श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय १५ वा

भरताच्या वंशाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - भरताचा पुत्र सुमती होता हे पूर्वी सांगितलेच आहे. त्याने ऋषभदेवाच्या मार्गाचे अनुकरण केले; म्हणून कलियुगात पुष्कळसे नास्तिक-मतवादी अनार्य आपल्या मताने वेदमताविरुद्ध कल्पना करून त्याला देवता मानतील. त्याची पत्‍नी वृद्धसेना. तिच्यापासून देवताजित नावाचा पुत्र झाला. देवताजिताला असुरीपासून देवद्युम्न, देवद्युम्नाला धेनुमतीपासून परमेष्ठी आणि त्याला सुवर्चलेपासून प्रतीह नावाचा पुत्र झाला. त्याने इतरांना आत्मविद्येचा उपदेश करून, स्वतः शुद्धचित्त होऊन, परमपुरुष श्रीनारायणांचा साक्षात्कार करून घेतला होता. प्रतीहाला सुवर्चलेपासून प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्‌गाता या नावाचे तीन पुत्र झाले. ते यज्ञादी कर्मांमध्ये अत्यंत निष्णात होते. यांच्यापैकी प्रतिहर्त्याला स्तुतीपासून अज आणि भूमा नावांचे दोन पुत्र झाले. भूमाला ऋषिकुल्येपासून उद्‍गीथ, उद्‍गीथाला देवकुल्येपासून प्रस्ताव आणि प्रस्तावाला नियुत्सेपासून विभू नावाचा मुलगा झला. विभूला रतीपासून पृथुषेण, पृथुषेणाला आकूतीपासून नक्त आणि नक्ताला द्रुतीपासून उदारकीर्ती राजर्षिप्रवर गय नावाचा मुलगा झाला. याला, जगाच्या रक्षणासाठी सत्त्वगुणाचा स्वीकार करणार्‍या साक्षात भगवान विष्णूंचा अंश मानले जात होते. संयमादी अनेक गुणांमुळे याची महापुरुषांत गणना केली जाते. त्याने प्रजेचे पालन-पोषण, मनोरंजन, लालन आणि शासन इत्यादी करून, तसेच निरनिराळ्या यज्ञांचे अनुष्ठान करून निष्कामभावाने केवळ भगवत्प्राप्तीसाठी आपल्या धर्माचे आचरण केले. त्यामुळे त्याची सर्व कर्मे सर्वश्रेष्ठ परमपुरुष परमात्मा श्रीहरींना समर्पित होऊन ती परमार्थरूप होऊन गेली होती. यामुळे तसेच ब्रह्मवेत्त्या महापुरुषांच्या चरणसेवेने त्याला भक्तियोगाची प्राप्ती झाली. नंतर सदैव भगवच्चिंतन करून त्याने आपले चित्त शुद्ध केले. आणि देहादी अनात्म वस्तूंविषयी ‘मी-माझेपणा’ नाहीसा करून तो आपल्या आत्म्याला ब्रह्मरूपाने अनुभवू लागला. एवढे असूनही तो निरभिमानपणे पृथ्वीचे पालन करीत राहिला.(१-७)

हे परीक्षिता, प्राचीन इतिहास जाणणार्‍या महात्म्यांनी राजर्षी गयाच्या संबंधी अशी यशोगाथा गायिली आहे. महाराज गय याची बरोबरी आपल्या कर्मांनी कोणता राजा करू शकेल ? तो भगवंतांचा अंशावतारच होता. त्याच्याखेरीज दुसरा कोण अशा प्रकारे यज्ञांचे यथाशास्त्र अनुष्ठान करणारा, स्वाभिमानी, अत्यंत ज्ञानी, धर्माचे रक्षण करणारा, लक्ष्मीवान, सत्पुरुषांत अग्रगण्य आणि संतांचा सच्चा सेवक असू शकेल ? सत्संकल्प करणार्‍या परम साध्वी श्रद्धा, मैत्री, दया इत्यादी दक्ष कन्यांनी मोठया आनंदाने त्याला नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला होता. तसेच त्याची इच्छा नसतानाही, गाय जसे आपल्या वासराला स्नेहाने पान्हावून दूध पाजते, त्याचप्रमाणे पृथ्वीने त्याच्या गुणांवर संतुष्ट होऊन प्रजेला धन, रत्‍ने इत्यादी इच्छित वस्तू दिल्या होत्या. त्याला कोणतीही इच्छा नव्हती, तरीसुद्धा वेदोक्त कर्मांनी त्याला सर्व प्रकारचे भोग दिले. राजांनी युद्धभूमीवर त्याच्या युद्धकौशल्याने संतुष्ट होऊन त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या आणि ब्राह्मणांनी त्याच्या धर्माने संतुष्ट होऊन परलोकात मिळणार्‍या आपल्या धर्मफळाचा एक षष्ठांश भाग त्याला दिला. त्याच्या यज्ञात मोठया प्रमाणावर सोमपान केल्याने इंद्र धुंद झाला होता. तसेच त्याने अत्यंत श्रद्धापूर्वक, विशुद्ध आणि निश्चल भक्तिभावाने समर्पित केलेले यज्ञफल भगवान यज्ञपुरुषांनी साक्षात प्रगट होऊन ग्रहण केले होते. ज्यांच्या तृप्त होण्याने ब्रह्मदेवांपासून देवता, मनुष्य, पशु-पक्षी, वृक्ष आणि गवतापर्यंतचे सर्व जीव तत्काळ तृप्त होतात, ते विश्वात्मा श्रीहरी स्वतः नित्यतृप्त असूनही राजर्षी गय याच्या यज्ञामध्ये तृप्त झाले होते. (८-१३)

गय याला गयंतीपासून चित्ररथ, सुगती आणि अवरोधन नावाचे तीन पुत्र झाले. त्यांपैकी चित्ररथाची पत्‍नी ऊर्णा हिच्यापासून सम्राटाचा जन्म झाला. सम्राटाला उत्कलेपासून मरीची आणि मरीचीला बिंदुमतीपासून बिंदुमान नावाचा पुत्र झाला. त्याला सरघेपासून मधू, मधूला सुमनेपासून वीरव्रत आणि वीरव्रताला भोजेपासून मंथू व प्रमंथू नावाचे दोन पुत्र झाले. त्यांपैकी मंथूला सत्येपासून भौवन, भौवनाला दूषणेपासून त्वष्टा, त्वष्टयाला विरोचनेपासून विरज आणि विरजाला विषूची नावाच्या पत्‍नीपासून शतजित इत्यादी शंभर पुत्र व एक कन्या झाली. विरजा-विषयी हा श्लोक प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे भगवान विष्णू देवतांची शोभा वाढवितात, त्याचप्रमाणे हा प्रियव्रत वंश यांमध्ये सगळ्यात शेवटी उत्पन्न झालेला राजा विरज याने आपल्या सुयशाने विभूषित केला होता. (१४-१६)

स्कंध पाचवा - अध्याय पंधरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP