श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ६ वा - अध्याय १ ला

अजामिळ-उपाख्यानाचा प्रारंभ -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

परीक्षित म्हणाला - भगवन, आपण अगोदर (दुसर्‍या स्कन्धात) निवृत्तिमार्गाचे वर्णन केले आहे. तसेच त्याच्याद्वारा अर्चिरादी मार्गाने जीव क्रमशः ब्रह्मलोकात जाऊन पोहोचतो आणि नंतर ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो, असेही सांगितले आहे. मुनिवर्य, याखेरीज आपण प्रवृत्तिमार्गाचे सुद्धा (तिसर्‍या स्कंधात) वर्णन केले आहे. त्यामुळे त्रिगुणात्मक स्वर्ग इत्यादी लोकांची प्राप्ती होते, पण प्रकृतीचा संबंध न सुटल्यामुळे जीवांना वारंवार जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात पडावे लागते. तसेच आपण अधर्म केल्यामुळे मिळणार्‍या अनेक नरकांचेही विस्ताराने वर्णन केले. ज्याचे अधिपती स्वायंभुव मनू होते, त्या पहिल्या मन्वन्तराचेही आपण वर्णन केले. त्याचबरोबर (चौथ्या आणि पाचव्या स्कंधात) प्रियव्रत आणि उत्तानपादाचे वंश आणि त्यांची चरित्रे, तसेच द्वीपे, वर्षे, समुद्र, पर्वत, नद्या, उद्याने आणि विभिन्न द्वीपातील वृक्षांचेसुद्धा निरूपण केले. भूमंडळाची स्थिती, त्याची द्वीपे, वर्षे इत्यादी विभाग, त्यांची लक्षणे आणि विस्तार, नक्षत्रांची स्थिती, सप्त पाताळे आणि भगवंतांनी हे सर्व जसे निर्माण केले, त्याचे वर्णनही ऐकविले. हे महाभाग, आता जे केल्यामुळे माणसांना अनेक भयंकर यातनांनी युक्त अशा नरकांमध्ये जावे लागणार नाही, तो उपाय आपण मला सांगा. (१-६)

श्रीशुक म्हणाले - मनुष्य मन, वाणी आणि शरीराने पाप करतो. जर त्याने त्या पापांचे याच जन्मात प्रायश्चित्त घेतले नाही, तर मेल्यानंतर त्याला निश्चितपणे भयंकर यातनापूर्ण नरकात जावे लागते. त्याचे वर्णन मी तुला ऐकविले. म्हणून मृत्यू येण्याआधीच दोषाच्या कमीजास्तपणानुसार लवकरात लवकर पाप नाहीसे करण्य़ासाठी प्रायश्चित्त घेतले पाहिजे, जसे रोगांचे कारण जाणणारा वैद्य रोगांची तीव्रता जाणून तत्परतेने औषधयोजना करतो. (७-८)

राजाने विचारले - मनुष्य राजदंड, समाजदंड इत्यादी लौकिक कष्ट आणि शास्त्रोक्त नरकगमन इत्यादी पारलौकिक कष्ट देणारे पाप, स्वतःचा शत्रू आहे, हे जाणूनसुद्धा पराधीन असल्यासारखा वारंवार पाप करतो. अशा स्थितीत त्याच्या पापांचे प्रायश्चित कसे होऊ शकेल? मनुष्य कधी प्रायश्चित्ताने पापांपासून सुटका करून घेतो, तर कधी पुन्हा तीच पापे करू लागतो. मला असे वाटते की, अशा स्थितीत जसे स्नान केल्यानंतर धूळ उडवून घेतल्यामुळे हत्तीने केलेले स्नान व्यर्थ होते, तसेच मनुष्याचे प्रायश्चित्त घेणेही व्यर्थच होय. (९-१०)

श्रीशुक म्हणाले - कर्माने कर्माचा समूळ नाश होत नाही. कारण कर्माचा अधिकारी अज्ञानी असतो. अज्ञान राहिल्याने पापवासना कायमच्या मिटत नाहीत. म्हणून खरे प्रायश्चित्त तत्त्वज्ञान हेच होय. जो मनुष्य केवळ पथ्यकारक अन्न खातो, त्याला रोग होऊ शकत नाहीत. तसेच हे राजा, जो मनुष्य शास्त्रनियमांचे पालन करतो, तो हळू हळू कल्याणकारक तत्त्वज्ञान प्राप्त करण्यास समर्थ होतो. जसे बांबूच्या झाडांच्या जाळीला लागलेली आग बांबू जाळून टाकते, त्याचप्रमाणे धर्मज्ञ आणि श्रद्धावान धीर पुरुष तपश्चर्या, ब्रह्मचर्य, इंद्रियदमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, अंतर्बाह्य पवित्रता तसेच यम, नियम या साधनांनी मन, वाणी आणि शरीराने केलेल्या मोठया पापांनाही नष्ट करतो. भगवंतांच्याच आश्रयाने राहाणारे भक्त केवळ भक्तीने, सूर्य जसे धुके नाहीसे करतो, त्याप्रमाणे आपली सर्व पापे नाहीशी करतात. परीक्षिता, भगवंतांना आत्मसमर्पण केल्याने आणि त्यांच्या भक्तांची सेवा केल्याने जशी पापी पुरुषांची शुद्धी होते, तशी तप इत्यादींनीही होत नाही. ज्या मार्गावरून भगवत्परायण सुशील साधुलोक चालतात, तो भक्तिमार्गच जगामध्ये सर्वश्रेष्ठ, भयरहित आणि कल्याणकारक आहे. हे राजेंद्रा, जसे दारूच्या घडयाला नद्या पवित्र करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे घेतलेली प्रायश्चित्ते भगवद्‌विमुख मनुष्याला पवित्र करीत नाहीत. या जगात ज्यांनी आपल्या भगवद्‍गुणांवर प्रेम करणार्‍या मनाला भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदांत एकदा गुंतवले, त्यांनी सर्व प्रायश्चित्ते घेतली (म्हणून समजावे). ते स्वप्नातसुद्धा यम आणि त्याचे पाशधारी दूत यांना पाहात नाहीत.(११-१९)

याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात. त्यात भगवान विष्णू आणि यम यांच्या दूतांचा संवाद आहे. तो माझ्याकडून ऐक. कान्यकुब्ज नगरात एक दासीपती अजामिळ नावाचा ब्राह्मण राहात होता. दासीच्या संसर्गाने दूषित झालेला असून त्याने सदाचार सोडलेला होता. तो पापी, कधी वाटसरूंना बांधून ठेवी; कधी जुगार खेळत असे; कधी कपटाने धन लुटीत असे; तर कधी चोर्‍या करी. अशा प्रकारे लोकांना त्रास देऊन तो आपल्या कुटुंबाचे पोट भरीत असे. अशा प्रकारे तेथे राहून दासीच्या मुलांचे पालन-पोषण करण्यात त्याच्या आयुष्याचा अठठयायशीं वर्षांचा मोठा काळ निघून गेला. वृद्ध अजामिळाला दहा मुलगे होते. त्यांपैकी सर्वांत धाकटयाचे नाव नारायण होते. आई-वडील त्याच्यावर अतिशय प्रेम करीत असत. वृद्ध अजामिळाचे मन बोबडे बोल बोलणार्‍या नारायणात गुंतले होते. तो आपल्या मुलाचे खेळ पाहून अत्यंत आनंदित होत असे. अजामिळ मुलाच्या स्नेहबंधनाने बांधला गेला होता. तो जेवता-खाताना त्यालाही जेवू-खाऊ घालीत असे. पाणी पिताना पाणी पाजीत असे. अशा प्रकारे स्वतःला विसरलेल्या त्याला आपला मृत्यू जवळ आल्याचेही भान राहिले नाही. (२०-२६)

अशा प्रकारे राहाणार्‍या त्याचा मृत्यू जवळ आला, तेव्हा तो आपला लहान मुलगा नारायण याच्यासंबंधीच विचार करू लागला. तेवढयात अजामिळाने आपल्याला घेऊन जाण्यासाठी अत्यंत भयानक असे तीन यमदूत आलेले पाहिले. त्यांच्या हातात फास असून त्यांची तोंडे वेडी-वाकडी होती आणि शरीरावरील केस ताठ होते. त्यावेळी मुलगा नारायण लांब खेळत होता. यमदूतांना पाहून घाबरलेल्या अजामिळाने मोठयाने ‘नारायणा’ अशी हाक मारली. महाराज, मरतेवेळी हरिकीर्तन करणार्‍या अजामिळाच्या तोंडून स्वामींचे नाव ऐकून भगवंतांचे पार्षद एकदम तेथे आले. ज्यावेळी यमाचे दूत दासीपती अजामिळाच्या शरीरातून त्याचे सूक्ष्म शरीर ओढून घेत होते, तेव्हा विष्णुदूतांनी ताकद लावून त्यांना अडविले. त्यांनी अडविल्यानंतर यमराजाचे दूत त्यांना म्हणाले, अरे ! धर्मराजांच्या आज्ञेला अडविणारे तुम्ही कोण ? तुम्ही कोणाचे दूत आहात ? कोठून आला आहात ? आणि आम्ही याला नेत असता आम्हांला का अडविता ? तुम्ही कुणी देव, उपदेव किंवा सिद्धश्रेष्ठ आहात काय ? तुम्हा सर्वांचे डोळे कमलदलाप्रमाणे आहेत, तुम्ही पिवळी वस्त्रे परिधान केली आहेत, तुमच्या डोक्यावर मुगुट, कानात कुंडले आणि गळ्यांमध्ये कमलपुष्पांचे हार शोभून दिसत आहेत. तुम्ही सर्वजण तरुण आहात, तुम्हांला सुंदर चार चार हात आहेत. सर्वांच्या हातांमध्ये धनुष्ये, बाणांचे भाते, तलवारी, गदा, शंख, चक्रे आणि कमळे शोभत आहेत. तुम्ही स्वतःच्या कांतीने दिशांमधील अंधकार आणि नेहमीचा प्रकाशही दूर करीत आहात. आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत. तुम्ही आम्हांला का अडवीत आहात ? (२७-३६)

श्रीशुक म्हणाले - यमदूत जेव्हा असे म्हणाले, तेव्हा भगवान नारायणांचे आज्ञाधारक पार्षद हसले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले. (३७)

विष्णूदूत म्हणाले - तुम्ही खरोखरच जर धर्मराजाचे सेवक आहात, तर आम्हांला धर्माचे लक्षण आणि धर्माचे तत्त्व सांगा. दंड कोणत्या प्रकारे दिला जातो ? दंड देण्यास पात्र कोण आहे ? मनुष्यांमध्ये पापाचरण करणारे सर्वजण दंडनीय आहेत की त्यांच्यापैकी काहीजणच ? (३८-३९)

यमदूत म्हणाले - वेदांनी जी कर्मे करावीत असे सांगितले आहे, ते धर्म होत आणि ज्यांचा निषेध केला आहे, ते अधर्म होत. वेद साक्षात भगवंतांचे स्वरूप असून स्वयंभू आहेत, असे आम्ही ऐकले आहे. जगातील रजोमय, सत्त्वमय, आणि तमोमय (असे) सर्व पदार्थ, सर्व प्राणी, आपले परम आश्रय असलेल्या भगवंतांमध्येच राहातात. त्यांचे गुण, नाम, कर्म आणि रूप यांनुसार वेदच त्यांचे योग्य विभाग करतात. जीवाच्या कर्मांचे सूर्य, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिये, चंद्र, दोन्ही संध्या(काळ), रात्र, दिवस, दिशा, पाणी, पृथ्वी, काळ आणि धर्म हे साक्षी असतात. यांच्याद्वारा अधर्म कळतो आणि मग दंडाच्या पात्रतेबद्दल निर्णय होतो. पापकर्म करणारी सर्व माणसे आपापल्या कर्मानुसार दंडनीय ठरतात. हे पुण्य़शील पुरुषांनो, प्राणी जी कर्मे करतात, त्यांचा गुणांशी संबंध असतोच. म्हणून सर्वांकडून काही पाप आणि काही पुण्य होतच असते. देहधारी कोणीही कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. या लोकात जो मनुष्य ज्या प्रकारचा आणि जितका अधर्म किंवा धर्म करतो, तो परलोकामध्ये त्याचे तितकेच आणि तसेच फळ भोगतो. हे देवश्रेष्ठांनो, सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांतील भेदामुळे या लोकी तीन प्रकारचे प्राणी दृष्टीस पडतात. पुण्यात्मे, पापात्मे, आणि पुण्य-पाप दोन्हींनी युक्त किंवा सुखीदुःखी आणि सुख-दुःख दोहोंनी युक्त. तसेच परलोकामध्येसुद्धा त्यांच्या त्रिविधतेचे अनुमान करता येते. वर्तमानकाळच भूतकाळ आणि भविष्यकाळाचे अनुमान करून देतो. तसेच वर्तमान जन्मातील पाप-पुण्येसुद्धा मागील आणि पुढील जन्मांच्या पाप-पुण्याचे अनुमान करून देतात. भगवान ब्रह्मदेवांसारखे यमराज स्वतःच्या नगरात राहूनच मनानेच सर्वांचा भूतकाळ पाहतात. त्याचबरोबर ते त्यांच्या भविष्यकाळाचाही विचार करतात. किंवा शरीरात राहणारा अजन्मा क्षेत्रज्ञ जीवाचा भूतकाळ जाणतो. तसाच त्याच्या भविष्यकाळाचा विचार करतो. जसे झोपी गेलेला मनुष्य स्वप्नामध्ये दिसणार्‍या कल्पित शरीरालाच आपले खरे शरीर समजतो आणि खर्‍या शरीराला विसरतो, त्याचप्रमाणे जीवालासुद्धा आपल्या पूर्वजन्मातील स्मृती राहात नाही आणि वर्तमान शरीराशिवाय त्याला अगोदरच्या किंवा पुढच्या शरीरासंबंधी काहीच कल्पना येत नाही. जीव या शरीरामध्ये पाच कर्मेंद्रियांनी स्वतःची कामे करतो, पाच ज्ञानेंद्रियांनी शब्दादी पाच विषयांचा अनुभव घेतो आणि सोळाव्या मनाच्या सहाय्याने तो स्वतः एकटाच मन, ज्ञानेंद्रिये, आणि कर्मेंद्रिये या तिघांच्या विषयांचा उपभोग घेतो. जीवाचे हे सोळा कला आणि सत्त्वादी तीन गुणांचे लिंगशरीर अनादी आहे. हेच जीवाला वारंवार हर्ष, शोक, भय आणि कष्ट देणार्‍या जन्म-मृत्यूच्या फे‍र्‍यात अडकविते. जो जीव अज्ञानाने काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या सहा शत्रूंवर विजय मिळवीत नाही, त्याला त्याची इच्छा नसतानाही निरनिराळ्या वासनांनुसार अनेक कर्मे करावी लागतात. अशा स्थितीत तो रेशमाच्या किडयाप्रमाणे स्वतःच आपल्याला कर्माच्या जाळ्यात अडकवून घेतो आणि मोहाची शिकार बनतो. कोणताही शरीरधारी जीव कर्म केल्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. प्रत्येक प्राण्याचे स्वाभाविक गुण बळजबरीने त्याला आपल्या अधीन करून त्याच्याकडून कर्म करवितात. जीव आपल्या प्रारब्धानुसार स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त करतो. त्याच्या स्वाभाविक प्रबळ वासनांमुळे त्याला मातेसारखे स्त्रीरूप किंवा पित्यासारखे पुरुषरूप प्राप्त होते. प्रकृतीशी संसर्ग झाल्यानेच पुरुष आपले मूळ स्वरूप विसरून शरीरालाच आपले खरे रूप मानतो. हा भ्रम भगवंतांच्या भजनाने लवकरच नाहीसा होतो. (४०-५५)

हा अजामिळ शास्त्रज्ञ होता. शील, सदाचार, आणि सद्‍गुणांचे तो आगर होता. ब्रह्मचारी, विनयशील, जितेंद्रिय, सत्यनिष्ठ, मंत्रवेत्ता आणि पवित्र होता. हा गुरू, अग्नी, अतिथी आणि वृद्ध पुरुषांची सेवा करणारा होता. तसेच हा अहंकाररहित, सर्व प्राण्यांचे हित इच्छिणारा, साधू, मितभाषी आणि निर्मत्सरी होता. एके दिवशी हा ब्राह्मण आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वनात गेला आणि तेथून फळे-फुले, समिधा व दर्भ घेऊन घरी येऊ लागला. परत येतेवेळी त्याला एक कामातुर शूद्र मद्यपान करून कोणा वेश्येबरोबर विहार करीत असलेला दिसला. वेश्यासुद्धा मद्यपान करून धुंद झाली होती. नशेमुळे तिचे डोळे भिरभिरत होते. तिची अवस्था अर्धनग्न होती. तो निर्लज्ज, आचारभ्रष्ट शूद्र त्या वेश्येबरोबर कधी गात, कधी हसत तर कधी वेगवेगळ्या क्रीडा करीत असे. तो शूद्र कामोद्दीपक वस्तू लावलेल्या हातांनी त्या स्त्रीला आलिंगन देत होता. त्यांना या अवस्थेत पाहून अजामिळ एकदम मोहित आणि कामातुर झाला. जरी अजामिळाने आपले धैर्य आणि ज्ञानानुसार कामवेगाने विचलित झालेले आपले मन आवरण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, तरीसुद्धा त्याला ते शक्य झाले नाही. काम-पिशाच्चाने त्या वेश्येचे निमित्त करून अजामिळाचे मन ग्रासून टाकले. शुद्धबुद्ध हरपून आता तो मनोमन त्या वेश्येचेच चिंतन करू लागला आणि त्याने स्वधर्म सोडून दिला. तो आपल्या पित्याची सर्व संपत्ती खर्च करून त्या स्त्रीलाच रिझवू लागला. ती ज्यामुळे प्रसन्न होईल, अशाच तिला आवडणार्‍या गोष्टी तो करू लागला. त्या स्वच्छंदी स्त्रीच्या नेत्र-कटाक्षांनी भुललेल्या त्या पाप्याने आपल्या कुलीन, नवयुवती, विवाहित, ब्राह्मण पत्नीचाही त्याग केला. हा मूर्ख ब्राह्मण न्यायाने-अन्यायाने जसे आणि जिथे कुठे धन मिळेल, तिथून ते आणून त्या वेश्येच्या मोठया कुटुंबाचे पालन-पोषण करीत असे. या पापी पुरुषाने शास्त्राज्ञेचे उल्लंघन करून स्वच्छंद आचरण केले आहे. सत्पुरुषांनी याची निंदा केली आहे. पुष्कळ दिवसपर्यंत याने वेश्येच्या अपवित्र अन्नाने आपले जीवन व्यतीत केले आहे. यामुळे याचे सर्व जीवनच पापमय आहे. म्हणून आपल्या पापांचे काहीही प्रायश्चित्त न घेतलेल्या या पापी पुरुषाला आम्ही यमराजांकडे नेत आहोत. तेथे हा आपल्या पापाची शिक्षा भोगून शुद्ध होईल. (५६-६८)

स्कंध सहावा - अध्याय पहिला समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP