श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय २ रा

विष्णुदूतांकडून भागवत-धर्म-निरूपण आणि अजामिळाचे परमधामगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणाले - राजा, धर्माचे मर्म जाणणार्‍या भगवंतांच्या दूतांनी यमदूतांचे हे भाषण ऐकून ते त्यांना म्हणाले. (१)

विष्णुदूत म्हणाले - यमदूतांनो, ही मोठी खेदाची बाब आहे की, धर्मज्ञांच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागला आहे; कारण जेथे निष्पाप आणि अदंडनीय व्यक्तींना यांच्याकडून विनाकारणच दंड दिला जात आहे. जे प्रजेचे रक्षक, शासक, समान दृष्टी ठेवणारे आणि सज्जन आहेत, तेच जर अन्याय करू लागले, तर प्रजेने कोणाला शरण जावे बरे ? सत्पुरुष जसे आचरण करतात, तसेच सामान्य लोकही करतात. ते ज्याला प्रमाण मानतात, त्याचेच लोक अनुकरण करतात व त्याच्या मांडीवर डोके ठेवून ते निश्चिंतपणे झोपी जातात. सामान्य लोक, पशूंप्रमाणे स्वतः धर्म किंवा अधर्माचे स्वरूप जाणत नाहीत. मित्रभावाने आत्मसमर्पण केलेल्या त्या अज्ञानी जीवांचा अत्यंत विश्वासू आणि दयाळू सत्पुरुषाने विश्वासघात करणे कसे योग्य आहे ? (२-६)

याने कोटयवधी जन्मांच्या पापांच्या राशींचे प्रायश्चित्त घेतले आहे, कारण विवश होऊन का होईना, याने भगवंतांच्या परम कल्याणकारक नावाचे उच्चारण केले आहे. ज्या क्षणी याने ‘नारायणा’ ये, या चार अक्षरांचा उच्चार केला, त्याचवेळी केवळ तेवढयानेच या पाप्याच्या सर्व पापांचे प्रायश्चित्त पूर्ण झाले. चोर, मद्यपी, मित्रद्रोही, ब्रह्मघाती, गुरुपत्नीसमागमी, स्त्री, राजा, पिता आणि गाईला मारणारा, तसेच यासारखे दुसरे जे पापी असतील त्या सर्वांसाठी हेच सगळ्यात मोठे प्रायश्चित्त आहे की त्यांनी भगवंतांच्या नावाचा उच्चार करणे. कारण मनुष्यांची बुद्धी भगवंतांशी जोडलेली असते. ब्रह्मवादी ऋषींनी पापनिर्दालनासाठी सांगितलेल्या प्रायश्चित्तादिकांनी किंवा व्रतादिकांनी पापी माणसाची तशी शुद्धी होत नाही जशी भगवंतांच्या नावांनी गुंफलेल्या पदांच्या उच्चारणाने होते. कारण ती नावे भगवंतांच्या गुणांचे ज्ञान करून देणारी असतात. प्रायश्चित्त घेतल्यानंतरही जर मन पुनः पापकर्माकडे धावत गेले, तर ते पूर्ण प्रायश्चित्त होऊ शकत नाही. म्हणून पापांचा समूळ नाश करायची इच्छा असेल त्यांनी भगवंतांच्या गुणांचेच वर्णन केले पाहिजे. कारण त्यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होते. (७-१२)

म्हणून तुम्ही सर्व पापांचे निरसन केलेल्या अजामिळाला घेऊन जाऊ नका. कारण त्याने मरतेवेळी भगवंतांच्या नावाचा उच्चार केला आहे. (१३)

दुसर्‍या कोणत्याही हेतूने, थटेटेने, तान घेण्याच्या निमित्ताने किंवा अवहेलना करण्यासाठी का होईना, जर कोणी भगवंतांच्या नावाचा उच्चार करील, तर त्याची सर्व पापे नाहीशी होतात, असे संत सांगतात. जो मनुष्य पडताना, पाय घसरताना, शरीराला पीडा होताना, साप चावला असताना, आगीने पोळला असताना किंवा ठेच लागली असतानाही असहाय्य होऊन ‘हरी-हरी’ म्हणतो, तो यमयातनेला पात्र होत नाही. महर्षींनी विचार करून मोठया पापांसाठी मोठी आणि लहान पापांसाठी लहान प्रायश्चित्ते सांगितली आहेत. तपश्चर्या, दान, जप इत्यादी प्रायश्चित्तांनी ती पापे नाहीशी होतात, यात संदेह नाही. परंतु त्या पापांनी मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही. भगवंतांच्या चरणांच्या सेवेने तेही शुद्ध होऊन जाते. अग्नीचा इंधनाला स्पर्श झाला, तर त्याचे भस्म होऊन जाते, तसेच जाणून-बुजून किंवा अजाणतेपणाने भगवंतांच्या नावाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होऊन जातात. अत्यंत शक्तिशाली औषध त्याचा गुणधर्म न जाणताही अजाणतेपणाने प्याले तरी ते पिणार्‍याला गुण देते, तसेच अजाणतेपणाने उच्चार केल्यानेही भगवंतांचे नाव फळ देते. (१४-१९)

श्रीशुक म्हणतात - राजन, अशा प्रकारे भगवंतांच्या पार्षदांनी भागवत धर्माचा संपूर्ण निर्णय ऐकवून अजामिळाला यमदूतांच्या पाशातून सोडवून मृत्यूमुखातून वाचविले. हे शत्रुंजय राजा, पार्षदांचे हे म्हणणे ऐकून यमदूत यमराजाकडे गेले आणि त्यांना हा सर्व वृत्तांत त्यांनी जसाच्या तसा सांगितला. (२०-२१)

अजामिळ यमदूतांच्या फासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला. त्याने भगवंतांच्या पार्षदांच्या दर्शनाने आनंदित होऊन मस्तक लववून त्यांना नमस्कार केला. पुण्यशील परीक्षिता, अजामिळ काहीतरी बोलू इच्छितो असे जेव्हा विष्णुदूतांनी पाहिले, तेव्हा ते लगेच त्याच्यादेखतच अंतर्धान पावले. यानिमित्ताने अजामिळाने भगवंतांच्या पार्षदांकडून विशुद्ध भागवतधर्म आणि यमदूतांच्या तोंडून वेदोक्त प्रवृत्तिविषयक धर्माचे श्रवण केले होते. सर्वपापहारी भगवंतांचा महिमा ऐकल्याने अजामिळाच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला. आता त्याला आपली पापे आठवून त्याबद्दल फार पश्चात्ताप होऊ लागला. (अजामिळ विचार करू लागला-) अरेरे ! मी असा कसा इंद्रियांचा दास बनलो ! एका दासीपासून पुत्रांना जन्म देऊन मी आपले ब्राह्मणत्व नष्ट केले. ही मोठी वाईट गोष्ट झाली. माझा धिक्कार असो ! मी संतांच्या निंदेला पात्र झालो. मी पापी आहे ! मी माझ्या कुळाला कलंक लावला. अरेरे ! मी माझ्या पतिव्रता बाळबोध पत्नीला सोडून मद्यपान करणार्‍या वेश्येशी संबंध ठेवला. मी किती नीच आहे ? माझे आई-वडील बिचारे वृद्ध व असहाय्य होते. त्यांची सेवा-शुश्रूषा करणारा अन्य कोणीही नव्हता. तरी मी त्यांचा त्याग केला. अरेरे ! मी किती कृतघ्न आहे ! मी आता खात्रीने अत्यंत भयानक अशा नरकात जाऊन पडणार ! जेथे अधर्मी, कामी लोक अनेक प्रकारच्या यमयातना भोगतात. (२२-२९)

मी आता जे अद्भुत दृश्य पाहिले ते स्वप्न होते की खरे ! आताच जे हातात फास घेऊन मला ओढून नेत होते, ते कोठे गेले ? फासामध्ये अडकवून पृथ्वीच्या खाली घेऊन चाललेल्या मला चार अत्यंत सुंदर पुरुषांनी येऊन सोडविले. ते तरी कोठे गेले ? जरी मी महापापी असलो, तरीसुद्धा मला या श्रेष्ठ देवतांचे दर्शन झाले, त्याअर्थी माझे कल्याण होणार ! म्हणूनच माझे हृदय आनंदाने भरून येत आहे. नाहीतर वेश्यागमनी आणि अत्यंत अपवित्र अशा माझ्या जिभेवर मरतेवेळी भगवंतांचे नाव कसे आले असते ? कुठे मी महाकपटी, पापी, निर्लज्ज व ब्राह्मण नष्ट करणारा आणि कुठे ते भगवंतांचे परम-मंगल ‘नारायण’ नाम ! म्हणून मी आता माझ्या मन, इंद्रिये, आणि प्राणांना वश करून असा प्रयत्न करीन की, ज्यामुळे मला पुन्हा त्या घोर अंधकारमय नरकात जावे लागणार नाही. मी अज्ञानाने उत्पन्न होणार्‍या वासना आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे, यांमुळे उत्पन्न होणारे बंधन तोडून टाकून सर्व प्राण्यांचे हित करीन, वासनांना शांत करीन, सर्वांशी मित्रतेचा व्यवहार ठेवीन, दुःखितांवर दया करीन, आणि पूर्ण संयमाने राहीन. भगवंतांच्या मायेने स्त्रीचे रूप धारण करून अधम अशा मला तिच्या मोहात अडकविले आणि तिच्या हातातील खेळणे करून मला खूप नाचविले. आता मी स्वतःला त्या मायेपासून मुक्त करीन. सत्य अशा परमात्म्याला मी आता ओळखले आहे. म्हणून मी शरीर इत्यादीमधील मी-माझेपण सोडून कीर्तनादिकांनी आपले मन शुद्ध करून ते भगवंतांच्या ठिकाणी जडवीन. (३०-३८)

श्रीशुकाचार्य म्हणाले - त्या महात्म्यांच्या थोडा वेळ झालेल्या सत्संगाने संसाराबद्दल त्याला तीव्र वैराग्य निर्माण झाले. तो सर्व बंधने तोडून हरिद्वारला गेला. त्या देवस्थानात राहून योगमार्गाचा आश्रय करून त्याने आपल्या सार्‍या इंद्रियांना विषयांपासून दूर करून मनामध्ये लीन केले आणि मन बुद्धीला जोडले. नंतर आत्मचिंतनाने बुद्धीला विषयांपासून वेगळे केले आणि तिला भगवंतांचे स्वरूपभूत आणि स्वतःच्या अनुभवरूप असलेल्या परब्रह्माला जोडले. अशा प्रकारे जेव्हा अजामिळाची बुद्धी भगवंतांच्या स्वरूपात स्थिर झाली, तेव्हा ज्यांना त्याने पहिल्यांदा पाहिले होते, तेच चार पार्षद पुढे उभे असलेले त्याला दिसले. अजामिळाने मस्तक लववून त्यांना नमस्कार केला. त्यांचे दर्शन झाल्यावर त्याने त्या तीर्थस्थानामध्ये गंगेत शरीराचा त्याग केला आणि ताबडतोब भगवंतांच्या पार्षदांचे स्वरूप प्राप्त करून घेतले. भगवंतांच्या पार्षदांच्याबरोबर अजामिळ सुवर्णमय विमानात बसून आकाशमार्गाने भगवान लक्ष्मीपतींच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला. (३९-४४)

अशा रीतीने तो दासीपती सर्व धर्म-कर्म सोडून निंद्य कर्मे केल्यामुळे पापी झाला होता. धर्मनियम सोडल्याने त्याला नरकात टाकले जाणार होते. परंतु भगवंतांचे नाव घेतल्यामुळे तो ताबडतोब मुक्त झाला. संसारबंधनातून मुक्त होऊ इच्छिणार्‍या लोकांना आपल्या चरणस्पर्शाने तीर्थालाही तीर्थ बनविणार्‍या भगवंतांच्या नामापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच साधन नाही. कारण नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचे मन पुन्हा कर्माच्या व्यापात पडत नाही. भगवन्नामाव्यतिरिक्त दुसर्‍या कोणत्याही प्रायश्चिताचा आश्रय घेतल्याने मन रजोगुणाने आणि तमोगुणाने व्यापून राहाते. तसेच पापांचा संपूर्ण नाशही होत नाही. (४५-४६)

परीक्षिता, हा इतिहास अत्यंत गोपनीय आणि सर्व पापांचा नाश करणारा आहे. जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन याचे श्रवण-कीर्तन करतो, तो कधीही नरकात जात नाही. यमराजाचे दूत त्याचेकडे पाहातसुद्धा नाहीत. अशा माणसाचे जीवन पापमय असले तरी तो वैकुंठ लोकात पूज्य ठरतो. अजामिळासारख्या पापी माणसाने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंतांच्या नावाचा उच्चार केला, त्यालासुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. तर मग जे लोक श्रद्धेने भगवंतांच्या नावाचा उच्चार करतात, त्यांच्याविषयी काय सांगावे ? (४७-४९)

स्कंध सहावा - अध्याय दुसरा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP