|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २३ वा
शिशुमारचक्राचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्री शुकदेव म्हणतात - सप्तर्षींच्या वरच्या बाजूला तेरा लाख योजने अंतरावर ध्रुवलोक आहे. याला भगवान विष्णूंचे परमपद असे म्हणतात. तेथे उत्तानपादाचा पुत्र परम भगवद्भक्त ध्रुव आहे. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप आणि धर्म हे सर्वजण एकाच वेळी अत्यंत आदराने याला प्रदक्षिणा घालतात. आतासुद्धा कल्पापर्यंत राहाणारे लोक याच्याच आधारावर आहेत. याचा या लोकातील प्रभाव आम्ही पूर्वी (चौथ्या स्कंधात) वर्णन केलेला आहे. सदा जागृत राहाणार्या अव्यक्तगती भगवान कालाकडून जे ग्रह-नक्षत्रादी ज्योतिर्गण नेहमी फिरविले जातात, त्यांना आधारस्तंभ म्हणून भगवंतांनी ध्रुवलोकाचीच नियुक्ती केली आहे. म्हणून हा एकाच ठिकाणी राहून नेहमी प्रकाशित असतो. (१-२) ज्याप्रमाणे धान्याची मळणी करण्यासाठी लहान, मध्यम आणि लांब अशा दोर्यांना बांधलेले बैल अनुक्रमे जवळ मध्ये आणि लांब राहून खांबाच्या चारी बाजूंनी गोलाकार फिरतात, त्याचप्रमाणे सगळी नक्षत्रे आणि ग्रह आत बाहेर असे क्रमाने या कालचक्रात गोवलेले आहेत. ते ध्रुवलोकाचाच आश्रय घेऊन, वायूच्या प्रेरणेने कल्पाच्या अंतापर्यंत फिरत राहातात. जसे मेघ आणि ससाणा इत्यादी पक्षी आपल्या कर्मानुसार वायूच्या अधीन राहून आकाशात उडत राहातात. त्याचप्रमाणे हे ग्रह-तारे प्रकृति-पुरुषाच्या संयोगामुळे आपल्या कर्मानुसार फिरत राहातात. पृथ्वीवर पडत नाहीत. (३) काही लोक भगवंतांच्या योगमायेच्या आधारावर असणार्या या ज्योतिश्चक्राचे शिशुमार नावाच्या जलचर प्राण्याच्या रूपात वर्णन करतात. याचे शरीर गोलाकार असून तोंड खालच्या बाजूला आहे. याच्या शेपटाच्या टोकावर ध्रुव आहे. शेपटाच्या मध्यभागी प्रजापती, अग्नी, इंद्र आणि धर्म हे आहेत. शेपटाच्या मुळाशी धाता आणि विधाता आहेत. याच्या कटिप्रदेशामध्ये सप्तर्षी आहेत. या शिशुमाराने उजव्या बाजूने शरीराचे वेटोळे केले आहे. अशा स्थितीमध्ये अभिजित नक्षत्रापासून पुनर्वसूपर्यंत उत्तरायणाची जी चौदा नक्षत्रे आहेत, ती याच्या उजव्या बाजूला आहेत आणि पुष्य नक्षत्रापासून उत्तराषाढापर्यंत दक्षिणायनाची जी चौदा नक्षत्रे आहेत, ती डाव्या बाजूला आहेत. ज्याप्रमाणे लोकांमध्ये सुद्धा जेव्हा शिशुमार गोलाकार असतो, तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूच्या अवयवांची संख्या सारखीच असते; त्याचप्रमाणे इथे नक्षत्र-संख्येमध्ये सुद्धा समानता आहे. याच्या पाठीमागील भागात अजवीथी (मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या तीन नक्षत्रांचा समूह) आणि पोटाच्या भागात आकाशगंगा आहे. याच्या उजव्या आणि डाव्या कटिप्रदेशात पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रे आहेत. पाठीमागच्या उजव्या आणि डाव्या पायात आर्द्रा आणि आश्लेषा ही नक्षत्रे आहेत. तसेच उजव्या आणि डाव्या नाकपुडीत अभिजित आणि उत्तराषाढा ही नक्षत्रे आहेत. त्याचप्रमाणे उजव्या आणि डाव्या डोळ्यांत श्रवण आणि पूर्वाषाढा तसेच उजव्या आणि डाव्या कानात धनिष्ठा आणि मूळ नक्षत्रे आहेत. मघा इत्यादी दक्षिणायनातील आठ नक्षत्रे डाव्या बरगडीत आणि उलटया क्रमाने मृगशीर्ष इत्यादी उत्तरायणाची आठ नक्षत्रे उजव्या बरगडीत आहेत. शततारका आणि ज्येष्ठा ही दोन नक्षत्रे अनुक्रमे उजव्या आणि डाव्या खांद्यांच्या ठिकाणी आहेत. याच्या वरच्या हनुवटीत अगस्त्य, खालच्या हनुवटीमध्ये नक्षत्ररूप यम, तोंडामध्ये मंगळ, लिंगप्रदेशात शनी, वशिंडामध्ये बृहस्पती, छातीमध्ये सूर्य, हृदयात नारायण, मनात चंद्र, नाभीमध्ये शुक्र, स्तनांमध्ये अश्विनीकुमार, प्राण आणि अपानात बुध, गळ्यात राहू, सर्व शरीरात केतू आणि सर्व रोमरोमात संपूर्ण तारांगण आहे. (४-७) हे भगवान विष्णूंचे सर्वदेवमय स्वरूप आहे. दररोज सायंकाळी पवित्र होऊन आणि मौन धरून याचे दर्शन करीत चिंतन करावे आणि पुढील मंत्राचा जप करीत भगवंतांची स्तुती करावी. "संपूर्ण नक्षत्रमंडळाचा आश्रय, कालचक्रस्वरूप, सर्वदेवाधिपती परमपुरुष परमात्म्याचे आम्ही नमस्कारपूर्वक ध्यान करीत आहोत." ग्रह, नक्षत्र आणि तारकांच्या रूपामध्ये भगवंतांचे आधिदैविक रूप प्रकाशित होत आहे. ते मंत्राचा त्रिकाळ जप करणार्य़ांचे पाप नाहीसे करते. जो मनुष्य सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, अशा तिन्ही वेळी त्यांच्या आधिदैविक स्वरूपाचे नित्य चिंतन आणि वंदन करतो, त्याचे त्यावेळी केलेले पाप ताबडतोब नष्ट होते. (८-९) स्कंध पाचवा - अध्याय तेविसावा समाप्त |