श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय २४ वा

राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, काही लोकांचे म्हणणे आहे की, सूर्यापासून दहा हजार योजने दूर खालच्या बाजूस राहू, नक्षत्रांप्रमाणे फिरत आहे. भगवंतांच्या कृपेनेच याने देवत्व आणि ग्रहत्व प्राप्त केले आहे. हा सिंहिकापुत्र स्वतः असुराधम असल्याकारणाने कोणत्याही प्रकारे या पदाला योग्य नव्हता. याच्या जन्म आणि कर्माचे वर्णन आपण पुढे करू. सूर्याचा हा जो अत्यंत तप्त गोल आहे, त्याचा विस्तार दहा हजार योजने सांगितला जातो. याचप्रमाणे चंद्रमंडळाचा विस्तार बारा हजार योजने आहे आणि राहूचा तेरा हजार योजने आहे. राहू अमृतपानाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये देवाच्या वेषात येऊन बसला त्यावेळी सूर्य आणि चंद्राने याचे गुपित फोडले होते. ते वैर लक्षात ठेवून हा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी त्यांच्यावर आक्रमण करतो. हे पाहून भगवंतांनी सूर्य आणि चंद्र यांच्या रक्षणासाठी त्या दोघांच्या जवळ आपले प्रिय आयुध सुदर्शन चक्र ठेवले आहे. ते नेहमी फिरत असते. म्हणून राहू त्याच्या असह्य तेजाने उद्विग्न आणि आश्चर्यचकित होऊन थोडा वेळ त्यांच्या समोर राहून पुन्हा मागे फिरतो. या त्याच्या थांबण्यालाच लोक ग्रहण म्हणतात. (१-३)

राहूच्या दहा हजार योजने खालील बाजूस सिद्ध, चारण आणि विद्याधर यांची स्थाने आहेत. त्याच्या खालच्या बाजूस जिथपर्यंत वायूची गती आहे आणि ढग दिसतात, तो अंतरिक्ष लोक आहे. हे यक्ष, राक्षस, पिशाच्च, प्रेत आणि भूतांचे विहार करण्याचे स्थान आहे. त्याच्या खाली शंभर योजने अंतरावर ही पृथ्वी आहे. हंस, गिधाडे, ससाणे, गरुड इत्यादी प्रमुख पक्षी जिथपर्यंत उडू शकतात, तिथपर्यंत हिची सीमा आहे. पृथ्वीचा विस्तार आणि स्थिती यांचे वर्णन झालेच आहे. तिच्याही खाली अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ नावाची सात भूविवरे (भूगर्भातील बिळे किंवा लोक) आहेत. ही एकाखाली एक दहा दहा हजार योजने अंतरावर आहेत आणि यांपैकी प्रत्येकाची लांबी-रुंदीसुद्धा दहा दहा हजार योजने इतकीच आहे. भूमीखालील ही विवरेसुद्धा एकप्रकारचे स्वर्गच आहेत. येथे स्वर्गापेक्षाही अधिक विषयभोग, ऐश्वर्य, आनंद, संतानसुख आणि धनसंपत्ती आहे. येथील वैभवपूर्ण भवने, उद्याने आणि क्रीडास्थानांमध्ये दैत्य, दानव आणि नाग निरनिराळ्या मायामय क्रीडा करीत निवास करतात. हे सर्व गृहस्थधर्माचे पालन करणारे आहेत. त्यांचे स्त्री, पुत्र, बंधू, बांधव आणि सेवक त्यांच्यावर फार प्रेम करतात आणि नेहमी प्रसन्नचित्त असतात. त्यांच्या भोगांमध्ये विघ्न आणण्याचे इंद्रादिकांनाही सामर्थ्य नाही. महाराज, या विवरांत मायावी मयदानवाने बनविलेली अनेक नगरे सौंदर्याने झगमगत आहेत. अनेक जातीच्या सुंदर सुंदर श्रेष्ठ रत्नांनी रचलेली चित्रविचित्र भवने, तट, नगरद्वारे, सभागृहे, मंदिरे, मोठमोठी अंगणे आणि घरे यांनी ही सुशोभित आहेत. तसेच यांच्या फरशांवर नाग आणि असुरांच्या जोडया तसेच कबूतर, पोपट, मैना इत्यादी पक्षी किलबिलाट करीत असतात. पाताळ-अधिपतींची भव्य भवने या नगरांची शोभा वाढवितात. तेथील बगीचेसुद्धा आपल्या शोभेने देवलोकातील उद्यानांच्या शोभेवर मात करतात. तेथे अनेक वृक्ष आहेत. ज्यांच्यावरील सुंदर डहाळ्या फळा-फुलांचे गुच्छ आणि कोमल अंकुरांच्या भारांनी झुकलेल्या असतात. तसेच त्यांना निरनिराळ्या वेलींनी आपल्या अंगपाशाने बांधून ठेवले आहे. तेथे निर्मल जलाने भरलेले जे अनेक जलाशय आहेत, त्यात विविध पक्ष्यांच्या जोडया विलास करीत असतात. या वृक्षांच्या आणि जलाशयांच्या सौंदर्याने ती उद्याने अतिशय शोभून दिसतात. त्या जलाशयात राहाणारे मासे जेव्हा क्रीडा करीत असताना उसळी मारतात, तेव्हा त्यातील पाणी खळाळते; त्याचबरोबर पाण्यावर उमललेली कमळे, कुमुदे, नीलकमळे, कल्हारे, लाल कमळे आणि शतपत्रे इत्यादींचे ताटवेसुद्धा हलू लागतात. या कमळांच्या वनात राहाणारे पक्षी अविश्रांत क्रीडा करीत निरनिराळे अतिशय गोड आवाज काढीत असतात. ते ऐकून मन आणि इंद्रियांना अतिशय आनंद होतो. त्यावेळी सर्व इंद्रियांमध्ये आनंदाचे भरते येते. तेथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही. म्हणून दिवस-रात्र अशा कालविभागाचीही भीती वाटत नाही. तेथील संपूर्ण अंधकाराला मोठमोठया नागांच्या मस्तकावरील मणीच दूर करतात. येथे राहाणारे लोक दिव्य औषधी, रस, रसायने, अन्न, पाणी, स्नान इत्यादींचे सेवन करतात. त्यांना मानसिक किंवा शारीरिक रोग होत नाहीत. तसेच त्यामुळे सुरकुत्या पडणे, केस पिकणे, वृद्धावस्था येणे, देह कांतिहीन होणे, शरीरातून दुर्गंधी येणे, घाम येणे, थकवा येणे, शिथिलता येणे तसेच वयोमानानुसार अवस्था बदलणे असे कोणतेच विकार होत नाहीत. ते नेहमी सुंदर, स्वस्थ, तरुण आणि शक्तिसंपन्न असतात. भगवंतांच्या तेजस्वी सुदर्शन चक्राशिवाय त्या पुण्यपुरुषांचा अन्य कोणत्याही साधनाने मृत्यू होऊ शकत नाही. सुदर्शन चक्र येताच भयामुळे तेथील असुरस्त्रियांचा गर्भपात होतो. (४-१५)

अतल लोकामध्ये मयदानवाचा पुत्र बल नावाचा असुर राहातो. त्याने शहाण्णव प्रकारची माया रचली आहे. त्यांपैकी काही काही माया आजसुद्धा मायावी पुरुषांच्या ठिकाणी आढळतात. त्याने एकदा जांभई दिली होती, त्यावेळी त्याच्या मुखातून स्वैरिणी (फक्त आपल्या वर्णाच्या पुरुषांशी रममाण होणारी) कामिनी (अन्य वर्णाच्या पुरुषांशी सुद्धा समागम करणारी) आणि पुंश्चली (अत्यंत चंचल स्वभावाची), अशा तीन प्रकारच्या स्त्रिया उत्पन्न झाल्या. या त्या लोकी राहाणार्‍या पुरुषांना हाटक नावाचा रस पाजून संभोग करण्यासाठी समर्थ बनवीत असतात आणि नंतर त्यांच्याबरोबर आपल्या हावभावयुक्त चेष्टा, प्रेमळ हास्य, प्रेमालाप आणि आलिंगन इत्यादी द्वारा यथेष्ट विलास करतात. तो हाटक रस प्याल्यावर मनुष्य मदांध होतो आणि स्वतःला दहा हजार हत्तींइतका बलवान समजून "मी ईश्वर आहे", "मी सिद्ध आहे" अशा प्रकारे बढाया मारू लागतो. (१६)

त्याच्या खाली वितल लोकामध्ये भगवान हाटकेश्वर नावाचे महादेव आपले पार्षद भूतगणांसह राहातात. ते प्रजापतीच्या सृष्टीच्या वृद्धीसाठी भवानीबरोबर विहार करीत असतात. त्या दोघांच्या तेजाने तेथे हाटकी नावाची एक श्रेष्ठ नदी निघाली आहे. वायूने प्रज्वलित झालेला अग्नी तिचे पाणी अत्यंत उत्साहाने पितो. तो जो हाटक नावाचे सोने थुंकतो, त्यापासून बनविलेले अलंकार दैत्यराजाच्या अंतःपुरात स्त्री-पुरुष सर्वजण धारण करतात. (१७)

वितलाच्या खाली सुतल लोक आहे. महायशस्वी पवित्रकीर्ती विरोचनपुत्र बली तेथे राहातो. भगवंतांनी इंद्राचे कल्याण करण्यासाठी अदितीपासून बटू-वामनरूपाने अवतीर्ण होऊन त्याच्यापासून तिन्ही लोक हिरावून घेतले होते. नंतर भगवंतांच्या कृपेनेच त्याचा या लोकात प्रवेश झाला. तेथे त्याला जशी उत्कृष्ट संपत्ती मिळाली आहे, तशी इंद्रादिकांच्या जवळसुद्धा नाही. म्हणून तो त्याच पूज्यतम प्रभूंची आपल्या धर्माप्रमाणे आराधना करीत तेथे आजसुद्धा निर्भयपणे राहातो. संपूर्ण जीवांचे नियंते आणि आत्मस्वरूप परमात्मा भगवान वासुदेवांना पूज्यतम, पवित्रतम, सत्पात्र म्हणून आल्यावर त्यांना परम श्रद्धेने आणि आदराने, स्थिरचित्ताने बलीने भूमिदान केले. त्यामुळे बलीला सुतल लोकाचे ऐश्वर्य प्राप्त झाले, हे काही त्याचे मुख्य फळ नाही. हे ऐश्वर्य तर नाशवंत आहे. परंतु ते भूमिदान साक्षात मोक्षाचेच द्वार ठरले. शिंक आल्यावर, पडल्यावर किंवा घसरल्यावर विवश होऊन भगवंतांचे एक वेळ नाव घेतल्यानेही मनुष्य सहजपणे कर्मबंधन तोडून टाकतो. परंतु हेच कर्मबंधन योगसाधन इत्यादी अन्य अनेक उपायांचा आश्रय घेऊनही मुमुक्षू लोक मोठया कष्टाने क्वचितच तोडून टाकू शकतात. म्हणून आपले संयमी भक्त आणि ज्ञानी लोकांना स्वस्वरूप प्रदान करणारे आणि सर्व प्राण्यांचे आत्मा अशा श्रीभगवंतांना आत्मभावाने दिलेल्या भूमिदानाचे येथील ऐश्वर्य हे फळ होऊ शकत नाही. जरी भगवंतांनी बलीला त्याच्या सर्वस्वदानाच्या बदल्यात आपले विस्मरण करणारे हे मायामय भोग आणि ऐश्वर्यही दिले असते, तरी त्यांनी बळीवर हा अनुग्रह केला असे झाले नसते. दुसरा कोणताही उपाय नाही असे पाहून भगवंतांनी याचनेच्या बहाण्याने त्याचे त्रैलोक्याचे राज्य हिरावून घेतले आणि त्याच्याजवळ फक्त त्याचे शरीरच शिल्लक ठेवले. आणि वरुणाच्या पाशाने बांधून पर्वताच्या गुहेत फेकून दिल्यावर तो म्हणाला होता. खेदाची गोष्ट आहे की, हा देवराज इंद्र किंवा सल्लामसलतीसाठीच पूर्णपणे नेमलेला बृहस्पती हा मंत्री स्वार्थ साधण्यात मुळीच कुशल नाही. कारण त्यांनी भगवान उपेंद्रांची अवहेलना करून त्यांचे दास्य न मागता त्यांच्याद्वारा माझ्याकडून हे भोगच मागितले. हे तिन्ही लोक फक्त एक मन्वन्तरापर्यंतच राहाणार आहेत आणि हे मन्वन्तर अनंत काळाचा फक्त एक अवयव आहे. भगवंतांच्या दास्यापुढे या तुच्छ भोगांची काय किंमत आहे ? भगवंतांनी, स्वतःचे वडील हिरण्यकशिपू यांना मारल्यानंतर आमच्या पितामह प्रल्हादांनी, प्रभूंच्या सेवेचाच वर मागितला होता. भगवंत देऊ इच्छित होते तरी त्यांनी त्यांच्यापासून दूर करणारे आपल्या पित्याचे निष्कंटक राज्य नाही घेतले. माझ्यावर ना भगवंतांची कृपा, ना माझ्या वासना शांत झालेल्या. अशा स्थितीत माझ्यासारखा कोण पुरुष त्या महानुभावाच्या जवळ तरी जाण्याची इच्छा करील ? ह्या बळीचे चरित्र आम्ही पुढे (आठव्या स्कंधात) विस्ताराने सांगू. आपल्या भक्तांसाठी भगवंतांचे हृदय दयेने भरलेले असते. म्हणूनच अखिल जगाचे गुरू भगवान नारायण हातात गदा घेऊन सुतल लोकात राजा बलीच्या दारावर राहातात. दिग्विजय करीत करीत एकदा रावण तेथे पोहोचला, तेव्हा भगवंतांनी आपल्या पायाच्या अंगठयानेच त्याला लाखो योजने दूर फेकून दिले. (आणि बळीचे काम स्वतः केले.) (१८-२७)

सुतल लोकाच्या खाली तलातल आहे. तेथे त्रिपुराधिपती दानवराज मय राहातो. त्रैलोक्याचे कल्याण करण्यासाठी भगवान शंकरांनी त्याची तिन्ही नगरे भस्म केली होती. नंतर त्यांच्याच कृपेने त्याला हे स्थान मिळाले. तो मायावींचा परम गुरू आहे आणि महादेवाच्या कृपेने सुरक्षित आहे. म्हणून त्याला सुदर्शन चक्रापासूनसुद्धा भय नाही. तेथील निवासी त्याला पूज्य मानतात. (२८)

त्याच्या खाली महातलामध्ये कद्रूपासून उत्पन्न झालेल्या अनेक डोकी असलेल्या सर्पांचा क्रोधवश नावाचा एक समुदाय राहातो. त्यांच्यामध्ये कुहक, तक्षक, कालिय सुषेण इत्यादी मुख्य आहेत. त्यांचे फणे मोठ-मोठे आहेत. भगवंतांचे वाहन पक्षिराज गरुड, याला ते नेहमी घाबरतात. तरीसुद्धा कधी-कधी आपले स्त्री, पुत्र, मित्र आणि कुटुंबाच्या संगतीत आनंदाने बेहोष होऊन येथे विहार करतात. (२९)

त्याच्या खाली रसातळात पणी नावाचे दैत्य आणि दानव राहातात. यांना निवातकवच, कालेय आणि हिरण्यपुरवासी असेही म्हणतात. हे देवांचे शत्रू आहेत. हे जन्मतःच मोठे बलवान आणि धाडसी असतात. परंतु ज्या श्रीहरींच्या तेजाचा प्रभाव सर्व लोकांमध्ये पसरलेला आहे, त्यांच्यामुळे यांचा बळाचा अभिमान संपूर्ण नाहीसा झाला असल्यामुळे हे सर्पांप्रमाणे लपून-छपून राहातात. तसेच इंद्राची दूती सरमा हिने म्हटलेल्या मंत्रवर्णरूप वाक्यामुळे इंद्रापासून नेहमी भिऊन असतात. (३०)

रसातळाच्या खाली पाताळ आहे. तेथे शंख, कुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड, कंबल, अश्वतर, देवदत्त इत्यादी मोठे क्रोधी आणि मोठमोठया फणा असलेले नाग राहातात. यांच्यामध्ये वासुकी प्रमुख आहे. यांपैकी कोणाला पाच, कोणाला सात, कोणाला दहा, कोणाला शंभर आणि कोणाला एक हजार फणा आहेत. त्यांच्या फण्यांवरील चमकणारे मणी आपल्या प्रकाशाने पाताळ लोकाचा सर्व अंधकार नष्ट करतात. (३१)

स्कंध पाचवा - अध्याय चोविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP