श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय ६ वा

श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप -

श्रीशुकदेव म्हणतात - त्यानंतर ब्रह्मदेवांनी समजूत घातल्यानंतर दक्षाने असिक्नीपासून साठ कन्या उत्पन्न केल्या. त्या सर्वजणी पित्यावर प्रेम करीत होत्या. दक्षाने त्यांपैकी दहा कन्यांचा धर्माशी, तेरांचा कश्यपाशी, सत्ताविसांचा चंद्राशी, दोघींचा भुतांशी, दोघींचा अंगिराशी, दोघींचा कृशाश्वाशी आणि उरलेल्या चौघींचा तार्क्ष्य नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला. परीक्षिता, तू या दक्षकन्या आणि त्यांच्या संतानांची नावे माझ्याकडून ऐक. यांचीच वंशपरंपरा तिन्ही लोकात पसरली आहे. (१-३)

धर्माच्या दहा पत्न्या होत्या. भानू, लंबा, ककुभ, जामि, विश्वा, साध्या, मरुत्वती, वसू, मुहूर्ता आणि संकल्पा. त्यांच्या पुत्रांची नावे ऐक. राजन, भानूचा पुत्र देवऋषभ आणि त्याचा पुत्र इंद्रसेन होता. लंबाचा पुत्र झाला विद्योत आणि त्याचा पुत्र मेघसमुदाय. ककुभेचा पुत्र होता संकट, त्याचा कीकट आणि कीकटचे पुत्र म्हणजे पृथ्वीवरील सर्व किल्ल्यांच्या अभिमानी देवता. जामीच्या पुत्राचे नाव होते स्वर्ग आणि त्याचा पुत्र नंदी. विश्वाचे पुत्र विश्वेदेव झाले. त्यांचे कोणी संतान नव्हते. साध्येपासून साध्यगण झाला आणि त्यांचा पुत्र अर्थसिद्धी नावाचा होता. (४-७)

मरुत्वतीचे दोन पुत्र झाले. मरुत्वान आणि जयंत. जयंत वासुदेवांचा अंश असून त्याला लोक उपेंद्र असेही म्हणतात. मुहूर्तेपासून मुहूर्ताचे अभिमानी देव उत्पन्न झाले. ते आपापल्या मुहूर्तावर जीवांना त्यांच्या कर्मानुसार फळे देतात. संकल्पेचा पुत्र संकल्प झाला आणि त्याचा काम. वसूचे आठही पुत्र वसू झाले. त्यांची नावे माझ्याकडून ऐक. द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू आणि विभावसू. द्रोणाच्या पत्नीचे नाव आहे अभिमती. तिच्यापासून हर्ष, शोक, भय इत्यादी पुत्र उत्पन्न झाले. प्राणाची पत्नी ऊर्जस्वती. तिच्यापासून सह, आयू आणि पुरोजव नावाचे तीन पुत्र झाले. ध्रुवाची पत्नी धरणी. तिने अनेक नगरांच्या अभिमानी देवता उत्पन्न केल्या. अर्काची पत्नी वासना. हिच्यापासून तर्ष इत्यादी पुत्र झाले. अग्नी नावाच्या वसूची पत्नी धारा. हिच्यापासून द्रविणक इत्यादी पुष्कळसे पुत्र उत्पन्न झाले. कृत्तिकापुत्र स्कंदसुद्धा अग्नीपासूनच उत्पन्न झाला. त्याच्यापासून विशाख इत्यादींचा जन्म झाला. दोषाची पत्नी शर्वरी. हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला. तो भगवंतांचा कलावतार आहे. वसूची पत्नी आंगिरसी. हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा झाला. विश्वकर्म्याची भार्या कृती. हिच्यापासून चाक्षुष मनू झाला आणि त्याचे पुत्र विश्वेदेव व साध्यगण झाले. विभावसूची पत्नी उषा. तिच्यापासून तीन पुत्र झाले- व्युष्ट, रोचिष आणि आतप. त्यांपैकी आतपाचा पंचयाम (दिवस) नावाचा पुत्र झाला, त्याच्यामुळेच सर्व प्राणी आपापल्या कामाला लागतात. (८-१६)

भूताची पत्नी सरूपा. हिने कोटयवधी रुद्रगण उत्पन्न केले. त्यांमध्ये रैवत, अज, भव, भीम, वाम, उग्र, वृषाकपी, अजैकपाद, अहिर्बुध्न्य, बहुरूप आणि महान हे अकरा जण मुख्य होत. भूताची दुसरी पत्नी भूता. हिच्यापासून भयंकर भुते आणि विनायक इत्यादींचा जन्म झाला. हे सर्वजण अकरावे प्रधान रुद्र महान याचे पार्षद झाले. (१७-१८)

अंगिरा प्रजापतीची पहिली पत्नी स्वधा. हिने पितृगणांना उत्पन्न केले आणि दुसरी पत्नी सती. हिने अथर्वांगिरस नावाच्या वेदाचाच पुत्ररूपात स्वीकार केला. कृशाश्वाची पत्नी अर्चीपासून धूम्रकेशाचा जन्म झाला आणि धिषणेला चार पुत्र झाले. वेदशिरा, देवल, वयुन आणि मनू. तार्क्ष्य नाव धारण करणार्‍या कश्यपाच्या चार पत्न्या होत्या. विनता, कद्रू, पतंगी आणि यामिनी. पतंगीपासून पक्ष्यांचा आणि यामिनीपासून टोळांचा जन्म झाला. विनतेचा पुत्र गरुड होय. हेच भगवान विष्णूंचे वाहन. विनतेचा दुसरा मुलगा अरुण. तो भगवान सूर्याचा सारथी आहे. कद्रूपासून अनेक नाग उत्पन्न झाले. (१९-२२)

परीक्षिता, कृत्तिका इत्यादी सत्तावीस नक्षत्राभिमानी देवी चंद्राच्या पत्नी होत. चंद्राने रोहिणीवर अधिक प्रेम केल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला. त्यामुळे त्याला क्षयरोग झाला. त्याला संतान झाले नाही. त्याने दक्षाला पुन्हा प्रसन्न करून घेऊन कृष्णपक्षात क्षीण झालेल्या कला शुक्लपक्षात पूर्ण होण्याचा वर प्राप्त करून घेतला. आता तू कश्यपपत्न्यांची कल्याणकारक नावे ऐक. त्या लोकमाता आहेत. त्यांच्यापासूनच ही सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. त्यांची नावे अशी- अदिती, दिती, दनू, काष्ठा, अरिष्टा, सुरसा, इला, मुनी, क्रोधवशा, ताम्रा, सुरभी, सरमा आणि तिमी. यांपैकी जलचर जंतू हे तिमीचे पुत्र (होत) आणि वाघ इत्यादी हिंस्त्र प्राणी सरमेचे (होत).म्हैशी-रेडे, गाय-बैल, तसेच दुसरे दोन खूर असणारे पशू सुरभीचे पुत्र आहेत. ससाणा, गिधाड इत्यादी शिकारी पक्षी ताम्रेची संताने होत. मुनीपासून अप्सरा उत्पन्न झाल्या. हे राजा, क्रोधवशेचे पुत्र दंदशूक इत्यादी साप, विंचू, विषारी जंतू, इलेपासून झाडे, वेली इत्यादी, सुरसेपासून राक्षस उत्पन्न झाले. अरिष्टेपासून गंधर्व आणि काष्ठेपासून घोडे इत्यादी एक खूर असलेले पशू उत्पन्न झाले. दनूला एकसष्ट पुत्र झाले. त्यांपैकी मुख्य मुख्य पुत्रांची नावे ऐक. (२३-२९)

द्विमूर्धा, शम्बर, अरिष्ट, हयग्रीव, विभावसू, अयोमुख, शंकुशिरा, स्वर्भानू, कपिल, अरुण, पुलोमा, वृषपर्वा, एकचक्र, अनुतापन, धूम्रकेश, विरूपाक्ष, विप्रचित्ती आणि दुर्जय. स्वर्भानूची कन्या सुप्रभा हिच्याशी नमुची आणि वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा हिच्याशी बलवान नहुषनंदन ययातीने विवाह केला. दनूचा पुत्र वैश्वानर याला चार सुंदर कन्या होत्या. त्यांची नावे उपदानवी, हयशिरा, पुलोमा आणि कालका अशी होती. यांपैकी उपदानवीबरोबर हिरण्याक्षाचा आणि हयशिराबरोबर क्रतूचा विवाह झाला. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने प्रजापती भगवान कश्यपांनी वैश्वानराच्या उरलेल्या दोन कन्या पुलोमा आणि कालका यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून पौलोम आणि कालकेय नावाचे साठ हजार रणशूर दानव झाले. त्यांचेच दुसरे नाव निवातकवच होते. ते यज्ञात विघ्न उत्पन्न करीत. म्हणून हे परीक्षिता, तुझे आजोबा अर्जुन याने एकटयानेच स्वर्गात गेला असता इंद्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मारले. विप्रचित्तीला सिंहिकेपासून एकशे एक पुत्र उत्पन्न झाले. त्यांपैकी सर्वांत ज्येष्ठ राहू होता. त्याची ग्रहांमध्ये गणना झाली. उरलेल्या शंभर पुत्रांचे नाव केतू असे होते. (३०-३७)

आता क्रमशः अदितीची वंशपरंपरा ऐक. या वंशात सर्वव्यापक देवाधिदेव नारायणांनी आपल्या अंशाने वामनरूपात अवतार घेतला होता. अदितीचे पुत्र होते- विवस्वान, अर्यमा, पूषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम (वामन.) यांनाच बारा आदित्य म्हणतात. विवस्वानाची पत्नी महाभाग्यवती संज्ञा हिच्यापासून श्राद्धदेव, वैवस्वत मनू आणि यम-यमीची जोडी उत्पन्न झाली. संज्ञेनेच घोडीचे रूप घेऊन सूर्यापासून भूलोकी दोन्ही अश्विनीकुमारांना जन्म दिला. (३८-४०)

विवस्वानाच्या दुसर्‍या पत्नीचे नाव छाया होते. तिच्यापासून शनैश्वर व सावर्णी मनू नावाचे दोन पुत्र आणि तपती नावाची एक कन्या उत्पन्न झाली. तपतीने संवरणाला पतिरूपाने वरले. अर्यमाची पत्नी मातृका होती. तिच्यापासून चर्षणी नावाचे पुत्र झाले. कर्तव्य-अकर्तव्याच्या ज्ञानाने ते संपन्न होते. म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांच्याच आधारे मनुष्यजातीची कल्पना केली. पूषाला काही संतान झाले नाही. प्राचीन काळी जेव्हा शिव दक्षावर क्रुद्ध झाले होते, तेव्हा पूषा दात दाखवून हसत होता, म्हणून वीरभद्राने याचे दात पाडले होते. तेव्हापासून पूषा दळलेले पीठ खातो. दैत्यांची धाकटी बहीण रचना त्वष्टयाची पत्नी होती. रचनेपासून संनिवेश आणि पराक्रमी विश्वरूप असे दोन पुत्र झाले. अशा प्रकारे विश्वरूप जरी शत्रूंचा भाचा होता, तरीसुद्धा जेव्हा देवगुरू बृहस्पतींनी इंद्राकडून अपमान झाल्यावर देवांचा त्याग केला, तेव्हा देवांनी विश्वरूपालाच आपला पुरोहित नेमले होते. (४१-४५)

स्कंध सहावा - अध्याय सहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP