|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १६ वा
भुवनकोशाचे वर्णन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] परीक्षित म्हणाला - जेथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेथपर्यंत तारागणांसह चंद्र दिसतो, तेथपर्यंतच्या भूमंडलाचा विस्तार आपण सांगितला. मुनिवर्य, त्यातही आपण असेही सांगितले की, महाराज प्रियव्रतांच्या रथाच्या चाकांच्या सात खडडयांपासून सात समुद्र तयार झाले होते. ज्यांच्यामुळे सात द्विपांमध्ये हे भूमंडल विभागले गेले. आता मी या सर्वांचे परिमाण अणि इतर लक्षणांसह संपूर्ण विवरण जाणून घेऊ इच्छितो. कारण, जे मन भगवंतांच्या या गुणमय स्थूल स्वरूपात तल्लीन होते, तेच त्यांच्या वासुदेव संज्ञा असलेल्या स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरूप सूक्ष्मतम स्वरूपामध्येसुद्धा तल्लीन होणे शक्य आहे. म्हणून गुरुवर्य, याविषयी सविस्तर वर्णन करण्याची कृपा करावी. (१-३) श्रीशुकाचार्य म्हणाले - महाराज, भगवंतांच्या मायेच्या गुणांचा इतका विस्तार आहे की, एखाद्या पुरुषाला देवतांच्याइतके आयुष्य मिळाले तरी तो मन किंवा वाणीने यांचा अंत लावू शकणार नाही. म्हणून आम्ही नाम, रूप, परिमाण आणि लक्षणांच्याद्वारा मुख्य-मुख्य गोष्टी घेऊनच या भूमंडलाच्या वैशिष्टयांचे वर्णन करू. भूमंडलरूप कमलाच्या कोशाच्या ठिकाणी ही जी सात द्वीपे आहेत, त्यांपैकी सगळ्यात आतील जो कोश तेच जंबुद्वीप आणि तेथेच आपण राहातो. याचा विस्तार एक लक्ष योजने आहे आणि हे कमलपत्राप्रमाणे गोलाकार आहे. यात नऊ-नऊ हजार योजने विस्तार असणारी नऊ वर्षे आहेत आणि ती या सीमांचे विभाग करणार्या आठ पर्वतांमध्ये वाटली गेली आहेत. यांच्या मधोमध इलावृत नावाचे दहावे वर्ष आहे, ज्याच्या मध्यभागी कुलपर्वतांचा राजा मेरुपर्वत आहे. भूमंडलरूप कमळाचा तो जणू मधला गडडा आहे. हा सर्व बाजूंनी संपूर्ण सुवर्णमय आहे. आणि याची उंची एक लक्ष योजने आहे. शिखरावर याचा विस्तार बत्तीस हजार आणि तळाला सोळा हजार योजने आहे. तसेच हा सोळा हजार योजनेच त्या भूमीच्या आत घुसला आहे. इलावृतवर्षाच्या उत्तरेला अनुक्रमे नील, श्वेत, आणि शृंगवान नावाचे तीन पर्वत आहेत. जे रम्यक, हिरण्मय आणि कुरू नावाच्या वर्षांच्या सीमा दाखवितात. ते पूर्वेकडून पश्चिमेकडे खार्या पाण्याच्या समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. त्यांपैकी प्रत्येकाची रुंदी दोन हजार योजने आहे. तसेच लांबी पुढच्यापेक्षा अलिकडच्याची या क्रमाने एकदशांशापेक्षा थोडी अधिक, कमी आहे. (४-८) त्याचप्रमाणे इलावृताच्या दक्षिणेकडे एकापाठोपाठ एक निषध, हेमकूट आणि हिमालय नावाचे तीन पर्वत आहेत. नील इत्यादी पर्वतांप्रमाणे हेसुद्धा पूर्व-पश्चिम पसरलेले आहेत आणि यांची उंची दहा-दहा हजार योजने आहे. यांनीच अनुक्रमे हरिवर्ष, किंपुरुष आणि भारतवर्षाच्या सीमांचे विभाग केले आहेत. इलावृताच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे उत्तरेला नील पर्वत आणि दक्षिणेला निषध पर्वतापर्यंत पसरलेले गंधमादन आणि माल्यवान नावाचे दोन पर्वत आहेत. यांची रुंदी दोन-दोन हजार योजने आहे आणि हे भद्राश्व तसेच केतुमाल नावाच्या दोन वर्षांची सीमा निश्चित करतात. यांच्याखेरीज मंदर, मेरुमंदर, सुपार्श्व आणि कुमुद हे चार पर्वत दहा-दहा हजार योजने उंची असलेले आणि तितकेच रुंद मेरु पर्वताच्या आधाराच्या खांबांसारखे तयार झालेले आहेत. या चार पर्वतांच्यावर त्यांच्यावरील निशाणांप्रमाणे अनुक्रमे आंबा, जांभूळ, कदंब आणि वड अशी चार झाडे आहेत. त्यांपैकी प्रत्येक अकराशे योजने उंच असून त्यांच्या शाखांचा विस्तारही प्रत्येकी शंभर योजने आहे. भरतश्रेष्ठा, या पर्वतांवर अनुक्रमे दूध, मध, उसाचा रस आणि गोड पाण्यांनी भरलेले चार डोह आहेत. हे सेवन करणार्या यक्षकिन्नरादी उपदेवांना स्वभावतःच योगसिद्धी प्राप्त आहेत. यांच्यावर अनुक्रमे नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक, आणि सर्वतोभद्र नावाची चार दिव्य उपवनेसुद्धा आहेत. यांमध्ये मुख्य-मुख्य देवगण, अनेक अप्सरांचे नायक बनून त्यांच्यासह विहार करतात. त्यावेळी गंधर्वादी उपदेवगण त्यांच्या महिम्याचे वर्णन करतात. (९-१५) मंदराचलावर देवांचा जो अकराशे योजने उंचीचा आम्रवृक्ष आहे, त्यापासून पर्वतशिखरांप्रमाणे मोठमोठी आणि अमृतासारखी स्वादिष्ट फळे पडतात. ती जेव्हा फुटतात, तेव्हा त्यांतून अतिशय सुगंधित आणि मधुर लाल-लाल रस वाहू लागतो. तोच अरुणोदा नावाच्या नदीतून वाहात जातो. ही नदी मंदराचलाच्या शिखरावरून उगम पावून आपल्या पाण्याने इलावृतवर्षाचा पूर्वेकडील भाग भिजविते. श्रीपार्वतीच्या दासी असणार्या यक्षपत्न्या या पाण्यात स्नान करतात. त्यामुळे त्यांच्या अंगातून असा सुगंध येतो की, त्याला स्पर्श करून वाहाणारा वायू त्याच्या चारी बाजूंचा दहा दहा योजनापर्यंतचा सर्व प्रदेश सुगंधित करतो. याचप्रमाणे जांभूळ-वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बहुतेक बिन-बियांची मोठमोठी फळे गळून पडतात. खूप उंचावरून पडल्याने ती फुटून जातात. त्यांच्या रसापासून जंबू नावाची नदी उत्पन्न होऊन मेरुमंदर पर्वताच्या दहा हजार योजने उंच शिखरावरून खाली येऊन इलावृताचा दक्षिण भू-भाग भिजविते. त्या नदीच्या दोन्ही किनार्यांवरील माती त्या रसाने भिजून नंतर जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने ती वाळून जाते, तेव्हा तिचेच देवलोकाला विभूषित करणारे जांबूनद नावाचे सोने बनते. देव, गंधर्व, इत्यादी आपल्या तरुण स्त्रियांसह मुगुट, कंकण, करदोटा इत्यादी दागिन्यांच्या रूपाने हे धारण करतात. (१६-२१) सुपार्श्व पर्वतावर जो विशाल कदंबवृक्ष आहे, त्याच्या पाच ढोलींमधून मधाच्या पाच धारा वाहातात. त्यांची रुंदी पाच वावांएवढी आहे. त्या या सुपार्श्वाच्या शिखरावरून वाहात येऊन इलावृताच्या पश्चिम भागाला आपल्या सुगंधाने सुवासित करतात. जे लोक हे मधुपान करतात, त्यांच्या मुखातून निघालेला वायू आपल्या चारी दिशांना शंभर-शंभर योजनांपर्यंत याचा सुगंध पसरवितो. (२२-२३) तसेच कुमुद पर्वतावर जो शतवल्श नावाचा वटवृक्ष आहे, त्याच्या पारंब्यांपासून खालच्या बाजूला वाहाणारे अनेक नद निघतात, ते सर्वच्या सर्व इच्छेनुसार भोग देणारे आहेत. त्यांपासून दूध, दही, मध, तूप, गूळ, अन्न, वस्त्र, शय्या, आसन, अलंकार इत्यादी सर्व पदार्थ मिळू शकतात. हे सर्व कुमुदाच्या शिखरावरून वाहात येऊन इलावृताचा उत्तरेकडील भाग भिजवितात. त्यांनी दिलेल्या पदार्थांचा उपभोग घेतल्याने तेथील प्रजेच्या त्वचेला सुरकुत्या पडणे, केस पिकणे, थकवा येणे, शरीरातून घाम येणे, तसेच दुर्गंध येणे, वृद्धापकाळ, रोग, मृत्यू, सर्दी-उष्णतेचा त्रास, शरीर कांतिहीन होणे, अवयव मोडणे इत्यादी कष्ट कधीही होत नाहीत आणि त्यांना जीवनभर पुरेपूर सुख प्राप्त होते. (२४-२५) कमलपुष्पाच्या गडडयाच्या चारी बाजूंना जसे केसर असतात, त्याचप्रमाणे मेरुच्या मुळाशी त्याच्या चारी बाजूंना कुरंग, कुरर, कुसुंभ, वैकंक, त्रिकूट, शिशिर, पतंग, रुचक, निषध, शिनीवास, कपिल, शंख, वैदूर्य, जारुधि, हंस, ऋषभ, नाग, कालंजर, नारद इत्यादी वीस पर्वत आहेत. याशिवाय मेरु पर्वताच्या पूर्वेकडे जठर आणि देवकूट नावाचे दोन पर्वत आहेत. जे अठरा अठरा हजार योजने लांब आणि दोन दोन हजार योजने रुंद आणि उंच आहेत. याचप्रमाणे पश्चिमेकडे पवन आणि पारियात्र, दक्षिणेकडे असलेले कैलास आणि करवीर पूर्वेकडे पसरले आहेत. तसेच उत्तरेकडे त्रिशृंग आणि मकर नावांचे पर्वत आहेत. या आठ पर्वतांनी चारी बाजूंनी वेढलेला सुवर्णगिरी मेरु अग्नीप्रमाणे झगमगत असतो. असे सांगतात की, मेरुपर्वताच्या मधोमध, चौरस आकाराची आणि एक कोटी योजने विस्तार असलेली, भगवान ब्रह्मदेवांची सुवर्णमय नगरी आहे. तिच्या खालच्या बाजूला पूर्वादी आठ दिशा आणि उपदिशांमध्ये त्यांचे अधिपती इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आठ नगरे आहेत. ते आपापल्या स्वामींप्रमाणेच त्या त्या दिशांना आहेत. तसेच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीच्या एकचतुर्थांश आहेत. (२६-२९) स्कंध पाचवा - अध्याय सोळावा समाप्त |