|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २० वा
अन्य सहा द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणाले - आता प्रमाण, लक्षण आणि स्थितीनुसार प्लक्षादी अन्य द्वीपांच्या वर्षविभागाचे वर्णन करतो. जसा मेरुपर्वत जंबुद्वीपाने वेढलेला आहे, त्याचप्रमाणे जंबुद्वीपसुद्धा आपल्याइतकेच परिमाण आणि विस्तार असलेल्या खार्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे. खंदक ज्याप्रमाणे बाहेरून उपवनाने घेरलेला असतो, त्याचप्रमाणे क्षारसमुद्रसुद्धा आपल्यापेक्षा दुप्पट विस्तार असणार्या प्लक्षद्वीपाने वेढलेला आहे. जंबुद्वीपामध्ये जेवढा मोठा जांभूळ-वृक्ष आहे, तेवढाच विस्तार येथे सुवर्णमय प्लक्ष-वृक्षाचा आहे. म्हणूनच याचे नाव प्लक्षद्वीप असे पडले आहे. येथे सात जिव्हा असणारे अग्निदेव राहातात. या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र इध्मजिव्ह होता. त्यानेच याचे सात वर्षांत विभाग केले आणि ते विभाग त्या वर्षांप्रमाणेच नावे असलेल्या आपल्या पुत्रांकडे सोपविले आणि स्वतः अध्यात्मयोगाचा आश्रय घेऊन विरक्त झाला. शिव, यवस, सुभद्र, शांत, क्षेम, अमृत, आणि अभय अशी या वर्षांची नावे होत. यांतसुद्धा सात पर्वत आणि सात नद्याच प्रसिद्ध आहेत. तेथे मणिकूट, वज्रकूट, इंद्रसेन, ज्योतिष्मान, सुपर्ण, हिरण्यष्ठीव आणि मेघमाल हे सात मर्यादापर्वत आहेत. तसेच अरुणा, नृम्णा, आंगिरसी, सावित्री, सुप्रभाता, ऋतंभरा आणि सत्यंभरा या सात महानद्या आहेत. तेथे हंस, पतंग, ऊर्ध्वायन आणि सत्यांग नावाचे चार वर्ण आहेत. या नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याने त्यांचे रजोगुण-तमोगुण क्षीण होत राहातात. त्यांचे आयुष्य एक हजार वर्षांचे असते. देवांप्रमाणेच हे दिसतात आणि त्यांना संतानेसुद्धा त्यांच्याप्रमाणेच असतात. हे तीन वेदांच्या मंत्रांनी स्वर्गाचे द्वार असणार्या तीन वेदस्वरूप भगवान सूर्याची आत्मरूपाने उपासना करतात. ते म्हणतात, जो सत्य आणि ऋत, वेद आणि शुभाशुभ फलांचा अधिष्ठाता आहे, त्या पुराणपुरुष विष्णुस्वरूप भगवान सूर्याला आम्ही शरण जातो. प्लक्ष इत्यादी पाच द्वीपांमध्ये सर्व माणसांना जन्मतःच आयुष्य, इंद्रिये, मनोबल, इंद्रियबल, शारीरिक बल, बुद्धी आणि पराक्रम सारख्याच प्रमाणात असतात. (१-६) प्लक्षद्वीप आपल्याइतक्याच विस्ताराच्या ऊसरसाच्या समुद्राने वेढलेले आहे. त्याच्यापुढे, त्याच्या दुप्पट विस्तार असलेले, शाल्मलीद्वीप आहे. ते तेवढयाच विस्ताराच्या मद्याच्या सागराने वेढलेले आहे. प्लक्ष द्वीपाच्या पाकर वृक्षासारखाच तेथे सावरीचा वृक्ष आहे. असे सांगतात की, हाच वृक्ष आपल्या वेदमय पंखांनी भगवंतांची स्तुती करणार्या पक्षिराज भगवान गरुडाचे निवासस्थान आहे आणि तोच या द्वीपाचे नाव असण्याचे कारण आहे. या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र यज्ञबाहू होता. त्याने याचे सुरोचन, सौमनस्य, रमणक, देववर्ष, पारिभद्र, आप्यायन आणि अविज्ञात नावाचे सात विभाग पाडले आणि हे याच नावाच्या आपल्या पुत्रांकडे सोपविले. यातसुद्धा सात वर्षपर्वत आणि सातच नद्या प्रसिद्ध आहेत. स्वरस, शतश्रॄंग, वामदेव, कुंद, मुकुंद, पुष्पवर्ष आणि सहस्त्रश्रुती अशी पर्वतांची नावे आणि अनुमती, सिनीवाली, सरस्वती, कुहू, रजनी, नंदा आणि राका ही नद्यांची नावे होत. या वर्षात राहाणारे श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर आणि इषन्धर नावाचे चार वर्ण वेदमय आत्मस्वरूप भगवान चंद्रांची वेदमंत्रांनी उपासना करतात. (आणि म्हणतात) जो कृष्णपक्ष आणि शुक्लपक्षात आपल्या किरणांनी विभाग करून देव, पितर आणि सर्व प्राण्यांना अन्न देतो, तो चंद्र आमचा राजा असो. (७-१२) याचप्रमाणे मद्याच्या समुद्राच्या पुढे त्याच्या दुप्पट आकाराचे कुशद्वीप आहे. यापूर्वी वर्णन केलेल्या द्वीपांप्रमाणे हे सुद्धा आपल्या इतकाच विस्तार असणार्या तुपाच्या समुद्राने घेरलेले आहे. यात देवांनी लावलेले एक दर्भाचे झुडुप आहे, त्याच्यावरूनच या द्वीपाचे हे नाव पडले आहे. हे अग्नीप्रमाणे तेजस्वी असून आपल्या गवताच्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करीत असते. राजन, या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र महाराज हिरण्यरेता होता. त्याने आपल्या द्वीपाचे सात विभाग करून त्यांपैकी एक-एक आपले सात पुत्र वसू, वसुदान, दृढरुची, नाभिगुप्त, स्तुत्यव्रत, विविक्त आणि वामदेव यांना दिले आणि स्वतः तो तप करण्यासाठी निघून गेला. त्यांच्या वर्षात सीमा निश्चित करणारे सात पर्वत आहेत आणि सातच नद्या आहेत. चक्र, चतुशृंग, कपिल, चित्रकूट, देवानीक, ऊर्ध्वरोमा आणि द्रविण ही पर्वतांची नावे होत. नद्यांची नावे अशी आहेत. रसकुल्या, मधुकुल्या, मित्रविंदा, श्रुतविंदा, देवगर्भा, घृतच्युता व मंत्रमाला. यांच्या जलामध्ये स्नान करून कुशद्वीपवासी कुशल, कोविद, अभियुक्त आणि कुलक या वर्णांचे लोक अग्निस्वरूप भगवान हरींचे यज्ञादी उत्तम कर्मांनी पूजन करतात. (तसेच याप्रमाणे स्तुती करतात) हे अग्ने, आपण परब्रह्माला साक्षात हवी पोहोचविणारे आहात; म्हणून भगवंतांच्या अंगभूत देवतांच्या यज्ञाने आपण त्या परमपुरुषाचे सुद्धा यजन करावे. (१३-१७) तसेच घृतसमुद्राच्या बाहेर त्याच्या दुप्पट आकाराचे क्रौंचद्वीप आहे. ज्याप्रमाणे कुशद्वीप तुपाच्या समुद्राने वेढलेले आहे, त्याप्रमाणेच हे आपल्याइतकाच विस्तार असणार्या दुधाच्या समुद्राने वेढलेले आहे. येथे क्रौंच नावाचा एक मोठा पर्वत आहे. त्याच्यावरूनच याचे नाव क्रौंच द्वीप असे पडले आहे. पूर्वी श्रीस्वामी कार्तिकेयांच्या शस्त्रप्रहाराने याचा मध्यभाग आणि झाडे-वेली इत्यादी उध्वस्त झाल्या होत्या. परंतु क्षीरसमुद्राचे सिंचन झाल्यामुळे आणि वरुणाने यांचे रक्षण केल्यामुळे हा पर्वत निर्भय झाला. या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र घृतपृष्ठ होता. त्याने याचे सात वर्षात विभाग करून त्यांच्यावर, त्यांच्यासारखीच नावे असणार्या आपल्या सात उत्तराधिकारी पुत्रांना नियुक्त केले आणि स्वतः सर्व जीवांचे अंतरात्मा, परम मंगलमय, कीर्तिशाली भगवान श्रीहरींच्या पवित्र चरणकमलांना तो शरण गेला. घृतपृष्ठाचे आम, मधुरुह, मेघपृष्ठ, सुधामा, भ्राजिष्ठ, लोहितार्ण आणि वनस्पती या नावाचे सात पुत्र होते. त्यांच्या वर्षांमध्ये सुद्धा सात वर्ष पर्वत आणि सातच नद्या होत्या, त्या पर्वतांची नावे शुक्ल, वर्धमान, भोजन, उपबर्हिण, नंद, नंदन आणि सर्वतोभद्र अशी आहेत आणि नद्यांची नावे अभया, अमृतौघा, आर्यका, तीर्थवती, वृत्तिरूपवती, पवित्रवती आणि शुक्ला ही होत. यांच्या पवित्र आणि निर्मल जलाचे सेवन करणारे तेथील पुरुष, ऋषभ, द्रविण आणि देवक नावाचे चार वर्णांचे निवासी पाण्याने भरलेल्या ओंजळींनी अर्घ्य देऊन जलदेवतेची उपासना करतात. (आणि म्हणतात) हे जलदेवते, तुला परमात्म्यापासून सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भूः, भुवः आणि स्वः अशा तिन्ही लोकांना तू पवित्र करतेस. कारण तू स्वरूपतःच पापांचा नाश करणारी आहेस. आम्ही आमच्या शरीराने तुला स्पर्श करतो. तू आमचे अंग पवित्र कर. (१८-२३) याचप्रमाणे क्षीरसमुद्राच्या पुढे त्याच्या चारी बाजूंनी बत्तीस लाख योजने विस्तार असलेले शाकद्वीप आहे. ते यांच्याएवढाच विस्तार असलेल्या ताकाच्या समुद्राने वेढलेले आहे. यामध्ये शाक नावाचा एक मोठा वृक्ष आहे. त्यामुळेच याचे ते नाव पडले आहे. त्याच्या अत्यंत मनोहर सुगंधाने सारे द्वीप दरवळलेले असते. मेधातिथी नावाचा त्याचा अधिपती हा सुद्धा प्रियव्रताचाच पुत्र होता. त्यानेसुद्धा आपल्या द्वीपाची सात भागात विभागणी केली आणि त्यांना आपल्या मुलांसारखीच नावे ठेवली आणि त्यांवर आपले पुत्र पुरोजव, मनोजव, पवमान, धूम्रानीक, चित्ररेफ, बहुरूप आणि विश्वधार यांची अधिपती म्हणून नियुक्ती करून स्वतः भगवान अनंतांच्यामधे एकाग्रचित्त करून तो तपोवनात निघून गेला. या वर्षांमध्ये सुद्धा सात मर्यादापर्वत आणि सात नद्याच आहेत. पर्वतांची नावे ईशान, उरुश्रृंग, बलभद्र, शतकेसर, सहस्त्रस्त्रोत, देवपाल आणि महानस अशी आहेत. आणि नद्यांची अनघा, आयुर्दा, उभयस्पृष्टी, अपराजिता, पंचपदी, सहस्रस्रुती आणि निजधृती अशी आहेत. या वर्षातील ऋतव्रत, सत्यव्रत, दानव्रत आणि अनुव्रत नावाचे पुरुष प्राणायामाने आपले रजोगुण-तमोगुण क्षीण करून महान समाधीच्या द्वारे वायुरूप श्रीहरींची आराधना करतात. (आणि याप्रमाणे त्यांची स्तुती करतात.) जे प्राणादिवृत्तिरूप आपल्या ध्वजांसह प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे पालन करतात, तसेच संपूर्ण जग ज्यांच्या अधीन आहे, ते अंतर्यामी वायुरूप साक्षात भगवान आमचे रक्षण करो. (२४-२८) त्याचप्रमाणे ताकाच्या समुद्रापुढे चारी बाजूंनी त्याच्या दुप्पट विस्तार असलेले पुष्करद्वीप आहे. ते चारी बाजूंनी आपल्याएवढाच विस्तार असलेल्या गोडया पाण्य़ाच्या समुद्राने वेढलेले आहे. तेथे अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे दैदीप्यमान लाखो सुवर्णमय पाकळ्या असलेले एक अत्यंत मोठे कमळ आहे, जे ब्रह्मदेवाचे आसन मानले जाते. या द्वीपाच्या मधोमध त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाकडील वर्षांच्या मर्यादा निश्चित करणारा मानसोत्तर नावाचा एकच पर्वत आहे. हा दहा हजार योजने उंच आणि तितक्याच लांबीचा आहे. त्याच्यावर चारी दिशांना इंद्रादी लोकपालांची चार नगरे आहेत. सूर्याच्या रथाचे संवत्सररूप चाक या मेरुपर्वताच्या चारी बाजूंनी देवांचा दिवस आणि रात्र म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रमाने नेहमी फिरत असते. या द्वीपाचा अधिपती प्रियव्रतपुत्र वीतिहोत्र हा सुद्धा आपले पुत्र रमणक आणि धातकी यांना दोन्ही वर्षांचा अधिपती नेमून, स्वतः आपल्या थोरल्या भावांप्रमाणे भगवत्सेवेमध्ये तत्पर राहू लागला. तेथील रहिवासी ब्रह्मारूप भगवान श्रीहरींची ब्रह्मसालोक्याची प्राप्ती करून देणार्या कर्मांनी आराधना करीत याप्रकारे स्तुती करतात. "जे साक्षात कर्मफलरूप आहेत आणि एक परमेश्वर हीच ज्यांची पूर्ण स्थिती आहे, तसेच ज्यांची सर्व लोक पूजा करतात, ब्रह्मज्ञानाच्या साधनरूप अशा त्या अद्वितीय आणि शांतस्वरूप ब्रह्ममूर्ती भगवंतांना माझा नमस्कार असो." (२९-३३) श्रीशुक म्हणतात - याच्यापुढे लोकालोक नावाचा पर्वत आहे. तो प्रकाशित आणि अप्रकाशित प्रदेशांच्या मध्यभागी त्यांचे विभाग पाडण्यासाठी केला आहे. मेरु पर्वतापासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जेवढे अंतर आहे, तेवढीच जमीन शुद्धोदक समुद्राच्या पलीकडील बाजूला आहे. त्याच्यापुढे सुवर्णमयी भूमी आहे. ती आरशाप्रमाणे स्वच्छ आहे. तेथे पडलेली कोणतीही वस्तू पुन्हा मिळत नाही. म्हणून देवांव्यतिरिक्त अन्य कोणी प्राणी येथे राहात नाहीत. सूर्य इत्यादींनी प्रकाशित आणि अप्रकाशित भूभागांच्या मधोमध हा पर्वत असल्याने त्याचे लोकालोक हे नाव पडले आहे. परमेश्वराने याला त्रैलोक्याच्या बाहेर, त्याच्या चारी बाजूंच्या सीमा म्हणून ठेवले आहे. हा इतका उंच आणि लांब आहे की, याच्या एका बाजूवर पडलेली, तिन्ही लोकांना प्रकाशित करणार्या सूर्यापासून तो ध्रुवापर्यंत सर्व ज्योतिर्मंडलांची किरणे दुसर्या बाजूला जाऊ शकत नाहीत. (३४-३७) प्रमाण, लक्षण आणि स्थिती यांना अनुसरून विद्वानांनी संपूर्ण लोकांचा एवढाच विस्तार सांगितला आहे. हा सर्व भूभाग पन्नास कोटी योजने आहे. हा लोकालोकपर्वत त्याच्या एक चतुर्थांश (म्हणजेच साडेबारा कोटी योजने) आहे. सर्व जगाचे गुरू स्वयंभू श्री ब्रह्मदेवांनी संपूर्ण लोकांच्या संरक्षणासाठी याच्या चारी दिशांना ऋषभ, पुष्करचूड, वामन आणि अपराजित नावाचे चार हत्ती नेमले आहेत. या दिग्गजांची आणि आपल्या अंशस्वरूप इंद्रादी लोकपालांच्या विविध शक्तींची वृद्धी व्हावी, तसेच सर्व लोकांच्या कल्याणासाठी, सर्वश्रेष्ठ ऐश्वर्याचे अधिपती सर्वांतर्यामी परमपुरुष श्रीहरी आपल्या विष्वक्सेनादी श्रेष्ठ पार्षदांसहित या पर्वतावर सर्व बाजूंनी विराजमान आहेत. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य इत्यादी आठ महासिद्धींनी संपन्न असे आपले विशुद्ध स्वरूप त्यांनी धारण केले आहे. त्यांच्या हातांमध्ये शंख, चक्र इत्यादी श्रेष्ठ आयुधे शोभून दिसत आहेत. अशा प्रकारे आपल्या योगमायेने रचलेल्या विविध लोकांची व्यवस्था ठेवण्यासाठी ते याच लीलामय रूपात कल्पाच्या अंतापर्यंत तेथे सगळीकडे राहातात. लोकालोक पर्वताच्या आतील बाजूच्या भूभागाचा जेवढा विस्तार सांगितला आहे, तेवढाच विस्तार लोकालोक पर्वताच्या बाहेरील बाजूस असणार्या अलोक पर्वताचा आहे. त्याच्यापुढे केवळ योगेश्वरांचीच उत्तम गती आहे, असे सांगतात. (३८-४२) स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये जे ब्रह्मांडाचे केंद्र आहे, तेथेच सूर्य आणि ब्रह्मांडगोल यांच्यामध्ये सर्व बाजूंनी पंचवीस कोटी योजने अंतर आहे. सूर्य या मृत (अचेतन) अंडयामध्ये वैराजरूपाने विराजमान आहे, म्हणून याचे नाव ‘मार्तंड’ असे पडले आहे. हा हिरण्यमय ब्रह्मांडापासून प्रगट झाला आहे, म्हणून याला ‘हिरण्यगर्भ’ असेही म्हटले जाते. सूर्याच्या द्वाराच दिशा, आकाश, अंतरिक्ष, भूलोक, स्वर्ग आणि मोक्षाचे प्रदेश, नरक आणि रसातल तसेच अन्य सर्व भागांची विभागणी होते. सूर्यच देव, पशुपक्षी, मनुष्य, सरपटणारे प्राणी आणि वेली-वृक्ष इत्यादी सर्व जीवसमूहाचा आत्मा आणि नेत्रेंद्रियाचा अधिष्ठाता आहे. (४३-४६) स्कंध पाचवा - अध्याय विसावा समाप्त |