|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १० वा
दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून वज्र-निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - विश्वाचे रक्षण करणारे भगवान श्रीहरी इंद्राला असे सांगून देवांच्यासमोरच अंतर्धान पावले. हे राजा, देवांनी अथर्ववेदी दधीची महर्षींकडे जाऊन याचना केली. ती ऐकून दधीची ऋषींना फार आनंद झाला. ते हसत म्हणाले, देवांनो, मरतेवेळी प्राण्यांना शरीराची चेतना नाहीशी करणार्या असह्य यातना होतात, हे तुम्हांला माहित नाही का ? जे जीव जगात जिवंत राहू इच्छितात, त्यांना शरीर हे अत्यंत प्रिय आणि हवेसे वाटणारे आहे. अशा स्थितीत स्वतः भगवान विष्णूंनी जरी ते मागितले, तरी ते कोण देईल बरे ! (१-४) देव म्हणाले - ब्रह्मन, ज्यांच्या कर्मांची महात्मेही प्रशंसा करतात, अशा आपल्यासारख्या प्राण्यांवर दया करणार्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे ? मागणारे लोक स्वार्थी असतात. देणार्याच्या संकटाचा ते विचार करीत नाहीत. जर विचार केला असता तर त्यांनी ते मागितलेच नसते. तसेच समर्थ दाताही कधी नाही म्हणत नाही. (५-६) दधीची ऋषी म्हणाले - आपल्या तोंडून धर्म ऐकण्यासाठीच मी तुम्हाला नकार दिला होता. हे घ्या. मी हे प्रिय शरीर आपल्यासाठी आताच सोडीत आहे. कारण एक दिवस हेच मला सोडणार आहे. हे देवांनो, जो मनुष्य या विनाशी शरीराने दुःखी प्राण्यांवर दया करून धर्म आणि यश संपादन करीत नाही, तो अचेतन वस्तूंहूनही क्षुद्र समजावा. जो मनुष्य कोणत्याही प्राण्याच्या दुःखात दुःखाचा आणि सुखात सुखाचा अनुभव घेतो, त्याच प्रकारच्या अविनाशी धर्माची महात्म्यांनी उपासना केली आहे. धन, जन आणि शरीर हे पदार्थ क्षणभंगुर आहेत. हे आपल्या उपयोगाचे नाहीत. तर शेवटी दुसर्यांच्याच उपयोगी पडणारे आहेत. अरेरे ! केवढा हा कंजूषपणा ! किती दुःखाची गोष्ट आहे की, हा मरणारा मनुष्य यांच्याद्वारा दुसर्यावर उपकार करीत नाही ! (७-१०) श्रीशुकाचार्य म्हणतात - अथर्ववेदी महर्षी दधीचींनी असा निश्चय करून स्वतःला परब्रह्म परमात्मा श्रीभगवंतांमध्ये विलीन करून आपल्या स्थूल शरीराचा त्याग केला. इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी यांचा संयम करून दृष्टी तत्त्वमय केल्यामुळे त्यांची सर्व बंधने तुटली. त्यामुळे ते भगवंतांशी पूर्णपणे एकरूप झाले आणि त्यांना शरीर पडल्याचेही भान राहिले नाही. (११-१२) भगवंतांची शक्ती मिळाल्यामुळे इंद्राचे बळ वाढले. दधीची ऋषींच्या अस्थींपासून विश्वकर्म्याने बनवलेले वज्र घेऊन तो ऐरावत हत्तीवर आरूढ झाला. त्याच्याबरोबर सर्व देवही तयार झाले. ऋषी-मुनी त्याची स्तुती करू लागले. आता त्रैलोक्याला जणू आनंदित करीत असुरसेनापतींसह असणार्या वृत्रासुराचा वध करण्यासाठी तो संपूर्ण ताकदीनिशी त्याच्यावर चालून गेला. क्रुद्ध रुद्राने काळावर आक्रमण करावे तसा. पहिल्या चतुर्युगातील त्रेतायुग सुरू झाले होते. त्यावेळी नर्मदा तटावर देवांचे दैत्यांशी हे भयंकर युद्ध झाले. हे राजा, त्यावेळी देवराज इंद्र हातात वज्र घेऊन रुद्र, वसू, आदित्य, अश्विनीकुमार, पितृगण, अग्नी, मरुद्गण, ऋभुगण, साध्यगण आणि विश्वेदेव यांच्यासह आपल्या तेजाने शोभत होता. तो समोर आलेला पाहून वृत्रासुरादी दैत्यांना ते सहन झाले नाही. तेव्हा नमुची, शंबर, अनर्वा, द्विमूर्धा, ऋषभ, अंबर, हयग्रीव, शंकुशिरा, विप्रचित्ती, अयोमुख, पुलोमा, वृषपर्वा, प्रहेती, हेती, उत्कल, सुमाली, माली इत्यादी हजारो दैत्य, दानव, यक्ष, राक्षस सोन्याचे अलंकार वगैरे घालून आले आणि देवराज इंद्राच्या मृत्यूलाही अजिंक्य सेनेला अडवू लागले. ते गर्विष्ठ असुर सिंहनाद करीत मोठया सावधगिरीने गदा, परिघ, बाण, प्रास, मुद्गर, तोमर, शूळ, फरशी, तलवारी, तोफा, भुशुंडी इत्यादी शस्त्रास्त्रांच्या वर्षावाने देवांवर सर्व बाजूंनी प्रहार करू लागले. जसे ढगांनी झाकून गेल्यामुळे आकाशातील तारे दिसत नाहीत, त्याप्रमाणे एका-मागोमाग-एक असे इतके बाण चारी बाजूंनी येत होते की, त्या वर्षावाने देव दिसेनासे झाले. तो शस्त्रास्त्रांचा वर्षाव देवसैनिकांना स्पर्शसुद्धा करू शकला नाही. त्यांनी आपल्या हस्तकौशल्याने आकाशातच त्यांचे हजारो तुकडे केले. जेव्हा असुरांची शस्त्रास्त्रे संपली, तेव्हा ते देवसेनेवर पर्वतांची शिखरे, वृक्ष आणि दगड फेकू लागले. परंतु देवांनी पहिल्याप्रमाणेच ते तोडून टाकले. (१३-२६) जेव्हा वृत्रासुराच्या सैनिकांना दिसले की, त्यांची असंख्य शस्त्रास्त्रे देवसेनेचे काहीही वाकडे करू शकली नाहीत, तसेच वृक्ष, खडक आणि पहाडांच्या शिखरांनीसुद्धा त्यांच्या शरीरावर खरचटलेसुद्धा नाही, एवढेच नव्हे तर सर्वजण कुशल आहेत, तेव्हा ते अतिशय भयभीत झाले. जसा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर क्षुद्र माणसांच्या कठोर आणि अमंगळ दुर्वचनांचा काहीही प्रभाव पडत नाही, त्याचप्रमाणे दैत्यांनी देवांना पराजित करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ होऊ लागले. श्रीहरींचे भक्त नसलेल्या असुरांचा युद्धाचा उत्साह आपले प्रयत्न व्यर्थ झालेले पाहून मावळला. आता ते आपल्या स्वामीला वृत्रासुराला युद्धभूमीवरच सोडून पळायला उद्युक्त झाले. कारण देवांनी त्यांचे सारे बळ हिरावून घेतले होते. (२७-२९) स्वाभिमानी वीर वृत्रासुराने पाहिले की, आपले बरोबरीचे असुर पळून जाऊ लागले आहेत आणि आपली पराभूत सेना सुद्धा अत्यंत भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागली आहे, तेव्हा त्यांना पाहून हसून तो म्हणाला. श्रेष्ठ वीर वृत्रासुर समयोचित वीरवाणीने विप्रचित्ती, नमुची, पुलोमा, मय, अनर्वा, शंबर इत्यादी दैत्यांना उद्देशून म्हणाला, असुरांनो, पळून जाऊ नका. मी सांगतो ते ऐका. जो जन्माला आला, तो अवश्य मरणार. विधात्याने या जगात मृत्यूपासून वाचण्याचा कोणताही उपाय सांगितलेला नाही. अशा स्थितीत जर मृत्यूमुळे स्वर्गादी लोक आणि सुयशसुद्धा मिळत असेल तर कोणता बुद्धिमान अशा उत्तम मृत्यूचा स्वीकार करणार नाही ? जगामध्ये दोन प्रकारचा मृत्यू परम दुर्लभ आणि श्रेष्ठ मानला गेला आहे. एक, आपल्या प्राणांना वश करून ब्रह्मचिंतन करीत करीत शरीराचा त्याग करणार्या योगी पुरुषाचा आणि दुसरा युद्धभूमीवर सेनेमध्ये पुढे राहून पाठ न दाखविता झुंज देऊन मरणार्या वीराचा. (३०-३३) स्कंध सहावा - अध्याय दहावा समाप्त |