|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १४ वा
संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्री शुकाचार्य म्हणतात - देहाभिमानी जीवांच्याकडून सत्त्वादी गुणांच्या भेदांमुळे शुभ, अशुभ आणि मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे होत राहातात. त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोग-वियोगादिरूप असणारा अनादी संसार जीवाला प्राप्त होतो, त्याच्या अनुभवाची मन आणि पाच ज्ञानेंद्रिये ही सहा दारे होत. त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापार्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहाणार्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्य़ाप्रमाणे दुर्गम असणार्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणार्या संसार-वनात जाऊन पोहोचतो. येथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामांत सफलता प्राप्त होत नाही. तरीसुद्धा तो आपले श्रम मिटविणार्या श्रीहरी व श्रीगुरुदेवांच्या चरणारविंदमकरंद-मधूचे रसिक असलेल्या भक्त-भ्रमरांच्या मार्गाने जात नाही. मनासहित सहा इंद्रियेच या संसारवनात आपल्या कर्मांच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत. पुष्कळसे कष्ट करून पुरुष जे धन मिळवितो, त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे. तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपात होईल तर (तोच) परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो. परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारथी विवेकहीन असतो आणि मन ताब्यात राहात नाही, त्याच्या त्या धर्मोपयोगी धनाला ही मनासहित सहा इंद्रिये पाहाणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प-विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तींच्याद्वारा गृहस्थोचित विषयभोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की, जसे बेइमान प्रमुखाचे अनुकरण करणार्या बेसावध व्यापार्यांच्या समूहाचे धन चोर, लुटारू लुटून नेतात. एवढेच काय, त्या संसारवनात राहाणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा ज्यांना पत्नी-पुत्र इत्यादी म्हटले जाते, परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या-कोल्ह्यांप्रमाणे असतात, त्या अर्थलोलुप कुटुंबप्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा, धनगर राखण करीत असलेल्या मेंढया पळवून नेतो. जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे, वेली, गवत इत्यादीने भरून जाते, त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रमही कर्मभूमी असल्याने येथेसुद्धा कर्मांचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही. कारण हे घर कामनांचा पेटारा आहे. (१-४) त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनरूपी बाहेरच्या प्राणांना, डास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसांपासून तसेच टोळ, पक्षी, चोर, उंदीर इत्यादींपासून हानी पोहोचत असते. कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या, इच्छा आणि कर्मांनी कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्वनगराप्रमाणे मिथ्या असणार्या या मर्त्य लोकाला सत्य समजू लागतो. नंतर खाणे-पिणे, स्त्री-संग इत्यादी छंदांत गुंतून मृगजळाप्रमाणे असणार्या खोटया विषयांच्या मागे धावत जातो. कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून ते मिळविण्यासाठी आशाळभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की, जसे जंगलात थंडीने गारठणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकूळ होऊन आग समजून आग्या-वेताळाच्या मागे धावतो. कधी या शरीराला जिवंत ठेवणारे घर, अन्न, पाणी, धन इत्यादींमध्ये आसक्ती ठेवून या संसाररूपी अरण्यामध्ये इकडे-तिकडे धावत सुटतो. कधी वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसवून घेते, तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळावयाच्या धर्ममर्यादेचाही विचार करीत नाही. त्यावेळी रजोगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलीन होते की, आपल्या कर्मांच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो. कधी आपले-आपणच एखादे वेळी विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊनसुद्धा अनादिकालापासून देहामध्ये आत्मबुद्धी राहिली असल्याने विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगजळासारख्या विषयांच्या पाठीमागेच पुन्हा धावू लागतो. कधी प्रत्यक्ष आवाज करणार्या अस्वलाप्रमाणे शत्रूंच्या आणि पाठीमागे आवाज करणार्या घुंगुर्ट्यांप्रमाणे राजाच्या अतिकठोर आणि काळजाला घरे पाडणार्या दटावण्याने याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात. (५-११) पूर्वपुण्य भोगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणीच मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला, कृष्णागरू इत्यादी विषारी फळे येणारे पापवृक्ष, वेली, आणि विषारी पाणी असलेल्या विहिरींप्रमाणे आहेत, ज्यांचे धन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही, तसेच जे जिवंत असूनही मुडद्याप्रमाणे आहेत, अशा कंजूष पुरुषांचा आश्रय घेतो. कधी असत पुरुषांशी संबंध आल्याने बुद्धीत बिघाड होऊन कोरडया पडलेल्या नदीत पडून दुःखी होण्य़ाप्रमाणे तो या आणि परलोकी दुःख देणार्या नास्तिकवादाला भुलतो. दुसर्यांना त्रास दिल्यामुळे जेव्हा याला अन्नही मिळत नाही, तेव्हा तो आपल्या सख्ख्या पिता-पुत्रांना किंवा पिता अथवा पुत्र यांचा एखादा तुकडाही ज्याच्याजवळ पाहातो, त्यांना फाडून खायला तो तयार होतो. कधी वणव्यासारख्या असणार्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामतः दुःख देणार्या घरांमध्ये तो पोहोचतो आणि तेथे त्याला हव्या त्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो. कधी काळाप्रमाणे भयंकर असणारा राजारूप राक्षस याच्या परमप्रिय धनरूप प्राणांना हिरावून घेतो, त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो. कधी काल्पनिक पदार्थांप्रमाणे मिथ्या असणार्या पिता-पितामह इत्यादी संबंधाना सत्य समजून त्यांच्या सहवासांत स्वप्नाप्रमाणे क्षणिक सुखाचा अनुभव घेतो. गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्मकांडाचा विस्तार आहे, त्याचे अनुष्ठान हे एखाद्या पर्वताचा दुर्गम कडा चढण्यासारखेच आहे. लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्याच्या आकर्षणामुळे हाही जेव्हा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निरनिराळ्या अडचणींमुळे क्लेश भोगून काटे कुटे असलेल्या जमिनीवरून चालणार्या व्यक्तीप्रमाणे दुःखी होतो. कधी पोटाला लागलेल्या असह्य भुकेमुळे कासावीस होऊन आपल्या कुटुंबावरच चिडतो. नंतर जेव्हा निद्रारूप अजगराच्या तोंडात सापडतो, तेव्हा अज्ञानरूप घोर अंधकारात सापडून निर्जन वनात फेकल्या गेलेल्या मुडद्याप्रमाणे झोपून राहतो. त्यावेळी त्याला कशाचीच शुद्धी राहात नाही. (१२-२०) कधी त्रास देणारे दुर्जनरूप किडे त्याचा इतका तिरस्कार करतात की, ज्या दातांनी हा दुसर्याला चावला होता ते याचे दात पडून जातात. तेव्हा मन अशांत झाल्याने याला झोपही येत नाही. आणि मर्मस्थानी वेदना झाल्याने क्षणाक्षणाला विवेकशक्ती कमी होत गेल्याने तो शेवटी आंधळ्याप्रमाणे या नरकरूप अंधार्या विहिरीत जाउन पडतो. कधी विषयसुखरूप मधुर कण शोधता शोधता जेव्हा हा लपून छपून परस्त्री किंवा परधन लुबाडू पाहातो, तेव्हा तिचे स्वामी किंवा राजा यांच्या हातून हा मारला जाऊन अशा नरकात जाऊन पडतो की, ज्याचा ठाव-ठिकाणा लागत नाही. म्हणून असे सांगतात की, प्रवृत्तिमार्गात राहून केलेली लौकिक आणि वैदिक अशी दोन्ही प्रकारची कर्मे जीवाला संसारातच ढकलतात. जरी कोणत्याही प्रकारे राजा इत्यादींच्या बंधनातून याची सुटका झाली, तरी अन्यायाने अपहरण केलेली ती स्त्री किंवा ते धन देवदत्त नावाचा दुसराच कोणीतरी हिसकावून घेतो आणि त्याच्याहीपासून विष्णूमित्र नावाचा तिसराच कोणीतरी लुबाडतो. अशा प्रकारे ते उपभोग एका पुरुषाकडून दुसर्याकडे जातात; एके ठिकाणी राहात नाहीत. कधी कधी थंडी, वारा इत्यादी अनेक आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखाचे निवारण करण्यास असमर्थ ठरल्याने अपार चिंतेमुळे तो उदास होऊन जातो. कधी एकमेकांत देव-घेवीचा व्यवहार करताना कोणा दुसर्याच्या दमडीइतक्या किंवा त्याच्याहीपेक्षा कमी धनाची चोरी करतो, तेव्हा या बेइमानीमुळे त्याच्याशी वैर मांडून बसतो. पूर्वीच्या विघ्नांव्यतिरिक्त या मार्गात सुख-दुःख, राग-द्वेष, भय, अभिमान, चुका, उन्माद, शोक, मोह, लोभ, मत्सर, ईर्ष्या, अपमान, तहान-भूक, आधि-व्याधी, जन्म, वृद्धावस्था, मृत्यू इत्यादी पुष्कळशी अन्य विघ्ने आहेत. एखादे वेळी देवमायारूपिणी स्त्रीच्या बाहुपाशात सापडून विवेकहीन होऊन जातो, तेव्हा तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतेत गढून राहातो आणि तिच्याबरोबर राहणारे पुत्र, कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची मधुर भाषणे, नेत्रकटाक्ष आणि हावभाव यांमध्ये आसक्त होऊन चित्त त्यांच्यातच गुंतल्याने इंद्रियांचा दास बनून तो घोर अंधकारमय नरकात जाऊन पडतो. (२१-२८) कालचक्र हे साक्षात भगवान विष्णूंचे आयुध आहे. परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत ते क्षण, घटका इत्यादी अवयवांनी युक्त आहे. ते नेहमी दक्ष राहून फिरत असते. वेगाने बदलणार्या बाल्य, तारुण्य इत्यादी अवस्था या त्याचा वेगच आहेत. त्याद्वारा तो ब्रह्मदेवापासून क्षुद्रातिक्षुद्र गवतापर्यंत सर्व चराचराचा निरंतर संहार करीत राहातो. कोणीही त्याच्या गतीत बाधा आणू शकत नाही. त्याची भीती ओळखून सुद्धा ज्यांचे हे कालचक्र स्वतःचे आयुध आहे, त्या साक्षात भगवान यज्ञपुरुषाची आराधना सोडून हा मंदबुद्धी मनुष्य नास्तिकांच्या फेर्यात अडकून कावळे, गिधाडे, बगळे, वटवाघूळ यांसारख्या आर्यशास्त्राने धिक्कारलेल्या देवतांचा आश्रय घेतो. (ज्या देवतांचा) फक्त वेदबाह्य अप्रामाणिक तंत्रशास्त्रांमध्येच उल्लेख आहे. तो नास्तिक स्वतःला तर फसवतोच; पण हाही जेव्हा त्याच्या कचाटयात सापडून दुःखी होतो, तेव्हा हा ब्राह्मणांना शरण जातो. परंतु उपनयन संस्कारानंतर श्रौत-स्मार्त कर्मांद्वारे भगवान यज्ञपुरुषाची आराधना करणे, इत्यादी त्याचे जे शास्त्राने सांगितलेले आचार आहेत, ते याला चांगले वाटत नाहीत. म्हणून हा वेदोक्त आचारांना अनुसरून आपली शुद्धी न झाल्याकारणाने (शेवटी) कर्मशून्य (अशा) शूद्रकुळामध्ये प्रवेश करतो. ज्यांचा स्वभाव (धर्म) वानरांच्या प्रमाणे फक्त कुटुंबपोषण आणि स्त्रीसेवन करणे एवढाच असतो. तेथे बंधनविरहित स्वच्छंद विहार करण्याने त्याची बुद्धी अत्यंत क्षुद्र होऊन जाते आणि एकमेकांची तोंडे पाहाणे इत्यादी विषयभोगांत अडकल्याने त्याला आपल्या मृत्युकाळाचीसुद्धा आठवण राहात नाही. लौकिक सुख हेच ज्यांचे फळ आहे, अशा वृक्ष-जातीप्रमाणे घरातच सुख मानून वानरांप्रमाणे स्त्री-पुत्रांमध्ये आसक्त होऊन हा आपला सगळा वेळ मैथुनादी विषयभोगातच घालवितो. (२९-३२) अशा प्रकारे प्रवृत्तिमार्गात पडून सुख-दुःखे भोगीत हा जीव रोगरूपी पर्वताच्या गुहेत अडकून तेथे राहाणार्या मृत्युरूप हत्तीला भीत असतो. कधी कधी थंडी, वारा इत्यादी अनेक प्रकारच्या आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांची निवृत्ती करण्यात तो जेव्हा असफल होतो, त्यावेळी अपार विषयांच्या चिंतेने तो खिन्न होतो. कधी आपापसात खरेदी-विक्री करताना लबाडी केली, तर थोडेसे धन याच्या हाती लागते. कधी धन संपल्यावर जेव्हा याच्याजवळ झोपणे, बसणे, खाणे इत्यादीसाठी आवश्यक सामग्री राहात नाही, तेव्हा आपले इच्छित भोग न मिळाल्याकारणाने तो चोरी इत्यादी वाईट मार्गांनी ते मिळविण्याचा निश्चय करतो. यामुळे त्याला सगळीकडून दुसर्यांकडून अपमानित व्हावे लागते. अशा प्रकारे धनाच्या आसक्तीने एकमेकांत वैरभाव वाढूनही हा आपल्या पूर्वीच्या वासनांनी लाचार होऊन आपापसात वैवाहिक संबंध जोडतो आणि तोडतो (सुद्धा). या संसारमार्गावर चालणारा हा जीव अनेक प्रकारचे क्लेश आणि विघ्नांनी त्रस्त होऊनही वाटेत एखाद्यावर जेव्हा आपत्ती येते किंवा जो कोणी मृत्यू पावतो, त्याला तेथेच सोडून देतो आणि नव्याने जन्मलेल्यांची संगत धरतो. कधी कोणासाठी शोक करतो, कोणाचे दुःख पाहून मूर्च्छित होतो, कोणाचा वियोग होईल या शंकेने भयभीत होतो. कोणाशी भांडण-तंटा करतो, काही संकट आले तर रडू-ओरडू लागतो, कधी एखादी मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने हुरळून जातो, कधी गाऊ लागतो, तर कधी त्यांच्यासाठी बंधनात पडण्यात संकोच करीत नाही.साधुवृंद याच्याकडे कधी येत नाहीत आणि हा साधु-संगतीपासून नेहमी वंचित राहातो. अशा प्रकारे हा नेहमी पुढेच जात आहे. जेथून याची यात्रा सुरू झाली आणि जेथे या यात्रेचा शेवट समजला जातो, त्या परमात्म्याजवळ मात्र अजूनही हा परतत नाही. योगशास्त्राचीसुद्धा परमात्म्यापर्यंत झेप पोहोचत नाही. ज्यांनी सर्व प्रकारे प्राण्यांना पीडा देणे इत्यादींचा त्याग केला आहे, ते निवृत्तिपरायण संयमी मुनिजनच त्याला प्राप्त करू शकतात. दिग्गजांना जिंकणारे आणि मोठ-मोठया यज्ञांचे अनुष्ठान करणारे राजर्षीसुद्धा येथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ते युद्धभूमीवर शत्रूंशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात. तसेच जिच्याविषयी "ही माझी आहे" असा अभिमान धरून त्यांनी वैर मांडले होते, त्या पृथ्वीवरच आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोकाला जातात. आपल्या पुण्यकर्मरूप वेलीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तींपासून आणि नरकातून सुटका करून घेतली, तरी पुन्हा या संसारमार्गात भटकत या जनसमुदायामध्ये तो मिसळून जातो. स्वर्ग इत्यादी ऊर्ध्वलोकांत जाणार्यांचीही हीच दशा होते. (३३-४१) राजर्षी भरतांच्याविषयी असे म्हणतात - जसे एखादी माशी गरुडाशी बरोबरी करू शकत नाही, त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरतांच्या मार्गाचे अन्य कोणी राजा मनानेसुद्धा अनुकरण करू शकत नाही. पुण्यकीर्ती श्रीहरींमध्ये अनुरक्त होऊन त्यांनी टाकण्यास कठीण अशा मनाला भुरळ पाडणार्या स्त्री, पुत्र, मित्र आणि राज्य यांचासुद्धा तारुण्यावस्थेतच विष्ठेप्रमाणे त्याग केला होता. त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी, पुत्र, स्वजन, संपत्ती आणि स्त्रीची एवढेच काय जिच्यासाठी मोठमोठया देवता आसुसलेल्या असतात; परंतु जी स्वतः भरतांच्या स्वतःवरील मर्जीसाठी त्यांच्यावर दयादृष्टीने पाहात होती, त्या लक्ष्मीचीसुद्धा त्यांना मुळीच इच्छा नव्हती. हे सर्व त्यांनाच शोभणारे होते. कारण ज्या महानुभावांचे चित्त भगवान मधुसूदनांच्या सेवेमध्ये तल्लीन झालेले आहे, त्यांच्या दृष्टीने मोक्षपदसुद्धा तुच्छ आहे. मृगशरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्चस्वरात ते म्हणाले होते की, धर्माचे रक्षण करणारे धर्मानुष्ठानामध्ये निपुण, योगस्वरूप सांख्ययोगाचे प्रतिपादक, प्रकृतीचे अधीश्वर, यज्ञमूर्ती (अशा) सर्वांतर्यामी श्रीहरींना नमस्कार असो. राजर्षी भरतांचे पवित्र गुण आणि कर्मांची भक्तजनसुद्धा प्रशंसा करतात. त्यांचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद, आयुष्य आणि धनाची वृद्धी करणारे, लोकांमध्ये सुयश वाढविणारे आणि अंती स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे. जो पुरुष हे ऐकतो, दुसर्यांना ऐकवितो आणि याची प्रशंसा करतो, त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात. त्याला दुसर्यांकडे काहीही मागावे लागत नाही. (४२-४६) स्कंध पाचवा - अध्याय चौदावा समाप्त |