श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ५ वा - अध्याय ११ वा

राजा रहूगणाला भरताचा उपदेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जडभरत म्हणाला - राजा, तू अज्ञानी असूनसुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहाता तर्कवितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस. म्हणून काही श्रेष्ठ ज्ञानी लोकांत तुझी गणना होऊ शकत नाही. या व्यवहाराला तत्त्वज्ञानी पुरुष तत्त्वविचाराच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारीत नाहीत. हे राजा, लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहारसुद्धा सत्य नाहीत. कारण वेदवाक्येसुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेली आहेत. राग-द्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्त्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती, खरे पाहाता त्यातसुद्धा झालेली नाही. गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही, त्यांना तत्त्वज्ञान समजावून सांगण्यास साक्षात उपनिषद्-वाक्येसुद्धा समर्थ नाहीत. जोपर्यंत मनुष्याचे मन सत्त्व, रज किंवा तमोगुणाच्या अधीन असते, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो. हे मन वासनामय, विषयासक्त, गुणांनी प्रेरित, विकारी आणि पंचमहाभूते व इंद्रिये या सोळा कलांमध्ये प्रमुख आहे. हेच निरनिराळ्या नावांनी देव, मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधींच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते. हेच मायेचे आवरण असलेले मन संसारचक्रामध्ये गुंतवणारे आहे. हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुख-दुःख आणि याव्यतिरिक्त मोहरूप अशा फलांची प्राप्ती करून देते. जोपर्यंत हे मन असते, तोपर्यंतच जागेपणीचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात. म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे, असे सांगतात. विषयासक्त मन जीवाला संसार-संकटात टाकते. तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षपद प्राप्त करून देते. जसे तुपाने भिजलेली वात खाणार्‍या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते, तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्त्वामध्ये विलीन होते. त्याचप्रमाणे विषय आणि कर्मांमध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहाते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्त्वामध्ये विलीन होते. (१-८)

हे वीरवरा, पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये आणि एक अहंकार, या अकरा मनाच्या वृत्ती आहेत. तसेच पाच प्रकारची कर्मे, पाच तन्मात्रा आणि एक शरीर हे अकरा त्याचे आधारभूत विषय समजले जातात. गंध, रूप, स्पर्श, रस, आणि शब्द हे पाच ज्ञानेंद्रियांचे विषय होत. मलत्याग, संभोग, जाणे-येणे, भाषण आणि देणे-घेणे इत्यादी क्रिया हे पाच कर्मेंद्रियांचे विषय आहेत. तसेच "हे माझे आहे" असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे. काही लोक अहंकाराला मनाची बारावी वृत्ती आणि त्याचा आश्रय असणार्‍या शरीराला बारावा विषय़ मानतात. मनाच्या या अकरा वृत्ती, विषय, स्वभाव, संस्कार, कर्म आणि काल यांमुळे शेकडो, हजारो, आणि कोटयवधी भेदांमध्ये व्यक्त होतात. परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच यांचे अस्तित्व आहे, स्वतःमुळे किंवा एकमेकात मिसळल्यामुळे नाही. मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे. हे विशेषतः संसारबंधनात टाकणार्‍या अशुद्ध कर्मांतच प्रवृत्त होऊन राहाते. याच्या या वरील वृत्ती प्रवाहरूपाने नित्यच असतात. जागेपणी आणि स्वप्नावस्थेत त्या प्रगट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहातात. या दोन्ही अवस्थांमधे विशुद्ध, चिन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ, मनाच्या या वृत्तींना साक्षीरूपाने पाहात राहतो. (९-१२)

हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्वव्यापक, जगताचे आदिकारण, परिपूर्ण, प्रत्यक्ष स्वयंप्रकाश, अजन्मा, ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणार्‍या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा आश्रयरूप असा भगवान वासुदेव आहे. जसा वायू सर्व स्थावर-जंगम प्रांण्यांमध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो, त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्वसाक्षी आत्मस्वरूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे. जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निरास करून सर्वांची आसक्ती सोडून आणि काम-क्रोधादी सहा शत्रूंना जिंकून आत्मतत्त्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत तो आत्म्याच्या उपाधिरूप मनाला संसार-दुःखाचे कारण समजत नाही, तोपर्यंत तो या लोकी असाच भटकत राहातो. कारण त्याचे चित्त त्याचा शोक, मोह, रोग, राग, लोभ, वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहाते. हे मनच तुझा मोठा बलवान शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखी वाढते. जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे, तरीसुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे. म्हणून तू स्वतः श्रीगुरू आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. (१३-१७)

स्कंध पाचवा - अध्याय अकरावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP