|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ८ वा
नारायण कवचाचा उपदेश - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षिताने विचारले - भगवन, ज्याच्या संरक्षणाखाली इंद्राने शत्रूंच्या सैनिकांना खेळाप्रमाणे सहज जिंकून त्रैलोक्याच्या राजलक्ष्मीचा उपभोग घेतला, ते नारायणकवच मला सांगावे. तसेच त्याने त्यापासून सुरक्षित होऊन रणभूमीवर आक्रमण करणार्या शत्रूंवर कसा विजय मिळवला, हेही सांगावे. (१-२) श्रीशुकदेव म्हणाले - परीक्षिता, जेव्हा देवांनी विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक केली, तेव्हा इंद्राने विचारल्यावरून विश्वरूपाने त्याला नारायणकवचाचा उपदेश केला, तो तू एकाग्रचित्ताने ऐक. (३) विश्वरूप म्हणाला - भीती उत्पन्न झाली असता नारायणकवच धारण करावे. त्याचा विधी असा- प्रथम हात पाय धुऊन आचमन करावे. नंतर अनामिकेत दर्भाचे पवित्र धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसावे. यानंतर कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंतःकरणाने "ॐ नमो नारायणाय" आणि "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्रांनी हृदयादी अंगन्यास व अंगुष्ठादी करन्यास करावा. प्रथम "ॐ नमो नारायणाय" या अष्टाक्षरी मंत्राच्या ॐ इत्यादी आठ अक्षरांचा क्रमशः पाय, गुडघे, मांडया, पोट, हृदय, वक्षःस्थळ, मुख आणि मस्तक येथे न्यास करावा. किंवा पूर्वोक्त मंत्रांच्या यकारापासून सुरुवात करून ॐकारापर्यंत आठ अक्षरांचा मस्तकापासून आरंभ करून त्याच आठ अंगांवर उलट क्रमाने न्यास करावा. त्यानंतर "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या द्वादशाक्षर मंत्राच्या ॐ इत्यादी बारा अक्षरांचा उजव्या तर्जनीपासून डाव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हातांची आठ बोटे आणि दोन्ही अंगठयांच्या दोन-दोन गाठींमध्ये न्यास करावा. नंतर "ॐ विष्णवे नमः" या मंत्राचे पहिले अक्षर ‘ॐ’ याचा हृदयावर ‘वि’चा ब्रह्मरंध्रावर ‘ष’चा भुवयांवर ‘ण’चा शेंडीवर ‘वे’चा दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी आणि ‘न’चा शरीरातील सर्व गाठींचे ठिकाणी न्यास करावा. तदनंतर ‘ॐ मः अस्त्राय फट्’ म्हणून दिग्बंध करावा. अशा प्रकारे न्यास करणारा पुरुष मंत्रस्वरूप होतो. यानंतर सर्व ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण (अशा) इष्टदेव भगवंतांचे ध्यान करावे व आपणही तद्रूप आहोत असे चिंतन करावे. त्यानंतर विद्या, तेज आणि तपःस्वरूप या कवचाचा पाठ करावा. (४-११) ज्यांनी गरुडाच्या पाठीवर आपले चरणकमल ठेवले आहेत, अणिमादी आठ सिद्धी ज्यांची सेवा करीत आहेत, ज्यांच्या आठ हातांमध्ये शंख, चक्र, ढाल, तलवार, गदा, बाण, धनुष्य आणि पाश आहेत, ते श्रीहरी सर्व प्रकारे व सर्व बाजूंनी माझे रक्षण करोत. मत्स्यावतारी भगवान पाण्यामध्ये पाण्यातील जंतूंपासून आणि वरुणाच्या पाशापासून माझे रक्षण करोत. मायेने ब्रह्मचार्याचे रूप धारण करणारे वामनावतार जमिनीवर आणि विश्वरूप श्रीत्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करोत. ज्यांच्या भीषण डरकाळीने सर्व दिशा दुमदुमून गेल्या होत्या आणि गर्भवतींचे गर्भ गळून पडले होते, ते दैत्यराजाचे शत्रू भगवान नृसिंह किल्ले, जंगल, रणभूमी इत्यादी बिकट ठिकाणी माझे रक्षण करोत. आपल्या दाढेने पृथ्वी धारण करणारे यज्ञमूर्ती वराहावतार मार्गामध्ये, परशुराम पर्वतांच्या शिखरांवर आणि लक्ष्मणासह भरताचे थोरले भाऊ भगवान रामचंद्र प्रवासाचे वेळी माझे रक्षण करोत. भगवान नारायण जारण-मारण इत्यादी आभिचारिक कर्मांपासून आणि सर्व प्रकारच्या अपघातांपासून माझे रक्षण करोत. ऋषिश्रेष्ठ नर गर्वापासून, योगेश्वर भगवान दत्तात्रेय योगातील विघ्नांपासून आणि त्रिगुणाधिपती कपिल कर्मबंधनांपासून माझे रक्षण करोत. सनतकुमार कामदेवांपासून, हयग्रिव रस्त्याने चालतेवेळी घडणार्या देवमूर्तींना नमस्कार इत्यादी न करण्याच्या अपराधापासून, देवर्षी नारद ईश्वरसेवेच्या अपराधांपासून आणि कच्छपावतार सर्व प्रकारच्या नरकांपासून माझे रक्षण करोत. भगवान धन्वन्तरी कुपथ्यापासून, जितेंद्रिय ऋषभदेव सुख-दुःखादी भीतीदायक द्वंद्वांपासून, यज्ञभगवान लोकापवादापासून, बलराम मनुष्यनिर्मित कष्टांपासून आणि श्रीशेष क्रोधवश नावाच्या सापांच्या समूहापासून माझे रक्षण करोत. भगवान व्यास अज्ञानापासून, बुद्धदेव नास्तिकांपासून आणि प्रमादांपासून माझे रक्षण करोत. धर्मरक्षणासाठी महान अवतार धारण करणारे भगवान कल्की, कळीकाळांच्या दोषांपासून माझे रक्षण करोत. गदाधारी केशव प्रातःकाळी, वंशीधर गोविंद सकाळी, तीक्ष्ण शक्तीधारी नारायण दुपारच्या आधी, आणि मध्यान्ही चक्रराज सुदर्शनधारी विष्णू माझे रक्षण करोत. तिसर्या प्रहरी प्रचंड धनुष्यधारी मधुसूदन आणि संध्याकाळी ब्रह्मादी त्रिमूर्तीधारी माधव माझे रक्षण करोत. सूर्यास्तानंतर ऋषिकेश, मध्यरात्रीच्या अगोदर आणि मध्यरात्री एकटे भगवान पद्मनाभ माझे रक्षण करोत. मध्यरात्रीनंतर श्रीवत्सलांछन श्रीहरी, उषःकाळी खड्गधारी भगवान जनार्दन, सूर्योदयाच्या पूर्वी श्रीदामोदर आणि दोन्ही संध्यासमयी कालमूर्ती भगवान विश्वेश्वर माझे रक्षण करोत. (१२-२२) हे सुदर्शना, तुझ्या कडांची टोके प्रलयकालीन अग्नीसमान तीव्र आहेत. तू भगवंतांच्या प्रेरणेने सगळीकडे फिरत असतोस. आग ज्याप्रमाणे वार्याच्या सहाय्याने गवत वगैरे जाळून टाकते, त्याप्रमाणे तू आमच्या शत्रूसेनेला लगेच जाळून टाक. हे कौमोदकी गदे, तुझ्यापासून निघणार्या ठिणग्यांचा स्पर्श वज्राप्रमाणे असह्य आहे. तू भगवंतांची आवडती आहेस. तू कुष्मांड, विनायक, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत इत्यादिकांचा चुरा करून टाक आणि माझ्या शत्रूंचा नायनाट कर. हे शंखश्रेष्ठा, भगवान श्रीकृष्णांनी फुंकल्यानंतर तू भयंकर आवाज करून माझ्या शत्रूंच्या हृदयाचा थरकाप उडव. तसेच यातुधान, प्रमथ, प्रेत, मातृका, पिशाच्च, ब्रह्मराक्षस इत्यादी भयानक प्राण्यांना येथून पळवून लाव. हे तीक्ष्ण धारेच्या श्रेष्ठ तलवारी, तू भगवंतांच्या प्रेरणेने माझ्या शत्रूंना छिन्न-विच्छिन्न करून टाक. शेकडो चंद्राप्रमाणे फिरणार्या हे ढाली, माझ्या शत्रूंचे डोळे तू बंद कर आणि पापी नजर असणार्यांची दृष्टी नाहीशी कर. (२३-२६) सूर्यादी ग्रह, धूमकेतू, दुष्ट माणसे, साप, दाढा असणारे हिंस्त्र पशू, भूत-प्रेत इत्यादी, तसेच पापी प्राण्यांपासून जे जे भय निर्माण होईल आणि जे जे आमच्या हिताच्या विरोधी असतील ते सर्वजण, भगवंतांचे नाम, रूप तसेच आयुधांचे कीर्तन केल्याबरोबर नष्ट होवोत. बृहद् रथंतर इत्यादी सामवेदीय स्तोत्रांनी ज्यांची स्तुती केली जाते, तो वेदमूर्ती भगवान गरुड आणि विष्वक्सेन आपल्या नामोच्चारणाच्या प्रभावाने आमचे सर्व तर्हेच्या संकटांपासून संरक्षण करोत. श्रीहरीचे नाम, रूप, वाहन, आयुधे आणि श्रेष्ठ पार्षद आमची बुद्धी, इंद्रिये, मन, आणि प्राणांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करोत. (२७-३०) जेवढे म्हणून कार्यकारणरूप जग आहे, ते वास्तविक भगवंतच आहे. या सत्याच्या प्रभावाने आमचे सर्व उपद्रव नाहीसे होवोत. ज्या लोकांनी ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा अनुभव घेतला आहे, त्यांच्या दृष्टीने भगवंतांचे स्वरूप भेदरहित आहे. तरीसुद्धा ते आपल्या मायेने अलंकार, आयुधे आणि रूप नावाच्या शक्ती धारण करतात, ही गोष्ट सत्य आहे. याच कारणाने सर्वज्ञ, सर्वव्यापक भगवान श्रीहरी नेहमीच सर्व स्वरूपात आमचे सर्वत्र रक्षण करोत. जे आपल्या शब्दाने सर्व लोकांची भीती दूर करतात आणि आपल्या तेजाने सर्वांचे तेज ग्रासून टाकतात, ते भगवान नृसिंह दिशोपदिशात वर-खाली-आत-बाहेर अशा सर्व ठिकाणी आमचे रक्षण करोत. (३१-३४) इंद्रा, मी तुला हे नारायणकवच सांगितले. हे कवच तू धारण कर. म्हणजे अनायासेच सर्व दैत्य सेनापतींना जिंकून घेशील. हे नारायणकवच धारण करणारा पुरुष ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो, तो ताबडतोब सर्व भयांपासून मुक्त होतो. जो ही वैष्णवी विद्या धारण करतो, त्याला राजा, चोर, पिशाच्च, वाघ इत्यादींपासून कोणत्याही प्रकारची भीती राहात नाही. पूर्वी कौशिक गोत्रातील एका ब्राह्मणाने ही विद्या धारण करून योगाने आपल्या शरीराचा मरुभूमीमध्ये त्याग केला होता. जेथे त्या ब्राह्मणाचे शरीर पडले होते, त्याच्यावरून एक दिवस गंधर्वराज चित्ररथ आपल्या स्त्रियांसह विमानात बसून चालला होता. तेथे येताच खाली डोके करून तो विमानासह आकाशातून पृथ्वीवर पडला. यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्याला जेव्हा वालखिल्य मुनींनी सांगितले की, हा नारायण कवच धारण केल्याचा परिणाम आहे. तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाच्या अस्थी पूर्ववाहिनी सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या आणि पुन्हा स्नान करून तो आपल्या लोकी गेला. (३५-४०) श्रीशुक म्हणतात - जो हे नारायणकवच योग्यवेळी ऐकून आदरपूर्वक धारण करतो, त्याच्यासमोर सर्व प्राणी नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त होतो. विश्वरूपापासून शतक्रतू इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर असुरांना जिंकले आणि तो त्रैलोक्यलक्ष्मीचा उपभोग घेऊ लागला. (४१-४२) स्कंध सहावा - अध्याय आठवा समाप्त |