श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय ११ वा

वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत्प्राप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, असुरसेना भयभीत होऊन पळू लागली होती. त्याचे सैनिक इतके व्याकूळ झाले होते की, त्यांनी आपल्या स्वामींच्या धर्मानुकुल म्हणण्य़ाकडे सुद्धा लक्ष दिले नाही. वृत्रासुराने पाहिले की, काळाची अनुकूलता असल्यामुळे देव असुरांच्या सेनेला चोपीत आहेत आणि ती सेनापती नसल्यासारखी छिन्न-विच्छिन्न होऊ लागली आहे. राजन, हे पाहून वृत्रासुराला हे सहन न होऊन क्रोधामुळे त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. मोठया बळाने देवसेनेला रोखून धरून त्यांचा तिरस्कार करीत तो म्हणाला. क्षुद्र देवांनो, रणभूमीवरून पळणार्‍या असुरांवर पाठीमागून प्रहार करण्यात काय पुरुषार्थ ? हे तर आपल्या आईचा मळ आहेत. परंतु स्वतःला शूर समजणार्‍या तुमच्यासारख्यांनी भित्र्या लोकांना मारणे ही काही भूषणावह गोष्ट नाही. आणि यामुळे तुम्हांला स्वर्गही मिळणार नाही. जर तुमच्यामध्ये युद्ध करण्याची शक्ती आणि उत्साह असेल, तसेच जिवंत राहून विषयसुख भोगण्याची इच्छा नसेल, तर क्षणभर माझ्यासमोर उभे राहा. (१-५)

वृत्रासुर अतिशय बलाढय होता. तो आपल्या आकारानेच शत्रू असणार्‍या देवांना भयभीत करू लागला. त्याने क्रोधाने एवढा प्रचंड सिंहनाद केला की, तो ऐकूनच लोक बेशुद्ध झाले. वृत्रासुराच्या भयानक गर्जनेने सर्व देव मूर्च्छित होऊन जमिनीवर पडले. जणू काही त्यांच्यावर वीजच कोसळली. जसा मदोन्मत्त हत्ती देवनळांचे जंगल तुडवितो, त्याचप्रमाणे रणशूर वृत्रासुर हातात त्रिशूळ घेऊन भीतीने डोळे बंद करून पडलेल्या देवसेनेला लाथांनी तुडवू लागला. त्या धमाक्याने पृथ्वी डळमळू लागली. त्याचे हे कृत्य देवराज इंद्राला सहन झाले नाही. तो जेव्हा त्याच्यावर धावून आला, तेव्हा त्याने आपल्या शत्रूवर एक मोठी गदा फेकली. ती असह्य गदा येता येताच त्याने सहजपणे आपल्या डाव्या हाताने पकडली. राजन, क्रोधाने लालबुंद होऊन अत्यंत पराक्रमी वृत्रासुराने त्याच गदेने इंद्राचे वाहन असलेल्या हत्तीच्या डोक्यावर जोराने गर्जना करीत प्रहार केला. त्याच्या या पराक्रमाची सर्वजण अतिशय प्रशंसा करू लागले. वृत्रासुराच्या गदेच्या आघाताने ऐरावत हत्ती वज्राघात झालेल्या पर्वताप्रमाणे कोसळला. डोके फुटल्याने रक्त ओकत तो इंद्रासह अठठावीस हात मागे सरला. आपले वाहन ऐरावत मूर्च्छित होऊन पडल्याने इंद्र विषण्ण झाला. हे पाहून महात्म्या वृत्रासुराने त्याच्यावर गदा टाकली नाही. तोपर्यंत इंद्राने आपल्या अमृतस्रावी हाताच्या स्पर्शाने घायाळ झालेल्या ऐरावताची व्यथा नाहीशी केली आणि तो पुन्हा युद्धभूमीवर उभा राहिला. परीक्षिता, भाऊ विश्वरूपाचा वध करणारा शत्रू इंद्र युद्धासाठी हातात वज्र घेऊन पुन्हा समोर आला आहे, हे वृत्रासुराने पाहिले, तेव्हा त्याला इंद्राच्या त्या पापकर्माची आठवण झाली आणि शोक आणि मोह यांनी युक्त होऊन उपहासाने तो त्याला म्हणू लागला. (६-१३)

वृत्रासुर म्हणाला - ज्या विश्वरूपाच्या रूपाने ब्राह्मण, आपले गुरू आणि माझ्या भावाची हत्या केलेला तुझ्यासारखा शत्रू माझ्यासमोर उभा आहे. हे माझे सुदैवच ! अरे दुष्टा ! मी तुझ्या पाषाणासारख्या कठोर हृदयाला माझ्या शूळाने विदीर्ण करून आज माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईन. केवढी ही भाग्याची गोष्ट ! स्वर्गाची इच्छा करणारा निर्दय माणूस यज्ञामध्ये जसे पशूचे डोके उडवितो, त्याप्रमाणे ब्राह्मण, यज्ञदीक्षा घेतलेला, तुझा गुरू, आत्मवेत्ता आणि निष्पाप अशा माझ्या मोठया भावाची तू विश्वासघात करून तलवारीने तिन्ही डोकी उडविलीस. लज्जा, लक्ष्मी, दया आणि कीर्ती तुला सोडून गेली आहे. ज्यांची निंदा राक्षसांनीही करावी, अशी नीच कर्मे तू केली आहेस. माझ्या त्रिशूळाने आज तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जातील. मरताना तुला फार कष्ट होतील. तुला अग्नी स्पर्शही करणार नाही. तुला तर गिधाडे टोचून टोचून खातील. तुझ्यासारख्या नीच आणि क्रूर व्यक्तीला साथ देणारे हे अज्ञानी देव माझ्यावर शस्त्रांचा प्रहार करीत आहेत. मी माझ्या तीक्ष्ण त्रिशूलाने त्यांची मस्तके छाटून त्यांचा गणांसह भूतनाथांना बळी म्हणून अर्पण करीन. हे वीर इंद्रा, कदाचित, तू माझी सेना मारून आपल्या वज्राने माझे मस्तक उडवशील, तेव्हाही मी माझ्या शरीराचा बळी पशु-पक्ष्यांना समर्पित करून कर्मबंधनातून मुक्त होईन आणि महापुरुषांच्या चरणरजाचा आश्रय घेईन. हे देवराजा, मी तुझ्यासमोर तुझा शत्रू उभा आहे. आता तू माझ्यावर तुझे अमोघ वज्र का सोडीत नाहीस ? जशी कंजूष माणसाकडे केलेली याचना निष्फळ होते, तसे तुझ्या गदेसारखेच वज्र निष्फळ होईल, असा संशय तू मनातच आणू नकोस. इंद्रा, तुझे हे वज्र श्रीहरींचे तेज आणि दधीची ऋषींच्या तपश्चर्येने तेजस्वी झाले आहे. श्रीविष्णूंच्या आज्ञेप्रमाणे वज्राने तू मला मार. कारण जिकडे भगवान श्रीहरी आहेत, तिकडेच विजय, लक्ष्मी आणि सर्व गुणांचा निवास असतो. भगवान संकर्षणांच्या आज्ञेनुसार मी आपले मन त्यांच्या चरणकमलांशी लीन करीन. तुझ्या वज्राचा वेग मला नव्हे, तर माझा विषयभोगरूप फास तोडून टाकील आणि मी शरीराचा त्याग करून मुनिजनांच्या गतीला जाईन. जे पुरुष भगवंतांवर अनन्य प्रेम करतात, त्यांचे भक्त असतात, त्यांना ते स्वर्ग, पृथ्वी किंवा रसातळातील संपत्ती देत नाहीत. कारण त्यांतून द्वेष, उद्वेग, मानसिक पीडा, कलह, दुःख आणि परिश्रमच हाती लागतात. इंद्रा, आमचे स्वामी आपल्या भक्ताचे धर्म, अर्थ आणि कामासंबंधीचे सर्व प्रयत्न निष्फळ करतात आणि खरे म्हणाल तर त्यातूनच भगवंतांच्या कृपेचे अनुमान करता येते. कारण त्यांचा असा कृपाप्रसाद, जवळ स्वतःचे असे काही न बाळगणार्‍या भक्तांच्याच अनुभवाला येतो, याखेरीज इतरांना तो दुर्लभ आहे. (१४-२३)

हे प्रभो, आपण माझ्यावर अशी कृपा करा की, आपल्या चरणकमलांची अनन्यभावाने सेवा करणार्‍या आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधी मला पुढच्या जन्मातही प्राप्त होवो. हे प्राणवल्लभा, माझे मन आपल्या गुणांचे स्मरण करीत राहो, माझी वाणी त्यांचेच गायन करो आणि शरीर आपल्या सेवेतच लागून राहो. हे सर्वसौभाग्यनिधे, मी आपल्याला सोडून स्वर्ग, ब्रह्मलोक, भूमंडलाचे साम्राज्य, रसातळाचे एकछत्री राज्य, योगाच्या सिद्धी, एवढेच काय मोक्षाचीसुद्धा इच्छा करीत नाही. जशी पक्ष्याची पंख न फुटलेली पिल्ले आपल्या आईची वाट पाहात असतात, जशी भुकेलेली लहान मुले आपल्या आईचे दूध पिण्यासाठी आतुर असतात आणि जशी विरही पत्नी आपल्या प्रवासाला गेलेल्या पतीच्या भेटीसाठी उत्कंठित झालेली असते, त्याचप्रमाणे हे कमलनयना, माझे मन आपल्या दर्शनासाठी उतावीळ झाले आहे. हे प्रभो, माझ्या कर्मांमुळे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात भटकत असता भगवंतांच्या प्रिय भक्तांशी माझी मैत्री जडो. तसेच हे स्वामी, जे लोक आपल्या मायेने देह, घर-दार इत्यादींमध्ये आसक्त आहेत, त्यांच्याशी मात्र माझा संबंध येऊ नये. (२४-२७)

स्कंध सहावा - अध्याय अकरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP