श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय १२ वा

वृत्रासुराचा वध -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात - राजन, वृत्रासुर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता. कारण त्याला विजयाहून मृत्यू श्रेष्ठ वाटत होता. म्हणून प्रलय काळातील पाण्यात कैटभासुर भगवान विष्णूंवर जसा धावला होता, तसा हासुद्धा त्रिशूळ घेऊन इंद्रावर तुटून पडला. प्रलयकालीन अग्नीच्या ज्वाळांसारख्या तीक्ष्ण टोकांचा त्रिशूल फिरवून वीर वृत्रासुराने तो अत्यंत वेगाने इंद्रावर फेकला आणि अतिशय क्रोधाने गर्जना करून तो म्हणाला, "नीच इंद्रा, आता तू वाचणार नाहीस." तो भयंकर त्रिशूळ ग्रह आणि उल्कांप्रमाणे गोल फिरत आकाशातून आपल्याकडे येणार आहे, असे पाहूनही इंद्राने विचलित न होता त्रिशूळाबरोबरच वासुकी नागासारख्या असलेल्या वृत्रासुराचा विशाल बाहू, शंभर गाठी असलेल्या आपल्या वज्राने तोडून टाकला. एक हात तुटल्याचे पाहून वृत्रासुराला अत्यंत राग आला. वज्रधारी इंद्राजवळ जाऊन त्याने त्याच्या हनुवटीवर आणि ऐरावतावर परिघाने असा आघात केला की इंद्राच्या हातातून ते वज्र खाली पडले. (१-४)

वृत्रासुराचा हा अत्यंत अलौकिक पराक्रम पाहून देव, असुर, चारण, सिद्धगण इत्यादी सर्वजण त्याची प्रशंसा करू लागले. परंतु इंद्रावर आलेले संकट पाहून तेच लोक वारंवार "हाय ! हाय !" करून मोठयाने आक्रोश करू लागले. ते वज्र इंद्राच्या हातातून सुटून वृत्रासुराजवळच जाऊन पडले होते. म्हणून लज्जित होऊन इंद्राने ते पुन्हा उचलून घेतले नाही. तेव्हा वृत्रासुर म्हणाला, "इंद्रा, तू वज्र घेऊन तुझ्या शत्रूला मारून टाक. ही खेद करण्याची वेळ नाही." सर्वज्ञ, सनातन, आदिपुरुष, भगवानच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्यास समर्थ आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त इतर देहाभिमानी आणि युद्ध करू इच्छिणार्‍या अविचारी लोकांना नेहमीच विजय मिळतो असे नाही. हे सर्व लोक आणि लोकपाल जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे ज्याच्या अधीन होऊन ही कृत्ये करतात, तो काळच सर्वांच्या जय-पराजयाचे कारण आहे. तो काळच मनुष्याचे मनोबल, इंद्रियबल, शरीरबल, प्राण, जीवन आणि मृत्यूच्या रूपात असतो. ते न कळल्यामुळे मनुष्य जड शरीरालाच सर्वाचे कारण समजतो. इंद्रा, जशी लाकडाची बाहुली आणि यंत्राचे हरिण नाचविणार्‍याच्या हातात असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणी भगवंतांच्या अधीन असतात, असे समज. भगवंतांच्या कृपेशिवाय पुरुष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरणचतुष्टय हे कोणीही या विश्वाची उत्पत्ती इत्यादी करण्यास समर्थ होऊ शकत नाहीत. भगवंतच सर्वांचे नियंत्रण करतात. हे ज्यांना माहित नाही, तेच या परतंत्र जीवाला स्वतंत्र कर्ता-भोक्ता मानतात. वास्तविक स्वतः भगवंतच प्राण्यांच्याकडून प्राण्यांची निर्मिती आणि संहार करतात. जसे इच्छा नसतानासुद्धा काल प्रतिकूल असताना मनुष्याला अपकीर्ती इत्यादी प्राप्त होतात, त्याचप्रमाणे काल अनुकूल असताना इच्छा नसतानासुद्धा त्याला आयुष्य, लक्ष्मी, यश, ऐश्वर्य इत्यादी भोग मिळतात. म्हणून यश-अपयश, जय-पराजय, सुख-दुःख, जीवन-मरण यांपैकी कशाचीही इच्छा-अनिच्छा न ठेवता सर्व परिस्थितीत समभावाने राहावे. सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचे आहेत. आत्म्याचे नाहीत. म्हणून जो मनुष्य आत्मा हा केवळ त्याचा साक्षी आहे, हे जाणतो, त्याला त्या गुणांचे बंधन नसते. हे इंद्रा, तू माझा हात आणि शस्त्र तोडून मला दुर्बळ केले आहेस. तरीसुद्धा मी तुझे प्राण घेण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत आहेच. हे युद्ध हा एक जुगारच अहे. यामध्ये प्राणांची बाजी लागते. बाणांचे फासे टाकले जातात आणि वाहने हा पट आहे. यामध्ये कोणाचा विजय होईल आणि कोण हरेल हे कळत नाही. (५-१७)

श्रीशुकदेव म्हणतात - वृत्रासुराच्या या निष्कपट वचनाची इंद्राने प्रशंसा केली आणि वज्र उचलले. यानंतर निगर्वीपणाने हसत हसत तो त्याला म्हणाला. (१८)

इंद्र म्हणाला - हे दानवराजा, तू खरोखर सिद्धपुरुष आहेस, म्हणून तुला अशी बुद्धी झाली. तुझे धैर्य, निश्चय आणि भगवद्भाव अत्यंत विलक्षण आहे. तू सर्व प्राण्यांचे सुहृद, आत्मस्वरूप, जगदीश्वरांचा अनन्य भक्त आहेस. लोकांना मोहित करणार्‍या भगवंतांच्या मायेला तू निश्चितच पार केले आहेस. म्हणूनच तर तू तुझा आसुरी स्वभाव सोडून साधुपुरुष झाला आहेस. तू रजोगुणी प्रकृतीचा असूनही विशुद्ध सत्त्वस्वरूप भगवान वासुदेवांमध्ये तुझी बुद्धी स्थिर आहे, ही खरेच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्याची परम कल्याणप्रद भगवान श्रीहरींच्या ठिकाणी भक्ती असते, त्याला क्षुद्र भोगांची काय पर्वा ! जो अमृताच्या समुद्रात विहार करीत असतो, त्याला खडडयातील पाणी काय करायचे ? (१९-२२)

श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, अशा प्रकारे योद्धयांमधील श्रेष्ठ, महापराक्रमी इंद्र आणि वृत्रासुर धर्माचे तत्त्व जाणण्याच्या इच्छेने एकमेकांशी संवाद करीत युद्ध करू लागले. राजन, आता शत्रुसूदन वृत्रासुराने पोलादाने बनविलेला एक भयंकर परिघ डाव्या हातात घेऊन गरगर फिरवीत इंद्रावर फेकण्याचा विचार केला. परंतु इंद्राने वृत्रासुराचा तो परिघ व हत्तीच्या सोंडेप्रमाणे असलेला त्याचा लांब हात आपल्या शंभर पेरे असलेल्या वज्राने एकदमच तोडून टाकला. दोन्ही भुजा मुळापासून तुटल्याने वृत्रासुराच्या दोन्ही खांद्यांमधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. त्यावेळी असे वाटत होते की, जणू काही इंद्राच्या वज्राने पंख तुटलेला एखादा पर्वतच आकाशातून पडला आहे. पायी चालणार्‍य़ा पर्वताप्रमाणे अत्यंत प्रचंड शरीर असणार्‍या वृत्रासुराने, आपली हनुवटी जमिनीला आणि वरचा ओठ स्वर्गाला लावला आणि आकाशाप्रमाणे विशाल मुख, सापासारखी भयानक जीभ व मृत्यूसमान क्रूर दाढा यांनी तो जणू त्रैलोक्याला गिळीत, आपल्या पायाच्या टाचांनी पृथ्वीला रगडीत आणि अत्यंत वेगामुळे पर्वतांची उलथा-पालथ करीत इंद्राजवळ आला. त्याने ऐरावत हत्तीसह त्याला गिळून टाकले. जणू एखाद्या बलवान अजगराने हत्तीलाच गिळावे. तेव्हा प्रजापती, महर्षी यांच्यासह देवांनी जेव्हा वृत्रासुराने इंद्राला गिळलेले पाहिले, तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले आणि "अरेरे ! फार मोठा अनर्थ झाला !" असे म्हणत विलाप करू लागले. बल दैत्याचा संहार करणार्‍या देवराज इंद्राने नारायणकवच धारण केल्यामुळे आणि योगमायेचे बळही त्याच्याजवळ असल्यामुळे वृत्रासुराने गिळून टाकल्यानंतर त्याच्या पोटात जाऊनही तो मरण पावला नाही. त्याने आपल्या वज्राने त्याचे पोट फाडले आणि पोटातून बाहेर पडून अत्यंत वेगाने पर्वतशिखराप्रमाणे उंच असलेले त्याचे डोके उडविले. सूर्यादी ग्रहांना उत्तरायण-दक्षिणायनांत स्वतःची गती पूर्ण करण्यास जेवढा वेळ लागतो, तितके दिवस म्हणजे एक वर्षभर, वृत्रासुराच्या वधाचा योग येईपर्यंत फिरत राहात त्या तीव्र वेगवान वज्राने त्याची मान सर्व बाजूंनी कापून जमिनीवर टाकली. (२३-३३)

त्यावेळी आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. महर्षींच्या बरोबरीने गंधर्व, सिद्ध इत्यादी वृत्रासुराचा वध करणार्‍या इंद्राचा पराक्रम सूचित करणार्‍या मंत्रांनी त्याची स्तुती करून आनंदाने त्याच्यावर पुष्पवर्षाव करू लागले. ते शत्रुदमन परीक्षिता, त्यावेळी वृत्रासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडून इंद्रादी सर्वजण पाहात असतानाच सर्व लोकातीत भगवंतांच्या स्वरूपात विलीन झाली. (३४-३५)

स्कंध सहावा - अध्याय बारावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP