श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय १३ वा

संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहूगणाची संशयनिवृत्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जडभरत म्हणाला - (ज्याप्रमाणे पैशाच्या मागे लागलेला व्यापार्‍यांचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखाद्या दुर्गम अरण्यात पोचावा त्याप्रमाणे) मायेने संसारातून तरून जाण्यास कठीण अशा प्रवृत्तिमार्गात ढकललेला हा जीवसमूह, सुखरूप धनाच्या आशेने रज, तम, सत्त्व या गुणांनी निर्माण केलेली कर्मे स्वतःचे कर्तव्य समजून करीत संसाररूप अरण्यात जाऊन पोहोचतो. तेथे त्याला जराही सुख मिळत नाही. हे राजा, त्या अरण्यात (प्रपंचविषयक) कुबुद्धी असणार्‍या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे सहा चोर बळेच लुबाडतात. (म्हणजेच धर्मासाठी वापरावयाचे द्रव्य स्वतःच्या उपभोगासाठी वापरतात.) लांडग्यांनी कळपातील मेंढराला आपापल्याकडे ओढावे, तसे स्त्रीपुत्रादीरूप कोल्हे परमार्थाविषयी बेसावध असणार्‍या जीवाला आपापल्याकडे ओढत असतात. पुष्कळ वेली, गवत, झुडपे यांमुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोचलेल्या माणसाला डास, मधमाशा यांनी हैराण करावे, त्याप्रमाणे कामना, निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहाणार्‍या माणसाला दुर्जन लोक सतावून सोडतात. काहीवेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी, तसे हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागते. काहीवेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारे प्रकाशित पिशाच दिसावे व त्याने त्याच्या आकर्षणाने त्याच्या पाठोपाठ पळावे, तसा संसारारण्यातील हा जीव सोन्याच्या (द्रव्याच्या) आकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळविण्यासाठी खूप खटपट करतो. अरण्यात पोचलेला माणूस राहाण्यासाठी जागा, पाणी, द्रव्य इत्यादी मिळविण्यासाठी इकडेतिकडे भटकतो, त्याचप्रमाणे संसाररुप अरण्यात आलेला जीव राहाण्यासाठी घर, अन्नपाणी, द्रव्य इत्यादी मिळविण्यासाठी खूप धावाधाव करतो (आणि ते मिळाल्यावर त्याच्याविषयी आपलेपणा बाळगून ते गेले असता खूप दुःखी होतो.) वावटळीमुळे उडालेली धूळ सगळीकडे भरल्यामुळे व डोळ्यांतही गेल्यामुळे अरण्यात गेलेल्या जीवाला जशा दिशा कळत नाहीत, त्याचप्रमाणे वावटळीप्रमाणे गरगर फिरणार्‍या स्त्रीच्या प्रेमविलासादिकांनी ज्याची दृष्टि धुंद झालेली असते, असा जीव कर्माच्या साक्षी असणार्‍या दिशारूप देवतांना जाणत नाही (आणि मनसोक्त कुकर्मे करीत राहतो.) न दिसणार्‍या घुंगुर्टयांच्या आवाजाने कानशूळ उठलेला अरण्यवासी घुबडांच्या घूत्काराने भयभीत होतो. भुकेने व्याकूळ झाला की, बिब्यासारख्या निषिद्ध झाडांच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मृगजळाकडे धाव घेतो. त्याचप्रमाणे संसारारण्यातील जीव पाठीमागे निंदा करणार्‍यांच्या शब्दांनी जसा व्यथित होतो, तसाच समोर अपशब्द बोलणार्‍यांच्या वाग्बाणांनी घायाळ होतो. भुकेने व्याकूळ झाला की, धर्मभ्रष्ट लोकांचे अन्न सेवन करतो आणि विषय मृगजळासारखे आहेत, हे माहीत असूनही त्यांच्या मागे लागतो. पाणी नसणार्‍या नदीत पडल्यामुळे माणसाचे हातपाय मोडतात व पाणीही मिळत नाही, त्याप्रमाणे हा जीव इहपरलोकी दुःखदायक असणार्‍या नास्तिकमताचा स्वीकार करून दुःखी होतो. नातलगांकडून अन्नवस्त्रादिकांची आशा करतो. अरण्यवासी कधी वणव्यात सापडून होरपळतो, तर कधी पिशाच्चांना पाहून जीव घेतल्यासारखा दुःखी होतो, तसाच संसारारण्यातील प्राणी वणव्यासारख्या दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने होरपळतो, तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धन कर इत्यादी रूपाने हिरावून घेतल्याने जीव गेल्यासारखा कष्टी होतो. अधिक बलवान असलेल्या कोणी कधी याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निपचित होऊन पडतो. आणि कधी गंधर्वनगरीप्रमाणे असणार्‍या मनासारख्या नातलगांत जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून आनंद मानू लागतो. काटया-कुटयांनी पायाची चाळणी झालेला अरण्यवासी जेव्हा पर्वतावर चढू इच्छितो, तेव्हा उदास होतो; त्याप्रमाणे संकटांनी वेढलेला जीव मोठमोठी कामे करू इच्छितो, तेव्हा निराश होतो. कधी तो भुकेच्या आगीने संतप्त होऊन आपल्या नातलगांवरच चिडू लागतो. कधी झोपरूपी अजगराचा घास बनून वनात फेकून दिलेल्या मुडद्याप्रमाणे पडून राहतो. यावेळी त्याला काहीच शुद्ध नसते. कधी विषारी जंतू चावावे, तसे दुष्ट याला पिडू लागतात, तेव्हा त्यांच्या विषारी वाग्बाणांनी विवेकशून्य होऊन एखाद्या अंधार्‍या विहिरीत पडावे, त्याप्रमाणे घोर दुःखमय अंधकारात शुद्ध-बुद्ध हरपून पडून राहतो. कधी परस्त्री-परधनरूप मधाच्या शोधात तो फिरतो, तेव्हा त्याचे मालकरूप मधमाशा याच्या नाकात दम आणतात आणि याचा सर्व अभिमान नष्ट होतो. अनेक संकटांचा सामना करून यदाकदाचित तो मध त्याला मिळाला, तरी दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात व पुन्हा त्यांच्याकडून इतरच तो हिसकावून घेतात. कधी थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यांपासून आपले संरक्षण करण्यास तो असमर्थ होतो. कधी आपापसात थोडी देवघेव करतो, तेव्हा पैशाच्या लोभाने दुसर्‍यांना फसवून त्यांच्याशी वैर मांडतो. कधी कधी त्या संसारवनात याचे धन नष्ट होते, तेव्हा याच्याजवळ अंथरूण-पांघरूण, आसन, घर आणि वाहनसुद्धा उरत नाही, तेव्हा तो दुसर्‍यांकडे याचना करतो. आणि मागूनही दुसर्‍याकडून इच्छित वस्तु मिळाली नाही की, दुसर्‍याच्या वस्तूंवर डोळा ठेवल्यामुळे तो त्यांच्याकडून अपमानित होतो. (१-१२)

अशा प्रकारे व्यावहारिक संबंधांच्यामुळे एकमेकांविषयी वैरभाव वाढल्यावरसुद्धा तो जीवसमूह आपापसात विवाहादी संबंध घडवून आणतो. आणि पुन्हा या मार्गात निरनिराळे कष्ट आणि धनक्षय होणे इत्यादी संकटे भोगता भोगता मृतवत होऊन जातो. साथीदारांपैकी जे जे मृत्युमुखी पडतात, त्यांना जिथल्या तिथे सोडून नवीन उत्पन्न झालेल्या साथीदारांना घेऊन तो जीवसमूह पुढे जातच राहतो. वीरवरा, त्यांपैकी कोणताही प्राणी आजपर्यंत परत आला नाही किंवा कोणीही हा संकटमय मार्ग पार करून परमानंदमय योगाला शरण गेला नाही. ज्यांनी मोठमोठया दिग्गजांना जिंकले आहे, ते धीर-वीर पुरुष सुद्धा पृथ्वीवर "ही माझी आहे," असा अभिमान धरून आपापसात वैर पत्करून संग्राम-भूमीवर लढून मरण पत्करतात, पण वैरहीन परमहंसांना जे भगवान विष्णूंचे अविनाशी पद मिळते, तेथे हे जात नाहीत. (१३-१५)

वेलींच्या कोवळ्या फांद्यांप्रमाणे असलेल्या स्त्रियांच्या बाहूंचा आश्रय घेऊन त्यांच्या ठिकाणी जीव आसक्त होतो. वेलींच्या फांद्यांवर बसून किलबिल करणार्‍या पक्ष्यांप्रमाणे स्त्रियांच्या कडेवर असून बोबडे बोलणार्‍या मुलांची त्याला ओढ लागते. काही वेळा सिंहांच्या कळपाप्रमाणे असणार्‍या जन्ममरणरूप कालचक्राला भिऊन, यापासून सुटका होण्यासाठी तो बगळे, कावळे, गिधाडे यांच्यासारख्या नास्तिक मतांचा स्वीकार करून त्याप्रमाणे वागू लागतो. जेव्हा त्यांच्याकडूनही काही फलप्राप्ती होत नाही, तेव्हा तो हंसांसारख्या ब्राह्मण कुळात प्रवेश करू इच्छितो. परंतु त्याला त्यांचे आचरण कठीण असल्यामुळे आवडत नाही. म्हणून वानरासारख्या आचारशून्य लोकांशी मैत्री करून त्यांच्या जातिस्वभावानुसार दांपत्यसुखात मग्न होऊन विषयभोगांनी इंद्रियांना तृप्त करीत राहतो. आणि एकमेकांची तोंडे पाहाण्यातच आपल्या आयुष्याचा कालावधी विसरतो. तेथे झाडांप्रमाणे तात्पुरते सुख देणार्‍या घरांत राहून पत्‍नीपुत्रांच्या प्रेमांत गुरफटून विषयसुखे भोगता भोगता दीनवाणा होऊन जातो. अशा रीतीने या संसारबंधनातून बाहेर पडायला असमर्थ असलेला तो स्वतःच्या या चुकीमुळे पर्वताच्या कडयांवरून खाली दरीत कोसळावे, तसा रोगादी दुःखांत सापडतो. दरीत कोसळणारा मनुष्य दरीत असलेल्या हत्तीच्या भीतीने हाताला लागलेल्या एखाद्या वेलीला लोंबकळत राहावा, तसा हा जीव त्या वेलीसारख्या असणार्‍या आपल्या पूर्वकर्माला पकडून तसाच राहू लागतो. शत्रुदमना, एखादेवेळी या ना त्या रीतीने या आपत्तीतून त्याची सुटका झाली, तरी तो पुन्हा आपल्या गोतावळ्यातच येतो. जो मनुष्य मायेच्या प्रेरणेने एक वेळ या प्रवृत्तिमार्गात येऊन पोहोचतो, तो संसारचक्रात फिरत राहिल्याने शेवटपर्यंत त्याला आपल्या परमपुरुषार्थाचा पत्ता लागत नाही. रहूगणा, तूसुद्धा याच मार्गात भटकत आहेस. म्हणून आता प्रजेला शिक्षा करणे सोडून सर्व प्राण्यांचा मित्र हो आणि विषयांबाबत अनासक्त होऊन भगवत्सेवेने धारदार केलेल्या ज्ञानरूप खड्‍गाने हा संसारमार्ग पार कर. (१६-२०)

राजा म्हणाला - अहो ! सर्व योनींमध्ये हा मनुष्य-जन्मच श्रेष्ठ आहे. इतर लोकांमध्ये प्राप्त होणार्‍या देवादी उत्कृष्ट जन्मांचासुद्धा काय लाभ ? तेथे भगवान हृषीकेशांच्या पवित्र यशाने शुद्ध अंतःकरण झालेल्या आपल्यासारख्या महात्म्यांचा अधिकाधिक सहवास लाभत नाही. आपल्या चरणकमलांच्या धुळीचे सेवन केल्याने ज्यांचे सर्व पाप-ताप नष्ट झाले आहेत, त्या महानुभावांना भगवंतांची विशुद्ध भक्ती प्राप्त व्हावी, यात काही आश्चर्य नाही. आपल्याशी दोन घटकाच सहवास झाल्याने माझे सर्व कुतर्कमूलक अज्ञान नष्ट झाले आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्यांमध्ये जे वयोवृद्ध आहेत, त्यांना नमस्कार असो. जे कुमार आहेत, त्यांना नमस्कार असो. जे तरुण आहेत, त्यांना नमस्कार असो. जी लहान मुले आहेत, त्यांनाही नमस्कार असो. जे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण अवधूतवेषाने पृथ्वीवर भ्रमण करतात, त्यांच्यापासून आमच्यासारख्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या राजांचे कल्याण होवो. (२१-२३)

श्रीशुक म्हणतात - उत्तरानंदना, अशा प्रकारे त्या श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षिपुत्राने आपला अपमान करणार्‍या सिंधुनरेश रहूगणालासुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्त्वाचा उपदेश केला, तेव्हा रहूगणाने दीन होऊन त्याच्या चरणांना वंदन केले. नंतर पूर्ण भरलेल्या समुद्राप्रमाणे ज्याच्या अंतःकरणातील इंद्रियांच्या लाटा शांत आहेत, असा भरत तशाच स्थितीत पृथ्वीवर भ्रमण करू लागला. सौवीरपती रहूगणाला त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमात्मतत्त्वाचे ज्ञान होऊन त्याने अविद्येमुळे अंतःकरणात दृढ असलेल्या ‘देह हाच आत्मा ’ या बुद्धीचा त्याग केला. राजा, जे लोक भगवंतांच्या आश्रयाला असणार्‍या अनन्य भक्तांना शरण जातात त्यांचा असाच प्रभाव असतो(२४-२५)

राजा परीक्षित म्हणाला - महाभागवत मुनिश्रेष्ठ ! आपण मोठे विद्वान आहात. आपण रूपकाच्या द्वारे अप्रत्यक्षपणे जीवाच्या ज्या संसाररूप मार्गाचे वर्णन केले आहे, त्या विषयाची कल्पना विवेकी पुरुषांच्या बुद्धीने केली आहे. अल्पबुद्धीच्या मनुष्यांना याची सहजतेने कल्पना येऊ शकत नाही. म्हणून हा रूपकात्मक दुर्बोध विषय साध्या शब्दात स्पष्टीकरण करून सांगावा. (२६)

स्कंध पाचवा - अध्याय तेरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP