|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १८ वा
भिन्न-भिन्न वर्षांचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणाले - भद्राश्व वर्षामध्ये धर्मपुत्र भद्रश्रवा आणि त्याचे मुख्य-मुख्य सेवक भगवान वासुदेवांच्या हयग्रीव नावाच्या धर्ममय प्रिय मूर्तीला अत्यंत समाधिनिष्ठेने हृदयात स्थापित करून या मंत्राचा जप करीत अशा प्रकारे स्तुती करतात. (१) भद्रश्रवा आणि त्याचे सेवक म्हणतात - चित्त शुद्ध करणार्या ॐकारस्वरूप भगवान धर्माला नमस्कार असो. (२) अहो, भगवंतांची लीला मोठी विचित्र आहे. ज्यांच्यामुळे हा जीव संपूर्ण लोकांचा संहार करणार्या काळाला पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तुच्छ विषयांचे सेवन करण्यासाठी पापमय विचारांत गुंतून आपल्याच हातांनी पुत्र, पिता इत्यादींची मृतशरीरे जाळूनही स्वतः जिवंत राहाण्याची इच्छा करतो. हे जन्मरहित प्रभो, विद्वान लोक जग नश्वर आहे असे म्हणतात आणि सूक्ष्मदर्शी आत्मज्ञानी असेच पाहातात सुद्धा. तरी आपल्या मायेने लोक मोहित होऊन जातात. आपण अनादी आहात आणि आपली कृत्ये मोठी आश्चर्यकारक आहेत. मी आपणास नमस्कार करतो. परमात्मन ! आपण अकर्ते आणि मायेच्या आवरणाविरहित आहात. तरीसुद्धा जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ही आपलीच कर्मे मानली गेली आहेत, ते ठीकच आहे. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण सर्वात्मरूपाने आपणच सर्वकार्याचे कारण आहात आणि या कार्यकारणभावापेक्षा आपले शुद्ध स्वरूप सर्वथैव वेगळे आहे. आपले शरीर मनुष्य आणि घोडा यांचे संयुक्त रूप आहे. प्रलयकाळामध्ये जेव्हा तमोगुणी दैत्यांनी वेद चोरून नेले होते, त्यावेळी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून आपण ते रसातळातून आणून दिले होते. अशी अमोघ लीला करणार्या सत्य-संकल्प आपणास मी नमस्कार करीत आहे. (३-६) हरिवर्षखंडामध्ये भगवान नृसिंहरूपाने राहातात. त्यांनी हे रूप कोणत्या कारणाने धारण केले होते, त्याचे पुढे (सातव्या स्कंधात) वर्णन केले जाईल. भगवंतांच्या त्या प्रिय रूपाची महाभागवत प्रल्हाद त्या वर्षातील इतर पुरुषांसह निष्काम आणि अनन्य भक्तिभावाने उपासना करीत आहे. प्रल्हाद हा महापुरुषांना योग्य अशा गुणांनी संपन्न आहे. तसेच त्याने आपल्या शील आणि आचरणाने दैत्य आणि दानवांच्या कुळांना पवित्र केले आहे. तो या मंत्राचा जप करून स्तुती करतो. ॐकारस्वरूप भगवान श्रीनृसिंह देवांना नमस्कार असो. आपण अग्नी इत्यादी तेजांचेही तेज आहात. आपणांस नमस्कार असो. हे वज्रनखा, हे वज्रदंष्ट्रा, आपण आमच्या समोर प्रगट व्हावे, प्रगट व्हावे. आमच्या कर्मवासना जाळून टाका, जाळून टाका. आमचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करा, नष्ट करा. ॐ स्वाहा. अभयदान देत आमच्या अंतःकरणात प्रगट व्हा. ॐ क्ष्रौम्. हे नाथ, विश्वाचे कल्याण होवो. दुष्टांची बुद्धी शुद्ध होवो. सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांमध्ये सद्भावना उत्पन्न होवो. सर्वजण एकमेकांचे हितचिंतन करोत. आमचे मन शुभ मार्गात प्रवृत्त होवो आणि आम्हा सर्वांची बुद्धी निष्कामभावाने भगवान श्रीहरींमध्ये प्रवेश करो. (७-९) घर, स्त्री, पुत्र, धन आणि बंधु-बांधवांमध्ये आमची आसक्ती नसो आणि ती उत्पन्न होणार असेल तर केवळ भगवंतांच्या प्रेमी भक्तांमध्येच होवो. जो संयमी पुरुष फक्त शरीरनिर्वाहापुरत्या अन्न वगैरेने संतुष्ट राहातो, त्याला जशी शीघ्र सिद्धी प्राप्त होते, तशी इंद्रियलोलुप पुरुषाला होत नाही. त्या भगवद्भक्तांच्या संगतीने भगवंतांचे तीर्थतुल्य पवित्र चरित्र ऐकावयास मिळते, जे त्यांची असाधारणशक्ती आणि प्रभावाचे सूचक असते. त्यांचे वारंवार सेवन करणार्यांच्या कानांतून भगवंत हृदयात प्रवेश करतात आणि त्यांचे सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक मळ नष्ट करतात. अशा भगवद्भक्तांची संगत कोण करू इच्छिणार नाही ? ज्या पुरुषाची भगवंतांमध्ये निष्काम भक्ती आहे, त्याच्या हृदयात सर्व देवता, धर्म, ज्ञान इत्यादी संपूर्ण सद्गुणांसह नेहमी निवास करतात. परंतु जो भगवंतांचा भक्त नाही, त्याच्यामध्ये महापुरुषांचे गुण कोठून येऊ शकतील बरे ? तो तर निरनिराळे संकल्प करून नेहमी बाहेरच्या तुच्छ विषयांच्या मागेच धावत असतो. ज्याप्रमाणे माशांना पाणी अत्यंत प्रिय, त्यांच्या जीवनाचा आधारच असते, त्याचप्रमाणे साक्षात श्रीहरीसुद्धा समस्त देह धारण करणार्यांचे प्रियतम आत्मा आहेत. जर कोणी महत्त्वाभिमानी पुरुष त्यांचा त्याग करून घरामध्येच आसक्त होईल, तर त्या अवस्थेत स्त्री-पुरुषांचा मोठेपणा फक्त वयाच्या आधारावरच मानला जाईल. गुणांच्या दृष्टीने नाही. म्हणून तुम्ही लोभ, राग, द्वेष, क्रोध, अभिमान, इच्छा, भय, दीनता आणि मानसिक संतापाचे मूळ असलेल्या तसेच जन्म-मरणरूप संसार-चक्रात ओढणार्या घर इत्यादींचा त्याग करून भगवान नृसिंहाच्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घ्या. (१०-१४) केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मीचे आणि संवत्सर नावाच्या प्रजापतीचे पुत्र आणि कन्या यांचे कल्याण करण्यासाठी भगवान कामदेवरूपाने निवास करतात. रात्रीच्या अभिमानी देवतारूप कन्या आणि दिवसाच्या अभिमानी देवतारूप पुत्रांची संख्या मनुष्याच्या शंभर वर्षांच्या आयुष्याच्या दिवस-रात्रींइतकी म्हणजे छत्तीस-छत्तीस हजार वर्षे आहे आणि तेच त्या वर्षाचे अधिपती होत. परमपुरुष श्रीनारायणांच्या श्रेष्ठ अस्त्र सुदर्शनचक्राच्या तेजाला त्या कन्या घाबरतात. म्हणून प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्यांचे गर्भपात होतात. भगवान आपल्या लालित्यपूर्ण गति-विलासाने, सुशोभित मधुर मधुर मंद हास्याने, मनोहर लीलापूर्ण आकर्षक कटाक्षांनी, थोडयाशा उंचावलेल्या सुंदर भुवयांच्या देखण्या छटेने, मुखारविंदाचे अमाप सौंदर्य प्रगट करून सौंदर्यदेवी लक्ष्मीला अत्यंत आनंदित करीत स्वतःही आनंदित होतात. परम समाधियोगाने श्रीलक्ष्मी भगवंतांच्या त्या मायामय स्वरूपाचे रात्रीच्या वेळी प्रजापती संवत्सराच्या कन्यांसह आणि दिवसा त्यांच्या पतींसह आराधना करते आणि या मंत्राचा जप करते. "जे इंद्रियांचे नियंत्रक आणि संपूर्ण श्रेष्ठ वस्तूंचे उत्पत्तिस्थान आहेत, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि संकल्प-निश्चय इत्यादी चित्ताचे धर्म व त्यांच्या विषयांचे अधिपती आहेत, अकरा इंद्रिये व पाच विषय या सोळा कलांनी युक्त आहेत, जे वेदोक्त कर्मांनी प्राप्त होतात, जे अन्नमय अमृतमय आणि सर्वमय आहेत, त्या मानसिक, इंद्रियविषयक आणि शारीरिक बलस्वरूप अशा परम सुंदर भगवान कामदेवांना ॐ र्हां र्हीं र्हूं या बीजमंत्रांसह सर्व बाजूंनी नमस्कार असो. (१५-१८) आपण इंद्रियांचे अधीश्वर आहात. निरनिराळ्या कठोर व्रतांनी स्त्रिया आपलीच आराधना करून अन्य लौकिक पतींची इच्छा करतात. परंतु ते पती त्यांचे प्रिय पुत्र, धन, आणि आयुष्याचे रक्षण करू शकत नाहीत. कारण ते स्वतःच परतंत्र आहेत. जो स्वतः सर्वथा निर्भय आहे आणि दुसर्या भयभीत लोकांचे सर्व प्रकारे रक्षण करू शकतो, तोच खरा पती होय. असे पती एकमात्र आपणच आहात. एकापेक्षा अधिक ईश्वर मानले तर त्यांना एकमेकांपासून भय असण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपल्या प्राप्तीपेक्षा अधिक दुसरा कोणताही लाभ मानीत नाही. हे भगवन, जी स्त्री आपल्या चरणकमलांचे पूजन करणेच इच्छिते, अन्य कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही, तिच्या सर्व कामना पूर्ण होतात. परंतु जी कोणतीही एक कामना घेऊन आपली उपासना करते, आपण तिला केवळ तेवढीच वस्तू देता आणि भोग समाप्त झाल्यावर ती वस्तू जेव्हा नष्ट होते, तेव्हा तिच्यासाठी तिला दुःख करावे लागते. हे अजिता, इंद्रिय-सुखाचे अभिलाषी ब्रह्मदेव, रुद्र इत्यादी समस्त सुरासुरगण माझ्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करीत राहातात. परंतु आपल्या चरणकमलांचा आश्रय करणार्या भक्तांशिवाय मला कोणी प्राप्त करून घेऊ शकत नाही. कारण माझे मन फक्त आपल्यातच लागून राहिले आहे. हे अच्युत, आपण आपल्या ज्या वंदनीय करकमलांना भक्तांच्या मस्तकांवर ठेवता, तीच माझ्याही मस्तकावर ठेवा. हे वरेण्य, आपण मला केवळ श्रीवत्सलांछनरूपाने आपल्या वक्षःस्थळावरच धारण करता. आपण सर्वसमर्थ आहात. आपण आपल्या मायेने ज्या लीला करता, त्यांचे रहस्य कोण जाणू शकेल ? (१९-२३) भगवंतांनी रम्यकवर्षामध्ये तेथील अधिपती मनूला पूर्वी आपले परम प्रिय मत्स्यरूप दाखविले होते. अजूनही मनू भगवंतांच्या त्या रूपाची मोठया भक्तिभावाने उपासना करतो आणि या मंत्राचा जप करीत स्तुती करतो - "सत्त्वप्रधान मुख्य प्राण, सूत्रात्मा तसेच मनोबल, इंद्रियबल, आणि शरीरबलस्वरूप अशा सर्वश्रेष्ठ भगवान महामत्स्यांना वारंवार नमस्कार असो." (२४-२५) प्रभो, नट ज्याप्रमाणे कठपुतळ्यांना नाचवितो, त्याचप्रमाणे आपण ब्राह्मण इत्यादी नामांच्या दोरीने संपूर्ण विश्व आपल्या अधीन करून (घेऊन) नाचवीत आहात. म्हणून आपणच सर्वांचे प्रेरक आहात. लोकपालसुद्धा आपल्याला पाहू शकत नाहीत. परंतु आपण सर्व प्राण्यांच्या आत प्राणरूपाने आणि बाहेर वायुरूपाने नेहमी संचार करीत असता. वेद आपलाच महान शब्द आहे. एकदा इंद्रादी इंद्रियाभिमानी देवतांना प्राणस्वरूप आपल्याबद्दल मत्सर निर्माण झाला. तेव्हा आपण बाजूला झाल्यावर ते स्वतंत्रपणे किंवा एकमेकात मिसळूनसुद्धा मनुष्य, पशू, सर्प, स्थावर, जंगम इत्यादी जितकी शरीरे दिसतात, त्यांच्यांपैकी कोणाचेही, पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा, रक्षण करू शकले नाहीत. हे अजन्मा प्रभो, सर्व वनस्पती आणि वेलींचा आश्रय असलेल्या या पृथ्वीला घेऊन आपण माझ्यासह मोठ-मोठया उत्तुंग लाटांनी युक्त प्रलयकालीन समुद्रामध्ये मोठया उत्साहाने विहार केला होता. आपण संसारातील सर्व प्राणिसमुदायाचे नियंते आहात. माझा आपणांस नमस्कार असो. (२६-२८) हिरण्मयवर्षामध्ये भगवान कासवाचे रूप धारण करून राहातात. तेथील निवासी लोकांसह पितृराज अर्यमा भगवंतांच्या त्या प्रियतम मूर्तीची उपासना करतात आणि या मंत्राचा निरंतर जप करीत स्तुती करतात. "जे सत्त्व गुणाने युक्त आहेत, ज्यांचे ठिकाण निश्चितपणे कळत नाही, तसेच जे काळाच्या कक्षेच्या बाहेर आहेत, त्या सर्वव्यापक, सर्वाधार भगवान कच्छपांना वारंवार नमस्कार असो. (२९-३०) अनेक रूपांमध्ये प्रतीत होणारा हा दृश्यप्रपंच जरी मिथ्या आहे असे वाटत असले, म्हणूनच याचे वस्तुतः काही मोजमाप नाही, तरीसुद्धा हे मायेने प्रकाशित होणारे आपलेच रूप आहे. अनिर्वचनीयरूप अशा आपणांस माझा नमस्कार असो. आपण एकमात्र असूनही जरायुज, स्वेदज, अंडज, उद्भिज्ज, स्थावर, जंगम, देव, ऋषी, पितृगण, भूते, इंद्रिये, स्वर्ग, आकाश, पृथ्वी, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप, ग्रह, तारे, इत्यादी वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहात. आपण असंख्य नामे, रूपे, आणि आकृतींनी युक्त आहात. कपिल मुनी इत्यादी विद्वानांनी आपल्यामध्ये ज्या चोवीस तत्त्वांच्या संख्येची कल्पना केली आहे, ती ज्या तत्त्वदृष्टीचा उदय झाल्यावर निवृत्त होते, तीसुद्धा वास्तविक आपलेच स्वरूप आहे. अशा सांख्यसिद्धांतस्वरूप आपणांस माझा नमस्कार असो. (३१-३३) उत्तर कुरुवर्षामध्ये भगवान यज्ञपुरुष वराहमूर्ती धारण करून विराजमान आहेत. पृथ्वीदेवी तेथील निवासी लोकांसह त्यांची अचल भक्तिभावाने उपासना करीत या परमोत्कृष्ट मंत्राचा जप करीत स्तुती करते. "ज्यांचे तत्त्व मंत्रांमुळे जाणले जाते, जे यज्ञ आणि क्रतुरूप आहेत, तसेच मोठ-मोठे यज्ञ ज्यांचे अंग आहेत, त्या शुद्ध कर्ममय त्रियुगमूर्ती पुरुषोत्तम भगवान वराहांना वारंवार नमस्कार असो." (३४-३५) ऋत्विज ज्याप्रमाणे अरणिरूप लाकडाच्या ओंडक्यात लपलेल्या अग्नीला मंथन करून प्रगट करतात, त्याचप्रमाणे कर्मासक्ती आणि कर्मफलांच्या कामनेने झाकून गेलेल्या ज्यांच्या रूपाला पाहाण्य़ाच्या इच्छेने परमप्रवीण पंडित आपल्या विवेकयुक्त मनरूप मंथनकाष्ठाने शरीर आणि इंद्रियांना घुसळतात. अशा प्रकारे मंथन केल्यावर आपले स्वरूप प्रगट करणार्या आपणांस नमस्कार असो. विचार, तसेच यम-नियमादी यौगिक साधनांमुळे ज्यांची बुद्धी निश्चयात्मक झाली आहे, ते महापुरुष द्रव्य (विषय), क्रिया (इंद्रियांचे व्यापार), हेतू (इंद्रियांच्या देवता), अयन (शरीर), ईश्वर (काल), आणि कर्ता (अहंकार) इत्यादी मायेची कार्ये पाहून ज्यांच्या वास्तविक स्वरूपाचा निश्चय करतात, अशा मायिक रूपांखेरीज असलेल्या आपणांस वारंवार नमस्कार असो. जसे लोखंड जड असूनही लोहचुंबकाच्या सान्निध्यात आल्यावर हालचाल करते, त्याचप्रमाणे ज्या सर्वसाक्षी असलेल्याच्या इच्छेने जी स्वतःसाठी नव्हे; तर सर्व प्राण्यांसाठी असते, ती प्रकृती आपल्या गुणांनी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत असते. अशा संपूर्ण गुणांचा आणि कर्मांचा साक्षी असणार्या आपणांस नमस्कार असो. आपण जगताचे कारणीभूत आद्य वराह आहात. ज्याप्रमाणे एक हत्ती दुसर्या हत्तीला आपटतो, त्याचप्रमाणे आपण हत्तीप्रमाणे क्रीडा करीत युद्धामध्ये आपला प्रतिद्वंद्वी हिरण्याक्ष दैत्याला ठार करून आपल्या दाढेच्या टोकावर मला ठेवून रसातळातून प्रलयसागराच्या बाहेर आला होतात. अशा सर्वशक्तिमान प्रभूला मी वारंवार नमस्कार करते. (३६-३९) स्कंध पाचवा - अध्याय अठरावा समाप्त |