|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १९ वा
किंपुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - किंपुरुषवर्षामध्ये श्रीलक्ष्मणांचे थोरले बंधू आदिपुरुष, सीता-हृदयाभिराम भगवान श्रीरामांच्या चरणसान्निध्यात रमलेले परम भागवत श्रीहनुमान अन्य किन्नरांसह अविचल भक्तिभावाने त्यांची उपासना करतात. तेथे अन्य गंधर्वांसहित आर्ष्टिषेण आपले स्वामी भगवान श्रीरामांची परम कल्याणमय जी गुणगाथा गातात ती श्रीहनुमान ऐकतात आणि स्वतः या मंत्राचा जप करीत त्यांची अशी स्तुती करतात. "आम्ही पवित्रकीर्ती भगवान श्रीरामांना नमस्कार करतो. सत्पुरुषांची लक्षणे, शील, आणि आचरण यांनी युक्त अशा आपणांस नमस्कार. संयमी व लोकाराधनतत्पर अशा आपणांस नमस्कार. साधुत्वाच्या परीक्षेत कसोटीच्या पाषाणाप्रमाणे असणार्या आपणांस नमस्कार. ब्राह्मणभक्त महापुरुष महाराज श्रीरामांना नमस्कार." (१-३) भगवन, आपण विशुद्ध बोधस्वरूप, अद्वितीय, आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने गुणांच्या कार्यरूप अशा जागृती इत्यादी सर्व अवस्थांचे निरसन करणारे, सर्वांतरात्मा, परम शांत, शुद्ध बुद्धीने ग्रहण करता येणारे, नाम-रूप विरहित आणि अहंकारशून्य आहात. मी आपणांस शरण आलो आहे. प्रभो, आपला मनुष्यावतार केवळ राक्षसांच्या वधासाठीच नाही, तर माणसांना शिक्षण देण्यासाठी आहे. नाहीतर, आपल्या स्वरूपातच नेहमी रममाण राहाणार्या साक्षात जगदात्मा जगदीश्वरांना सीतेसाठी इतके दुःख कसे झाले असते ? आपण आत्मज्ञानी पुरुषांचे आत्मा आणि हितकर्ते भगवान वासुदेव आहात. त्रैलोक्यातील कोणत्याही वस्तूची आपल्याला आसक्ती नाही. त्यामुळे सीतेचा मोह आपल्याला असू शकत नाही की लक्ष्मणाचा त्याग आपण करू शकत नाही. उत्तम कुळामध्ये जन्म, सौंदर्य, वाक्पटुत्व, बुद्धी, आणि श्रेष्ठ योनी यांपैकी कोणताही गुण आपल्यासारख्या थोरांच्या प्रसन्नतेला कारण होऊ शकत नाही. म्हणूनच लक्ष्मणाचे थोरले बंधू असलेल्या आपण यांपैकी कोणताही गुण नसलेल्या आम्हा वनवासी वानरांशी मैत्री केली. देव, असुर, वानर किंवा मनुष्य, कोणीही असो, त्याला सर्व प्रकारे मनुष्यावतारी श्रीरामांचेच भजन केले पाहिजे. कारण ते साक्षात श्रीहरीच आहेत. ते थोडयाशा सत्कृत्यानेही संतुष्ट होतात. म्हणूनच तर त्यांनी सर्व उत्तरकोसलवासियांना आपल्या दिव्यधामाला नेले. (४-८) भारतवर्षामध्येसुद्धा भगवंत दयावश होऊन, नरनारायणरूप धारण करून, आत्मज्ञानी पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी अव्यक्तरूपाने कल्पाच्या अंतापर्यंत तप करीत आहेत. त्यांची ही तपश्चर्या अशी आहे की, जिच्यामुळे धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शांती, आणि उपरती यांची उत्तरोत्तर वृद्धी होऊन शेवटी आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. तेथे देवर्षी नारद, स्वतः भगवंतांनीच सांगितलेल्या सांख्य आणि योगशास्त्रासह भगवंतांचा महिमा प्रगट करणार्या पांचरात्रदर्शनाचा सावर्णी मनूंना उपदेश करण्यासाठी भारतवर्षातील वर्णाश्रमधर्माचे पालन करणार्या प्रजेसह अत्यंत भक्तिभावाने भगवान श्रीनरनारायणांची उपासना करीत या मंत्रांचा जप तसेच स्तोत्र गाऊन स्तुती करीत आहेत. शांत स्वभावयुक्त आणि अहंकाररहित भगवंतांना नमस्कार. अनासक्तांचे धन ऋषिप्रवर भगवान नर-नारायणांना नमस्कार. परमहंसांचे परम गुरू आणि आत्मारामांचे अधिपती अशा आपल्याला वारंवार नमस्कार असो. ते असेही गातात की - जे विश्वाची उत्पत्ती इत्यादीचे कर्ता असूनही कर्तृत्वाच्या अभिमानाने बांधले जात नाहीत, शरीरात राहूनसुद्धा ज्यांना देहधर्म सतावीत नाहीत. तसेच द्रष्टा असूनही ज्यांची दृष्टी दृश्याच्या गुण-दोषांनी दूषित होत नाही, त्या असंग आणि विशुद्ध साक्षीस्वरूप भगवान नर-नारायणांना नमस्कार असो. हे योगेश्वर, भगवान हिरण्यगर्भांनी योगसाधनेची सर्वात मोठी कुशलता हीच सांगितली आहे की, मनुष्याने अंतकाली देहाभिमान सोडून भक्तिपूर्वक आपल्या प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये आपले मन लावावे. लौकिक आणि पारलौकिक भोगांना लालचावलेला मूर्ख मनुष्य जसा पुत्र, स्त्री आणि धनाची चिंता करून मृत्यूला भितो, त्याचप्रमाणे जर विद्वानालाही हे निंदनीय शरीर सुटण्याची भीती वाटू लागली, तर त्याने ज्ञानप्राप्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न केवळ श्रमच आहेत. म्हणून हे अधोक्षजा, आपण आम्हांला आपला स्वाभाविक प्रेमरूप भक्तियोग प्रदान करा की, ज्यामुळे हे प्रभो, या निंदनीय शरीरात आपल्या मायेमुळे भिनलेल्या दुर्भेद्य अशा मी-माझेपणाला ताबडतोब नाहीसे करता येईल. (९-१५) या भारतवर्षात सुद्धा पुष्कळसे पर्वत आणि नद्या आहेत. जसे - मलय, मंगलप्रस्थ, मैनाक, त्रिकूट, ऋषभ, कूटक, कोल्लक, सह्य, देवगिरी, ऋष्यमूक, श्रीशैल, वेंकट, महेंद्र, वारिधार, विंध्य, शुक्तिमान, ऋक्षगिरी, पारियात्र, द्रोण, चित्रकूट, गोवर्धन, रैवतक, ककुभ, नील, गोकामुख, इंद्रकील, आणि कामगिरी. शिवाय असेच आणखीही शेकडो-हजारो पर्वत आहेत. त्यांच्या कडयांवर उगम पावणार्या नद-नद्या सुद्धा अगणित आहेत. या नद्या आपल्या नावांनीच जीवांना पवित्र करतात आणि भारतीय प्रजा यांच्याच पाण्याचा उपयोग करतात. त्यांपैकी या महानद्या आहेत - चंद्रवसा, ताम्रपर्णी, अवटोदा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, पयस्विनी, शर्करावती, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमरथी, गोदावरी, निर्विन्ध्या, पयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मण्वती, सिंधू, अंध आणि शोण या नावांचे नद, महानदी, वेदस्मृती, ऋषिकुल्या, त्रिसामा, कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वती, दृषद्वती, गोमती, सरयू, रोधस्वती, सप्तवती, सुषोमा, शतद्रू, चंद्रभागा, मरुद्वृधा, वितस्ता, असिक्नी, आणि विश्वा. याच वर्षात जन्म घेणार्या पुरुषांना आपण केलेल्या सात्त्विक, राजस, आणि तामस कर्मांनुसार अनुक्रमे वेगवेगळ्या प्रकारच्या दैवी मानुषी आणि नारक योनी प्राप्त होतात. कारण कर्मानुसार सर्व जीवांना सर्व योनी प्राप्त होऊ शकतात. तसेच आपापल्या वर्णासाठी नेमून दिलेल्या धर्मांचे विधिवत पालन केल्याने मोक्षाचीसुद्धा प्राप्ती होऊ शकते. सर्व भूतमात्रांचे आत्मा, रागादी दोषरहित, अनिर्वचनीय, निराधार, परमात्मा भगवान वासुदेवांमध्ये अनन्य आणि अहैतुक भक्तिभाव हेच मोक्षपद होय. जेव्हा अनेक प्रकारच्या गर्तीचे कारण असणारी अविद्यारूप हृदयाची ग्रंथी सोडविणारी भगवंतांच्या भक्तांची संगत लाभते, तेव्हाच हा भक्तिभाव प्राप्त होतो. (१६-२०) देवसुद्धा असेच म्हणतात - अहाहा ! ज्यांनी भगवंतांच्या सेवेसाठी योग्य असा मनुष्यजन्म भारतवर्षात घेतला, त्यांनी असे कोणते पुण्य केले आहे की स्वतः श्रीहरीच यांच्यावर प्रसन्न झाले आहेत ? आम्हांलासुद्धा यांचा हेवा वाटतो. आम्हांला अतिशय कठीण असे यज्ञ, तप, व्रत, दान इत्यादी करून हा जो तुच्छ स्वर्गाचा अधिकार प्राप्त झाला आहे, याच्यापासून काय लाभ ? इंद्रियभोगांच्या आधिक्यामुळे येथे भगवत्स्मृतीच नाहीशी होते. म्हणून श्रीनारायणांच्या चरणकमलांची स्मृतीच होत नाही. जेथे निवास करणार्यांना एक-एक कल्पाचे आयुष्य असते, तो स्वर्गच काय, परंतु जेथून संसारचक्रात पुन्हा यावे लागते, त्या ब्रह्मलोक इत्यादीपेक्षाही भारतवर्षामध्ये थोडे आयुष्य घेऊन जन्म घेणे चांगले आहे. कारण धैर्यवान मनुष्य येथे एका क्षणातच आपल्या या मर्त्य शरीराने केलेली सर्व कर्मे श्रीभगवंतांना अर्पण करून त्यांचे अभयपद मिळवू शकतो." (२१-२३) जेथे भगवत्कथेची अमृतमय सरिता वाहात नाही, जेथे तिचे उगमस्थान असणारे भगवद्भक्त निवास करीत नाहीत, आणि जेथे नृत्य-गीतांसह मोठया समारंभपूर्वक भगवान यज्ञपुरुषांची पूजा-अर्चा केली जात नाही, तो ब्रह्मलोक जरी असला, तरी त्याचा आश्रय करू नये. ज्या जीवांनी या भारतवर्षामध्ये ज्ञान त्यानुसार कर्म, तसेच त्या कर्माला उपयुक्त द्रव्यादी सामुग्रीने संपन्न असा मनुष्यजन्म मिळूनही जर जन्म-मरण फेर्यातून सुटण्याचा प्रयत्न केला नाही तर (व्याधाच्या जाळ्यातून सुटल्यानंतरही फळे इत्यादीच्या लोभामुळे पुन्हा त्याच वृक्षावर विहार करणार्या) वनवासी पशुपक्ष्यांप्रमाणे ते पुन्हा संसारबंधनात पडतात. (२४-२५) जेव्हा हे यज्ञामध्ये निरनिराळ्या देवतांच्या उद्देशाने वेगवेगळे भाग करून विधी, मंत्र, द्रव्य यांनी श्रद्धापूर्वक त्यांना हवी अर्पण करतात, तेव्हा इंद्रादी वेगवेगळ्या नावांनी आवाहन केल्यावरही सर्व कामना पूर्ण करणारे पण स्वतः पूर्णकाम असणारे श्रीहरीच प्रसन्न होऊन तो हवी ग्रहण करतात. सकाम पुरुषांनी मागितल्यानंतर भगवान त्यांना इच्छित पदार्थ देतात, हे योग्यच आहे; परंतु हे काही भगवंतांचे वास्तविक दान नाही. कारण ती वस्तू मिळाल्यानंतरसुद्धा मनुष्याच्या मनात पुन्हा इच्छा उत्पन्न होत राहातातच. याविरुद्ध, जे त्यांचे निष्कामभावाने भजन करतात, त्यांना तर ते साक्षात आपल्या चरणकमलांची भक्ती देतात. ही सर्व कामनाच नाहीशी करणारी आहे. म्हणून आतापर्यंत स्वर्गसुख भोगल्यानंतर आम्ही पूर्वी केलेल्या यज्ञ, प्रवचन आणि इतर शुभ कर्मांपैकी जर काही पुण्य शिल्लक असेल, तर त्याच्या प्रभावाने आम्हांला या भारतवर्षामध्ये भगवत्स्मृतीने युक्त मनुष्यजन्म मिळो. कारण श्रीहरी त्यांचे भजन करणार्याचे कल्याण करतात. (२६-२८) श्रीशुक म्हणाले - राजन, सगराच्या पुत्रांनी आपल्या यज्ञाच्या घोडयाचा शोध घेत असता ही पृथ्वी चारी बाजूंनी खोदली होती. त्यातूनच जंबूद्वीपाच्या अंतर्गत आठ उपद्वीपे आणखी तयार झाली, असे काही लोकांचे म्हणणे आहे. ती स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन, रमणक, मंदरहरिण, पांचजन्य, सिंहल आणि लंका ही होत. भरतश्रेष्ठा, अशा प्रकारे मी जसे गुरुमुखातून ऐकले होते, तसेच या जंबूद्वीपाच्या वर्षांचे विभाग तुला सांगितले. (२९-३१) स्कंध पाचवा - अध्याय एकोणिसावा समाप्त |