श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय १७ वा

गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुती -

श्रीशुक म्हणाले - राजा, बळिराजाच्या यज्ञशाळेत साक्षात यज्ञमूर्ती भगवान विष्णूंनी जेव्हा त्रैलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला, तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठयाच्या नखाने ब्रह्मांडरूप कढईचा वरचा भाग फुटला. त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरच्या बाजूची जी जलधारा आत आली, तिने ते चरणकमल धुतल्याने त्यातील केशर त्यात मिसळून (ती) लाल झाली. त्या निर्मल धारेचा स्पर्श होताच संसारातील सर्व पापे नष्ट होतात आणि तरी ती धार नेहमी निर्मळच राहते. दुसर्‍या कोणत्याही नावाने उल्लेख न करता तिला "भगवत्पदी" असेच म्हणतात. ती धार हजारो युगे होऊन गेल्यानंतर स्वर्गाच्या शिरोभागी असणार्‍या ध्रुवलोकात उतरली. तिला "विष्णुपद" असे म्हणतात. वीरव्रत परीक्षिता, त्या ध्रुवलोकात उत्तानपादाचा पुत्र परम भागवत ध्रुव राहातो. तो दररोज वाढत्या भक्तिभावाने हे "आमच्या कुलदेवतेचे चरणोदक आहे" असे समजून आजही ते जल मोठया आदराने मस्तकी धारण करतो. त्यावेळी प्रेमभरामुळे त्याचे हृदय अत्यंत सद्‍गदित होते आणि भावोद्रेकाने बळेच मिटून घेतलेल्या त्याच्या दोन्ही डोळ्यांतून निर्मल पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उभे राहातात. (१-२)

यानंतर आत्मनिष्ठ सप्तर्षी तिचा प्रभाव जाणल्याकारणाने "हीच तपश्चर्येची आत्यंतिक सिद्धी आहे," असे मानून ज्याप्रमाणे मुमुक्षूजन प्राप्त झालेली मुक्ती आदराने आपल्या मस्तकावर धारण करतात, त्याप्रमाणे ती आपल्या जटांवर धारण करतात. तसे पाहाता हे अत्यंत निष्काम आहेत. सर्वात्मा भगवान वासुदेवांच्या निश्चल भक्तीलाच आपली श्रेष्ठ संपत्ती समजून अन्य सर्व कामनांचा त्यांनी त्याग केला आहे, एवढेच काय तिच्यासमोर ते आत्मज्ञानालाही फारशी किंमत देत नाहीत. तेथून गंगा नदी कोटयवधी विमानांनी घेरलेल्या आकाशमार्गात उतरते आणि चंद्रमंडळाला भिजवून मेरुच्या शिखरावरील ब्रह्मपुरीमध्ये पडते. (३-४)

तेथे ती सीता, अलकनंदा, चक्षू आणि भद्रा अशी नावे धारण करून चार प्रवाहांमध्ये विभक्त होते आणि निरनिराळ्या चार दिशांकडे वाहात जाऊन शेवटी नद-नद्यांचा अधिपती अशा समुद्राला जाऊन मिळते. (५)

त्यांपैकी सीता ब्रह्मपुरीतून खाली उतरून केसराचलाच्या सर्वोच्च शिखरांवरून खालच्या बाजूला गंधमादन पर्वताच्या शिखरांवर पडते आणि भद्राश्व वर्षाला भिजवून पूर्वेकडील खार्‍या समुद्राला जाऊन मिळते. याचप्रमाणे चक्षू, माल्यवान पर्वताच्या शिखरावरून बेधडक केतुमाल वर्षामध्ये वाहात जाऊन पश्चिमेकडील क्षार समुद्राला जाऊन मिळते. भद्रा मेरुपर्वताच्या शिखरावरून उत्तरेकडे वाहात जाते. तसेच एका पर्वतावरून दुसर्‍या पर्वतावर असे करीत शेवटी शृंगवान पर्वताच्या शिखरावरून खाली उतरून उत्तरकुरू देशात जाऊन, उत्तरेकडे वाहात-वाहात समुद्राला जाऊन मिळते. तशीच अलकनंदा ब्रह्मपुरीच्या दक्षिणेकडील अनेक पर्वत-शिखरांना ओलांडून हेमकूट पर्वतावर पोहोचते. तेथून अत्यंत तीव्र वेगाने हिमालयाच्या शिखरांना फोडत भारत वर्षात येते आणि पुन्हा दक्षिण दिशेला समुद्राला जाऊन मिळते. या नदीत स्नान करण्यास आलेल्या माणसांना पावलो-पावली अश्वमेध, राजसूय इत्यादी यज्ञांचे फळ मिळणे कठीण नाही. प्रत्येक वर्षात मेरु वगैरे पर्वतातून निघालेल्या आणखीही शेकडो नद-नद्या आहेत. (६-१०)

या सर्व वर्षांमध्ये भारतवर्ष हीच कर्मभूमी आहे. उरलेली आठ वर्षे स्वर्गवासी पुरुषांची स्वर्गभोगातून उरलेली पुण्ये भोगण्याची ठिकाणे आहेत. म्हणून यांना भूलोकाचे स्वर्ग असेही म्हणतात. मानवी गणनेनुसार, तेथील देवतुल्य मनुष्यांचे आयुष्य दहा हजार वर्षांचे असते. त्यांच्यामध्ये दहा हजार हत्तींचे बळ असते. तसेच त्यांच्या वज्राप्रमाणे सुदृढ शरीरात जी शक्ती, तारुण्य आणि उल्हास असतो, त्यामुळे ते पुष्कळ काळपर्यंत मैथुनादी विषय भोगीत राहातात. शेवटी भोग संपल्यावर त्यांचे आयुष्य फक्त एक वर्षाचे शिल्लक राहाते, तेव्हा त्यांच्या स्त्रिया गर्भ धारण करतात. अशा प्रकारे तेथे नेहमी त्रेतायुगासारखा काळ असतो. तेथे असे आश्रम, भवने, वर्षे, आणि पर्वतांच्या दर्‍या आहेत. तेथील सुंदर वने-उपवने, सर्व ऋतूतील फुलांचे गुच्छ, फळे आणि नवीन पालवीच्या शोभेच्या भाराने वाकलेल्या फांद्या आणि वेलीयुक्त वृक्षांनी सुशोभित आहेत. तेथे निर्मल पाण्याने भरलेले जलाशय असे आहेत की, ज्यांत निरनिराळी नवीन कमळे उमललेली असतात आणि त्या कमळांच्या सुगंधाने आनंदित होऊन राजहंस, पाणकोंबडया, कारंडव, सारस, चकवा इत्यादी पक्षी निरनिराळ्या प्रकारच्या बोली बोलतात. तसेच वेगवेगळ्या जातींचे धुंद भुंगे मधुर गुंजारव करीत असतात. या ठिकाणी देवांचे अधिपती परम सौंदर्यवान देवांगनांसह त्यांच्या कामोन्मादक सूचक हास्य-विलास आणि लीला-कटाक्षांनी मन आणि नेत्र आकर्षित झाल्यामुळे जलक्रीडादी निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेळत स्वच्छंद विहार करतात आणि त्यांचे मुख्य मुख्य सेवक अनेक प्रकारच्या सामग्रींनी त्यांचा आदर-सत्कार करीत असतात. (११-१३)

या नऊही वर्षांमध्ये परमपुरुष भगवान नारायण तेथील पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी यावेळी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपाने विराजमान असतात. इलावृत वर्षामध्ये मात्र केवळ भगवान शंकरच एकटे पुरुष आहेत. श्रीपार्वतीदेवींचा शाप माहीत असलेला दुसरा कोणी पुरुष तेथे प्रवेश करीत नाही. कारण तेथे जो जातो तो स्त्री होतो. या प्रसंगाचे आम्ही पुढे (नवव्या स्कंधात) वर्णन करू. तेथे पार्वती आणि तिच्या कोटयवधी दासींसह भगवान शंकर परमपुरुष परमात्म्याच्या वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण संज्ञा असलेल्या चतुर्व्यूह-मूर्तींपैकी आपली कारणरूप जी संकर्षण नावाची तमःप्रधान चौथी मूर्ती तिचे ध्यान करून मनोमय मूर्तीच्या रूपात चिंतन करतात आणि या मंत्राचा उच्चार करीत त्यांची स्तुती करतात. (१४-१६)

श्रीभगवान शंकर म्हणतात - ज्यांच्यापासून सर्व गुणांचे प्रगटीकरण होते, त्या अनंत आणि अव्यक्तमूर्ती ॐकारस्वरूप परमपुरुष श्रीभगवंतांना नमस्कार असो. हे भजनीय प्रभो, आपले चरणकमल भक्तांना आश्रय देणारे आहेत. तसेच आपण स्वतः सर्व ऐश्वर्याचे परम आश्रय आहात. भक्तांच्या समोर आपण आपले भूतभावन स्वरूप संपूर्णपणे प्रगट करता. तसेच त्यांना संसारबंधनातूनसुद्धा मुक्त करता. परंतु अभक्तांना मात्र त्या बंधनात अडकविता. आपणच सर्वेश्वर आहात, मी आपले भजन करतो. प्रभो, आम्ही क्रोधाचा आवेग जिंकू शकलो नाही. तसेच आमची दृष्टी तत्काळ पापमय होऊन जाते. परंतु आपण मात्र संसाराचे नियमन करण्यासाठी नेहमी साक्षीरूपाने त्याचे सर्व व्यवहार पाहात असता. तथापि आमच्यावर असलेल्या आपल्या त्या दृष्टीवर मायिक विषय तसेच चित्ताच्या वृत्तींचा नाममात्र सुद्धा प्रभाव पडत नाही. अशा स्थितीत आपले मन वश करण्याची इच्छा असलेला कोणता पुरुष आपला आदर करणार नाही ? आपण मद्य-आसव इत्यादींचे सेवन केल्याने ज्या पुरुषांना अरुणनयन आणि वेडसर आहात असे वाटते, ते मायेमुळेच अशी मिथ्या कल्पना करतात. तसेच आपल्या चरणस्पर्शानेच चित्त चंचल झाल्याकारणाने नागपत्न्या लज्जेमुळे आपली पूजा करण्यास असमर्थ होतात. आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कारण असल्याचे वेदमंत्र सांगतात. परंतु आपण स्वतः या तीन विकारांपासून अलिप्त आहात, म्हणून आपल्याला ‘अनंत’ म्हणतात. आपल्या एक हजार मस्तकांवर हे भूमंडल मोहरीच्या दाण्याप्रमाणे ठेवलेले आहे. ते कुठे आहे, हेही आपल्याला माहीत नाही. ज्यांच्यापासून उत्पन्न झालेला मी अहंकाररूप आपल्या त्रिगुणमय तेजाने देवता, इंद्रिये आणि भूतांची रचना करतो. ते विज्ञानाचे आश्रय भगवान ब्रह्मदेवसुद्धा आपलेच महत्तत्त्व संज्ञक असे प्रथम गुणमय स्वरूप आहेत. हे महात्मन, महत्तत्त्व, अहंकार, इंद्रियाभिमानी देवता, इंद्रिये, पंचमहाभूते इत्यादी आम्ही सर्वजण दोरीत बांधलेल्या पक्ष्याप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीच्या अधीन राहून आपल्याच कृपेने या जगाची निर्मिती करतो. सत्त्वादी गुणांच्या सृष्टीने मोहित झालेला हा जीव आपणच रचलेल्या तसेच कर्मबंधनात टाकणार्‍या मायेला कदाचित जाणू शकेल, परंतु तिच्यापासून मुक्त होण्याचा उपाय सहजपणे, (त्याला) माहीत होत नाही. या जगाची उत्पत्ती आणि प्रलय ही आपलीच रूपे आहेत. अशा आपणास मी वारंवार नमस्कार करतो. (१७-२४)

स्कंध पाचवा - अध्याय सतरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP