|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ५ वा
श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवंतांची शक्ती प्राप्त झाल्याने, दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवान झाला होता. त्याने पंचजनाची कन्या असिक्नीपासून हर्यश्व नावाचे दहा हजार पुत्र उत्पन्न केले. राजा, दक्षाचे हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते. वडिलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेकडे गेले. पश्चिम दिशेकडे सिंधुनदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे. मोठमोठे मुनी आणि सिद्ध पुरुष तेथे निवास करतात. नारायणसरोवरामध्ये स्नान करताच हर्यश्वांचे अंतःकरण शुद्ध झाले. त्यांना संन्यास घेण्याची बुद्धी उत्पन्न झाली. तरीसुद्धा पित्याच्या आज्ञेच्या बंधनामुळे ते उग्र तपश्चर्या करीत राहिले. देवर्षी नारदांनी ते प्रजावृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, हे पाहून त्यांना म्हटले, अरे हर्यश्वांनो, तुम्ही प्रजापती असलात तरी मूर्ख आहात. जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही, तर प्रजा कशी उत्पन्न कराल ? हे तुमचे करणे विचित्र नव्हे का ! असा एक देश आहे की, जेथे एकच पुरुष आहे. एक असे विवर आहे, जेथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही. एक अशी स्त्री आहे, जी बहुरूपिणी आहे. एक असा पुरुष आहे, जो व्यभिचार करणार्या स्त्रीचा पती आहे. एक अशी नदी आहे, जी मागे-पुढे अशा दोन्ही बाजूंनी वाहाते. एक असे आश्चर्यकारक घर आहे, जे पंचवीस पदार्थांनी बनलेले आहे. एक असा हंस आहे, ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे. एक असे चक्र आहे, जे धारदार असलेले दात आणि वज्राने बनलेले असून ते आपोआप फिरते. हर्यश्वांनो, जोपर्यंत तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजून घेतली नाही, आणि वरील वस्तू पाहिल्या नाहीत, तोपर्यंत त्यांच्या आज्ञेनुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल ? (१-९) श्रीशुक म्हणतात - हर्यश्व जन्मतःच बुद्धिमान होते. देवर्षी नारदांचे हे गूढ बोलणे ऐकून ते आपल्या बुद्धीने स्वतःच विचार करू लागले. ज्याला जीव म्हणतात, ते लिंगशरीरच भू आहे आणि हेच आत्म्याचे अनादी बंधन आहे. याचा विनाश पाहिल्याशिवाय मोक्षाला उपयोगी नसणारी कर्मे करण्यात काय अर्थ आहे ? सर्वसाक्षी ईश्वर एकच आहे. तो सर्वांचा आश्रय आहे, परंतु त्याचा आश्रय कोणी नाही. तोच भगवान होय. त्या नित्यमुक्त परमात्म्याला पाहिल्याशिवाय आणि त्याला समर्पित केल्याविना केल्या जाणार्या कर्मांपासून जीवाला काय लाभ होणार आहे ? जसा पाताळात गेलेला मनुष्य तेथून परत येत नाही, तसाच जीव ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही, जो स्वतः अंतर्ज्योतिःस्वरूप आहे, त्या परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय विनाशी अशी स्वर्गादी फले देणारी कर्मे करण्यापासून काय फायदा ? बहुरूपी आणि सत्त्व, रज, तम या गुणांना धारण करणारी आपली बुद्धीच व्यभिचारी स्त्रीसारखी आहे. तिचे खरे स्वरूप जाणून घेतल्याखेरीज म्हणजेच विवेक प्राप्त केल्याखेरीज अधिकाधिक अशांती वाढविणारी कर्मे करून काय उपयोग ? ही बुद्धीच कुलटा स्त्रीप्रमाणे आहे. हिच्या संगतीनेच जीवाचे ऐश्वर्य म्हणजे त्याची स्वतंत्रता नष्ट झाली आहे. त्या कुलटा स्त्रीच्या पतीप्रमाणे जीव तिच्या पाठीमागे लागून संसारात भटकत असतो. तिच्या सुख-दुःखरूप गती जाणल्याशिवाय, विवेकरहित कर्मे करून काय सिद्धी मिळणार आहे? माया हीच दोन्ही बाजूंनी वाहाणारी नदी आहे. ही सृष्टी निर्माण करते आणि तिचा प्रलयही करते. जे लोक हिच्यातून बाहेर पडण्यासाठी तपश्चर्या, ज्ञान इत्यादी तटांचा आश्रय घेऊ लागतात, त्यांना वाहून नेण्यासाठी क्रोध, अहंकार इत्यादी रूपांत ती आणखी वेगाने वाहू लागते. जो मनुष्य तिच्या वेगाच्या अधीन असून अनभिज्ञ आहे, त्याला मायिक कर्मांपासून कोणता लाभ मिळणार आहे ? ही पंचवीस तत्त्वेच एक अद्भुत घर आहे. पुरुष हा त्यांचा आश्चर्यमय आश्रय आहे. तोच सर्व कार्यकारणात्मक जगाचा अधिष्ठाता आहे. ही गोष्ट समजली नाही, तर खरे स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. म्हणून खोटया स्वतंत्रतेने केली जाणारी कर्मे व्यर्थच होत. भगवंतांचे स्वरूप सांगणारे शास्त्रच हंसाप्रमाणे नीर-क्षीर-विवेकी आहे. ते बंधन-मोक्ष, चेतन आणि जड यांना वेगवेगळे करून दाखविते. असे अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय बहिर्मुख बनविणार्या कर्मांपासून कोणता लाभ होणार आहे ? हा काळ हेच एक चक्र आहे. हे नेहमी फिरत असते. याची धार सुर्याप्रमाणे आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे. आणि हे सार्या जगाला आपल्याकडे खेचते. त्याला थांबविणारे कोणीही नाही. ते संपूर्णपणे स्वतंत्र आहे. ही गोष्ट न जाणता कर्मांची फळे नित्य आहेत असे समजून जे लोक सकाम भावनेने त्यांचे अनुष्ठान करतात, त्यांना त्या अनित्य कर्मापासून काय लाभ होणार ? शास्त्र हाच पिता आहे. कारण दुसरा जन्म शास्त्रामुळेच होतो. आणि त्याची शिकवण कर्मापासून निवृत्त होणे ही होय. हे न जाणता गुणमय शब्दादी विषयांवर जो विश्वास ठेवतो, तो कर्मापासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचे पालन कसे बरे करू शकेल ? राजा, हर्यश्वांनी एकमताने असा निश्चय केला आणि नारदांना प्रदक्षिणा घालून ज्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा परत यावे लागत नाही, त्या मोक्षमार्गाने ते चालू लागले. यानंतर देवर्षी नारद स्वरब्रह्मातील संगीतलहरीमध्ये अभिव्यक्त झालेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे ठिकाणी आपले चित्त अखंड स्थिर करून निरनिराळ्या लोकांत विहार करण्यासाठी गेले. (१०-२२) परीक्षिता, जेव्हा दक्ष प्रजापतीला कळले की आपले शीलवान पुत्र नारदांच्या उपदेशामुळे कर्तव्यच्युत झाले आहेत, तेव्हा तो शोकाने व्याकूळ झाला. चांगले संतान हेसुद्धा शोकाचे कारण होते, हेच खरे ! ब्रह्मदेवांनी दक्षप्रजापतीचे सांत्वन केले. तेव्हा त्याने असिक्नीपासून आणखी एक हजार पुत्र उत्पन्न केले. त्यांचे नाव शबलाश्व होते. तेसुद्धा आपल्या पित्याची आज्ञा घेऊन प्रजानिर्मितीच्या उद्देशाने जेथे त्यांच्या थोरल्या भावांनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती, त्या नारायणसरोवरावर तप करण्यासाठी गेले. तेथे जाऊन शबलाश्वांनी त्या सरोवरात स्नान केले. केवळ स्नानानेच त्यांच्या अंतःकरणातील सर्व दोष धुतले गेले. आता ते परब्रह्मस्वरूप प्रणवाचा (ॐ) चा जप करीत मोठी तपश्चर्या करू लागले. काही महिने केवळ पाणी आणि काही महिने केवळ हवा पिऊनच त्यांनी "आम्ही नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचे ध्यान करतो. ते विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतर्यामी आहेत. तसेच ते सर्वव्यापक व परमहंसस्वरूप आहेत." या मंत्राचा जप करीत मंत्राधिपती भगवंतांची त्यांनी आराधना केली. हे राजेंद्रा, अशा रीतीने दक्षाचे पुत्र शबलाश्व प्रजानिर्मितीसाठी तपश्चर्या करीत होते. त्यांच्याकडेही देवर्षी नारद आले आणि त्यांनी पहिल्याप्रमाणेच गूढ उपदेश केला. ते म्हणाले "दक्ष प्रजापतींच्या पुत्रांनो, मी तुम्हांला जो उपदेश करतो, तो नीट ऐका. बंधूंवर प्रेम करणारे तुम्ही बंधूंच्या मार्गाचेच अनुकरण करा. जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठया भावांच्या श्रेष्ठ आचरणाचे अनुकरण करतो, तो पुण्यवान पुरुष परलोकात मरुद्गणांच्याबरोबर राहून आनंद उपभोगतो. परीक्षिता, अशा प्रकारे शबलाश्वांना उपदेश करून देवर्षी नारद तेथून निघून गेले आणि त्यांनीही आपल्या भावांच्या मार्गाचेच अनुकरण केले. कारण नारदांचे दर्शन कधी व्यर्थ होत नाही. वृत्ती अंतर्मुख होण्याला योग्य, अत्यंत सुंदर आणि भगवत्प्राप्तीसाठी अनुकूल अशा मार्गाचे ते यात्रेकरू झाले. निघून गेलेल्या रात्रींप्रमाणे ते अजूनही परत आलेले नाहीत. (२३-३३) दक्षप्रजापतीला याच सुमारास पुष्कळ अपशकून होऊ लागले होते. तेवढयात मागील वेळेप्रमाणे यावेळीसुद्धा नारदांनी आपल्या मुलांना बिघडवल्याचे त्याने ऐकले. मुले कर्तव्यच्युत झाल्याचे पाहून त्याला अत्यंत शोक झाला. त्याला नारदांचा भयंकर राग आला. ते भेटताच दक्षप्रजापतीचा क्रोध अनावर झाला आणि त्याचे ओठ थरथरू लागले. तो नारदांना म्हणाला. (३४-३५) दक्ष म्हणाला - अरे दुष्टा, तू साधूचे सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवून वाईट कृत्य केलेस. अजून त्यांनी ब्रह्मचर्याने ऋषिऋण, यज्ञाने देवऋण आणि पुत्रोत्पत्तीने पितृऋण फेडलेले नाही. कर्मफलाच्या नश्वरतेबद्दलही त्यांना माहिती नाही. परंतु हे पाप्या, तू त्यांच्या दोन्ही लोकांच्या सुखाचा घात केलास. तू निर्दय आहेस. तू अशाप्रकारे मुलांचा बुद्धिभेद करणारा आहेस. भगवंतांच्या पार्षदांमध्ये राहून त्यांच्या कीर्तीला कलंक लावला आहेस. तू अगदी निर्लज्ज आहेस. तुझ्याशिवाय इतर भगवद्भक्त नेहमी प्राण्यांवर दया करण्यात तत्पर असतात. परंतु तू मात्र प्राण्यांचे अहित करणारा आहेस. अजात-शत्रूंशीही तू वैर करतोस. केवळ वैराग्यानेच स्नेहपाश तुटतो, असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण ज्ञानाशिवाय वैराग्याचे सोंग करणार्या तुझ्या उपदेशाने कोणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही. विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याची दुःखरूपता समजत नाही. म्हणून त्यांच्या दुःखाचा अनुभव घेतल्यानंतर आपोआप जसे वैराग्य निर्माण होते, तसे दुसर्याच्या सांगण्यावरून होत नाही. आम्ही सद्गृहस्थ आहोत. आपल्या धर्ममर्यादांचे पालन करणारे आहोत. यापूर्वीसुद्धा तू आम्हांला न आवडणारी असह्य गोष्ट केली होतीस. एकवेळ आम्ही ती सहन केली. तू तर आमची वंशपरंपरा उध्वस्त करणारा आहेस. तू आमच्याशी पुन्हा तसाच दुष्टपणा केलास. म्हणून मूर्खा, लोकांतरांमध्ये भटकताना तू एका जागी स्थिर राहू शकणार नाहीस. (३६-४३) श्रीशुक म्हणाले - संतशिरोमणी देवर्षी नारदांनी ‘ठीक’ म्हणून दक्षाच्या शापाचा स्वीकार केला. बदला घेण्याची शक्ती असूनसुद्धा दुसर्याने केलेला अपकार सहन करणे, यालाच ‘साधुता’ म्हणतात. (४४) स्कंध सहावा - अध्याय पाचवा समाप्त |