श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय २१ वा

सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परिमाण आणि लक्षणांसहित ह्या भूमंडलाचा एकूण विस्तार एवढाच सांगितला आहे. याच्याच आधाराने विद्वान लोक द्युलोकाचेही परिमाण सांगतात. जसे द्विदल धान्याच्या दोन दलांपैकी एकाचे स्वरूप जाणल्याने दुसर्‍याचेसुद्धा जाणता येते, त्याचप्रमाणे भूलोकाच्या परिमाणानेच द्युलोकाचेसुद्धा परिमाण जाणून घेतले पाहिजे. या दोन्हींच्या मध्ये अंतरिक्ष लोक आहे. हे या दोघांचे संधिस्थान आहे. याच्या मध्यभागी असणार्‍या ग्रह आणि नक्षत्रांचा अधिपती भगवान सूर्य आपली उष्णता आणि प्रकाश यांनी तिन्ही लोकांना तापवीत आणि प्रकाशित करीत असतो. तो उत्तरायण, दक्षिणायन आणि वैषुवत नावाच्या अनुक्रमे मंद, जलद आणि समान गतीने समयानुसार मकर इत्यादी राशींमध्ये वर, खाली आणि समान स्थानात राहून दिवस-रात्रींना मोठे, लहान किंवा समान करतो. जेव्हा सूर्य मेष किंवा तूळ राशीमध्ये असतो, तेव्हा दिवस-रात्री समान होतात. जेव्हा वृषभ इत्यादी पाच राशींत असतो, तेव्हा दरमहा रात्र एक-एक घटका कमी होत जाते आणि त्याच हिशेबाने दिवस मोठा होतो. जेव्हा वृश्चिक इत्यादी पाच राशीत असतो, तेव्हा दिवस आणि रात्र यांमध्ये याच्याविरूद्ध परिवर्तन होते. अशा प्रकारे दक्षिणायन सुरू होईपर्यंत दिवस मोठा होत जातो अणि उत्तरायण सुरू होईपर्यंत रात्र मोठी होत जाते. (१-६)

अशा रीतीने पंडित मानसोत्तर पर्वताभोवतीचा सूर्याच्या प्रदक्षिणेचा मार्ग नऊ कोटी एक्कावन्न लाख योजने इतका सांगतात. त्या पर्वतावर मेरुच्या पूर्वेकडे इंद्राची देवधानी, दक्षिणेला यमराजाची संयमनी, पश्चिमेला वरुणाची निम्लोचनी आणि उत्तरेला चंद्राची विभावरी नावाची नगरी आहे. या नगरींमध्ये मेरूच्या चारी बाजूंना वेळोवेळी सूर्योदय, मध्यान्ह, सायंकाळ आणि मध्यरात्री होत राहातात. याच्याचमुळे सर्व जीव काम सुरू करतात किंवा थांबवतात. जे लोक सुमेरूवर राहातात, त्यांच्या माथ्यावर नेहमी सूर्य असतो. तो आपल्या गतीने अश्विनी इत्यादी नक्षत्रांमध्ये जात असता, जरी मेरूला डाव्या बाजूला ठेवून जात असला, तरी सर्व ज्योतिर्मंडल फिरविणार्‍या व नेहमी उजव्या बाजूने वाहाणार्‍या प्रवह नावाच्या वायूने फिरविल्यामुळे तो त्याला उजवीकडे ठेवून चालतो असे वाटते. ज्या भागात सूर्याचा उदय होतो, त्याच्या बरोबर दुसर्‍या बाजूच्या भागात त्याचा अस्त होताना दिसतो आणि जेथे तो लोकांना तापवून घामेघूम करतो, त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला मध्यरात्र असल्यामुळे तो लोकांना झोपवितो. ज्या लोकांना मध्यान्हाच्या वेळी तो स्पष्ट दिसतो, त्यांनाच तो विरुद्ध दिशेला गेल्यावर दिसत नाही. (७-९)

सूर्य जेव्हा इंद्रपुरीहून यमराजपुरीकडे जातो, तेव्हा पंधरा घटकात तो सव्वादोन कोटी आणि साडेबारा लाख योजनांपेक्षा थोडे अधिक (पंचवीस हजार योजने) चालतो. नंतर याच क्रमाने तो वरुण आणि चंद्र यांच्या पुरींना ओलांडून पुन्हा इंद्रपुरीमध्ये पोहोचतो. याच प्रमाणे चंद्र इत्यादी अन्य ग्रहसुद्धा ज्योतिश्चक्रामधील अन्य नक्षत्रांसह उदय आणि अस्त पावतात. भगवान सूर्याचा वेदमय रथ याप्रमाणे एका मुहूर्तात चौतीस लाख आठशे योजने या हिशोबाने या चार पुरींमध्ये फिरत राहातो. (१०-१२)

याचे संवत्सर नावाचे एक चक्र आहे. त्याला महिनेरूपी बारा आरे आहेत. ऋतुरूप सहा चाकाचे घेर आहेत. चार महिनेरूपी तीन गडडे आहेत. या रथाच्या धुरीचे एक टोक मेरुपर्वताच्या शिखरावर आहे आणि दुसरे मानसोत्तर पर्वतावर. याला लावलेले एक चाक घाण्याच्या चाकाप्रमाणे फिरत राहून मानसोत्तर पर्वतावर फेर्‍या घालते. या धुरीला जिचा मूळ भाग जोडला आहे, अशी आणखी एक धुरी आहे. तिची लांबी मूळ धुरीच्या एक चतुर्थांश आहे. तिच्या वरचा भाग तेलघाण्याच्या धुरीप्रमाणे ध्रुवलोकाला लागलेला आहे. (१३-१४)

या रथातील बैठक छत्तीस लाख योजने लांब आणि नऊ लाख योजने रुंद आहे. त्याचे जू-सुद्धा छत्तीस लाख योजनेच लांब आहे. त्याला अरुण नावाच्या सारथ्याने गायत्री इत्यादी छंदांची नावे असलेले सात घोडे जुंपलेले आहेत. तेच या रथावर बसलेल्या भगवान सूर्याला घेऊन जातात. सूर्यापुढे त्याच्याचकडे तोंड करून बसलेला अरुण त्याचा सारथी आहे. भगवान सूर्यासमोर अंगठयाच्या पेराएवढया आकाराचे वालखिल्य नावाचे साठ हजार ऋषी स्वस्तिवाचनासाठी नियुक्त केले आहेत, ते त्याची स्तुती करतात. यांच्या खेरीज ऋषी, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष, राक्षस, आणि देव असे जे सर्व मिळून चौदा आहेत, परंतु जोडीने राहिल्याकारणाने सात समजले जातात, ते प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावे धारण करून आपल्या वेगवेगळ्या कर्मांनी प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावे धारण करणार्‍या आत्मस्वरूप भगवान सूर्याची दोघे-दोघे मिळून उपासना करतात. अशा प्रकारे भगवान सूर्य भूमंडलाच्या नऊ कोटी, एक्कावन्न लक्ष योजने लांब विस्तारातील अंतर प्रत्येक क्षणात दोन हजार दोन योजने (याप्रमाणे) पार करतो. (१५-१९)

स्कंध पाचवा - अध्याय एकविसावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP