श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय ३ रा

यम आणि यमदूतांचा संवाद -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने विचारले - ऋषिवर्य, सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंतांच्या पार्षदांनी त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्यांच्या दूतांचा अपमान केला. जेव्हा त्यांच्या दूतांनी अजामिळाचा वृत्तांत सांगितला, तेव्हा तो ऐकून ते आपल्या दूतांना काय म्हणाले ? कोणीही धर्मराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे मी यापूर्वी ऐकले नाही. मुनिवर्य, याविषयी लोकांच्या मनातील संशय आपल्याशिवाय दुसरा कोणी दूर करू शकणार नाही. असे माझे निश्चित मत आहे. (१-२)

श्रीशुकाचार्य म्हणाले - परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी यमदूतांच्या कामात अडथळा आणला, तेव्हा त्या लोकांनी संयमनी पुरीचे स्वामी आणि आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले. (३)

यमदूत म्हणाले - प्रभो ! पाप, पुण्य किंवा मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे संसारातील जीव करीत असतात. या जीवांना त्या कर्मांचे फळ देणारे शासक जगात किती आहेत ? जगात दंड देणारे जर जास्त शासक असतील, तर कोणाला सुख किंवा दुःख मिळावे आणि कोणाला मिळू नये हे कोण ठरवणार ? जगात कर्म करणारे अनेक असल्याकारणाने जर त्यांचे शासकही अनेक असतील तर त्या शासकांचा अधिकार नाममात्रच राहील. जसा एका सम्राटाच्या अधीन पुष्कळ नाममात्र सामंत असतात, तसा. म्हणून आम्हांला वाटते की, आपण एकटेच सर्व प्राणी आणि देव यांचे अधीश्वर आहात. आपणच मनुष्यांच्या पाप-पुण्याचा निर्णय करणारे, दंड देणारे आणि शासक आहात. जगात आजपर्यंत कोठेही आपण दिलेला दंड मोडला गेला नाही. परंतु या वेळी मात्र चार अद्‍भुत सिद्धांनी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे. आपल्या आज्ञेने आम्ही एका पापी माणसाला यातनागृहाकडे नेत असताना त्यांनी बळजबरीने आपला फास तोडून त्याला सोडविले. त्या अजामिळाच्या तोंडून नारायण हा शब्द निघताच "भिऊ नकोस" असे म्हणत ताबडतोब जे तेथे येऊन पोहोचले, त्यांचे रहस्य आम्ही आपल्याकडून जाणू इच्छितो. ते ऐकण्यास आम्ही अधिकारी असलो तर सांगावे. (४-१०)

श्रीशुक म्हणाले - जेव्हा दूतांनी असा प्रश्न केला, तेव्हा प्रजेचे शासक यमराज प्रसन्नपणे श्रीहरींच्या चरणकमलांचे स्मरण करीत त्यांना म्हणाले. (११)

यमराज म्हणाले - माझ्याव्यतिरिक्त आणखीही एकजण या चराचर जगताचे स्वामी आहेत. हे संपूर्ण जग त्यांच्यामध्येच वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे. त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा, विष्णू, आणि शंकर या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतात. हे सर्व जग नाकात वेसण घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांच्या अधीन आहे. जसे शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोर्‍यांनी बांधून नंतर त्या दोर्‍या एका मोठया आडव्या दोराने बांधतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी सुद्धा ब्राह्मणादी वर्ण आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमरूप लहान लहान नावांच्या दोर्‍यांत बांधून पुन्हा सर्व नावांना वेदवाणीरूप मोठया दोराने बांधून ठेवले आहे. अशा प्रकारे सर्व जीव, नाव आणि कर्मरूप बंधनात बांधलेले भयभीत होऊन भगवंतांनाच आपले सर्वस्व अर्पण करीत आहेत. मी, इंद्र, निऋती, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्मा, बारा आदित्य, विश्वेदेव, आठ वसू, साध्य, एकोणपन्नास मरुद्‍गण, सिद्ध, अकरा रुद्र, रजोगुण-तमोगुण-विरहित भृगू इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठे देव सर्वच्या सर्व सत्त्वप्रधान असूनही त्यांच्या मायेच्या अधीन आहोत. आम्ही कोणीही भगवंतांची लीला जाणत नाही. तर इतरांविषयी काय सांगावे ? दूतांनो, ज्याप्रमाणे घट, पट इत्यादी पदार्थ आपल्याला पाहाणार्‍या डोळ्यांना पाहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे अंतःकरणात साक्षीरूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी इंद्रिये, मन, प्राण, हृदय किंवा वाणी यांसारख्या कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाही. ते प्रभू सर्वांचे स्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत. त्याच मायापती पुरुषोत्तमांचे बहुधा त्यांच्याचसारखे मनोहर रूप, गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या लोकात भ्रमण करतात. (१२-१७)

भगवान विष्णूंच्या, देवांनाही पूजनीय अशा अतिशय अलौकिक पार्षदांचे दर्शन दुर्लभ आहे. ते भगवंतांच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूंपासून, माझ्यापासून आणि अग्नी इत्यादी संकटांपासून नेहमी सुरक्षित ठेवतात. (१८)

साक्षात भगवंतांनी निर्माण केलेला धर्म ऋषी, देव किंवा सिद्धगणही जाणत नाहीत, तर मग मनुष्य, विद्याधर, चारण, असुर वगैरे कसे जाणू शकतील ? भगवंतांनी निर्माण केलेला भागवतधर्म परम शुद्ध, गोपनीय आणि कळण्यास कठीण आहे. जो, हा धर्म जाणतो, तो भगवत्स्वरूपाला प्राप्त होतो. भागवतधर्माचे रहस्य ब्रह्मदेव, देवर्षी नारद, भगवान शंकर, सनत्कुमार, कपिलदेव, स्वायंभुव मनू, प्रल्हाद, जनक, भीष्मपितामह, बली, शुकदेव आणि मी असे आम्ही बाराजणच जाणतो. या जगात जीवांसाठी हाच सगळ्यांत मोठा धर्म आहे की, त्यांनी नामसंकीर्तनादी उपायांनी भगवंतांच्या चरणांविषयी भक्तिभाव प्राप्त करून घ्यावा. प्रिय दूतांनो, भगवंतांच्या नामोच्चरणाचा महिमा तर पहा ! अजामिळासारखा पापीसुद्धा ज्याच्यामुळेच मृत्यूपाशातून सुटला. भगवंतांचे गुण, लीला आणि नामांचे श्रद्धायुक्त केलेले कीर्तन मनुष्यांच्या पापांचा संपूर्णपणे नाश करते, हे काही त्याचे फार मोठे फळ नाही. कारण अत्यंत पापी अशा अजामिळाने मरतेवेळी अस्वस्थ असताना आपल्या पुत्राचे ‘नारायण’ नाव कसेबसे उच्चारले. पण एवढयानेच त्याला मुक्तीसुद्धा मिळाली. भगवंतांच्या मायेने मोहित झालेली विद्वानांची बुद्धी स्वर्गादी गोड फळांचे वर्णन करणार्‍या वेदवाणीत आसक्त होते. त्यामुळे यज्ञयागादी मोठ-मोठया कर्मांचे त्यांना महत्त्व वाटते. आणि या सोप्या भगवन्नामाचा महिमा बहुधा ते जाणत नाहीत. ही किती खेदाची गोष्ट आहे ! (१९-२५)

बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अनंतांमध्येच अंतःकरणपूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात, ते माझ्या दंडाला पात्र नाहीत. जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले, तरी भगवंतांचे गुणगान ते तत्काळ नष्ट करते. जे समदर्शी साधू भगवंतांनाच शरण जातात, त्यांच्या पवित्र चरित्राचे मोठ-मोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान गातात. दूतांनो, भगवंतांची गदा नेहमी त्यांचे रक्षण करते. तुम्ही त्यांच्या जवळही जाऊ नका. आमच्यात किंवा साक्षात काळामध्येही त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही. दिव्य रस जाणणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवान मुकुंदाच्या चरणारविंदांच्या मकरंदाचे पान करतात. जे अभक्त त्या दिव्य रसाला विन्मुख होऊन नरकाचा मार्ग असलेल्या घरादिकांचा लोभ धरतात, त्यांना माझ्याकडे (खुशाल) घेऊन या. ज्यांची जीभ भगवंतांचे गुण आणि नाम यांचा उच्चार करीत नाही, ज्यांचे चित्त त्यांच्या चरणारविंदांचे चिंतन करीत नाही, आणि ज्यांचे मस्तक एकवेळसुद्धा श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करीत नाही, त्या भगवत्सेवाविन्मुख पापी लोकांना माझ्याकडे घेऊन या. माझ्या दूतांनी भगवंतांचा जो अपराध केला, त्याची पुराणपुरुष भगवान नारायण क्षमा करोत. अज्ञानी असले तरी हात जोडून प्रार्थना करणार्‍या भक्तांच्या मोठया अपराधालाही भगवंतांनी क्षमा करणे हेच योग्य आहे. त्या सर्वव्यापी प्रभूंना नमस्कार असो. (२६-३०)

परीक्षिता, म्हणून तू असे समज की, मोठ-मोठयासुद्धा पापांचे खात्रीचे प्रायश्चित्त म्हणजे जगाचे कल्याण करणारे भगवंतांचे नामसंकीर्तन हे होय. जे लोक भगवंतांच्या उदार चरित्रांचे वारंवार श्रवण कीर्तन करतात, त्यांच्या हृदयामध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो. त्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते, तशी कृच्छ्र-चांद्रायणादी व्रतांनी होत नाही. जो मनुष्य श्रीकृष्णांच्या चरणारविंदांचा लोभी भ्रमर होतो, तो स्वभावतःच मायेच्या अधःपतन करणार्‍या, दुःखद आणि पहिल्यापासूनच सोडलेल्या विषयांमध्ये पुन्हा रममाण होत नाही. परंतु कामनांनी ज्याची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे, तो आपल्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी पुन्हा दोष उत्पन्न करणारे प्रायश्चित्तरूप कर्मच करतो. (३१-३३)

परीक्षिता, जेव्हा यमदूतांनी आपल्या स्वामींनी सांगितलेला भगवंतांचा असा महिमा ऐकला, तेव्हा त्या प्रसंगाचे स्मरण होताच त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तेव्हापासून ते धर्मराजांच्या वचनावर विश्वास ठेवून आपला नाश होईल, या शंकेने भगवंतांचे आश्रित असलेल्या भक्तांजवळ जात नाहीत. एवढेच काय, ते त्यांच्याकडे नजर वर करून पाहाण्यासही भितात. हा गोपनीय इतिहास आहे. मलयपर्वतावर असलेल्या श्रीहरीची पूजा करणार्‍या भगवान अगस्त्यांनी तो मला सांगितला होता. (३४-३५)

स्कंध सहावा - अध्याय तिसरा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP