|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २५ वा
श्रीसंकर्षणदेवांचे विवरण आणि स्तुती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - पाताळ लोकाच्या खाली तीस हजार योजने अंतरावर अनंत नावाची भगवंतांची तामसी नित्य कला आहे. ही अहंकाररूप असल्याने द्रष्टा आणि दृश्याला एकत्रित करते. म्हणून पांचरात्र तंत्राचे अनुयायी भक्त हिला ‘संकर्षण’ म्हणतात. या भगवान अनंतांना एक हजार फणा आहेत. त्यांपैकी एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते. प्रलयकाली जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते, तेव्हा क्रोधाने फिरणार्या यांच्या मनोहर भ्रुकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रगट होतात. त्यांच्या समूहाची संख्या अकरा आहे. त्या सर्वांना प्रत्येकी तीन डोळे असून त्यांच्या हातात त्रिशूळ असतात. भगवान संकर्षणांच्या दोन्ही चरणकमळांची स्वच्छ, तांबूस वर्णाची नखे रत्नांप्रमाणे दैदीप्यमान आहेत. जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात, तेव्हा त्या नखमण्यांमध्ये त्यांच्या कुंडलकांतिमंडित कमनीय गाल असणार्या मनोहर मुखकमलाची मनमोहक शोभा दिसते, तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाते. अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून त्यांच्या अंगावर, चांदीच्या खांबांप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कडयांनी शोभणार्या लांबच लांब, शुभ्रवर्ण, सुंदर बाहूंवर अष्टगंध, चंदन आणि कुंकुमाचा लेप करतात. त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात कामसंचार होतो. तेव्हा त्या त्यांच्या विव्हल झालेल्या करुणामय, तांबूस नयनकमलांनी सुशोभित, तसेच प्रेममदाने आनंदित झालेल्या, मुखारविंदाकडे मधुर, मनोहर हास्य करीत लज्जित भावनेने निरखून पाहू लागतात. ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत. (१-६) देव, असुर, नाग, सिद्ध, गंधर्व, विद्याधर आणि मुनिगण, भगवान, अनंतांचे ध्यान करतात. त्यांचे नेत्र नेहमी प्रेमभराने आनंदित, चंचल आणि भावपूर्ण असतात. ते लालित्यपूर्ण वचनामृताने आपले पार्षद आणि देवसमुदायाला संतुष्ट करीत असतात. त्यांच्या अंगावर निळे वस्त्र आणि कानात फक्त एक कुंडल झगमगत असते. तसेच त्यांचा पवित्र आणि सुंदर हात नांगराच्या मुठीवर ठेवलेला असतो. उदार लीला करणारे ते भगवान संकर्षण गळ्यात वैजयंती माळा धारण करतात, ती इंद्राचा हत्ती जो ऐरावत त्याच्या गळ्यात असलेल्या सुवर्णसाखळीप्रमाणे दिसते. ती कधी कोमेजत नाही. तिच्यातील ताज्या तुळशींचा गंध आणि गोड मकरंद यांनी धुंद झालेले भ्रमर नेहमी मधुर गुंजारव करीत तिची शोभा वाढवितात. (७) परीक्षिता, अशा माहात्म्यश्रवणाने आणि ध्यान केल्याने भगवान अनंत, मुमुक्षूंच्या हृदयात प्रगट होऊन त्याच्या अनादिकालापासून कर्मवासनांनी उत्पन्न झालेल्या सत्त्व, रज आणि तमोगुणात्मक अविद्यामय हृदयग्रंथी ताबडतोब तोडून टाकतात. एकदा ब्रह्मदेवांचे पुत्र भगवान नारदांनी तुंबुरू गंधर्वांसह त्यांच्या गुणांचे ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये याप्रकारे गायन केले होते. (८) ज्यांच्या दृष्टिक्षेपानेच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाला कारणीभूत असणारे सत्त्वादी प्रकृतीचे गुण आपापल्या कार्याला समर्थ होतात, ज्यांचे स्वरूप अनंत आणि अनादी आहे, तसेच ज्यांनी एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्यात धारण केले आहे, त्या भगवान संकर्षणांचे तत्त्व कोण कसा जाणू शकेल ? ज्यांच्यामध्ये हा सर्व कार्य-कारणरूप प्रपंच भासमान होत आहे, तसेच ज्यांनी आपल्या भक्तांचे चित्त आकर्षित करण्यासाठी केलेली पराक्रमरूप लीला पराक्रमी सिंहानेही आदर्श मानून तिचे अनुकरण केले आहे, त्या उदारवीर्य भगवान संकर्षणांनी आमच्यावर मोठी कृपा करून हे विशुद्ध सत्त्वमय शरीर धारण केले आहे. ज्यांच्या ऐकलेल्या किंवा ऐकविलेल्या नावाचे एखाद्या पीडिताने किंवा पतित पुरुषाने अकस्मात किंवा थटटेनेसुद्धा उच्चारण केले तर तो पुरुष दुसर्या मनुष्यांची सारी पापे तत्काळ नष्ट करतो, अशा शेष भगवानांना सोडून मुमुक्षू पुरुष आणखी कोणाचा आश्रय घेईल ? पर्वत, नद्या, समुद्र, प्राणी इत्यादींसह हे संपूर्ण भूमंडल त्या सहस्रशीर्षा भगवंतांच्या एका मस्तकावर एका रजःकणाप्रमाणे ठेवलेले आहे. ते अनंत आहेत म्हणून त्यांच्या पराक्रमाला काही सीमा नाही. एखाद्याला हजार जिभा असल्या तरीसुद्धा तो सर्वव्यापक भगवंतांच्या पराक्रमांची गणना कशी करू शकेल ? वास्तविक त्यांचे शौर्य, असंख्य गुण आणि प्रभाव अमर्याद आहेत. असे प्रभावशाली भगवान अनंत रसातळात आपल्याच महिम्यामध्ये स्थित असून स्वतंत्र आहेत आणि सर्व लोकांच्या स्थितीसाठी लीलेने या पृथ्वीला त्यांनी धारण केले आहे. (९-१३) भोगांची कामना करणार्या पुरुषांच्या आपापल्या कर्मानुसार प्राप्त होणार्या, भगवंतांनी रचलेल्या ह्याच गती आहेत. या जशा मी गुरुमुखातून ऐकल्या तशा तुला सांगितल्या. हे राजा, प्रवृत्तिरूप धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणार्या मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्च-नीच गती आहेत, त्या इतक्याच आहेत. त्या तुझ्या प्रश्नानुसार मी तुला सांगितल्या. आणखी काय सांगू ? (१४-१५) स्कंध पाचवा - अध्याय पंचविसावा समाप्त |