श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय १२ वा

रहूगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रहूगण म्हणाला - भगवन, मी आपल्याला नमस्कार करतो. आपण जगताचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केला आहे. हे योगेश्वरा, आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आहात आणि एका मूर्ख ब्राह्मणाच्या वेषाने आपल्या नित्यज्ञानमय स्वरूपाला लपविले आहे. मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. ब्रह्मन, जसे तापाने फणफणलेल्या रोग्याला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृततुल्य वाटते, त्याचप्रमाणे ज्याच्या विवेकबुद्धीला देहाभिमानरूप विषारी सर्पाने दंश केला आहे, अशा मला आपले वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे. माझ्या शंकांचे निरसन मी आपल्याकडून मागाहून करून घेईन. आता आपण मला जो अध्यात्मयोगमय उपदेश केला आहे, तो अगोदर सोपा करून सांगा. तो समजावून घेण्याची मला मोठी उत्कंठा लागली आहे. हे योगेश्वरा, आपण जे सांगितलेत की, ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम ही दोन्ही प्रत्यक्ष असूनसुद्धा केवळ व्यवहारमूलकच आहेत. तत्त्वविचारासमोर ही दोन्ही टिकत नाहीत. याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या या म्हणण्याचे मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही. (१-४)

जडभरत म्हणाला - हे पृथ्वीपते, हा देह पृथ्वीचा विकार आहे. जेव्हा हा कोणत्यातरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो, त्यावेळी त्याला ओझेवाला इत्यादी नाव पडते. याला दोन पाय आहेत, त्यावर घोटे, पिंडर्‍या, गुडघे, जांघ, कंबर, वक्षःस्थळ, मान आणि खांदे हे अवयव आहेत. खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे, त्यामध्येसुद्धा सौवीरराज नावाचा एक पार्थिव विकारच आहे. त्यावर आत्मबुद्धिरूप अभिमान धरल्याने, तू, "मी सिंधु देशाचा राजा आहे," या प्रबळ गर्वाने आंधळा झाला आहेस. परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. वास्तविक तू तर मोठा क्रूर आणि उद्धटच आहेस. तू या बिचार्‍या दीन-दुःखी भोयांना वेठबिगारीने पकडून पालखीला जुंपले आहेस आणि पुन्हा महापुरुषांच्या सभेत आढयतेने सांगतोस की, मी लोकांचे रक्षण करणारा आहे. हे तुला शोभत नाही. आम्ही पाहातो की, ही संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासूनच उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच लीन होतात. निरनिराळ्या कर्मांच्यामुळेच त्यांची वेगवेगळी नावे पडली आहेत. याशिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे, हे सांग पाहू ? (५-८)

याचप्रमाणे ‘पृथ्वी’ शब्दाचा व्यवहारसुद्धा मिथ्या आहे, कारण ही आपले उपादानकारण असलेल्या सूक्ष्म परमाणूंमध्ये विलीन होऊन जाते. आणि ज्यांच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीरूप कार्याची सिद्धी होते, ते परमाणूही मनानेच अज्ञानाने कल्पिलेले आहेत. तसेच जे काही कृश-जाड, लहान-मोठे, कार्य-कारण, चेतन-अचेतन इत्यादी द्वैत दिसते, तेसुद्धा द्रव्य, स्वभाव, आशय, काल, कर्म इत्यादी नावे असलेले भगवंतांच्या मायेचेच कार्य समज. विशुद्ध परमार्थरूप अद्वितीय तसेच आत-बाहेर या भेदाव्यतिरिक्त परिपूर्ण ज्ञान, हीच सत्य वस्तू आहे. ते सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे. त्याचेच नाव ‘भगवान ’ असून त्यालाच पंडित ‘वासुदेव ’ म्हणतात. रहूगणा, महापुरुषांच्या चरणधुळीत आपण न्हाऊन निघाल्याशिवाय केवळ तप, यज्ञादी वैदिक कर्मे, दान, गृहस्थोचित धर्मानुष्ठान, वेदाध्ययन किंवा पाणी, अग्नी, अथवा सूर्य यांची उपासना अशा कोणत्याही साधनाने हे परमात्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण महापुरुषांच्या समुदायात नेहमी पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणांची चर्चा होत असते. त्यामुळे विषयवार्ता त्यांच्याजवळ फिरकतही नाही. आणि जेव्हा भगवत्कथेचे नेहमी सेवन केले जाते, तेव्हा ते मुमुक्षूंच्या शुद्ध बुद्धीला भगवान वासुदेवांमध्ये स्थिर करते. (९-१३)

पूर्वजन्मी मी भरत नावाचा राजा होतो. ऐहिक आणि पारमार्थिक विषयांपासून विरक्त होऊन भगवंतांची आराधनाच करीत असे. तरीसुद्धा एका हरिणात आसक्त झाल्याने मला परमार्थापासून भ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी हरीण व्हावे लागले. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या प्रभावाने त्या हरीण योनीतसुद्धा माझ्या पूर्वजन्माची स्मृती नाहीशी झाली नाही. म्हणूनच मी आता जनसंपर्काला भिऊन नेहमी अनासक्त राहून गुप्तरूपानेच विहार करीत असतो. तात्पर्य, विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खड्‌गाच्या योगाने मनुष्याने या लोकातच मोहबंधने तोडून टाकली पाहिजेत. नंतर श्रीहरींच्या लीलांचे कथन आणि श्रवण यांनी भगवत्स्मृती कायम राहिल्याकारणाने तो सहजपणेच संसारमार्ग पार करून भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो. (१४-१६)

स्कंध पाचवा - अध्याय बारावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP