श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय ४ था

दक्षाकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने विचारले - भगवन, आपण थोडक्यात स्वायंभुव मन्वन्तरामध्ये देव, असुर, मनुष्य, साप आणि पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली, हे सांगितले. परम कारण भगवानांनी आपल्या ज्या शक्तीने, ज्या प्रकारे त्याच्यानंतरची सृष्टिरचना केली, ती विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. (१-२)

सूत म्हणतात - शौनकादी ऋषींनो, महायोगी व्यासनंदन श्रीशुकदेवांनी हा सुंदर प्रश्न ऐकून त्याचे अभिनंदन केले आणि म्हटले. (३)

श्रीशुक म्हणाले - राजा प्राचीनबर्हिचे प्रचेता नावाचे दहा पुत्र जेव्हा समुद्राच्या बाहेर आले, तेव्हा त्यांना सगळी पृथ्वी वृक्षांनी भरून गेलेली आढळली. त्यांना वृक्षांचा फार राग आला. तपोबलामुळे तर त्यांचा क्रोध आणखी भडकला. वृक्षांना जाळण्यासाठी त्यांनी आपल्या मुखातून वायू आणि अग्नी उत्पन्न केले. परीक्षिता, जेव्हा अग्नी आणि वायू वृक्षांना जाळू लागले, तेव्हा वृक्षांचा राजाधिराज चंद्र त्यांचा क्रोध शांत करीत त्यांना म्हणाला, हे महाभाग्यवान प्रचेतांनो, आपण बिचार्‍या झाडांचा द्वेष करू नका. कारण आपण प्रजेची वृद्धी करू इच्छिणारे प्रजापती मानले गेलेले आहात. अहो ! प्रजापतींचे अधिपती अशा अविनाशी भगवान श्रीहरींनी सर्व वनस्पती आणि औषधी यांना प्रजेच्या खाण्यापिण्यासाठी निर्माण केले आहे. (४-८)

जगात पंखांनी उडणार्‍या, चालत्या-फिरत्या प्राण्यांच्या भोजनासाठी फल-पुष्पादी स्थिर पदार्थ आहेत, पायांनी चालणार्‍यांसाठी गवत इत्यादी बिनपायांचे पदार्थ भोजन आहेत, हात असणार्‍यांसाठी वृक्ष-वेली इत्यादी बिनहातांचे आणि दोन पायांच्या माणसांसाठी धान्य, गहू इत्यादी अन्न आहे. चार पायांचे बैल, उंट इत्यादी शेतीतून उत्पन्न होणार्‍या अन्नासाठी सहाय्यक आहेत. हे पुण्यशील प्रचेतांनो, आपल्याला पित्याने आणि देवाधिदेव भगवंतांनी अशी आज्ञा केली आहे की, प्रजेची उत्पत्ती करा. मग (त्यांचे अन्न असणारे) वृक्ष जाळून कसे चालेल ? आपण आपला राग आवरा आणि आपले पिता, आजोबा, पणजोबा इत्यादींनी अनुकरण केलेल्या सत्पुरुषांच्या मार्गाने जा. आई-वडील मुलांचे, पापण्या डोळ्यांचे, पती पत्नीचे, गृहस्थ भिक्षुकांचे आणि ज्ञानी अज्ञान्यांचे हितचिंतक व रक्षण करणारे असतात. सर्व प्राण्यांच्या शरीरांमध्ये भगवान श्रीहरी आत्म्याच्या रूपाने राहातात. म्हणून आपण सर्वांना भगवंतांचे निवासस्थान समजा आणि असे कराल तर भगवंतांनाच प्रसन्न कराल. जो मनुष्य अकस्मात उत्पन्न झालेल्या भयंकर क्रोधाला आत्मविचाराने शांत करतो, तोच तिन्ही गुणांवर विजय मिळवतो. या गरीब बिचार्‍या वृक्षांना आणखी जाळू नका. जे काही शिल्लक आहेत, त्यांचे रक्षण करा. त्यामुळे आपलेही कल्याण होईल. या उत्तम कन्येचे पालन या वृक्षांनीच केले आहे. हिचा आपण पत्नी म्हणून स्वीकार करा. (९-१५)

परीक्षिता, वनस्पतींचा राजा चंद्र याने प्रचेतांना अशा प्रकारे समजावून त्यांना प्रम्लोचा अप्सरेची सुंदर कन्या दिली आणि तो निघून गेला. नंतर प्रचेतांनी धर्मानुसार तिचे पाणिग्रहण केले. त्या प्रचेतांना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला. नंतर दक्षाच्या संततीने तिन्ही लोक भरून गेले. कन्यांवर प्रेम असणार्‍या त्याने ज्याप्रकारे संकल्पाने आणि वीर्याने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली, ती मी तुला सांगतो. तू लक्ष देऊन ऐक. (१६-१८)

परीक्षिता, अगोदर प्रजापती दक्षाने पाणी, जमीन आणि आकाशात राहाणारे देव, असुर, मनुष्य इत्यादी प्रजा संकल्पानेच उत्पन्न केली. जेव्हा त्याला असे दिसले की, या सृष्टीची वाढ होत नाही, तेव्हा त्याने विंध्याचलाच्या टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली. तेथे ‘अघमर्षण’ नावाचे एक अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे. ते सर्व पापे धुऊन काढते. दक्षाने त्या तीर्थात त्रिकाल स्नान करून तपश्चर्येने भगवंतांना संतुष्ट केले. दक्षाने भगवान अधोक्षजांची हंसगुह्य नामक स्तोत्राने स्तुती केली. त्यामुळेच भगवंत त्याच्यावर प्रसन्न झाले. ती स्तुती मी तुला सांगतो. (१९-२२)

प्रजापती म्हणाले - भगवन, आपली चित्‌शक्ती अमोघ असून आपण जीव आणि प्रकृतीचे नियंत्रक आहात. जे जीव त्रिगुणात्मक सृष्टीलाच सत्य समजतात, ते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करू शकत नाहीत. कारण आपण कोणत्याही प्रमाणाने कळणारे नाही. स्वयंप्रकाशी आणि परात्पर अशा आपल्याला मी नमस्कार करतो. जसे विषय आपल्याला प्रकाशित करणार्‍या इंद्रियांना जाणत नाहीत, तसे जीव आणि ईश्वर शरीरात एकत्र निवास करत असूनही जीव, द्रष्टा असणार्‍या तुमचे प्रकाशकत्व जाणत नाही. अशा सर्वशक्तिमान आपल्याला मी नमस्कार करतो. देह, प्राण, इंद्रिये, अंतःकरणाच्या वृत्ती, पंचमहाभूते आणि त्यांच्या तन्मात्रा, हे सर्व जड असल्याकारणाने स्वतःला आणि स्वतःव्यतिरिक्त दुसर्‍याला जाणत नाहीत. परंतु जीव या सर्वांना आणि यांचे कारण अशा तीन गुणांनाही जाणतो. परंतु तो जीव सर्वांचे ज्ञाते आणि अनंत अशा तुम्हांला जाणू शकत नाही. हे प्रभो, अशा आपली मी स्तुती करतो. जेव्हा समाधिकालात दर्शन आणि स्मरणशक्तीचा लोप झाल्याने या नाम-रूप जाणणार्‍या मनाचा लय होतो, त्यावेळी आपण सच्चिदानंदमय स्वरूपाने स्वतःच प्रकाशित होत असता. हे प्रभो, शुद्ध हृदयमंदिरात राहाणार्‍या शुद्ध अशा आपणांस माझा नमस्कार असो. जसे यज्ञ करणारे लोक लाकडात सुप्त असलेल्या अग्नीला ‘सामिधेनी’, नावाच्या पंधरा मंत्रांनी प्रगट करतात, तसेच ज्ञानी लोक आपल्या सत्तावीस शक्तींच्या द्वारा गुप्तपणे हृदयात लपलेल्या तुम्हांला शुद्ध बुद्धीने हृदयातच शोधतात. जगामध्ये जो वेगळेपणा दिसतो, तो सर्व मायेचाच आहे. मायेचा निषेध केल्यानंतर परम सुखाचे साक्षात्कारस्वरूप असे आपणच शिल्लक राहता. परंतु विचारांती आपल्या ठिकाणी मायेचे अस्तित्व जाणवत नाही. अर्थात मायाही आपणच आहात. म्हणून सर्व नामे आणि सर्व रूपे आपलीच आहेत. प्रभो, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. जे काही वाणीने बोलले जाते किंवा जे काही मन, बुद्धी, आणि इंद्रियांनी ग्रहण केले जाते, ते आपले स्वरूप नाही. कारण ते गुणरूप आहे आणि आपण तर गुणांच्या उत्पत्तिप्रलयाचे अधिष्ठान आहात. भगवन, आपल्यामध्येच हे सर्व जग राहिलेले आहे. आपल्यापासूनच निर्माण झाले आहे आणि आपणच याची निर्मिती केली आहे. हे आपलेच असून स्वतःसाठीच आहे. याच्या रूपात निर्माण होणारेही आपण आणि निर्माण करणारेही आपणच आहात. बनणे-बनविणे या क्रियाही आपणच आहात. आपणच सर्वांकडून काम करून घेणारे आहात. जेव्हा कार्य आणि कारण यात भेद नव्हता, तेव्हासुद्धा आपण स्वयंसिद्ध स्वरूपात होतात. आपण जीव-जगतातील भेद आणि स्वगतभेद यापेक्षा सर्वथा वेगळे असे एक, अद्वितीय ब्रह्म आहात. आपल्याच शक्ती, वादी-प्रतिवादी यांच्यातील विवाद आणि संवाद यांचा विषय असतात आणि त्यांना वारंवार मोहात टाकतात. अनंत गुणांनी युक्त, सर्वव्यापी अशा आपणाला नमस्कार असो. योगवादी उपासक म्हणतात की, आमचे प्रभू साकार आहेत आणि सांख्यवादी ज्ञानी म्हणतात की भगवंत निराकार आहेत. अशा प्रकारे ते जरी एकाच वस्तूच्या दोन परस्पर विरोधी धर्मांचे वर्णन करत असले, तरीसुद्धा त्यांमध्ये विरोध नाही. कारण हे दोन्हीही धर्म एकाच वस्तूचे आहेत. ती वस्तू म्हणजे आहे-नाहीचा विरोध नसलेले सम परब्रह्म आपण आहात. आपण नामरूपरहित भगवान अनंत आहात. तरीसुद्धा जे आपल्या चरणकमलांचे भजन करतात, त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी आपण अनेक रूपांमध्ये प्रगट होऊन अनेक लीला करता आणि त्या रूपांना व लीलांना अनुसरून अनेक नावे धारण करता. अशा आपण माझ्यावर कृपा करावी. सुगंध वाहून नेणारा वारा सुगंधित झाल्यासारखा वाटतो, परंतु वास्तविक तो सुगंधित नसतो. त्याप्रमाणे आपण सर्वांच्या हृदयात राहून त्यांच्या सामान्य भावनेनुसार भिन्न-भिन्न देवतांच्या रूपात प्रतीत होत असता. अशा प्रभूंनी माझी अभिलाषा पूर्ण करावी. (२३-३४)

श्रीशुकाचार्य म्हणाले - परीक्षिता, विंध्याचलाच्या त्या अघमर्षण तीर्थांवर जेव्हा प्रजापती दक्षाने अशी स्तुती केली, तेव्हा भक्तवत्सल भगवान त्यांच्यासमोर प्रगट झाले. त्यावेळी भगवंतांनी गरुडाच्या खांद्यावर चरण ठेवले होते. त्यांचे विशाल आणि दीर्घ असे आठ हात होते. त्यांत त्यांनी चक्र, शंख, तलवार, ढाल, बाण, धनुष्य, पाश आणि गदा ही आयुधे धारण केली होती. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे असणार्‍या श्यामल शरीरावर पीतांबर झळकत होता. मुखमंडल प्रफुल्लित होते. नेत्रांतून कृपेचा वर्षाव होत होता. गळ्यात वनमाळा धारण केली होती. वक्षःस्थळावर श्रीवत्सचिन्ह आणि कौस्तुभमणि शोभत होता. बहुमोल किरीट, कडी, तेजस्वी मकराकृती कुंडले, कमरपटटा, अंगठया, पायांतील कडी, नूपुरे आणि बाजूबंद यांनी ते शोभून दिसत होते. त्रिभुवनपती भगवंतांनी त्रैलोक्याला मोहिनी घालणारे रूप धारण केले होते. नारद, नंद, सुनंद इत्यादी पार्षद आणि लोकपाल त्यांच्याबरोबर होते. सिद्ध, गंधर्व आणि चारण भगवंतांच्या गुणांचे गायन करीत होते. हे अत्यंत आश्चर्ययुक्त आणि अलौकिक रूप पाहून दक्षप्रजापती बावरला. प्रजापती दक्षाने आनंदित होऊन भगवंतांना साष्टांग प्रणाम केला. झर्‍यांच्या पाण्याने जशा नद्या भरून जातात, तशी परमानंदाच्या उद्रेकाने त्याची इंद्रिये उचंबळून आली आणि अतिशय आनंदित झाल्याने तो काहीच बोलू शकला नाही. अत्यंत नम्रपणे उभ्या असलेल्या व प्रजावृद्धीची इच्छा करणार्‍या, भक्त प्रजापतीला सर्वांच्या हृदयातील जाणणारे भगवान म्हणाले. (३५-४२)

श्रीभगवान म्हणाले - महाभाग्यवान दक्षा, तपश्चर्येने तू सिद्ध झाला आहेस. कारण माझ्यावरील अत्यंत श्रद्धेने तुझ्या हृदयात माझ्याबद्दल परम प्रेम उत्पन्न झाले आहे. हे प्रजापते, तू या विश्वाची वृद्धी व्हावी, म्हणून तपश्चर्या केली आहेस. यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. कारण जगातील सर्व प्राण्यांची वाढ व्हावी व ते समृद्ध व्हावेत, हीच माझीही इच्छा आहे. ब्रह्मदेव, शंकर, तुझ्यासारखे प्रजापती, स्वायंभुवादी मनू तसेच इंद्रादी देवेश्वर हे सर्वजण माझ्या विभूती आहेत आणि हे सर्वजण प्राण्यांचा उत्कर्ष करणारे आहेत. हे ब्रह्मन, तपश्चर्या हे माझे हृदय आहे, विद्या शरीर आहे, कर्म आकृती आहे, यज्ञ अंगे आहेत, धर्म मन आहे आणि देवता प्राण आहेत. जेव्हा ही सृष्टी नव्हती, तेव्हा फक्त मीच होतो आणि तेसुद्धा निष्क्रिय स्वरूपात. आत-बाहेर कोठेही काहीही नव्हते. मी फक्त ज्ञानस्वरूप आणि अव्यक्त होतो. असे समज की, सगळीकडे जणू झोपच झोप होती. मी अनंत गुणांचा आधार असून स्वतः अनंत आहे. जेव्हा गुणमय मायेच्या क्षोभाने हे ब्रह्मांड-शरीर प्रगट झाले, तेव्हा यामध्ये अयोनिज आदिपुरुष ब्रह्मदेव उत्पन्न झाला. जेव्हा मी त्याच्यामध्ये शक्ती आणि चेतनेचा संचार केला, तेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी उद्युक्त झाला. परंतु त्याला आपण सृष्टिनिर्माणकार्यात असमर्थ आहोत, असे वाटले. जेव्हा मी त्याला आज्ञा केली की, तप कर. तेव्हा त्याने घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या प्रभावाने सर्वप्रथम तुम्हां नऊ प्रजापतींची उत्पत्ती केली. (४३-५०)

प्रिय दक्षा, ही पंचजन प्रजापतीची कन्या असिक्नी आहे. हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. आता तू स्त्रीसहवासरूप धर्माचा स्वीकार कर. ही असिक्नीसुद्धा त्याच धर्माचा स्वीकार करील. तेव्हा तू हिच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न करशील. आता तुझ्यानंतर सर्व प्रजा माझ्या मायेमुळे स्त्री-पुरुष संयोगानेच उत्पन्न होईल व माझ्या सेवेत तत्पर राहील. (५१-५३)

श्रीशुक म्हणतात - असे म्हणून विश्वाचे जीवनदाते भगवान श्रीहरी दक्षाच्या समोरच, स्वप्नात पाहिलेली वस्तू जागे होताच लुप्त होते त्याप्रमाणे, अंतर्धान पावले. (५४)

स्कंध सहावा - अध्याय चवथा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP