|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २६ वा
नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षिताने विचारले - महर्षे, लोकांना या ज्या उच्च-नीच गती प्राप्त होतात, त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा ? (१) श्रीशुकाचार्य म्हणाले - कर्म करणारे लोक सात्त्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्येसुद्धा भेद असतो. त्यामुळे त्यांच्या कर्मांच्या गतीसुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कमी-अधिक प्रमाणात या सर्व गती सर्व कर्त्यांनाच प्राप्त होतात. अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप पाप करणार्यांनाही त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही. म्हणून अनादी अविद्येमुळे कामना मनात धरून केलेल्या निषिद्ध कर्मांचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत, त्यांचे विस्ताराने वर्णन करू. (२-३) परीक्षिताने विचारले - भगवन, आपण ज्यांचे वर्णन करू इच्छिता, ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत, की अंतराळी आहेत ? (४) श्रीशुक म्हणाले - ते त्रैलोक्याच्या आतच आहेत. तसेच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत. याच दिशेला अग्निष्वात्त इत्यादी पितृगण राहातात. ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजांसाठी मंगल कामना करतात. त्या नरकलोकामध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम आपल्या सेवकांसह राहातात आणि भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तेथे आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचे फळ म्हणून दंड देतात. राजा, काहीजण नरकांची संख्या एकवीस आहे असे सांगतात. आता आम्ही नाम, रूप आणि लक्षणांनुसार त्यांचे क्रमशः वर्णन करीत आहोत. त्यांची नावे अशी- तामिस्र, अंधतामिस्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सूकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, सन्दंश, तप्तसूर्मि, वज्रकंटकशाल्मली, वैतरणी, पूयोद, प्राणरोध, विशसन, लालाभक्ष, सारमेयादन, अवीची आणि अयःपान. यांखेरीज क्षारकर्दम, रक्षोगणभोजन, शूलप्रोत, दन्दशूक, अवटनिरोधन, पर्यावर्तन आणि सूचीमुख हे सात मिळून एकूण अठठावीस नरक निरनिराळ्या यातना भोगण्याची स्थाने आहेत. (५-७) जो पुरूष दुसर्यांचे धन, संतान किंवा स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत कालपाशात बांधून बळजबरीने तामिस्र नरकात ढकलतात. त्या अंधकारमय नरकात त्याला अन्न-पाणी न देणे, दंडुके मारणे, भीती दाखविणे इत्यादी अनेक प्रकारच्या उपायांनी पीडा दिल्या जातात. यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो एकाएकी मूर्च्छित होतो. याचप्रमाणे जो मनुष्य दुसर्याला फसवून त्याची स्त्री इत्यादींचा उपभोग घेतो, तो अंधतामिस्र नरकात पडतो. तेथील यातनांमध्ये सापडून मुळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे वेदनांमुळे त्याची शुद्ध हरपते आणि त्याला काहीच सुचत नाही. म्हणूनच या नरकाला अंधतामिस्र असे म्हणतात. (८-९) या लोकामध्ये जो पुरुष हे शरीरच मी आहे आणि हे स्त्री, धन इत्यादी माझेच आहेत असे समजून, दुसर्या प्राण्यांचा द्वेष करून, नेहमी आपल्या कुटुंबाच्या पालन-पोषणातच व्यग्र असतो, तो आपले शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापामुळे स्वतःच रौरव नरकात जाऊन पडतो. या लोकात ज्याने ज्या जीवांना ज्याप्रकारे कष्ट दिले असतील, परलोकात यमयातना भोगण्याची वेळ आल्यावर ते जीव रुरु होऊन त्याला त्याच प्रकारचे कष्ट देतात. म्हणून या नरकाचे नाव ‘रौरव’ असे आहे. ‘रुरु’ हे सापापेक्षाही अधिक क्रूर स्वभावाच्या एक प्रकारच्या जीवाचे नाव आहे. असाच महारौरव नरक आहे. जो दुसर्या कोणाचीही पर्वा न करता केवळ आपल्या शरीराचेच पालन-पोषण करतो, तो या नरकात जातो. कच्चे मांस खाणारे ‘रुरु’ त्याला या मांसाच्या लोभाने फाडून खातात. (१०-१२) जो क्रूर माणूस या लोकी आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशू किंवा पक्षी शिजवितो, त्या हृदयशून्य राक्षसांपेक्षाही क्रूर माणसाला यमदूत कुंभीपाक नरकात घेऊन जाऊन उकळत्या तेलात शिजवितात. जो मनुष्य या लोकी माता-पिता, ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतो, त्याला यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात. याचा घेर दहा हजार योजने आहे. येथे जे तापलेले तांब्याचे मैदान आहे, तेथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दाहाने ते भयंकर तापलेले असते. तेथे पोहोचलेला पापी जीव तहान-भुकेने व्याकूळ होऊन जातो आणि त्याचे शरीर आतून-बाहेरून जळू लागते. तो इतका बेचैन होतो की, तो कधी बसतो, कधी झोपतो, कधी तडफडू लागतो, कधी उभा राहातो तर कधी इकडे तिकडे धावतो. अशा प्रकारे पशूच्या शरीरामध्ये जितके रोम असतात, तितकी हजार वर्षेपर्यंत त्याची अशी दुर्गती होत राहाते. (१३-१४) जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली नसतानाही आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक धर्म स्वीकारतो, त्याला यमदूत असिपत्रवन नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात. जेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो, तेव्हा त्याच्या सर्व अंगाचे ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असणार्या तीक्ष्ण धारेच्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात. तेव्हा अत्यंत वेदना झाल्याने तो हाय हाय ! मी मेलो ! अशा प्रकारे ओरडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडू लागतो. आपला धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाण्याने त्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माचे फळ भोगावे लागते. (१५) या लोकात जो पुरुष, राजा किंवा राजाचा सेवक असून एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला शरीरदंड देतो, तो महापापी मेल्यानंतर सूकरमुख नरकात जाऊन पडतो. तेथे जेव्हा महाबलवान यमदूत त्याचे अंग घुसळतात, तेव्हा तो चरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो, तेव्हा तो ज्याप्रमाणे या लोकी त्याने सतावलेले निरपराध प्राणी रडत-ओरडत होते, त्याप्रमाणे कधी आर्त स्वराने प्रडतो आणि कधी मूर्च्छित पडतो. (१६) जो मनुष्य या लोकी ढेकूण इत्यादी जीवांची हिंसा करतो, त्यांना पीडा दिल्यामुळे तो अंधकूप नरकात जाऊन पडतो. कारण स्वतः ईश्वरानेच दुसर्यांचे रक्त पिणे इत्यादी ही त्यांची उपजीविका बनविली आहे आणि त्यामुळे आपण दुसर्यांना कष्ट देतो याचे त्यांना ज्ञानही नसते. परंतु मनुष्याची उपजीविका भगवंतांनी विधि-निषेधपूर्वक बनविली आहे आणि दुसर्याला होणार्या कष्टाचे त्याला ज्ञानही आहे. तेथे ते पशू, मृग, पक्षी, साप इत्यादी सरपटणारे प्राणी, डास, उवा, ढेकूण, माशा इत्यादी त्याने त्रास दिलेले जीव त्याला सर्व बाजूंनी चावतात. त्यामुळे त्याची झोप आणि शांती भंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाण न मिळाल्यामुळेसुद्धा तो बेचैन होऊन त्या घोर अंधकारात अशा प्रकारे भटकत राहातो की जसा रोगग्रस्त शरीरात जीव तडफड करतो. (१७) जो मनुष्य या लोकी पंचयज्ञ केल्याखेरीज तसेच जे काही मिळेल ते दुसर्या कोणाला दिल्याखेरीज स्वतःच खातो, त्याला कावळ्यासमान मानले गेले आहे. तो परलोकी कृमिभोजन नावाच्या निकृष्ट नरकात जाऊन पडतो. तेथे एक लाख योजने लांब-रुंद असे एक किडयांचे कुंड आहे. त्यात यालाही किडा बनून राहावे लागते आणि जोपर्यंत आपल्या पापांचे प्रायश्चित न घेणार्या त्या पापी माणसाच्या दुसर्याला खाणे दिल्याखेरीज आणि हवन न करता खाणे या दोषांचे चांगल्या तर्हेने निवारण होत नाही तोपर्यंत तो तिथेच पडल्या-पडल्या कष्ट भोगीत राहातो. तेथे किडे त्याला टोचे मारतात, आणि हा किडे खातो. हे राजा, या लोकी जी व्यक्ती चोरी किंवा बळजबरी करून ब्राह्मणाच्या किंवा आपत्ती आलेली नसतानाही दुसर्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्ने इत्यादीची चोरी करते, तिला मेल्यानंतर यमदूत संदंश नावाच्या नरकात घेऊन जाऊन तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी डाग देतात आणि चिमटयांनी कातडी उपटतात. या लोकी जर कोणी पुरुषाने संभोगास अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने संभोगास अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला, तर यमदूत त्याला किंवा तिला तप्तसूर्मी नावाच्या नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुषाशी आलिंगन करवितात. या लोकात जो पुरुष, पशू इत्यादी सर्वांच्याबरोबर संभोग करतो, त्याला मृत्यूनंतर यमदूत वज्रकंटक-शाल्मली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काटे असणार्या सावरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली ओढतात. (१८-२१) जे राजे किंवा राजसेवक या लोकी श्रेष्ठ कुळांत जन्म घेऊनही धर्ममर्यादेचे उल्लंघन करतात, ते यामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीत पडतात. ही नदी नरकाचा खंदक समजली जाते. तिच्यात मल, मूत्र, पू, रक्त, केस, नखे, हाडे, चरबी, मांस, मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू भरलेल्या आहेत. तेथे पडल्यानंतर त्यांना त्या पाण्यातील इकडचे-तिकडचे जीव ओरबडतात, परंतु यामुळे त्यांचे शरीर सुटत नाही. पाप केल्यामुळे प्राण त्या शरीराचे धारण करतात आणि त्या दुर्गतीला आपल्या कर्मांचे फळ समजून ते मनोमन कष्टी होत राहातात. जे लोक पावित्र्य आणि आचाराच्या नियमांचा त्याग करून तसेच लज्जेला तिलांजली देऊन या लोकी शूद्र स्त्रियांशी संबंध ठेवून पशूंप्रमाणे आचरण करतात, तेसुद्धा मरणानंतर पू, विष्ठा, मूत, कफ आणि मळाने भरलेल्या पूयोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेरडया वस्तूच खातात. या लोकी जे ब्राह्मणादी उच्च वर्णाचे लोक कुत्री किंवा गाढवे पाळतात आणि शिकार करतात, त्याचप्रमाणे शास्त्राला सोडून पशूंचा वध करतात, ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि यमदूत तेथे त्यांना बाणांनी घायाळ करतात.(२२-२४) जे नास्तिक लोक ढोंगीपणाने केलेल्या यज्ञांत पशूंचा वध करतात, त्यांना परलोकी वैशस नरकात टाकून तेथील अधिकारी अत्यंत त्रास देऊन त्यांना तोडतात. जो द्विज कामातुर होऊन आपल्या सवर्ण भार्येला वीर्यपान करवितो, त्या पाप्याला मेल्यानंतर यमदूत वीर्याच्या नदीत (लालाभक्ष नावाच्या नरकात) टाकून वीर्य पाजतात. जे कोणी चोर, राजे किंवा राजसेवक या लोकी एखाद्याच्या घराला आग लावतात, कोणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापार्यांच्या टोळीला लुटतात, त्यांना मेल्यानंतर सारमेयादन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाढा असणारे सातशे वीस यमदूत कुत्री बनून त्यांचा कडकडून चावा घेऊ लागतात. या लोकी जो पुरुष कोणासाठी साक्ष देताना व्यापारात किंवा दान देतेवेळी कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो, तो मृत्यूनंतर आधारशून्य अवीचिमान नरकात जाऊन पडतो. तेथे त्याला शंभर योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोके करून फेकले जाते. त्या नरकातील दगडी जमीन पाण्यासारखी दिसते. म्हणून त्याचे नाव अवीचिमान असे आहे. तेथून टाकून दिल्याने त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे होऊनसुद्धा प्राण जात नाहीत. म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकले जाते. (२५-२८) जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा व्रत करीत असलेला कोणीही अथवा त्यांच्या पत्न्या चुकूनही जर मद्यपान करतील तर त्याला यमदूत अयःपान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळता लोखंडी रस घालतात. या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून जन्म, तप, विद्या, आचार, वर्ण किंवा आश्रम याबाबतीत आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करीत नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. मृत्यूनंतर त्याला क्षारकर्दम नावाच्या नरकात खाली डोके करून टाकले जाते आणि तेथे त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात. (२९-३०) जे पुरुष या लोकी नरबळी देऊन भैरव, यक्ष, राक्षस इत्यादींची पूजा करतात आणि ज्या स्त्रिया ह्या नरबळीचे मांस खातात, त्यांना पशूंप्रमाणे मारले गेलेले पुरुष यमलोकात राक्षस होऊन निरनिराळ्या यातना देतात आणि रक्षोगणभोजन नावाच्या नरकामध्ये कसायांच्याप्रमाणे कुर्हाडीने तोडून त्यांचे रक्त पितात. तसेच ज्याप्रमाणे ते मांस खाणारे पुरुष या लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होत, त्याप्रमाणे हेसुद्धा त्यांचे रक्तपान करीत आनंदित होऊन नाचू लागतात. या लोकी जे लोक जंगलातील किंवा गावातील जगू इच्छिणार्या जीवांना निरनिराळ्या उपायांनी फूस लावून आपल्याजवळ बोलावतात आणि पुन्हा त्यांना काटयांनी टोचून किंवा दोरीने बांधून त्यांचा खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देतात, त्यांनासुद्धा मेल्यानंतर यमयातनांच्या वेळी शूलप्रोत नावाच्या नरकात शूळांनी टोचले जाते. त्यावेळी जेव्हा ते तहान-भुकेने व्याकूळ होतात आणि कंक, वटवाघूळ, वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडांनी त्यांना टोचू लागतात, तेव्हा आपण केलेली सर्व पापे त्यांना आठवतात. (३१-३२) राजा, या लोकी जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष दुसर्या जीवांना पीडा देतात, ते मेल्यानंतर दंदशूक नावाच्या नरकात जाऊन पडतात. तेथे पाच-पाच, सात-सात तोंडे असणारे सर्प त्यांच्याजवळ येऊन त्यांना उंदरांप्रमाणे गिळतात. ज्या व्यक्ती येथे दुसर्या प्राण्यांना अंधार्या खडडयात, कोठीत किंवा गुहेत टाकतात, त्यांना परलोकामध्ये यमदूत तशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमटवतात. म्हणून या नरकाला अवटनिरोधन म्हणतात. जो गृहस्थ आपल्या घरी आलेल्या अतिथी-अभ्यागताकडे वारंवार रागीट नजरेने असे बघतो की जणू आता त्याचे भस्म करून टाकील. तो जेव्हा नरकात जातो, तेव्हा त्या पापदृष्टीचे डोळे गिधाडे, कंक, कावळे, होले इत्यादी पक्षी वज्रासारख्या कठोर चोचींनी बळजबरीने काढून घेतात. या नरकाला पर्यावर्तन म्हणतात. (३३-३५) या लोकी जो गृहस्थ स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकडया नजरेने पाहातो, आणि सर्वांवर संशय घेतो, धनाचा खर्च व नाश होईल या चिंतेने ज्याचे मन आणि तोंड सुकून जाते, तसेच थोडीशीही चैन न करता जो यक्षाप्रमाणे धनाचे फक्त रक्षण करतो, तसेच पैसा मिळविणे वाढविणे आणि साठवून ठेवणे यासाठीच जो निरनिराळी पापे करतो, तो नराधम मेल्यानंतर सूचीमुख नरकात जाऊन पडतो. तेथे अर्थपिशाच्च पापात्म्याचे सारे अंग यमराजाचे दूत शिंप्याप्रमाणे सुई-धाग्याने शिवतात. (३६) हे राजा, यमलोकात अशा प्रकारचे शेकडो-हजारो नरक आहेत. त्यांपैकी ज्यांचा येथे उल्लेख झाला आहे आणि ज्यांच्याविषयी काही सांगितलेले नाही, त्या सर्वांमध्ये सगळे अधर्मी जीव आपल्या कर्मानुसार पाळी-पाळीने जातात. याच प्रकारे धर्मात्मे स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातात. अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा यांची अधिकांश पापे आणि पुण्ये क्षीण होतात, तेव्हा शिल्लक राहिलेल्या पापपुण्यरूप कर्मांना घेऊन हे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी इहलोकी परत येतात. (३७) धर्म आणि अधर्म या दोहोंपेक्षा निराळा असा जो निवृत्तिमार्ग आहे, त्याचे आधीच (दुसर्या स्कंधात) वर्णन केले आहे. पुराणात ज्या चौदा भुवनांच्या रूपाने वर्णन केले गेले आहे, तो ब्रह्मांडकोश एवढाच आहे. साक्षात परम पुरुष श्रीनारायणांचे हे आपल्या मायेच्या गुणांनी युक्त अत्यंत स्थूल स्वरूप आहे, याचे वर्णन मी तुला ऐकविले. परमात्मा भगवंतांचे निर्गुण स्वरूप जरी मन-बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे, तरीसुद्धा जो पुरुष या स्थूल रूपाचे वर्णन आदरपूर्वक वाचील, ऐकेल, किंवा (दुसर्याला) ऐकवील, त्याची बुद्धी, श्रद्धा आणि भक्तीमुळे शुद्ध होते आणि तो त्या सूक्ष्म रूपाचासुद्धा अनुभव घेऊ शकतो. (३८) संन्याशाने भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपांचे श्रवण करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावे. नंतर हळूहळू तेथून काढून घेऊन त्याला सूक्ष्म रूपात लावावे. परीक्षिता, मी तुला पृथ्वी, तिच्या अंतर्गत द्वीपे, वर्षे, नद्या, पर्वत, आकाश, समुद्र, पाताळ, दिशा, नरक, ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचे वर्णन करून सांगितले. हेच भगवंतांचे अतिशय अद्भुत स्थूल रूप आहे. हेच सर्व जीवसमुदायाचे आश्रयस्थान आहे. (३९-४०) स्कंध पाचवा - अध्याय सव्विसावा समाप्त |