ निर्माण करतात. पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांचा समूह असलेला जीवात्म्याचा हा देह, जीवाला विविध प्रकारचे क्लेश आणि संताप देणारा म्हटला जातो. म्हणून तू मनाने आपल्या खर्या स्वरूपाचा विचार करून या द्वैताविषयी नित्यत्वाचा विश्वास सोडून परम शांतीत राहा. (२०-२६) नारद म्हणाले - हे मंत्रोपनिषद तू माझ्यापासून एकाग्र चित्ताने ग्रहण कर. हे धारण केल्याने सात रात्रींमध्येच तुला भगवान संकर्षणांचे दर्शन होईल. नरेंद्रा, प्राचीन काळी भगवान शंकर इत्यादींनी श्रीसंकर्षण देवांच्याच चरणकमलांचा आश्रय घेतला होता. त्यामुळेच त्यांचा द्वैतभ्रम दूर झाला आणि ज्यापेक्षा अधिक काही नाही किंवा ज्याच्या समानही नाही, अशा महिम्याला ते तात्काळ प्राप्त झाले. तूसुद्धा लवकरच भगवंतांचे ते परमपद प्राप्त करून घेशील. (२७-२८) स्कंध सहावा - अध्याय पंधरावा समाप्त |