श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय २२ वा

भिन्न-भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

परीक्षिताने विचारले - आपण जे सांगितलेत की, जरी भगवान सूर्य राशींकडे जात असताना मेरुपर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून जातो असे वाटले तरी खरे पाहाता त्याची गती उजवीकडे असत नाही, हे आम्ही कसे जाणावे ? (१)

श्रीशुक म्हणाले - जसे कुंभाराच्या फिरत असणार्‍या चाकावर बसून त्याच्याबरोबर फिरणारी मुंगी इत्यादींची गती त्याच्यापेक्षा वेगळीच असते. कारण ती वेगवेगळ्या वेळी त्या चक्राच्या निरनिराळ्या जागी दिसते. त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांच्यामुळे कळणारे कालचक्र ध्रुव आणि मेरुला उजव्या बाजूला ठेवून फिरत असले तरी त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रयाने फिरणार्‍या सूर्य इत्यादी ग्रहांची गती वास्तविक त्यापेक्षा वेगळीच आहे. कारण ते वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या राशी आणि नक्षत्रांमध्ये दिसतात. वेद आणि विद्वान लोकसुद्धा ज्यांची गती जाणण्यासाठी उत्सुक असतात, ते साक्षात आदिपुरुष भगवान नारायणच लोकांचे कल्याण आणि कर्मांच्या शुद्धीसाठी आपले वेदमय स्वरूप जो काळ त्याला बारा महिन्यात विभागून वसंत इत्यादी सहा ऋतूंमध्ये त्यांचे यथायोग्य गुण प्रगट करतात. या लोकी वर्णाश्रम-धर्मांचे अनुसरण करणारे पुरुष तीन वेदांनी प्रतिपादन केलेल्या लहान-मोठया कर्मांनी आणि योगसाधनेने त्या आदिपुरुषाची श्रद्धापूर्वक आराधना करून सुलभतेने परमपद प्राप्त करतात. भगवान सूर्य सर्व लोकांचा आत्मा आहे. तो पृथ्वी आणि द्युलोकाच्या मध्यभागी असलेल्या आकाशमंडळात कालचक्रामध्ये राहून बारा महिन्यांचा उपभोग घेतो. महिने हे संवत्सराचे अवयव आहेत आणि मेष इत्यादी राशींच्या नावाने प्रसिद्ध आहेत. यांपैकी प्रत्येक महिना चांद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा दोन पंधरवडयांचा, पितृमानाने एक रात्र आणि एक दिवसाचा तसेच सौरमानाने सव्वा दोन नक्षत्रांचा सांगितला जातो. जेवढया काळात सूर्य ह्या संवत्सराचा एक षष्ठांश भाग उपभोगतो, तेवढया भागाला ‘ऋतू’ म्हणतात. आकाशात भगवान सूर्याचा जेवढा मार्ग आहे, त्याच्या निम्मा तो जेवढया वेळात पार करतो, त्याला एक ‘अयन’ असे म्हणतात. तसेच जितक्या वेळात तो आपल्या मंद, तीव्र आणि समान गतीने स्वर्ग आणि पृथ्वीमंडलासहित संपूर्ण आकाशाला प्रदक्षिणा घालतो, त्याला अवांतर भेदाने संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर किंवा वत्सर म्हणतात. (२-७)

याचप्रमाणे सूर्याच्या किरणांपासून एक लाख योजने वर चंद्र आहे. त्याची चाल फार वेगाची आहे. म्हणून तो सर्व नक्षत्रांच्या पुढे असतो. तो सूर्याचा एक एक वर्षाचा मार्ग एक महिन्यात, एक महिन्याचा मार्ग सव्वा दोन दिवसांत आणि एक पंधरवडयाचा मार्ग एकाच दिवसात चालून जातो. हा कृष्णपक्षात क्षीण होत जाणार्‍या कलांनी पितरांचे आणि शुक्ल पक्षात वाढत जाणार्‍या कलांनी देवतांचे दिवस-रात्र असे विभाग करतो. तसेच तीस-तीस मुहूर्तांमध्ये एक-एक नक्षत्र पार करतो. अन्नमय आणि अमृतमय असल्याकारणाने हाच सर्व जीवांचा प्राण आणि जीवन आहे. हा जो सोळा कलांनी युक्त मनोमय, अन्नमय, अमृतमय, पुरुषस्वरूप भगवान चंद्र आहे, तोच देवता, पितर, मनुष्य, भूत, पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वृक्ष इत्यादी सर्व प्राण्यांच्या प्राणांचे पोषण करतो, म्हणून याला ‘सर्वमय’ असे म्हणतात. (८-१०)

चंद्राच्या तीन लाख योजने वर अभिजितासह अठठावीस नक्षत्रे आहेत. भगवंतांनी यांना कालचक्रामध्ये गोवले आहे. ही मेरुच्या उजव्या बाजूनेच फिरतात. याच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला शुक्र दिसतो. हा सूर्याच्या शीघ्र, मंद आणि समान गतीनुसार त्याच्याच प्रमाणे कधी पुढे, कधी मागे आणि कधी बरोबरीने राहून चालतो. हा पाऊस पाडणारा ग्रह आहे. म्हणून लोकांना साधारणतः नेहमीच अनुकूल असतो. याच्या गतीवरून असे अनुमान निघते की, हा पाऊस अडविणार्‍या ग्रहांना शांत करतो. (११-१२)

शुक्राच्या गतीप्रमाणेच बुधाचीही गती आहे. चंद्राचा हा पुत्र शुक्रापासून दोन लाख योजने वरच्या बाजूला आहे. हा साधारणतः मंगलकारकच आहे. परंतु जेव्हा सूर्याच्या गतीचे उल्लंघन करून जातो, तेव्हा फार मोठया प्रमाणावर वादळ, पाऊस आणि दुष्काळाच्या भीतीची सूचना देतो. याच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला ‘मंगळ’ आहे. वक्रगतीने चालला नाही, तर तो एकेका राशीत तीन-तीन पंधरवडे राहातो आणि बारा राशींना पार करतो. हा अशुभ ग्रह आणि सर्वसाधारणपणे अमंगलाचा सूचक आहे. याच्या वरच्या बाजूला दोन लाख योजने अंतरावर भगवान बृहस्पती आहे. हा वक्रगतीने चालला नाही तर एकेका राशीत एक-एक वर्ष राहातो. हा विशेष करून ब्राह्मण वर्णाला अनुकूल असतो. (१३-१५)

ब्रुहस्पतीच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला शनी दृष्टीस पडतो. हा तीस-तीस महिनेपर्यंत एकेका राशीत राहातो. म्हणून याला सर्व राशी पार करून जाण्यास तीस वर्षे लागतात. हा बहुधा सर्वांना पीडादायक आहे. याच्या वरील बाजूला अकरा लाख योजने अंतरावर कश्यप इत्यादी सप्तर्षी दृष्टीस पडतात. हे सर्व लोकांसाठी मंगल-कामना करीत भगवान विष्णूंचे परम पद असणार्‍या ध्रुवलोकाची प्रदक्षिणा करतात. (१६-१७)

स्कंध पाचवा - अध्याय बाविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP