|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १३ वा
इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - दानशूर परीक्षिता, वृत्रासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लोक आणि लोकपाल त्याचक्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झाले. नंतर देव, ऋषी, पितर, भूत, दैत्य आणि देवांचे अनुयायी, आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर ब्रह्मदेव, शंकर आणि इंद्र इत्यादीसुद्धा निघून गेले. (१-२) राजाने विचारले - मुनिवर्य, इंद्राच्या विषण्णतेचे कारण मी ऐकू इच्छितो. वृत्रासुराचा वध झाल्याने सर्व देव सुखी झाले. मग इंद्राला दुःख होण्याचे कारण काय ? (३) श्रीशुकदेव म्हणाले - वृत्रासुराच्या पराक्रमाने जेव्हा सर्व देव आणि ऋषी भयभीत झाले होते, तेव्हा त्यांनी त्याच्या वधासाठी इंद्राला प्रार्थना केली. परंतु ब्रह्महत्येच्या भीतीने तो त्याला मारू इच्छित नव्हता. (४) इंद्र म्हणाला - विश्वरूपाच्या वधाने मला लागलेले ब्रह्महत्येचे पातक स्त्री, पृथ्वी, जल आणि वृक्षांनी माझ्यावर कृपा करून वाटून घेतले. आता वृत्रवधाच्या पातकापासून माझी सुटका कशी होणार ? (५) श्रीशुकदेव म्हणतात - ते ऐकून ऋषी इंद्राला म्हणाले, देवराजा, तुझे कल्याण असो. आम्ही तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ करवून घेऊ. तू भिऊ नकोस. अश्वमेध यज्ञाने सर्वांचे अंतर्यामी, सर्वशक्तिमान, परमात्मा नारायण देवांची आराधना केली असता जगाच्या वधाच्या पापापासूनही तू मुक्त होशील. देवराज, भगवंतांच्या नामसंकीर्तनानेच ब्राह्मण, पिता, गाय, माता, आचार्य इत्यादींची हत्या करणारा, महापापी, कुत्र्याचे मांस खाणारे चांडाळ आणि कसाई सुद्धा शुद्ध होऊन जातात. त्या अश्वमेध नावाच्या महायज्ञाचे आमच्याकडून श्रद्धापूर्वक अनुष्ठान करविले असता ब्रह्मदेवापर्यंत सर्व चराचर जगाच्या हत्येच्या पापानेसुद्धा तू लिप्त होणार नाहीस. मग या दुष्टाला दंड देण्याच्या पापापासून सुटण्याची काय कथा ! (६-९) श्रीशुकदेव म्हणतात - ब्राह्मणांनी असे सांगितल्यामुळे इंद्राने वृत्रासुराचा वध केला. आता तो मारला गेल्यानंतर ब्रह्महत्या इंद्राकडे गेली. त्यामुळे इंद्राला त्रास सहन करावा लागला. त्याला एक क्षणभरही चैन पडेनासे झाले. जेव्हा मर्यादाशील सज्जनाला कलंक लागतो, तेव्हा त्याचे गुणसुद्धा त्याला सुखी करू शकत नाहीत, हेच खरे. इंद्राने पाहिले की, ब्रह्महत्या प्रत्यक्ष चांडाळणीप्रमाणे त्याच्या मागे लागली आहे. वृद्धापकाळामुळे तिचे अंग कापू लागले आहे, क्षयरोगाने तिला ग्रासले आहे आणि तिची वस्त्रे रक्ताने माखली आहेत. पांढरे केस विसकटीत "थांब, थांब," असे ओरडत ती येऊ लागली आहे. तिच्या श्वासातून माशांचा दुर्गंध येत असल्यामुळे तो मार्गही दुर्गंधाने भरला आहे. राजन, तिच्या भीतीने इंद्र सर्व दिशांतून आणि आकाशातून फिरू लागला. शेवटी त्याने ईशान्य दिशेला असलेल्या मानससरोवरात तातडीने प्रवेश केला. मानससरोवरातील कमळाच्या तंतूमध्ये लपून एक हजार वर्षे राहून तो विचार करू लागला की, ब्रह्महत्येपासून आपली सुटका कशी होईल ? तो अग्नीच्या मुखातून भोजन करीत असल्यामुळे व आता पाण्यात राहात असल्यामुळे त्याला काही खायलाही मिळत नव्हते. (कारण अग्नीला पाण्यात जाता येत नव्हते.) तोपर्यंत राजा नहुष, विद्या, तपश्चर्या आणि योगबळाच्या प्रभावाने स्वर्गाचे राज्य करीत राहिला. परंतु संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मदाने जेव्हा त्याला इंद्रपत्नी शचीशी अनाचार करण्याची इच्छा झाली, तेव्हा शचीने त्याच्याकडून ऋषींचा अपमान करविला आणि त्यांच्या शापाने त्याला साप केले. त्यानंतर जेव्हा भगवंतांचे ध्यान करण्याने इंद्राचे पाप नाहीसे झाले, तेव्हा ब्राह्मणांच्या बोलावण्यावरून तो पुन्हा स्वर्गलोकी गेला. कमळात राहणारी लक्ष्मी इंद्राचे रक्षण करीत होती आणि ईशान्येचा अधिपती रुद्र याने त्याचे पाप निस्तेज केल्यामुळे ब्रह्मवधाचा इंद्रावरील प्रभाव नाहीसा झाला. (१०-१७) परीक्षिता, इंद्र स्वर्गात आल्यानंतर ब्रह्मर्षींनी तेथे येऊन भगवंतांच्या आराधनेसाठी इंद्राला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली. जेव्हा वेदवेत्त्या ऋषींनी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करविला आणि इंद्राने त्या यज्ञाने सर्वदेवस्वरूप भगवंतांची आराधना केली, तेव्हा तिच्या प्रभावाने वृत्रासुराच्या वधाचा तो अत्यंत मोठा पापाचा ढीग समूळ नाहीसा झाला. जसे सूर्योदयामुळे धुके नाहीसे होते. जेव्हा मरीची इत्यादी मुनीश्वरांनी त्याच्याकडून विधिपूर्वक अश्वमेध यज्ञ करविला, तेव्हा त्याद्वारा सनातन पुरुष यज्ञपती भगवंतांची आराधना करून इंद्र सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पहिल्याप्रमाणे पुन्हा श्रेष्ठ झाला. (१८-२१) परीक्षिता ! या श्रेष्ठ आख्यानात इंद्राचा विजय, त्याची पापापासून मुक्तता आणि भगवंतांचा प्रिय भक्त वृत्रासुर यांचे वर्णन आले आहे. यामध्ये भगवंतांच्या गुणांचे संकीर्तन आहे. ते सर्व पापांना धुऊन टाकणारे आणि भक्तिभाव वाढविणारे आहे. बुद्धिमान पुरुषांनी हे इंद्रांसंबंधीचे आख्यान नेहमी वाचावे आणि विशेषतः पर्वकाळी तर हे अवश्य ऐकावे. हे धन आणि यश वाढविते, सर्व पापांपासून मुक्त करते, शत्रूवर विजय मिळवून देते. तसेच आयुष्य आणि मंगल यांची अभिवृद्धी करते. (२२-२३) स्कंध सहावा - अध्याय तेरावा समाप्त |