|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ९ वा
विश्वरूपाचा वध, वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषीकडे जाणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणाले - परीक्षिता, आम्ही असे ऐकले आहे की, विश्वरूपाला तीन मस्तके होती. तो एका तोंडाने सोमरस, दुसर्याने मद्य आणि तिसर्याने अन्न ग्रहण करीत असे. त्वष्टा इत्यादी बारा आदित्य त्याचे वडील होते. म्हणून तो यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षात उंच स्वराने नम्रतापूर्वक देवांना आहुती देत असे. त्याचबरोबर तो अप्रत्यक्षपणे असुरांनासुद्धा आहुती देत असे. कारण त्याची आई असुरकुलातील असल्यामुळे मातृस्नेहामुळे तो असुरांना यज्ञभाग देत असे. देवराज इंद्राने पाहिले की, तो अशा रीतीने देवांचा अपराध आणि धर्माच्या आड लपून कपट करीत आहे. त्यामुळे इंद्र भयभीत झाला आणि रागारागाने त्याने वेगाने त्याची तिन्ही मस्तके तोडली. विश्वरूपाचे सोमरस पिणारे मस्तक चातक, सुरापान करणारे मस्तक चिमणा आणि अन्न खाणारे कवडा झाले. इंद्र ब्रह्महत्येचे ते पाप जरी दूर करू शकत होता, तरी त्याने त्याचा ओंजळीने स्वीकार केला आणि एक वर्षापर्यंत त्यातून सुटण्याचा काहीही उपाय केला नाही. त्यानंतर सर्वांच्या समोर आपण शुद्ध होण्यासाठी ते पाप चार भागांत वाटून पृथ्वी, जल, वृक्ष आणि स्त्रियांना दिले. तो चौथा भाग स्वीकारताना पृथ्वीने त्याच्या बदल्यात हा वर मागून घेतला की, जेथे कुठे खडडा असेल, तो योग्य वेळी आपोआप भरला जावा. तीच ब्रह्महत्या कुठे कुठे ओसाड जमिनीच्या रूपाने दृष्टीस पडते. दुसरा चतुर्थांश वृक्षांनी घेतला. त्याबदली त्यांनी हा वर मिळवला की, एखादा भाग तोडला गेल्यानंतर तो पुन्हा भरून यावा. अजूनही त्यांच्यात चिकाच्या रूपाने ब्रह्महत्या दृष्टीस पडते. नेहमी कामोत्पत्ती होण्याचा वर मिळवून स्त्रियांनी ब्रह्महत्येचा तिसरा भाग स्वीकारला. त्यांची ब्रह्महत्या प्रत्येक महिन्यात रजःस्रावाच्या रूपाने दृष्टीस पडते. उपयोग करीत राहिल्यानंतरही झरे इत्यादींच्या रूपाने वाढच व्हावी, हा वर मिळवून पाण्याने ब्रह्महत्येचा चौथा भाग स्वीकारला. फेस, बुडबुडे इत्यादी रूपांनी तीच ब्रह्महत्या पाण्यावर दृष्टीस पडते. म्हणून माणूस ते बाजूला सारून पाणी उपयोगात आणतो. (१-१०) विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्याचा पिता त्वष्टा "हे इंद्रशत्रो, तू मोठा हो आणि लवकरच आपल्या शत्रूला मारून टाक." या मंत्राने इंद्राला शत्रू उत्पन्न करण्यासाठी हवन करू लागला. यज्ञ पूर्ण होताच अन्वाहार्य-पचन नावाच्या अग्नीतून एक मोठा भयानक पुरुष प्रगट झाला. तो सर्व लोकांचा नाश करण्यासाठी प्रलयकालीन विक्राळ काळच प्रगट झाला आहे, असा वाटत होता. दररोज त्याचे शरीर सर्व बाजूंनी बाणाएवढे वाढत असे. तो जळलेल्या पहाडाप्रमाणे काळाकुटट होता. संध्याकाळच्या ढगांप्रमाणे त्याची कांती होती. त्याच्या डोक्यावरील केस आणि दाढी-मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल रंगाच्या, तसेच डोळे माध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे प्रखर होते. तीन पात्यांचा चमकणारा त्रिशूल घेऊन जेव्हा तो नाचत, ओरडत आणि उडया मारीत असे, तेव्हा पृथ्वीचा थरकाप होऊन जाई आणि असे वाटत असे की त्या त्रिशूळावर त्याने अंतरिक्षाला झेलले आहे. तो वारंवार जांभई देत असे. त्यामुळे जेव्हा त्याचे गुहेसारखे खोल, विक्राळ दाढा असलेले प्रचंड तोंड उघडले जाई, तेव्हा असे वाटत असे की, तो सर्व आकाश पिऊन टाकील, जिभेने सर्व नक्षत्रे चाटून घेईल आणि तिन्ही लोक गिळून टाकील. त्याचे भयानक रूप पाहून सर्व लोक घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले. (११-१७) त्वष्टयाच्या तमोगुणी मुलाने सर्व लोक व्यापले होते, म्हणून त्या पापी आणि अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव वृत्र असे पडले. मोठमोठे देव आपापल्या अनुयायांसह एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले आणि आपापल्या दिव्य शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर प्रहार करू लागले. परंतु वृत्रासुराने ती सर्व गिळून टाकली. तेव्हा चकित व निस्तेज झालेले ते सर्वजण उदास झाले आणि एकाग्र चित्ताने आपल्या हृदयात विराजमान असलेल्या आदिपुरुष नारायणांची स्तुती करू लागले. (१८-२०) देव म्हणाले - वायू, आकाश, अग्नी, जल, आणि पृथ्वी ही पाच महाभूते, यांच्यापासून तयार झालेले तिन्ही लोक, त्यांचे अधिपती ब्रह्मदेव इत्यादी, तसेच आम्ही सर्व देव ज्या काळाला भिऊन त्याला पूजासामग्री अर्पण करतो, तो काळ ज्या भगवंतांना घाबरतो, ते भगवानच आमचे रक्षणकर्ते आहेत. प्रभो, आपल्याला कशाचेही आश्चर्य वाटत नाही. आपण आपल्या स्वरूपाच्या साक्षात्कारानेच सर्वथा पूर्णकाम, सम आणि शांत आहात. जो आपल्याला सोडून दुसर्या कोणाला शरण जातो, तो मूर्ख कुत्र्याचे शेपूट धरून समुद्र पार करू इच्छितो. मागील कल्पाच्या शेवटी वैवस्वत मनू ज्यांच्या विशाल शिंगाला पृथ्वीरूप नाव बांधून सहजपणेच प्रलयकालीन संकटातून वाचला, तेच मत्स्यभगवान आम्हा शरणागतांना वृत्रासुराने आणलेल्या दुस्तर भयापासून अवश्य वाचवतील. प्राचीन काळी वार्याच्या प्रचंड झंझावाताने उठलेल्या उत्तुंग लाटांच्या गर्जनांमुळे ब्रह्मदेव, भगवंतांच्या नाभिकमळातून भयंकर प्रलयकालीन पाण्यामध्ये पडला होता. तो त्यावेळी जरी असहाय होता, तरी ज्यांच्या कृपेने त्या संकटातून वाचला, तेच भगवान आम्हांला या संकटातून वाचवोत. अद्वितीय असूनसुद्धा त्याच प्रभूंनी आपल्या मायेने आम्हांला उत्पन्न केले आणि त्यांच्याच कृपेने आम्ही विश्व चालवीत आहोत. ते जरी आमच्यासमोर सर्व प्रकारच्या लीला करीत आहेत. तरीसुद्धा आम्ही स्वतःला ईश्वर मानीत असल्यामुळे आम्ही त्यांचे स्वरूप पाहू शकत नाही. देव आपल्या शत्रूंपासून फार दुःखी झाले आहेत, असे पाहून वास्तविक निर्विकार असूनही ते आपल्या मायेने देव, ऋषी, पशु-पक्षी किंवा मनुष्य इत्यादी योनींमध्ये अवतार घेतात आणि युगा-युगांत आपलेपणाने आमचे रक्षण करतात. तेच सर्वांचे आत्मा आणि परम आराध्य देव आहेत. तेच प्रकृति-पुरुषरूपाने विश्वाचे कारण आहेत. ते विश्वापासून वेगळे आहेत आणि विश्वरूपही आहेत. आम्ही सर्वजण त्याच शरणागतवत्सल भगवान श्रीहरींना शरण जात आहोत. तेच प्रभू निजजन अशा आम्हा देवतांचे कल्याण करतील. (२१-२७) श्रीशुकदेव म्हणतात - महाराज, देवांनी जेव्हा अशा प्रकारे भगवंतांची स्तुती केली, तेव्हा स्वतः शंख, चक्र, गदा, पद्मधारी भगवान पश्चिमेकडे त्यांच्यासमोर प्रगट झाले. भगवंतांचे नेत्र शरद ऋतूतील कमळाप्रमाणे शोभत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सोळा पार्षद त्यांच्या सेवेत व्यग्र होते. श्रीवत्सचिन्ह आणि कौस्तुभमणि सोडल्यास ते सर्वजण भगवंतांच्या सारखेच दिसत होते. परीक्षिता, भगवंतांचे दर्शन होताच आनंदमग्न झालेल्या देवांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि नंतर हळू हळू उठून ते भगवंतांची स्तुती करू लागले. (२८-३०) देव म्हणाले - भगवन, स्वर्ग इत्यादी देण्याची यज्ञाची शक्ती आणि त्यांच्या फळांचा समय निश्चित करणारे काळही आपणच आहात. यज्ञात विघ्न निर्माण करणार्या दैत्यांना आपण चक्राने छिन्न-विच्छिन्न करून टाकता. आपली नावेही अनंत आहेत. आम्ही आपणांस वारंवार नमस्कार करीत आहोत. हे विधाता, सत्त्व, रज, तम या तीन गुणांनुसार ज्या उत्तम, मध्यम आणि निकृष्ट गती प्राप्त होतात, त्यांचे नियमन करणारे आपणच आहात. आपल्या परमपदाचे वास्तविक स्वरूप या कार्यरूप जगातील कोणताही आधुनिक प्राणी जाणू शकत नाही. (३१-३२) भगवन ! नारायण, वासुदेव, आदिपुरुष आणि महापुरुष आपण आहात. आपला महिमा अमर्याद आहे. आपण परम मंगलमय, परम कल्याणस्वरूप आणि परम दयाळू आहात. आपणच सार्या जगाचे आधार तसेच अद्वितीय आहात. केवळ आपणच सार्या जगाचे स्वामी आहात. आपण सर्वेश्वर असून लक्ष्मीपती आहात. प्रभो, परमहंस परिव्राजक योगी जेव्हा आत्मसंयमरूप समाधीने चांगल्या तर्हेने आपले चिंतन करतात. तेव्हा त्यांच्या शुद्ध हृदयामध्ये परमहंसांचा वास्तविक धर्म असणार्या भगवद्भजनाचा उदय होतो. त्यामुळे त्यांच्या हृदयातील अज्ञानरूप दार उघडले जाते आणि त्यांच्या आत्म्यामध्ये आपण आत्मानंदरूपात प्रगट होता. अशा आपणास आम्ही नमस्कार करीत आहोत. आपल्या लीलेचे रहस्य जाणणे कठीण आहे. कारण आपण कोणत्याही आश्रयाविना आणि शरीराशिवाय तसेच आमच्या सहकार्याशिवाय निर्गुण आणि निर्विकार असूनही या सगुण जगाची उत्पत्ती, रक्षण आणि संहार करता. ही गोष्ट नीटपणे आमच्या लक्षात येत नाही की, या सृष्टीत देवदत्तासारख्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे उत्पन्न होऊन आपण कर्मांच्या अधीन होऊन आपण केलेल्या चांगल्या-वाईत कर्मांचे फळ भोगता की आत्माराम, शांतस्वभावयुक्त व सर्वांना समदृष्टीने पाहाणारे होऊन साक्षीभावाने राहाता. आपल्यामध्ये या दोन्ही गोष्टी असल्या तरी काही विरोध येत नाही. कारण आपण स्वतः भगवान आहात. आपले गुण अगणित आहेत. आपला महिमा अगाध आहे आणि आपण सर्वशक्तिमान आहात. आधुनिक लोक अनेक प्रकारचे विकल्प, वितर्क, विचार, खोटी प्रमाणे आणि कुतर्काने भरलेल्या शास्त्रांचे अध्ययन करून आपले हृदय दूषित करून घेतात. आणि याचमुळे ते दुराग्रही बनतात. त्यांच्या वाद-विवादात पडण्यात आपणास सवडही नाही. आपले खरे स्वरूप सर्व मायामय पदार्थांच्या पलीकडचे विशुद्ध आहे. जेव्हा आपण त्यातच आपल्या मायेला झाकून ठेवता, तेव्हा कोणती गोष्ट आपल्या बाबतीत अशक्य आहे ? कारण आपल्यामध्ये कर्तृत्व-भोक्तृत्वही नाही आणि उदासीनताही नाही. आपण दोहोंहून विलक्षण व अनिर्वचनीय आहात. जसे एकच दोरीचा तुकडा भ्रम झालेल्या पुरुषाला साप इत्यादी रूपात दिसतो, परंतु जाणकाराला मात्र दोरीच्या रूपात; तसेच आपणही अज्ञानी लोकांना कर्ता-भोक्ता इत्यादी अनेक रूपात दिसता आणि ज्ञानी पुरुषांना मात्र शुद्ध सच्चिदानंद स्वरूपात. कारण आपण सर्वांच्या बुद्धीनुसार रूप धारण करता. आपणच सर्व वस्तूंमध्ये त्या वस्तूंच्या रूपाने राहाता. आपणच सर्वांचे स्वामी आहात आणि संपूर्ण जगाचे कारण असलेले ब्रह्मदेव, प्रकृती इत्यादींचेही कारण आहात. आपण सर्वांचे अंतर्यामी अंतरात्मा आहात. म्हणून जगातील सर्व गुणरूपांत दिसता. आणि श्रुतींनी मात्र सर्व पदार्थांचा निषेध करून फक्त आपल्यालाच शिल्लक ठेवले आहे. हे मधुसूदना, आपला महिमा अमृतमय रसाचा समुद्र आहे. त्यातील लहानशा थेंबाचाही केवळ एक वेळ स्वाद चाखल्याने हृदयात परमानंदाची निरंतर धारा वाहू लागते. त्यामुळे इह-परलोकींच्या विषयभोगांच्या सुखाचा आभास विसरले आहेत, अशा सर्व प्राण्यांचे प्रिय सुहृद आणि सर्वात्मा असणार्या आपणा परमात्म्यामध्ये जे आपले मन निरंतर लावून ठेवून आपल्या चिंतनाचे सुख लुटतात, ते आपले अनन्यप्रेमी परम भक्तच आपल्या स्वार्थात निपुण आहेत. तेच भक्तजन आपल्या चरणकमलाच्या सेवनाचा त्याग करीत नाहीत. कारण त्यामुळेच त्यांना या जन्म-मरणरूप संसारात परत यावे लागत नाही. प्रभो ! आपण त्रैलोक्याचे आत्मा आणि आश्रय आहात. आपण आपल्या तीन पावलांनीच सर्व जग व्यापले होते आणि आपणच तिन्ही लोकांचे संचालक आहात. आपला महिमा त्रैलोक्याचे मन हरण करतो. दैत्य, दानव आणि असुर या आपल्याच विभूती आहेत, यात संशय नाही. परंतु आताची वेळ ही त्यांच्या उन्नतीची नाही. असा विचार करून आपण आपल्या योगमायेने देव, मनुष्य, पशू, नृसिंह, मत्स्य इत्यादी जलचरांच्या रूपात अवतार घेऊन त्यांच्या अपराधानुसार त्यांना दंड देता. हे दंडधारी प्रभो ! आपणास योग्य वाटत असेल, तर आपण त्या असुरांप्रमाणे या वृत्रासुराचासुद्धा नाश करा. हे भगवन, आपण आमचे पिता, पितामह, सर्व काही आहात. आणि आम्ही आपलेच असून नेहमी आपल्यासमोर आमचे मस्तक लववीत आहोत. आपल्या चरणकमलांचे ध्यान करता करता आमचे हृदय त्याच प्रेमबंधनात बांधले गेले आहे. आपण आमच्यासमोर आपल्या दिव्य गुणांनी युक्त सगुण रूप प्रगट करून आम्हांला आपलेसे केले आहे. म्हणून हे प्रभो ! आम्ही आपणास अशी प्रार्थना करीत आहोत की, आपण आपल्या दयार्द्र, विमल, सुंदर आणि शीतल हास्ययुक्त अंतःकरणाने तसेच आपल्या मुखारविंदातून बाहेर पडणार्या मनोहर वाणीरूप सुमधुर अमृतबिंदूंनी आमच्या हृदयाचा ताप शांत करावा. आमची आंतरिक ज्वाला विझवावी. प्रभो, जशा अग्नीच्या अंशभूत असणार्या ठिणग्या अग्नीला प्रकाशित करण्यास असमर्थ असतात, त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आमचा कोणताही स्वार्थ-परमार्थ आपल्यापुढे निवेदन करण्यास असमर्थ आहोत. आपणास आम्ही सांगावयाचे तरी काय म्हणा ! कारण आपण दिव्य मायेने संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याची लीला करीत आहात. तसेच सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये आणि बाहेरही ब्रह्म, प्रधान आणि अंतर्यामीच्या रूपांत विराजमान असता. जगातील देश, काल, शरीर आणि अवस्था यांचे उपादान कारण आणि कार्यरूपामध्ये आपणच असता. आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात. आपण आकाशाप्रमाणे सगळीकडे आहात. निर्लिप्त आहात. आपण स्वतः परब्रह्म परमात्मा आहात. म्हणून आम्ही ज्या इच्छेने येथे आलो आहोत, ती स्वतःच जाणून पूर्ण करा. आपण अचिंत्य, ऐश्वर्यसंपन्न आणि जगाचे परमगुरू आहात. आम्ही विविध पापांचे फळ असणार्या जन्म-मृत्युरूप संसाराचे कष्ट दूर करणार्या आपल्या चरणकमलाच्या आश्रयाला आलो आहोत. हे सर्वशक्तिमान श्रीकृष्णा, वृत्रासुराने आमचा प्रभाव आणि शस्त्रास्त्रे गिळून टाकली आहेत. आणि आता तो तिन्ही लोकांना ग्रासू लागला आहे. आपण त्याला मारून टाकावे. हे प्रभो, आपण शुद्धस्वरूप, हृदयस्थित, सर्वांचे साक्षी, अनादी आणि उज्ज्वल कीर्तिसंपन्न आहात. संतलोक आपल्याच आश्रयाला येतात. संसाराचे वाटसरू जेव्हा फिरत फिरत आपल्याला शरण येतात, तेव्हा शेवटी आपणच त्यांना परमानंदरूप इष्ट फळ देता आणि त्यांचे कष्ट नाहीसे करता. हे कृष्णा, आम्ही आपल्याला नमस्कार करतो. (३३-४५) श्रीशुकदेव म्हणाले - परीक्षिता, जेव्हा देवांनी मोठया आदराने अशा प्रकारे भगवंतांचे स्तवन केले, तेव्हा आपली ती स्तुती ऐकून ते अतिशय प्रसन्न होऊन त्यांना म्हणू लागले. (४६) श्रीभगवान म्हणाले - श्रेष्ठ देवांनो ! तुम्ही स्तुतियुक्त ज्ञानाने माझी उपासना केली आहे. यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. या स्तुतीमुळे जीवांना आपल्या खर्या स्वरूपाची स्मृती आणि माझी भक्ती प्राप्त होते. हे श्रेष्ठ देवांनो, मी प्रसन्न झाल्यावर कोणती वस्तू दुर्मिळ आहे ? तरीपण माझे अनन्यप्रेमी तत्त्ववेत्ते भक्त माझ्यापासून माझ्याव्यतिरिक्त आणखी कशाचीच इच्छा करीत नाहीत. जगातील विषयांना सत्य मानणारा अज्ञानी मनुष्य आपले खरे कल्याण जाणत नाही. तसेच जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला विषयच देतो, तोसुद्धा अज्ञानीच होय. जसे रोग्याची इच्छा असूनही चांगला वैद्य त्याला कुपथ्य करू देत नाही, तसाच जीवांचे आत्यंतिक कल्याण जाणणारा विद्वान अज्ञानी लोकांना कर्मांचा उपदेश करीत नाही. हे इंद्रा, तुझे कल्याण असो. आता उशीर करू नको. ऋषिश्रेष्ठ दधीची यांचेकडे जा. त्यांचे जे शरीर, उपासना, व्रत आणि तपश्चर्येमुळे अत्यंत बलवान झाले आहे, ते त्यांच्याकडून मागून घे. दधीची ऋषींना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान आहे. अश्विनीकुमारांना घोडयाच्या डोक्याने उपदेश केल्याकारणाने त्यांचे एक नाव अश्वशिर असेही आहे. त्यांनी उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावानेच दोन्ही अश्विनीकुमार अमर झाले. अथर्ववेदी दधीची ऋषींनी सर्वप्रथम माझ्या स्वरूपभूत अभेद्य नारायण-कवचाचा त्वष्टयाला उपदेश केला होता. त्वष्टयाने तोच विश्वरूपाला आणि विश्वरूपाने तुला केला. दधीची ऋषी धर्माचे श्रेष्ठ जाणकार आहेत. ते तुम्हाला अश्विनीकुमारांच्या मागण्यावरून आपले शरीर अवश्य देतील. त्यानंतर विश्वकर्म्याकडून त्या अंगांपासून एक श्रेष्ठ आयुध तयार कर. नंतर माझ्या शक्तीने युक्त होऊन तू त्याच शस्त्राने वृत्रासुराचे मस्तक उडव. वृत्रासुर मेल्यावर तुम्हांला पुन्हा तेज, शस्त्रास्त्रे आणि सर्व संपत्ती प्राप्त होईल. तुमचे कल्याण होईल. कारण मला शरण आलेल्यांना कोणीही मारू शकत नाही. (४७-५५) स्कंध सहावा - अध्याय नववा समाप्त |