श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय ७ वा

बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने विचारले - भगवन, देवाचार्य बृहस्पतींनी देवांचा त्याग का केला ? आपल्या गुरूंचा देवांनी कोणता अपराध केला होता, ते मला सांगावे. (१)

श्रीशुक म्हणाले - राजन, त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळाल्याने इंद्राला त्याचा गर्व झाला होता. त्यामुळेच तो अधर्माने वागू लागला होता. एके दिवशी सभेत मरुद्‌गण, वसू, रुद्र, आदित्य, ऋभू, विश्वेदेव, साध्य, अश्विनीकुमार, सिद्ध, चारण, गंधर्व, ब्रह्मज्ञानी मुनी, विद्याधर, अप्सरा, किन्नर, पक्षी आणि नाग त्यांची सेवा आणि स्तुती करीत होते. सगळीकडे मधुर स्वराने त्याच्या कीर्तीचे गायन चालू होते. डोक्यावर चंद्रमंडलाप्रमाणे सुंदर शुभ्र छत्र शोभत होते. चवर्‍या, पंखे इत्यादी महाराजांना योग्य अशी सामग्री तेथे होती. या सभेत अर्ध्या आसनावर बसलेल्या इंद्राणीसह इंद्र अतिशय शोभून दिसत होता. त्याचे स्वतःचे आणि सर्व देवांचे परम आचार्य बृहस्पती जेव्हा तेथे आले, तेव्हा सुरासुरांनी नमस्कार केलेल्या त्यांना सभेत आलेले पाहूनही इंद्र उभा राहिला नाही की त्याने त्यांना आसन वगैरे देऊन त्यांचा सत्कार केला नाही. एवढेच नव्हे तर तो आपल्या आसनावरून हललासुद्धा नाही. त्रिकालदर्शी समर्थ बृहस्पतींनी पाहिले की, याला ऐश्वर्याचा माज चढला आहे. झाले ! ते ताबडतोब तेथून निघून गुपचुप आपल्या घरी आले. (२-९)

परीक्षिता, त्याचवेळी आपण गुरूंची अवहेलना केल्याचे इंद्राच्या लक्षात आले आणि भर सभेत तो स्वतः आपलीच निंदा करू लागला. अरेरे ! ऐश्वर्याच्या नशेत चूर होऊन, मी मूर्खाने भरसभेत आपल्या गुरूदेवांचा तिरस्कार केला. खरेच ! मी हे किती वाईट केले ! कोणता विवेकी पुरुष या स्वर्गातीलदेखील राजलक्ष्मीची इच्छा धरील ? आज हिनेच तर मला देवराज असूनसुद्धा राक्षस बनवले. जे लोक असे म्हणतात की, सार्वभौ‌म राजसिंहासनावर बसलेल्या सम्राटाने कोणासाठीही उठू नये, ते धर्माचे खरे स्वरूप जाणत नाहीत. असा उपदेश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे होत. ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात. शिवाय जे त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात, तेही दगडाच्या नावेत बसलेल्याप्रमाणे बुडून जातात. माझे गुरुदेव बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर आहेत. मी फारच उद्धटपणा केला आहे. आता मी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून त्यांची मनधरणी करीन. (१०-१५)

इंद्र असा विचार करीत होता, तेवढयात बृहस्पती आपल्या घरून निघून योगबलाने अंतर्धान पावले. देवराज इंद्राने आपल्या गुरुदेवांचा पुष्कळ शोध केला परंतु त्यांचा ठाव-ठिकाणा समजला नाही. तेव्हा गुरुशिवाय आपण असुरक्षित आहोत, असे समजून देवांसह पुष्कळ विचार करूनही जेव्हा त्याला उपाय सापडला नाही, तेव्हा तो अस्वस्थ झाला. दैत्यांनासुद्धा हे समजले, तेव्हा त्या मदोन्मत्त असुरांनी आपले गुरू शुक्राचार्यांच्या आज्ञेनुसार देवांवर विजय मिळविण्यासाठी शस्त्रे उगारून हल्ला केला. त्यांनी देवांवर इतक्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला की, त्यांची मस्तके, मांडया, बाहू इत्यादी अवयव तुटून पडू लागले. तेव्हा इंद्रासह सर्व देव मस्तक लववून ब्रह्मदेवांना शरण गेले. स्वयंभू भगवान ब्रह्मदेवांनी देवांची अशी दुर्दशा पाहून त्यांचे हृदय अत्यंत करुणेने भरून आले. ते देवांना धीर देत म्हणाले.(१६-२०)

ब्रह्मदेव म्हणाले - देवांनो, ऐश्वर्यमदामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी, वेदज्ञ आणि संयमी ब्राह्मणाचा सत्कार केला नाही, ही खरोखर फार वाईट गोष्ट केलीत. देवांनो, आज वैभवशाली असूनही निर्बल शत्रूंपुढे तुम्हांला मान खाली घालावी लागत आहे, हे तुमच्या त्या उर्मटपणाचेच फळ आहे. देवराज पहा ना ! तुमचे शत्रूसुद्धा गुरूंचा तिरस्कार केल्यामुळे प्रथम अत्यंत निर्बल झाले होते. परंतु आता भक्तिभावाने त्यांची आराधना करून ते पुन्हा धन-मानाने संपन्न झाले आहेत. शुक्राचार्यांना दैवत मानणारे हे दैत्य थोडयाच दिवसांत माझा ब्रह्मलोकही हिरावून घेतील. शुक्राचार्यांच्या शिष्यांच्या सल्लामसलती बाहेर फुटत नाहीत. ते स्वर्गच काय, पाहिजे तो लोक जिंकू शकतात. जे श्रेष्ठ मनुष्य ब्राह्मण, गोविंद आणि गायींना आपले ईश्वर मानून त्यांची कृपा संपादन करतात, त्यांचे कधीच अमंगल होत नाही. म्हणून आता तुम्ही ताबडतोब त्वष्टयाचे पुत्र विश्वरूप यांच्याकडे जा आणि त्यांची सेवा करा. ते खरे ब्राह्मण, तपस्वी आणि संयमी आहेत. त्यांच्या असुरांवरील प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकलात आणि त्यांचा सन्मान केलात, तर ते तुमचे काम करतील. (२१-२५)

श्रीशुकदेव म्हणाले - परीक्षिता, ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर त्यांची चिंता दूर झाली. ते त्वष्टयाचे पुत्र असणार्‍या विश्वरूप ऋषींच्याकडे गेले आणि त्यांना आलिंगन देऊन म्हणाले. (२६)

देव म्हणाले - पुत्रा, तुझे कल्याण असो. आम्ही तुमच्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हा वडिलांची समयोचित अभिलाषा पूर्ण कर. ज्यांना मुले झाली आहेत, त्या सत्पुत्रांचाही खरा धर्म हाच आहे की, त्यांनी आपल्या वडील माणसांची सेवा करावी. मग जे ब्रह्मचारी आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलावे ? कारण वत्सा, आचार्य वेदाची मूर्ती, पिता ब्रह्मदेवाची मूर्ती, भाऊ इंद्राची मूर्ती आणि माता साक्षात पृथ्वीची मूर्ती असते. बहीण दयेची मूर्ती, अतिथी धर्माची मूर्ती, अभ्यागत अग्नीची मूर्ती आणि सर्व प्राणी आपल्या आत्म्याचीच मूर्ती-आत्मस्वरूप असतात. म्हणून पुत्रा, आम्हा वडिलांचे शत्रूकडून झालेल्या पराभवाचे हे दुःख आपल्या तपोबलाने नाहीसे कर आणि आमच्या आज्ञेचे पालन कर. तू ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण असल्याने आमचा गुरू आहेस. आम्ही तुझा आचार्य म्हणून अंगीकार करून तुझ्या शक्तीने अनायासे शत्रूंवर विजय प्राप्त करू. हे ब्राह्मणा, कामाच्या वेळी लहानांच्या पाया पडणेही निंद्य नाही. वेदांचे ज्ञानच मोठेपणाला कारण असते, नुसते वय नव्हे. (२७-३३)

श्रीशुकाचार्य म्हणतात - जेव्हा देवांनी अशा प्रकारे विश्वरूपाला पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली, तेव्हा परम तपस्वी विश्वरूपाने प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रिय आणि मधुर शब्दात म्हटले. (३४)

विश्वरूप म्हणाला - पौरोहित्याचे काम ब्रह्मतेज क्षीण करणारे आहे, म्हणून धर्मशील महात्म्यांनी त्याची निंदा केली आहे. परंतु आपण माझे वडील आहात आणि (आपण) लोकेश्वर असूनसुद्धा त्यासाठी मला प्रार्थना करीत आहात. अशा स्थितीत आपला शिष्य असलेला मी आपल्याला नकार कसा देऊ ? आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच माझे हित आहे. देवगण हो, शेतातील धान्य काढल्यानंतर किंवा धान्याचा बाजार उठून गेल्यानंतर तेथे पडलेले काही धान्य गोळा करून आणणे हेच आमच्यासारख्या संग्रह न करणार्‍यांचे धन असते आणि त्यावरच आम्ही आमचे देवकार्य आणि पितृकार्य संपन्न करतो. हे लोकपालांनो, अशा स्थितीत मी पौरोहित्यासारखे निंदनीय कृत्य का बरे करावे ? ज्यांची बुद्धी बिघडलेली असते, असेच लोक त्याने खूष होतात. तरीसुद्धा मी आपल्या कामाला नकार देऊ शकत नाही. कारण आपल्यासारख्या वडीलधार्‍यांचे मागणे तरी कितीसे आहे ? म्हणून मी आपली सर्व मागणी तन-मन-धनाने पूर्ण करीन.(३५-३७)

श्रीशुकाचार्य म्हणतात - विश्वरूप मोठा तपस्वी होता. देवांना असे वचन देऊन ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पौरोहित्यासाठी नेमलेला तो त्यांचे काम अतिशय मनापासून करू लागला. शुक्राचार्यांनी जरी आपल्या ज्ञानाच्या बळावर असुरांची संपत्ती सुरक्षित ठेवली होती, तरीसुद्धा सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने त्यांच्यापासून ती संपत्ती हिरावून घेऊन देवराज इंद्राला दिली. ज्या विद्येने सुरक्षित होऊन इंद्राने असुरांच्या सेनेवर विजय मिळविला, तिचा उदारबुद्धी विश्वरूपानेच त्याला उपदेश केला. (३८-४०)

स्कंध सहावा - अध्याय सातवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP