|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १४ वा
वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षित म्हणाला - ब्रह्मन, वृत्रासुराचा स्वभाव रजोगुणी, तमोगुणी होता. तो पापीच होता. असे असता भगवान नारायणांच्या चरणी त्याची बुद्धी निश्चल कशी झाली ? शुद्ध सत्त्वमय देव आणि पवित्रहृदय ऋषी यांचीसुद्धा भगवंतांच्या चरणी भक्ती क्वचितच उत्पन्न झालेली दिसते. भगवन, या जगात पृथ्वीवरील धूलिकणांइतके असंख्य प्राणी आहेत. त्यांपैकी काही मनुष्यादी श्रेष्ठ जीवच आपल्या कल्याणाचा प्रयत्न करतात. हे ब्रह्मन, त्यातूनही मुक्ती इच्छिणारे विरळाच असतात आणि अशा हजारो मोक्ष इच्छिणार्यांत एखाद्यालाच मुक्ती किंवा सिद्धी प्राप्त होते. हे महामुने, अशा कोटयवधी सिद्ध किंवा मुक्त पुरुषांमध्ये सुद्धा जो भगवंतांचाच अनन्यभक्त आहे, असा शांतचित्त महापुरुष सापडणे तर अत्यंत दुर्मिळ आहे. (१-५) तर मग सर्वांना सतावणारा असल्याने जो मोठा पापी होता, त्या वृत्रासुराची भयंकर युद्धाच्या वेळीही भगवान श्रीकृष्णांमध्ये इतकी दृढ भक्ती कशी उत्पन्न झाली ? हे प्रभो, याविषयी आम्हांला अतिशय संदेह असून त्याचे उत्तर ऐकण्याविषयी मोठेच कुतूहल आहे. त्या वृत्रासुराने तर रणभूमीवर इंद्रालासुद्धा संतुष्ट केले होते. (६-७) सूत म्हणतात - श्रद्धाळू परीक्षिताचा हा प्रश्न ऐकून भगवान शुकदेवांनी त्याचे अभिनंदन करीत म्हटले. (८) श्रीशुकदेव म्हणाले - राजा ! व्यास, नारद आणि देवल यांच्या तोंडून मी ऐकलेला हा इतिहास लक्षपूर्वक तू ऐक. हे राजा, शूरसेन देशात चक्रवर्ती चित्रकेतू नावाचा प्रसिद्ध राजा होता. त्याच्या राज्यात पृथ्वी सर्व कामना पूर्ण करीत असे. त्याला एक कोटी राण्या होत्या आणि तो राजाही स्वतः संतानोत्पत्तीला समर्थ होता. परंतु त्याला संतती झाली नाही. चित्रकेतूला कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. सौंदर्य, औदार्य, तारुण्य, कुलीनता, विद्या, ऐश्वर्य, संपत्ती इत्यादी सर्व गुणांनी तो संपन्न होता. तरीसुद्धा संतती नसल्यामुळे त्याला काळजी लागून राहिली होती. त्या सार्वभौम राजाला सर्व सुंदर राण्या, सर्व पृथ्वी, सर्व प्रकारची संपत्ती सुखी करू शकत नव्हती. एके दिवशी भगवान अंगिरा ऋषी स्वच्छंदपणे निरनिराळ्या लोकांत हिंडत असता राजा चित्रकेतूच्या राजवाडयात येऊन पोहोचले. राजाने सामोरे जाऊन अर्घ्य इत्यादींनी त्यांची विधिपूर्वक पूजा केली. आदरातिथ्य झाल्यानंतर जेव्हा ऋषी समाधानाने आसनावर बसले, तेव्हा राजा चित्रकेतूसुद्धा शांतपणे त्यांच्याजवळच बसला. महाराज, राजा अत्यंत नम्रपणे जमिनीवर बसलेला पाहून त्याच्या त्या वागण्याचा आदर करीत ते चित्रकेतूला म्हणाले. (९-१६) अंगिरा ऋषी म्हणाले - राजा, तू तुझ्या गुरू, मंत्री, राष्ट्र, दुर्ग, कोष, सेना आणि मित्र या अंगांसह खुशाल आहेस ना ? जसा जीव महत्तत्त्वादी सात आवरणांमुळे सुरक्षित असतो, त्याचप्रमाणे राजासुद्धा या सात अंगांमुळे सुरक्षित असतो. नरेंद्रा, ज्याप्रमाणे अंगे अनुकूल असल्यावरच राजा राज्यसुख उपभोगू शकतो, त्याचप्रमाणे प्रजासुद्धा आपल्या संरक्षणाचा भार राजावर सोपवून सुखाचा लाभ घेते.(१७-१८) राजा ! राण्या, प्रजा, मंत्री, सेवक, व्यापारी, अमात्य, नागरिक, ग्रामवासी, मांडलिक राजे आणि पुत्र तुला वश आहेत ना ? ज्याचे मन आपल्या ताब्यात असते, त्याला सर्वजण वश होतात. एवढेच काय, सर्व लोक आणि लोकपालसुद्धा आळस न करता त्याला भेटी देऊन प्रसन्न करतात. परंतु मला असे दिसते की, तू स्वतः संतुष्ट नाहीस. तुझी एखादी कामना अपूर्ण आहे. तुझ्या तोंडावर काळजी असल्याचे जाणवते. तुझ्या या असंतोषाचे कारण दुसरा कोणी आहे की तू स्वतःच आहेस ? (१९-२१) परीक्षिता, राजाला कोणती चिंता आहे, हे माहीत असूनही ऋषींनी त्याला प्रश्न विचारले. चित्रकेतूला संतानाची इच्छा होती. म्हणून महर्षींनी विचारल्यावरून त्याने विनयाने मान लववून निवेदन केले. (२२) चित्रकेतू म्हणाला - भगवन, तपश्चर्या, ज्ञान, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्यामुळे ज्या योग्यांची पापे नष्ट झालेली आहेत, त्यांना प्राण्यांच्या मनातील किंवा बाहेरील कोणती गोष्ट माहीत नसते ? हे ब्रह्मन, आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण मला विचारीत आहात, म्हणून मी आपल्या आज्ञेवरून माझी चिंता आपल्याला निवेदन करीत आहे. लोकपालांनीसुद्धा इच्छा करावी असे पृथ्वीचे साम्राज्य, ऐश्वर्य आणि संपत्तीसुद्धा मला संतान नसल्यामुळे आनंद देत नाहीत. जसे तहान-भूक लागलेल्यांना अन्न-पाण्याखेरीज इतर भोग आनंद देत नाहीत. म्हणून हे महाभाग, पूर्वजांसह दुःखी असणार्या मला नरकापासून वाचवा. तसेच संततीमुळे मी दुस्तर नरक तरून जाईन, असे करा. (२३-२६) श्रीशुकदेव म्हणतात - चित्रकेतूने अशी प्रार्थना केली, तेव्हा सर्वसमर्थ अशा कृपाळू ब्रह्मपुत्र अंगिरांनी त्वष्टा देवता असलेला चरू शिजवून त्याने त्वष्टा देवतेला उद्देशून हवन केले. परीक्षिता, राजा चित्रकेतूच्या राण्यांमध्ये सर्वांत ज्येष्ठ आणि सद्गुणसंपन्न महाराणी कृतद्युती होती. महर्षी अंगिरांनी तिला यज्ञाचा प्रसाद दिला. आणि राजा चित्रकेतूला ते म्हणाले, "राजन, तुला एक पुत्र होईल. तो तुला आनंद आणि शोक दोन्हीही देईल." असे म्हणून अंगिरा ऋषी निघून गेले. जसे कृत्तिकेने आपल्या गर्भामध्ये अग्निकुमाराला धारण केले, तसेच तो प्रसाद खाल्ल्यानंतर महाराणी कृतद्युतीने चित्रकेतूपासून गर्भ धारण केला. राजन, शूरसेन देशाचा राजा चित्रकेतूच्या तेजामुळे कृतद्युतीचा गर्भ शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस क्रमाक्रमाने वाढू लागला. (२७-३१) त्यानंतर योग्य वेळी एका पुत्राचा जन्म झाला. त्याच्या जन्माची वार्ता ऐकून शूरसेन देशातील प्रजा अतिशय आनंदित झाली. आनंदित झालेल्या राजाने स्नान करून पवित्र होऊन वस्त्रालंकार धारण केले. नंतर ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करवून घेऊन आणि आशीर्वाद घेऊन पुत्राचा जातकर्म संस्कार केला. त्याने त्या ब्राह्मणांना सोने, चांदी, वस्त्र, अलंकार, गावे, घोडे, हत्ती, आणि साठ कोटी गाई दान केल्या. जसे मेघ सर्व जीवांचे मनोरथ पूर्ण करतात, त्याचप्रमाणे उदार राजाने पुत्राच्या धन, यश, आणि आयुष्याच्या वृद्धीसाठी इतर लोकांनाही त्यांनी मागितल्या त्या वस्तू दिल्या. जसे कंगाल माणसाला अत्यंत श्रमाने काही धन मिळाले तर त्याच्या विषयी विशेष प्रेम वाटते, तसे मोठया कष्टाने प्राप्त झालेल्या त्या पुत्राविषयी चित्रकेतूला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रेम वाटू लागले. माता कृतद्युतीलासुद्धा आपल्या पुत्राविषयी मोहामुळे अत्यंत स्नेह वाटत होता. परंतु तिच्या सवतींच्या मनात पुत्रकामनेमुळे अधिकच मत्सर निर्माण झाला. दररोज बाळाचे लाड करणार्या चित्रकेतूचे बाळाची आई कृतद्युतीवर जितके प्रेम होते, तितके दुसर्या राण्यांवर राहिले नाही. त्या राण्या एक तर संतान नसल्यामुळे दुःखी होत्या. शिवाय राजा चित्रकेतूने त्यांची उपेक्षा केली. म्हणून त्या व्यथेने स्वतःचा धिक्कार करीत त्या मत्सराने मनातल्या मनात जळू लागल्या. (३२-३९) त्या आपापसात म्हणू लागल्या,- "पुत्रहीन पापी स्त्रीचा धिक्कार असो. पुत्र असणार्या तिच्या सवती निपुत्रिक स्त्रीचा दासीसारखा तिरस्कार करतात. एवढेच काय, स्वतः पतीसुद्धा तिचा पत्नी म्हणून मान राखीत नाही. आपल्या स्वामीची सेवा करून नेहमी सन्मान मिळविणार्या दासींना काय दुःख आहे ? परंतु आम्ही अभागिनी त्यांच्यापेक्षाही हलक्या प्रतीच्या होऊ लागलो आहोत. अशा रीतीने आपल्या सवतीला पुत्र झालेला पाहून त्या राण्या जळत होत्या आणि राजासुद्धा त्यांच्या बाबतीत उदासीन झाला होता. म्हणून त्यांच्या मनात कृतद्युतीबद्दल अत्यंत द्वेष निर्माण झाला. द्वेषामुळे सद्बुद्धी नाहीशी झालेल्या त्यांच्या अंतःकरणात क्रूरता निर्माण झाली. त्यांना पतीचा पुत्रस्नेह सहन झाला नाही. म्हणून त्यांनी चिडून त्या राजकुमाराला विष दिले. सवतींच्या या घोर कृत्याचा कृतद्युतीला काहीच पत्ता नव्हता. बाळ झोपलेला आहे, असे वाटून ती महालात नेहमीप्रमाणे वावरत राहिली. बाळ बराच वेळ झोपलेला आहे, असे पाहून राणी दाईला म्हणाली "बाई ग ! माझ्या लाडक्याला घेऊन ये." झोपी गेलेल्या बालकाजवळ जाऊन दाईने पाहिले, तर त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या उलटया झाल्या होत्या. प्राण, इंद्रिये आणि जीवात्मा हे त्याच्या शरीराला सोडून गेले होते. हे पाहाताच, "घात झाला," म्हणून ती जमिनीवर कोसळली. (४०-४६) दाई दोन्ही हातांनी छाती बडवीत किंचाळून मोठमोठयाने रडू लागली. तिचे रडणे ऐकून महाराणी लगेच मुलाजवळ येऊन पाहाते, तर तिला मुलगा अकस्मात मरण पावलेला दिसला. तेव्हा अत्यंत शोकामुळे ती मूर्च्छित होऊन जमिनीवर पडली. तिचे केस विसकटले आणि शरीरावरील वस्त्रे अस्ताव्यस्त झाली. तेव्हा महाराणीचे रडणे ऐकून अंतःपुरातील सर्व स्त्री-पुरुष तेथे येऊन सहानुभूतीने अत्यंत दुःखी होऊन रडू लागले. विष देणार्या राण्यासुद्धा तेथे येऊन रडण्याचे ढोंग करू लागल्या. (४७-४९) चित्रकेतूने पुत्राचा अकारणच मृत्यू झाल्याचे ऐकले, तेव्हा अत्यंत स्नेहामुळे वाढलेल्या शोकावेगाने त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तो हळू हळू मंत्री आणि ब्राह्मणांसह रस्त्यातून धडपडत मृत बालकाजवळ आला आणि मूर्च्छित होऊन त्याच्या पायापाशी पडला. तो सुस्कारे टाकू लागला. त्याचे केस आणि वस्त्रे इतस्ततः विखुरली. अश्रू आवरेनासे झाल्याने त्याचा गळा दाटून आला आणि तो काही बोलू शकला नाही. आपला पती अत्यंत शोकाकुल झालेला आणि एकुलता एक मुलगा मेलेला पाहून ती निरनिराळ्या तर्हेने विलाप करू लागली. त्यांचे हे दुःख पाहून मंत्री आणि लोक शोकाकुल झाले. महाराणीच्या डोळ्यांतून काजळमिश्रित अश्रू वाहात होते. ते तिचे केशर आणि चंदनचर्चित वक्षःस्थळ भिजवू लागले. तिचे केस विसकटलेले होते. त्यात माळलेली फुले खाली पडत होती. अशा प्रकारे ती टिटवीप्रमाणे गळा काढून निरनिराळ्या प्रकारे शोक करीत होती. (५०-५३) ती म्हणू लागली, हे विधात्या, तू खरोखरच अतिशय मूर्ख आहेस, की जो आपल्या सृष्टीला प्रतिकूल असे खेळ खेळतोस. वृद्ध लोक जिवंत राहातात आणि मुले मरतात, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तुझ्या स्वभावात खरोखरच अशी विसंगती असेल, तर मग तू जीवांचा कायमचा शत्रू आहेस. जगात प्राण्यांच्या जीवन-मरणाचा काही क्रम राहिला नाही तर ते आपल्या प्रारब्धानुसार जन्मतील आणि मरतील. तुझी सृष्टी वाढविण्यासाठी तू नातलगांमध्ये स्नेहबंधन निर्माण केले आहेस. परंतु अशा प्रकारे वागून तू आपणच केलेला नियम स्वतःच मोडीत आहेस. बाळा, तुझ्याविना मी अनाथ आणि दीन होऊन राहिले आहे. तू मला असा सोडून जाऊ नकोस. पहा तरी ! तुझे वडील तुझ्या वियोगाने किती शोकाकुल झाले आहेत ! तुझ्यामुळेच संतती नसलेल्यांना तरण्यास कठीण असा नरक आम्ही सहज पार करू. अरे, तू या निर्दय यमाबरोबर दूर जाऊ नकोस. (५४-५६) माझ्या लाडक्या राजकुमारा, ऊठ. तुझे बालमित्र तुला खेळायला बोलवीत आहेत. तुला झोपून पुष्कळ वेळ झाला. आता तुला भूक लागली असेल. काहीतरी खा. माझे दूध पी आणि आम्हा नातलगांचा शोक दूर कर. माझ्या लाडक्या, आज मला अभागिनीला तुझ्या मुखकमलावर ते भोळे-भाबडे हास्य आणि तुझे ते आनंदाने पाहाणे दिसत नाही. आज मला तुझे ते गोड बोबडे बोलणे ऐकू येत नाही. निष्ठुर यम तुला खरोखरीच त्या परलोकात घेऊन गेला आहे काय, जेथून कोणीच परत येत नाही ? (५७-५८) श्रीशुकदेव म्हणतात - आपली राणी आपल्या मृत पुत्रासाठी अशी निरनिराळ्या प्रकारे विलाप करीत आहे, हे पाहून चित्रकेतू शोकाने अत्यंत संतप्त होऊन ओक्साबोक्शी रडू लागला. राजा-राणीच्या अशा विलाप करण्याने बरोबरीचे स्त्री-पुरुष सुद्धा दुःखी होऊन रडू लागले. अशा प्रकारे सर्व नगरीच शोकाने निपचित झाली. चित्रकेतू पुत्रशोकाने बेशुद्ध झाला आहे. त्याची समजूत घालणाराही कोणी नाही, असे पाहून नारदांसह अंगिरा ऋषी तेथे आले. (५९-६१) स्कंध सहावा - अध्याय चवदावा समाप्त |